Tuesday, February 1, 2022

Chitrakathi चित्रकथी / कथा व्यंकटेश माडगूळकर (Marathi) by Vyankatesh Madgulkar.

................................................................................................

CHITRAKATHI 
चित्रकथी / 
कथा व्यंकटेश माडगूळकर 
by VYANKATESH MADGULKAR 
................................................................................................
................................................................................................

It's unclear at first, but as one proceeds it becomes clearer that it is indeed autobiographical. He's using another name, however, for the protagonist. 
................................................................................................
................................................................................................
एक 

He begins with a first person narration, with details borrowed from his own life, changed just enough so a reader familiar knows of both the borrowing and change. 

"त्यांचा प्रचंड राग माझ्या वाट्याला आजवर कधी आला नसला, तरी तो माझ्या परिचयाचा होता. आपली दोन वर्षांची पोर सारखी किंचाळायची थांबेना तेव्हा दाणदाण पाय आपटत येऊन त्यांनी तिला बकोट धरून उचलून भिरकावलेली मी पाहिली होती."

That did happen, except the child so treated was a sister of both, when the elder brother was a teenager and had a high fever. 
................................................................................................

He describes a duckling he loved and bought. 

"याचा रंगही सुरेख होता. पिवळट रंगाची चोच, डोकं, मान हिरव्या रंगाची, अर्ध्या मानेवर पांढरं कडं, छाती विटकरी रंगाची, अंग चॉकलेटी रंगाचं, कुठं-कुठं पांढऱ्या रेघा – काळे शिंतोडे, पाय नारिंगी."
................................................................................................

"एके दिवशी ती म्हणाली की, ‘‘तुम्ही माझ्याशी लग्न केलं नाही, तर मी जीव देऊन मोकळी होईन.’’ 

"मी म्हणालो, ‘‘ते फारच अवघड आहे. कारण मी बेकार आहे. शिवाय माझ्यापाशी दिडकीही नाही, शिवाय मला घरातले लोक हाकून देतील.’’ 

"ती म्हणाली, ‘‘मी वाटेल ते हाल सोशेन. एकवेळ जेवून आनंदानं राहीन.’’ 

"अशा प्रसंगी उच्चारलेल्या प्रतिज्ञा या फार काळ खऱ्या समजायच्या नसतात, हे तेव्हा मला माहीत नव्हतं."
................................................................................................
................................................................................................
दोन 

"यानंतर या कानाचं त्या कानाला न कळता मी मालकीणबाईच्या मुलीशी लग्न करून प्रचंड गुंत्यात स्वतःला अडकवून घेतलं. लग्नाचा सोहळा फारच साधेपणानं मुंबईला पार पडला. मुहूर्त वगैरे नाहीच. एके दिवशी अतिशय उतरलेल्या चेहऱ्यानं मी टॅक्सीत बसलो. माझ्या अंगावर नेहमीचेच पण परीटघडीचे कपडे होते. मालकीणबाईची मुलगी नवी साडी नेसली होती. तिची मोठी बहीण, बहिणीचा व्यापारी नवरा आणि वयानं मोठ्या पण उंचीनं मुलगी राहिलेल्या, एक गुजराथी भाषा येणाऱ्या मराठी बाई अशी वरात मुंबईच्या डांबरी रस्त्यावरनं निघाली. या महानगराच्या प्रचंड कोलाहलाची वाजंत्री वाजत होती. मॅरेज रजिस्ट्रारचं ऑफिस उघडण्याची वेळ, हा मुहूर्त होता. 

"टॅक्सी ऑफिसच्या आवाराबाहेर थांबली. मोठ्या बहिणीनं लहानशी पर्स उघडून टॅक्सीचं बिल दिलं. तोवर तिच्या व्यापारी नवऱ्यानं इमारतीची उंची दृष्टीनं मोजली. 

"रजिस्ट्रार भले हसतमुख गृहस्थ होते. म्हणाले, ‘‘बसा, बसा! तुम्हीच पहिले आलात. उरकून टाकू या हं.’’ 

"बसलो. मग आम्ही दोघांनी प्रतिज्ञा वगैरे उच्चारली. मोठ्या बहिणीनं आणि फळांचा व्यापार करणाऱ्या तिच्या नवऱ्यानं साक्षी घातल्या. गुजराथी बोलता येणाऱ्या मराठी बार्इंनीही घातली. रजिस्ट्रारांनी हसत-हसत म्हटलं, ‘‘ओके, नॉव, एनी टोकन –?’’ 

"आम्ही गोंधळल्या चेहऱ्यानं एकमेकांकडे बघितलं. रजिस्ट्रारांनीच खुलासा केला – ‘‘गळ्यात घालण्यासाठी हार, बोटात घालण्यासाठी अंगठी असं काही?’’  

"आम्ही तिघेही यावर गप्प. व्यापारी फक्त ओशाळवाणं हसले. 

"‘‘काही नाही? बरं मग टाळ्या वाजवा! Clap your hands and go!’’"
................................................................................................

