Thursday, November 11, 2021

Tupacha Nandadeep, तुपाचा नंदादीप, ग. दि. माडगूळकर (प्रस्तावना वा. कृ. चोरघडे) by G.D. Madgulkar.


................................................................................................
................................................................................................

तुपाचा नंदादीप 

ग. दि. माडगूळकर 

(प्रस्तावना वा. कृ. चोरघडे) 
................................................
................................................

Tupacha Nandadeep

by G.D. Madgulkar
................................................................................................
................................................................................................


It's always a surprise, although it shouldn't be, that the beloved poet GaDiMa writes stories so very beautifully too; one always knew his poetry through films he wrote for, and since his brother Vyankatesh Madgulkar was known for literature - having read his famous Kaalie Aaie, in a text for a grade far higher than one's own, in 1965 - one assumed, wìth naivete of a child of ten, that the brothers had divided regions of literature between the two, each master of his part. 

Well, GaDiMa is king of storytelling too! And while he tells of the life and region shared by the family, too, with the same reality in his portrature that is characteristic of his brother'swork, there's a slight difference. Vyankatesh Madgulkar can write of unpleasant reality, and horrify one, and more. The elder brother GaDiMa retains his "praasaadik" quality in his stories that his poetry is known for, and brings a feeling of all is right with everything, nevertheless, despite it all. 

In this collection is a pleasant surprise, his account of a king of a small state as hundreds of states that existed until when, shortly after independence, they were convinced by Sardar Patel to join India formally. This was not a name famous beyond its birders, but the portrait by GaDiMa is so very beatific, benevolent, one wishes one had known it, while it still was so very beautiful. 

He describes it in two of the stories here, and leaves one with an impression of a heaven that existed. 
................................................................................................


"राजधानीचा गावही राजाला शोभेसाच होता. लहानसा पण टुमदार. त्या एवढ्याशा गावात हायस्कूल होते. ‘त्र्यंबक कलाभुवन’ नावाची एक औद्योगिक शिक्षण-संस्था होती. अनंत मनोहर जोशी यांच्यासारखे तपस्वी गायक राजाने जवळ केले होते. त्यांच्याकरवी तो गायनकलेचे विद्यादान करीत होता. राजा स्वत: तर, चित्रकलेचा छांदिष्ट म्हणविण्याइतका प्रेमी होता. औंध संस्थानातील शाळांतून चित्रकलेचे शिक्षण सक्तीचे होते. राजा कलाप्रेमी होता; तसाच धर्मनिष्ठही होता. कीर्तन या उपदेशकांच्या परंपरागत संस्थेवर त्याची प्रगाढ श्रद्धा होती. कीर्तनकाराच्या शिक्षणाची सोयही राजधानीच्या गावी होती. महाराष्ट्रीय थोर थोर कीर्तनकार राजाने पदरी बाळगले होते. त्याचा राजवाडा साधाच होता. लक्ष्मीपेक्षा सरस्वतीचाच संचार त्या प्रासादात आधिक्याने होत होता. राजवाड्याच्या दर्शनी अंगणात सहा ऋतूंचे प्रतीकात्मक पुतळे उभे होते. तर पिछाडीच्या बाजूला मूर्तिकारांनी आपला कारखाना ठेवला होता. माडीवरील एका दालनात अजंठ्यातील चित्रकृतींच्या प्रतिकृती जशाच्या तशा चितारल्या होत्या, त्या दालनाचे नावच होते अजंठा हॉल. राजवाड्यातला चित्रसंग्रह खरोखरच अवर्णनीय होता. राजाच्या निद्रागारात पूर्ण नलोपाख्यान तसबिरींच्या रूपाने लटकत होते; तर एखादे दालन गजगौरीच्या चित्रकथेने सुशोभित झाले होते. भारतातील सर्व नामांकित चित्रकारांच्या कलाकृती त्या राजवाड्यात होत्या. भिवा सुताराच्या रामपंचायतनापासून कोट्याळकरांच्या तांडवनृत्यापर्यंत वेगवेगळ्या कलाकृती दालनादालनातून लटकविलेल्या होत्या. राजा तसा विद्याविभूषित होता. डेक्कन कॉलेजात त्याचे शिक्षण झाले होते. बी.ए.ची उपाधी त्याने मिळवली होती. पुस्तकसंग्रहाइतकाच त्याचा वाद्यसंग्रहही त्याच्या चोखंदळपणाची साक्ष देत होता. साऱ्याच कलांना त्याच्या लेखी आदराचे स्थान होते. राजाचे कलाप्रेम हे त्याच्या ऐषआरामाचे द्योतक नव्हते. कलावंताच्या जबाबदारीची त्याला जाण होती. मोठमोठे शास्त्रीय गायक कऱ्हाड देवीपुढे कीर्तनाला उभे राहत होते. कलेचे हात संस्कृतिवर्धनासाठी राबत होते. राजाची देवावर निष्ठा होती. धर्मावर श्रद्धा होती. गीर्वाण भाषेतील साहित्यावर तो जणू लुब्ध होता. त्याच्या ह्या सर्व आवडी-निवडी त्याच्या निवासस्थानात साकारलेल्या दिसत होत्या. मी औंध हायस्कूलात दाखल झालो. मला विद्या मोफत मिळत होती; रोजचे अन्नही विनामूल्य मिळत होते. मला राजाश्रय मिळाला होता, पण राजकृपा मात्र माझ्या वाट्याला आली नव्हती. औंध हायस्कुलात शिकणाऱ्याविद्यार्थ्यांना राजाच्या डोळ्यांत भरणे फारसे अवघड नव्हते. कारण राजाची दृष्टी सर्वांत अधिक शिक्षणसंस्थांवर होती. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी त्याच्या मनी उपजत माया होती. भूत आणि वर्तमानापेक्षा भविष्याबद्दल तो अधिक जागरूक होता. विद्यार्थ्यांसाठी त्याने अनेक सोयी केल्या होत्या. प्राथमिक शिक्षणाला कुठेच शुल्क नव्हते. माध्यमिक शिक्षणाची फी होती केवळ दोन आणे. औंधला तर विद्यार्थ्यांसाठी फ्री बोर्डिंग होते. अत्यंत अल्प भाड्याची वसतिगृहे होती. त्या वसतिगृहांतील खोलीचे भाडे देखील केवळ सहा आणे मासिक. मी पंचवटी नावाच्या वसतिगृहात राहत होतो. फ्री बोर्डिंगातील अन्नावर निर्वाह चालला होता. जगदंबेच्या नैवेद्याइतकेच राजाचे लक्ष विद्यार्थ्यांसाठी शिजवल्या गेलेल्या अन्नाकडे असे. विद्यार्थ्यांसाठी त्याने सर्व सुखसोई तर केल्या होत्याच; पण त्यांच्यावर कसलाही कुसंस्कार घडू नये याचीही काळजी त्याने कटाक्षाने घेतली होती. औंध गावात कुठेही एक कपभर चहा विकत मिळत नव्हता. एकही सिनेमागृह नव्हते. कधीमधी राजाच एखादा सिनेमा विद्यार्थ्यांना दाखवी. तो कार्यक्रम जगदंबेच्या देवळात व्हायचा. परदेशात छोटेछोटे शास्त्रविषयक बोलपट निर्माण होत असत. राजा ते मागवून घेई आणि राजकुटुंबीय मुलांबरोबर सर्व शाळकरी मुलांना दाखवी. कधी कधी राजा दूरच्या प्रवासाला जाई. त्या प्रवासाचे चलच्चित्रपट तयार करवी आणि तेही जगदंबेच्या मंदिरात आम्हांला दाखवी; चलच्चित्रपटाची सर्व साधनसामग्री तेवढ्यासाठी त्याने खरेदी केली होती. चित्रपट घेणारे कारागीर पदरी बाळगले होते."
................................................................................................


"मी दोन्ही पायांवर उठून उभा राहिलो आणि राजा खो खो हसू लागला. त्याला सारे माझे नाटकातील काम आठवत होते. मी जवळ जाताच त्याने माझ्या हातावर बक्षीस ठेवले आणि जोराने माझी पाठ थोपटली. जिंकलेल्या पैलवानाचा दंड धरून त्याला फडात फिरवतात तसा राजाने माझा दंड धरला आणि लोकांना उद्देशून तो म्हणाला, “हा मुलगा हास्याचे डोंगर उत्पन्न करील. बाळ, तू टाकीत जा. शिकला नाहीस तरी चालेल.” त्याने मला सांगितले. टाकीत म्हणजे बोलक्या सिनेमात. इंग्रजी शब्द जाणूनबुजून अशुद्ध उच्चारण्याची त्याची लकब होती. राजाज्ञेप्रमाणे मी शिकलो नाहीच, टाकीत गेलो. मधल्या काळात राजाने आपल्या राज्यात असंख्य सुधारणा केल्या. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच आठ वर्षे त्याने आपल्या प्रजाजनांना स्वातंत्र्य बहाल करून टाकले. औंध संस्थानात निवडणुकीची धमाल उडाली. राजाचा एक मुलगा परदेशातून बॅलिस्टर होऊन आला होता. त्याने अगदी राजाच्या हातावर हात मारला. त्यालाच जनतेने संस्थानी राज्याचा मुख्य प्रधान केला. राज्यकारभाराची घटना राजाने खुद्द महात्मा गांधींच्या सल्ल्याने तयार करून आणली होती. मधल्या चारपाच वर्षांत मला राजदर्शन घडले नाही. मी कोल्हापूर संस्थानात होतो. संस्थाना-संस्थानांतला फरक पाहत होतो. एकदा असाच महाद्वार रस्त्याने जगदंबेच्या दर्शनाला मी चाललो होतो. एक मोटर माझ्या बाजूला अचानक थांबली. मी वळून पाहिले तो ‘औंधाचा राजा’. राजाचे शब्द माझ्या लक्षात होते. त्याचे उपकार मी विसरलो नव्हतो. राजाच्या पायाला हात लावण्याची इच्छा माझ्या मनी उफाळून आली, त्यापूर्वीच राजाने मोटरचे दार उघडले आणि माझ्या पाठीवर थाप मारली. तो मला विसरला नव्हता. म्हणाला, ‘बाळ, तुमची प्रगती आम्ही ऐकतो आहोत. आनंद वाटतो. आपल्या संस्थानचे नाव असेच उज्ज्वल करा. जगदंबा तुम्हांला उदंड आयुष्य देईल.’ राजा निघून गेला. त्याने सांगितलेल्या मार्गाने मी चालत राहिलो. भलीबुरी प्रगती करीत राहिलो. बेचाळीसच्या लढ्यात सातारच्या क्रांतिकारकांना आसरा मिळाला तो औंध संस्थानातच. त्याला इंग्रजांचे राज्य कधीच आवडत नव्हते. त्याची निष्ठा होती छत्रपती शिवाजीमहाराजांवर. तो स्वत: कीर्तन करी, त्या कीर्तनाची सर्व कथानके त्याने शिवचरित्रावरून गुंफली होती. स्वावलंबनाचा उपदेश तर तो आपल्या प्रजाजनांना सदैवच करीत असे. बलोपासना हा तर त्याच्या प्रगाढ निष्ठेचा विषय होता. त्याने आयुष्यभर कधीही परदेशी कपडा वापरला नाही. परदेशी वस्तू वापरली नाही. परदेशी वस्तूविरुद्ध तो एका सभेत बोलत असताना त्याच्याच - शिक्षणाने सुजाण झालेल्या - एका नागरिकाने त्याला खडसावून विचारले होते, “मग महाराज, मोटर कशी वापरता?” अमोघ वक्तृत्वाबद्दल प्रसिद्ध असलेल्या राजाची जीभ त्या प्रसंगी चाचरली होती. त्याचे डोळे गहिवरले होते. साद गहिवरला होता. त्या प्रजाजनाला त्याने उत्तर दिले होते... “माझ्या संस्थानचा मुलूख इतस्तत: पसरलेला आहे. एक तालुका सोलापुराजवळ तर दुसरा विजापूर हद्दीत. वेगवान वाहन नसेल तर माझ्या संस्थानच्या प्रत्येक खेड्यात जाणे मला अशक्य होईल. पुन्हा पुन्हा माझ्या प्रजाजनांची गठ पडणार नाही. नाइलाजाने मी हे परदेशी वाहन वापरत आहे. यंत्रे आणि औषधे या बाबतींत आपण दुबळे आहोत. त्या बाबतींतही हा देश स्वावलंबी झाल्याचे पाहण्यास परमेश्वराने आम्हांला आयुष्य द्यावे.” 1947 साली देश स्वतंत्र झाला. राजाचे डोळे कृतार्थ झाले. साऱ्या संस्थानभर महोत्सव साजरे केले गेले. पुढे दोन वर्षांतच राजाला आपले राज्यही भारतीय प्रजेच्या स्वाधीन करावे लागले. कृतार्थ राजयोग्यासारख्या त्याने त्या घटना आनंदाने पाहिल्या. हे आनंदवनभुवन त्याच्या समर्थ डोळ्यांनी फार पूर्वी पाहिले होते. त्याच्या निर्मितीसाठी करता येतील तितके प्रयत्न विधायकपणे केले होते."