" ... खूप गप्पा झाल्या, जुन्या आठवणी निघाल्या. शेवटी सावकार म्हणाले, ‘‘थोडं आत येता?’’ मोठं देवघर होतं. सुबक पितळी मूर्ती, मोठ्यामोठ्या समया होत्या. तिथं पांढऱ्या कोऱ्या रुमालात बांधून काही जिन्नस सावकारांनी हाती दिला. 

"‘‘माझी वाचकाची अल्पशी भेट स्वीकारा –’’ म्हणून वाकून नमस्कार केला. 

"काय आहे म्हणून मी रुमाल सोडून पाहिलं. वडिलांनी अनेक वर्षांपूर्वी गहाण टाकलेली चांदीची भांडी होती. एक ताम्हण, दोन पंचपात्री, अत्तरदाणी, एक मोठी वाटी. 

"सावकार म्हणाले, ‘‘तुमचे वडील, माझे वडील दोघंही गेले. ही भांडी त्यावरची नावं वाचून मी सांभाळली होती. आज ती तुम्हाला द्यायचा योग आला. प्रत्यक्ष भेट घेऊन तुम्हाला द्यावी अशी फार इच्छा होती कधीची.’’"
................................................................................................
................................................................................................
तीन 

"सामंताच्या संपादनाखाली निघणाऱ्या साप्ताहिकात आठवड्याला एक याप्रमाणे माझ्या गोष्टी झाल्या आणि चार लोक मला ओळखू लागले. मलाही थोडा धीर आला. आपण काही करू शकतो असा थोडाफार विश्वास वाटू लागला."
................................................................................................
................................................................................................
चार 

" ... संतचरित्रकार धोतर सावरून आमच्यात बसले. बनकरांनी आधी माझी ओळख करून दिली. म्हणाले, ‘‘हो, परिचयाचं वाटतं नाव. पदं लिहितात.’’ 

"‘‘ते दुसरे! हे गद्य लिहितात.’’ 

"‘‘अस्सं!’’"
................................................................................................

"गौरीबाई मला नदीतल्या काळ्याभोर डोहासारख्या वाटत. त्यांच्या मनाचा तळ कधीच लागला नाही. लांबीरुंदीही कळली नाही. 

"मोर जसा रंग घेऊन जन्माला येतो, तशा या अभिनय घेऊन जन्माला आल्या होत्या."
................................................................................................
................................................................................................
पाच 

"पंढरपुरात पोहोचल्यावर लवकरच कळून आलं की, आम्हा सर्वांत जास्त भाविक बाईच आहेत. 

"आषाढी-कार्तिकी किंवा एकादशी वगैरे नसल्यामुळे पंढरपुरात भाविकांची आणि बघ्यांची गर्दी नव्हतीच. सगळं निवांत, मोकळं होतं. धन्य तो पंढरी! धन्य भीमातीर! 

"सकाळी लवकर उठून चंद्रभागेत निर्मळ व्हायचं आणि देवदर्शन घ्यायचं ठरलं. ... "
................................................................................................

"देवळाच्या मधल्या चौकात, फरशीवर तुळशीमाळा, फुलं विकणाऱ्या माळिणी ओळीनं बसलेल्या होत्या. तुळशीमंजिऱ्याचा, फुलांचा घमघमाट सुटला होता. चिमण्या चिवचिवाट करीत होत्या आणि काळ्या फरशीवर नाचत होत्या. 

"बाईनी देवाचं सगळं मनापासून केलं. विठ्ठलाच्या मूर्तीसमोर त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि जरा वेळानं उठून बसल्या तेव्हा त्यांचे डोळे ओले झाले होते. 

"नऊवारी साडी, डोक्यावरून पदर, गळ्यात-हातात जुन्या पद्धतीचे दागिने यामुळे त्या, खरंच कुणी सतराव्या शतकातल्या संत कवयित्री वाटल्या. 

"नावेतले, गर्दीतले, देवळातले असे काही शॉट्स झाले. पंढरीच्या बोळातून जाणारी गाय, खांद्यावर पताका आणि गळ्यात टाळ असलेले, ग्यानबातुकाराम म्हणून नाचणारे दिंडीतले वारकरी, बडवे, पुंडलिकाच्या देवळाच्या शिखरापलीकडचा सूर्योदय. उजाडता उजाडता दिसणारी चंद्रभागा, घाट, स्नानाला उडालेली गर्दी अशी दृश्यं टिपून झाली. पब्लिसिटीसाठी आमचे काही फोटो झाले आणि दोन दिवसांतच पंढरपूर उरकलं."
................................................................................................
................................................................................................
सहा

"म्युनिसिपालटीत जाऊन मी साठ्यांचा पत्ता काढला. ... "