"परवा, ‘दो आँखे बारह हाथ’ या मी लिहिलेल्या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले. त्या चित्रपटाची कथा मला औंध संस्थानच्या परिसरात सुचली होती. औंधच्या राजानेच तो अद्भुत प्रयोग करून पाहिला होता. ‘मॉरिस फ्रीडमन’ नावाच्या एका पोलिश तरुणाच्या सूचनेवरून गुन्हेगारांना उघड्या वस्तीत ठेवण्याचा प्रयोग औंधकरांनी केला होता. ती संस्था अल्पशेष अवस्थेत अजून आहे. माझ्या गावाजवळच आहे. तिथल्या खुनी कैद्यांनी मला सांगितले होते, ‘बेड्या काढताना राजाने आम्हांला जगदंबेसमोर नेऊन शपथा घेववल्या होत्या!’ माझ्या या चित्रपटात, या देवाच्याच धाकाचा उपयोग केला होता. माझ्या उद्योगाला राजाचे साहाय्य अशा तऱ्हाने झाले. राजाच्या हयातीनंतर झाले. ‘दो आँखे बारह हाथ’च्या यशाचे अभिनंदन करणारे एक पत्र मला आले. ते औंधाच्या राजाचे थोरले चिरंजीव बॅ. अप्पासाहेब पंत यांनी सिक्कीमहून लिहिले होते. त्यांनी लिहिले होते : ‘-तुझे अभिनंदन करू की कौतुक! गुन्हेगारांना माणुसकीने वागविण्याचा हा प्रयोग माझ्याच एका मित्राच्या सांगण्यावरून बाबांनी केला होता. आज बाबा असते तर...’ पुढची अक्षरे मला वाचवेनात किती तरी वेळ डोळे नुसते गळतच राहिले."
................................................................................................


"कोवळ्या उन्हाचा शेक अंगाला बरा लागत होता. पायांना थकण्याची कल्पना देखील नव्हती. चालता चालता आम्ही टेकाडावर चढलो तेव्हा दूरवर एका हिरव्या वनराईकडे बोट दाखवीत आबा म्हणाला, “ती बघ किन्हई.” मला नुसती झाडी दिसली. गावाचा मागमूस देखील लागला नाही. किन्हई गावाच्या आसपास हिरवी रुखावळ इतकी दाटली होती की, गावात आले तरी गाव आला आहे असे वाटले नाही. 

"एक सुंदर बगीचा आणि तिच्या मध्यभागी टुमदार कौलारू बंगली लागली तेव्हा मी आबाला विचारले, “आबा, हे काय?” 

"“लायब्री बंगला!” आबा म्हणाला. 

"“एवढे मोठे आहे गाव - लायब्ररी असण्याएवढे?” 

"“पूर्वी पंत सरकार गावातऱ्यात होतं तवाच्या बागा, इमारती ह्या. आता काय नाही.” आबाने उत्तर दिले. 

"‘लायब्ररी’ हा शब्द बहुतेक आबाला कळला नव्हता. औंधकर संस्थानिक त्या गावात पूर्वी वस्ती करीत होते. आता ते येथे नाहीत. गाव आणि नाव तेवढे राहिले, “पंतांची किन्हई” इतके मी जाणले. 

"त्या गावात आल्यावर तर मला कुठल्या तरी बागेत आल्यासारखे वाटले. गावच्या गल्ल्या अन्य खेड्यांतील गल्ल्यांसारख्या निरुंदच होत्या; पण त्या प्रत्येक गल्लीतून पवित्र असा सुगंध येत होता. ते गौडबंगाल मला काही केल्या कळेना. त्या सुगंधाने मी अगदी भारावून गेलो. 

"पोलीसठाण्याजवळ आल्यावर आबा थांबला आणि मला उद्देशून म्हणाला, “हे पोलीसठाणं, हवालदार असतील त्यांना इचार. ते नेतील तुला बापाकडे!” 

"आबाने दाखविलेल्या पोलीसठाण्याकडे मी पाहात राहिलो. ती इमारत मोठी अजबच होती. आबा निघून गेला. एका गल्लीच्या कोपऱ्यावर आलेल्या त्या षट्कोणी इमारतीकडे जाताना माझ्या पायांचा वेग मंदावला. गावातली प्रत्येक गल्ली सुगंधाने भरलेली आणि पोलीसठाण्याची इमारत षटकोणी, मंगुळरी कौलांची. मला माहीत नव्हते की, या रांगड्या महाराष्ट्रात कुठे असली अद्भुत खेडी आहेत. 

"पोलीसठाण्याची पायरी चढून मी वर गेलो. दुटांगी धोतर नेसलेला, भरघोस मिशांचा एक माणूस अंगात डगला चढविण्यात गुंगला होता. “हवालदार-” मी म्हणालो. तो वळला. “या, दादा आताच गेले वाड्याकडे!” त्या माणसाने माझे स्वागत केले व न विचारताच मला हवी होती ती माहितीही देऊन टाकली. मी देवस्थान कारकुनाचा मुलागा आज येणार होतो, हे आबाप्रमाणे त्या पोलीस कॉन्स्टिस्टेबललाही माहीत होते. तो माणूसही पोलिसासारखा दिसत नव्हता. पोलिसाचे सोंग घेतलेल्या एखाद्या गोसाव्यासारखा वाटला मला तो. 

"“चला, जाऊ दादांच्याकडेच.” तो पोलीस म्हणाला. पोलीस चौकी उघडीच ठेवून तो माझ्याबरोबर निघाला. वाड्याकडे जायला म्हणून वळलो. पुन्हा सुगंधाचा एवढा जोरदार झोत आला की मी त्या सुगंधाने गुदमरलो. आता मात्र माझ्याने राहवेना. मी त्या पोलीस हवालदारालाच विचारले, “एवढा सुगंध कसला येतो आहे हो या गावात?” “या गावात उदबत्त्यांचे वीस-पंचवीस कारखाने आहेत.” पोलीस हवालदार म्हणाले. 

"केवढा भाग्यवान गाव. गावात उद्योग आहे तो देखील सुगंध निर्माण करण्याचा. कातडी कमावण्याचा धंदा एखाद्या गावच्या नशिबी आला तर गाव दुर्गंधीने कोंदून जायचा. किन्हईचे तसे नव्हते. तिथे अष्टौप्रहार सुगंध दरवळला होता. 

"पोलीस हवालदार ‘दादा वाड्याकडे गेले आहेत’ म्हणून म्हणाले, तो वाडा पंत प्रतिनिधींचा. शे-पाऊणशे खणांचा, ऐसपैस, दुमजली. आम्ही वाड्यात गेलो. समोरच्या कचेरीत एका शुभ्र गादीतक्क्यावर माझे वडील बसले होते. मला पाहून ते उठले. त्यांचा आनंद मला त्यांच्या डोळ्यांत वाचता आला. वाड्यात आणखी कुणी नव्हते. वडिलांनी मला सारी इमारत फिरून दाखविली. मागचा पुढचा चौक, माडीवरची दालने, त्या दालनांतील नामांकित चित्रकारांच्या हातच्या तसबिरी, भिंतीतील चोरखोल्या. 

"राजवाडाच होता तो. त्याच्या नुसत्या दर्शनाने माझा जीव सुखावला. वाड्याच्या समोरच्या प्रांगणातील निशिगंधाची बाग पाहून तर मी वेडाच झालो. निशिगंधाचे एक फूल मिळाले तरी मी उल्हसित होत असे. मग इथे तर पुरा बगीचाच निशिगंधाच्या फुलांनी लहडलेला होता! असल्या वाड्यात न राहता औंधचे राजे त्या औंधाला का राहतात तेच मला कळेना. 

"वाड्याच्या मागच्या दरवाज्यात आल्यावर तर मला आणखी सुंदर दृश्य दिसले. तो वाडा नदीकाठावर वसलेला होता. वाड्याच्या पिछाडीला लागून नदीचा घाट होता. घाटावर मोठेमोठे वटवृक्ष होते. त्या वडाच्या गाढ सावलीत एक टुमदार मंदिर होते. त्या मंदिराच्या कोरीव दगडाच्या पायऱ्या नदीच्या निवळशंख धारेपर्यंत पोचलेल्या होत्या. 

"“दादा, हे मंदिर कशाचे?” मी वडिलांना विचारले. 

“एकवीरेश्वर!” ते म्हणाले. 

"त्या देवाचे नाव देखील मला आवडले. एकवीरेश्वराचे मंदिर, पलीकडे नदी आणि नदीच्या पलीकडे गाव. नदीची धार गावाच्या मधून गेलेली. पैलतीरावर आणखी संपन्न बाग डवरलेली. त्याच्या पलीकडे गावची प्रमुख बाजारपेठ आणि त्याच्या पलीकडे औंधकर संस्थानिकांची कुलस्वामिनी - तिचे मंदिर, तेही एका छोटेखानी टेकडीवर. दगडी बांधणीचे, त्याला तळापासून वरपर्यंत पायऱ्या. 

"वडिलांनी गावची रचना सांगितली आणि मी अगदी त्या गावाच्या प्रेमात पडलो. त्या गावातून नुसते भरकत राहावे असे मला वाटू लागले. वडील म्हणाले, “चला आता जेवा. मग संध्याकाळी जा देवीला!” 

"मी विचारलं, “स्वयंपाक कोण करतं दादा?” 

"वडील बोलले, “मीच. आज मित्रानं केला असेल!” 

मी विचारले, “कोण?” 

"ते म्हणाले, “दामोदर मनोहर हेड कॉनिस्टेबल!” 

"मला पोलीस ठाण्यावर भेटलेले ते गृहस्थ कागदपत्री सहीदेखील अशीच करीत असत! दामोदर मनोहर हेड कॉनिस्टेबल. तो माणूस इतका प्रेमळ होता की, पोलीस खात्यात त्याला नोकरी कशी काय लागली होती कोण जाणे! त्याच्या आयुष्यात लग्न हा प्रकारच संभवला नव्हता. तूर्त वडील आणि ते एकत्रच स्वयंपाक करीत होते, जेवत होते. 

"त्या दिवशी मी पोलिसाने केलेला स्वयंपाक जेवलो. पोलिसाचे हात पाठीची चामडी लोळवायचे, ते माझ्या पोटात गेले. 

"किन्हईतली संध्याकाळ तर मी जन्मात विसरणार नाही. थंडगार वाऱ्याच्या झुळका, निवळ निळ्या आकाशात परतणाऱ्या पाखरांची भिरी, वडाच्या मायेवरील चिमण्यांचा गोड गोंधळ, चहू दिशांनी येणारा आल्हाददायक सुगंध, गायीगुरांच्या हंबरण्याचे आवाज, एकवीरेश्वराच्या देवळातील घंटांचे मंजुळ नाद आणि कुठून तरी ऐकू येत असलेली एका विलक्षण पद्धतीने, गद्यप्राय शैलीने गायली जाणारी मोरोपंत कवीची केकावली- 

"सदाश्रितपदा सदाशिवमनोविनोदास्पदा 
"स्वदासवशमानसा कलिमलांतका कामदा 
"वदान्य जन सद्गुरो प्रशमितामिता सन्मदा 
"गदारिदरनंदकांबुजधरा, नमस्ते सदा" 

"ती केकावली गाणारी व्यक्ती कवी मोरापंतांच्या रक्ताची होती. ते त्या महाकवीचेच वंशज होते. रामकृष्ण दत्तात्रय पंत पराडकर. पंतांनी या टुमदार खेड्यातच कायम वास्तव्य केले होते. गावातील एकवीरेश्वराचे देऊळ, औंधकर संस्थानिकांनी त्यांना दिले होते. त्या देवळात त्यांनी आपला ‘सुगंधशाळा’ नावाचा उदबत्त्यांचा कारखाना चालविला होता. 

"त्या सुगंधित गावात मी आठ-दहा दिवस राहिलो. ते गाव सोडणे मला कठीण झाले. तेवढ्या आठ-दहा दिवसांत मला अनेक तोंडवळ्यांच्या ओळखी झाल्या. त्या तोंडवळ्यांबद्दलचे असीम औत्सुक्य माझ्या मनी निर्माण झाले. व्यक्तीसारख्याच वस्तूही परिचयाच्या झाल्या. वैशिष्ट्ये उमगली. मनातले कुतूहल वाढतच गेले. मला समजले की, मंदिरात आणि धर्मकार्यात वापरल्या जाणाऱ्याउदबत्त्यांची निर्मिती करणारा पंत पराडकरांचा कारखाना, केवळ अस्पृश्य लोकांकडून चालविला जात होता. उदबत्त्यांची कृती पंत पराडकरांना कुणा सिद्धपुरुषाकडून मिळाली होती. 

"पंतांचा एक तरुण भाचा, कुरळ्या दाढी-मिशांचे जंगल घेऊन त्या कारखान्यात काम करीत होता; पण त्याचे वेड होते योगसाधना. पंतांनी आपल्या अपत्यांची नावे मोठी काव्यात्म ठेविली होती. त्यांच्या मुलांची नावे होती : आर्या आणि केकावली. पंतांनी सारे पंतवाङ्मय प्रकाशित केले होते. ‘लोकसंग्रह’ नावाचा कारखानाही पूर्वी चालविला होता. टिळककालीन राजकारणाशी त्यांचा संबंध होता. त्यांच्याजवळ वीर सावरकरांच्या प्रक्षिप्त ग्रंथांच्या प्रती जपून ठेवलेल्या होत्या. 

"पट्टाभिषिक श्रीरामाच्या देवळासमोर एक बाबूराव राहात होते. लोक त्यांना भंपक बाबूराव म्हणत असत, पण तो माणूस दिलाचा राजा होता. त्याची शेकडो एकर जमीन होती. घरच्या श्रीमंतीपेक्षा मनाच्या श्रीमंतीला तो माणूस अधिक मान देत होता. 

"भंपक बाबूरावांच्या वाड्यात एक लिमये मास्तर राहात होते. त्यांचा मुलगा गोरेगावाला गवळ्याचा धंदा करीत होता. जातीने कोकणस्थ ब्राह्मण असून त्या मुलाने असा स्वतंत्र व्यवसाय आरंभला होता. तो दर महिन्याला बापाकडे पैसे पाठवीत होता आणि लिमये मास्तर जुन्या राजवाड्यातील जागा खरेदी करून त्यावर दुमजली घर बांधणार होते. 

"जुन्या राजवाड्यात कुणी डॉक्टर पाटणकर राहात होते. त्यांनाही औंधकर पंतांनी आश्रय दिला होता. आयुर्वेदाविषयीचा त्या माणसाचा गाढा व्यासंग होता. ‘सुवर्णराजवंगेश्वर’ ही त्यांची औषधी देशभर प्रसिद्ध होती. 

"नदीकाठावरच्या एका वाड्यात एक कुटुंब राहत होते. त्यांची मुले अत्यंत हुशार होती. थोरला मुलगा अण्णा, पराडकरांच्या सुगंधशाळेत व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. तो म्हणे उत्तम नट होता. गावात नाटके बसविण्याची त्याला फार हौस होती. 

"भंपक बाबूरावांप्रमाणे एक बाबूराव चष्मेवाला या गावात होता. तो गावचा कुलकर्णी होता. त्याचे नाव कुणीतरी ‘लाखपाचोत्री’ ठेविले होते. 

"ही असली नावे ठेवण्याचे काम मांडवगणे भटजी करीत होते. ते सरकार- वाड्याच्या माडीवर राहात होते. त्यांचे पोट खूप मोठे होते. त्यांची बायको पण त्यांच्यासारखी जाडी होती. ती मंडळी औंधकर सरकारांच्या आश्रयाने तिथे आली होती. औंधकर औंधाला निघून गेले होते आणि आश्रितांनी वाड्यात कायमचा तळ ठोकला होता. या पठ्ठ्याने या गावात नवीन आलेल्या माझ्या वडिलांना देखील नवे नाव ठेवले होते : खुडखुडदास! 

"राजवाड्याशेजारी एक पडका वाडा होता. तो म्हणे विमाप्रसिद्ध चिरमुल्यांचा होता. मोटारवाले गरवारे या किन्हईचेच होते. 

"औंधकर संस्थानिकांचा मूळ पूर्वज या किन्हई गावचाच कुलकर्णी होता. किन्हईपासून दोन मैलांवर एक बलभीमवाडी होती. ते स्थळ अत्यंत रम्य होते. तिथे पूर्वी एक साधू राहात होता. त्या साधूच्या प्रसादाने औंधकरांच्या घराण्यातील कोणा पुरुषाला औंधाधिपती होता आले होते. तो पुरुष राजघराण्यात दत्तक गेला होता. 

"किन्हई सोडून मी औंधला गेलो खरा; पण किन्हई गावात माझे मन फार गुंतून राहिले. ते वर्ष निघूत गेले. छत्तीस साली मी पुन्हा किन्हईल गेलो. त्या वेळी आमचे सारे बिऱ्हाडच किन्हईला आले होते. वडिलांची बढती झाली होती. ते देवस्थान कारकुनाचे देवस्थान वहिवाटदार झाले होते. मी किन्हईला आलो तो आजारी पडून. आजारीपण योग्य वेळी आल्याने माझा मुक्काम दीर्घकाल होऊ शकला. किन्हईत राहायला सापडले. ज्या राजवाड्याच्या प्रथमदर्शनाने मी निहायत खूष होऊन गेलो होतो, त्या राजवाड्यात आता आमची सर्व मंडळी राह्यलाच आली होती. वडिलांच्या पगाराचा आकडा पन्नासच्या आतबाहेरच होता; पण राजवाड्यात राहिल्यामुळे साऱ्या कुटुंबावरच श्रीमंतीची कळा आली होती. वाड्याच्या निगराणीसाठी औंधकर सरकारनी नेमून ठेवलेले नोकर आमच्या कुटुंबाच्या सेवेत रुजू झाले होते. आता धाकट्या भांवडांना सांभाळण्यासाठी लखोबा गडी अहोरात्र सिद्ध होता. केरवारा, सडासारवणासाठी सखू मोलकरीण बांधलेली होती. वडिलांना लोक ‘रावसाहेब’ म्हणू लागले होते आणि आई ‘काकीसाहेब’ पदवी पावली होती. 

"आमच्या घरातल्या कुणाही माणसांनी श्रीमंती कधीही स्वप्नात पाहिली नव्हती. अनाठायी चालून आलेला राजप्रासादनिवास अंगवळणी पडण्याचा हव्यास प्रत्येकाला लागला होता. आई देवाला जात होती, ती मागेपुढे पट्टेवाला घेऊन. पोरे शाळेला जात होती. ती दप्तराचे ओझे गड्याच्या हाती सोपवून. माझे वडील मात्र या बेगडी श्रीमंतीत मुळीच गुरफटलेले नव्हते. उलट ते आईलाच म्हणत, “नोकर सरकारचे आहेत, त्यांना उगीच राबवू नकोस.” ‘दो दिवसाची जाइल सत्ता अपेश माथा घेऊ नको.’ हा फंदी अनंताचा फटका ते पुन:पुन्हा आईच्या माथ्यावर फटकारीत होते. पण आई त्यांचे ऐकायला तयार नव्हती. समोर आलेल्या राजलक्ष्मीचा ती पुरेपूर उपभोग घेत होती. 

"माझी प्रकृती बरी झाल्यावर आईने मला वरचा दिवाणखाना उघडून दिला. त्या दिवाणखान्यात हंड्या, झंबरे, गाद्या-गिरद्या, सारा राजेशाही थाट होता. मोठमोठ्या आरामखुर्च्या होत्या. कसरीने रसास्वाद घेतलेली असंख्य पुस्तके होती. दिवाणखाना भला मोठा ऐसपैस होता. त्याच्या खिडक्यांना रंगी-बिरंगी तावदाने होती. त्या तावदानांतून आत येणारा चक्क सूर्यप्रकाश त्या दिवाणखान्याचे वातावरण अधिकच स्वप्नमय करून टाकीत होता. औंधच्या कुठल्याही राजकुमाराने घेतला नसेल इतका उपभोग मी त्या ऐश्वर्याचा घेतला. पाठीशी लोड, पायाखाली तक्क्या अशा लक्ष्मीघरी थाटात मी तेथे भरमसाठ वाचन केले. हरिभाऊ आपट्यांच्या साऱ्या कादंबऱ्या, ‘महाराष्ट्र कुटुंब माले’चे कैक ग्रंथ, ‘मासिक मनोरंजन’ आणि ‘केरकोकिळ’ यांचे अनेक अंक वाचून मी फस्त केले. आजारपणाच्या कारणाने माझी मॅट्रिकची परीक्षा हुकली होती. 

"किन्हईच्या मुक्कामात मी अभ्यासाच्या पुस्तकांना हातही लावला नाही. सकाळी लवकर उठावे, राजवाड्यात स्नानगृहातील दगडी चौरंगावर बसून राजा गोपीचंदासारखे मनमुराद सुखस्नान करावे, नदीचा प्रवाह ओलांडून पैलाड जावे, एखाद्या कोकरागत उड्या मारीत साखरगडनिवासिनीची टेकडी चढावी. त्या टेकडीवरील डोंगरी फुले कविता गात गात गोळा करावी. ती देवीच्या मूर्तीवर वाहावी. वहिवाटदाराचा मुलगा आल्याचे पाहून तिथल्या पुजाऱ्याने आगतस्वागत करावे, चांदीच्या वाटीतून बेसनाचा रसरशीत लाडू प्रसाद म्हणून पुढे करावा. मग रमतगमत टेकडीच्या खाली उतरावे. उतरताना राम गणेशांच्या बालकवींच्या कविता तोंडपाठ म्हणाव्यात. घरी आल्यावर मनसोक्त न्याहारी करावी आणि दिवाणखान्यात जाऊन त्या राजेशाही बैठकीवर लोळत पुन: वाचनास प्रारंभ करावा - असा माझा क्रम चालला होता. 

"एके दिवशी काही कामानिमित्त पंत पराडकर वडिलांच्याकडे आले. अभ्याव्यतिरिक्त इतर वाचनाला सोकावलेल्या माझ्या मनाने ही संधी दवडली नाही. ‘केसरी’तून प्रसिद्ध झालेले सावरकरांचे लेख आणि पंतांचे वाङ्गमय यांचा वास मला आगाऊ लागलेला होताच. पंतांची परवानगी विचारून मी त्यांच्या कारखान्यात वळण पाडले. सुगंधशाळेच्या सुगंधी वातावरणात हाती आले ते वाङ्गमय मी अधाशीपणाने वाचू लागलो. त्या कारखान्यात काम करणाऱ्या साऱ्या स्त्रिया महाराणी होत्या. त्यांची राहणी स्वच्छ होती. भाषा शुद्ध झाली होती. वाचलेल्या वाङ्गमयातील उतारे मी त्यांना सांगू लागलो. कथनाची कला मला उपजतच साध्य होती. हातांनी उदबत्त्या वळता वळता त्या चांडालस्त्रिया माझ्या पुराणात रंगू लागल्या. 

"पंतांचा ब्रह्मचारी भाचा गोपाळ आणि नाट्यवेडा व्यवस्थापक अण्णा खेर यांच्याशी त्या काळात माझा चांगला दोस्ताना झाला. गोपाळबरोबर मी गावाबाहेरच्या शिवमंदिरातही संध्याकाळाच्या वेळी जाऊ लागलो. हे शिवमंदिर ती योग्यांना समाधिस्थान आणि कवींना प्रतिभास्थान वाटावे इतके शांत आणि रम्य होते. त्याची बांधणी हेमाडपंती पद्धतीची, काळ्या दगडांची होती. हे मंदिरही नदीकाठीच होते. पंत पराडकरांना ‘वनस्पतिजन्य शुद्ध धूपाची’ विद्या देणारे त्यांचे सिद्ध गुरू हयात असताना याच मंदिरात नांदत होते. या मंदिरात गेल्यावर गोपाळ तासच्या तास शीर्षासन करून उलटा उभा राही. आणि मी मंदिराच्या कठड्यावर बसून नव्यानेच पाठ झालेल्या आर्या केकावलीतील चरण गुणगुणत राही- “श्रीरामा तू स्वामी जगाचा असशी माझ्या शिरावरी जागा। आम्हांस तुझ्या पायावाचून निर्भय नसे दुजी जागा।” सूर्यास्ताच्या समयी त्या निवान्त जागी त्या ओळींना काही वेगळा अर्थ यायचा. आकाशाच्या लाल कडा धीरे धीरे अंधारून जात. पूर्ण झांजड पडे. ब्रह्मचारी गोपाळ त्या शिवमंदिराच्या गाभाऱ्यातील नंदादीप प्रज्वलित करी. नंदादीपाच्या प्रकाशात उजळलेल्या चंदनचर्चित शिवपिंडीला प्रणाम करून आम्ही दोघे परतत असू. कोरडी वाळू, ओली वाळू, खडबडीत खडक, निसरडे खडक, गुडघाभर पाणी, घोटाभर पाणी यांतून प्रवास करीत नदीच्या पात्रापात्रानेच आम्ही घरी येत असू."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................

October 18, 2021 - 
November 12, 2021. 

Kindle Edition, 200 pages
Published September 28th 2018 
by Saket Prakashan Pvt. Ltd 

ASIN:- B07HSZ1B12
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

तुपाचा नंदादीप 
कथा ग. दि. माडगूळकर ☐ 
प्रकाशन क्रमांक – 1560 ☐ 
प्रकाशक साकेत बाबा भांड, 
साकेत प्रकाशन प्रा. लि., 115, 
म. गांधीनगर, स्टेशन रोड, 
औरंगाबाद - 431 005, 
फोन- (0240)2332692/95. 

www.saketpublication.com info@saketpublication.com ☐ 

पुणे कार्यालय साकेत प्रकाशन प्रा. लि., 
ऑफिस नं. 02, ‘ए’ विंग, 
पहिला मजला, धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स, 
373 शनिवार पेठ, 
कन्या शाळेसमोर, 
कागद गल्ली, पुणे -411 030 
फोन- (020) 24436692

................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4332260737
................................................................................................
................................................................................................