"‘‘अहो, मी कारकून माणूस. पण मला आपला याचा नाद आहे. अगदी योगायोगानं या थोर माणसाशी माझा परिचय झाला. आमचा नित्याचा वाणी आहे. त्याच्याकडनं मुलांनी काही वस्तू आणल्या. त्या ज्या रद्दी कागदात बांधल्या होत्या, त्यावर जांभळ्या अक्षरांत लिहिलेल्या लावणीच्या ओळी सहज दृष्टीला आल्या. बघतो तर पठ्ठे बापूरावची लावणी. ढोबळ हस्ताक्षर. वाण्याकडं तो कागद घेऊन गेलो. बाबा रे, ही रद्दी आली कुठनं? तर म्हणाला, एका म्हातारीनं आणून घातली. मी म्हणालो, अरे हे सोनं आहे सोनं! आणखी कागद आहेत का? तर त्यानं हे एवढं बाड पुढे टाकलं. हरखून गेलो मी. मला ही रद्दी देतोस का? तू दिलीस त्याच्या दुप्पट मी भाव देतो. त्याला काय हो, वाणीच तो, रुपया जास्ती आला की त्याचं समाधान. म्हणाला, न्या घरी. घेऊन आलो.’’ 

"‘‘त्या बाडावर पत्ता होता, त्यावर शोधत गेला तुम्ही, आणि बापूराव भेटले का?’’ 

"‘‘छे हो! इतक्या सहजासहजी कुठं असल्या गोष्टी घडतात काय? मी त्या वाण्याला म्हणालो, ही म्हातारी पुन्हा कधी तुझ्याकडे आली तर मला कळव. तो म्हणाला, बरं! काही महिने गेले आणि एकवार वाण्याच्या दुकानातलं पोरगं, संध्याकाळी पळत येऊन म्हणालं, ‘मालक म्हणाले, ती म्हातारी आलीये, बसवून ठेवलीय. या.’ 

"‘‘सुदैव मी घरी होतो. तात्काळ गेलो. बघतो तर, साठीला आलेली म्हातारी. दात गेलेले, दृष्टी कमी झालेली. अंगावर मळकी वस्त्रं. म्हटलं, ‘बाई आपलं नाव काय, राहता कुठं?’ 

"तर, ‘माझं नाव ताई. तमाशाचं थेटर हाये ना, त्या बाजूलाच खोपटं हाय माजं!’ 

"‘‘हे कागद तुमच्यापाशी कसे?’’ तर म्हणाली, ‘आम्हा दोघांचा फड होता. मिळून ऱ्हात आलो. पुष्कळ कागद हायेत पडलेले.’ 

"साठे भारावून सगळी हकिगत सांगत होते. मी ऐकत होतो. 

"‘या ताईच्या घरातच एका उदास संध्याकाळी मी या शाहिराला भेटलो. बोललो त्यांच्याशी. मला म्हणाले, ‘कालगती गहन आहे!’  

"श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असुनी, सोवळे ठेविले घालुन घडी, 
"हाती धरली मशाल तमाशाची, लाज लावली देशोधडी. 

"‘चाळीस वर्षं मुशाफिरी केली. पैसा मिळविला, उधळला. घरदार सोडलं, महारापोरांत मिसळलो. पुष्कळ वैभव भोगलं, आता सद्दी संपलीये. स्वतःच्या गावी कुणी विचारत नाही. वाळीत पडलोय. एक कुत्री, मी आणि ही ताई एवढे ऱ्हातो आता एकमेकांना सांभाळून.’ 

"मी पार विरघळून गेलो. म्हणालो, ‘‘आपली योग्यता मोठी. केवढं सामर्थ्य आणि आता हे जिणं –’’ 

"‘‘जाऊ द्या! हे भोग आहेत, ते भोगूनच संपतात.’’ 

"मी ते लावण्यांचं बाड परत केलं, तर म्हणाले, ‘‘नका परत करू, न्या तुम्हाकडं. माझी आठवण म्हणून संभाळा हे धन. माझ्यापाशी राहणार नाही. जाईल घेऊन कुणीतरी आणि हे बघा, एक साधी इच्छा आहे. आपण हसाल. मला ब्राह्मणी पद्धतीनं केलेलं जेवण जेवायचं आहे. कित्येक वर्षं झाली. तुमच्या कुटुंबाला सांगा. जातीनं वाळीत टाकलेल्या एका ब्राह्मणाला इच्छाभोजन हवं आहे.’ ‘‘ 

"– हे ऐकून माझ्या डोळ्याला पाणी आलं बघा!’’ 

"साठ्यांनी सांगितलेली हकिगत मी ऐकली. कथा लिहिण्यापुरती सामग्री मला मिळाली. 

"साठ्यांच्या बरोबर जाऊन मी खोपटातल्या त्या म्हाताऱ्या ताईला भेटलो. तिचं घर पाहिलं. तिच्याशी बोललो. या एवढ्या सामग्रीवर, एक काल्पनिक कथा मला सहज उभी करता येणार होती. माझं काम झालं होतं."
................................................................................................

"एकूणच मला असं दिसलं की, या रूपेरी दुनियेकडे आकर्षित होऊन जे-जे आले होते, त्यापैकी बऱ्याच जणांचा भ्रमनिरास झाला होता. त्यांना काहीच कमवता आलं नव्हतं. पैसा नाही, नाव नाही, समाधान तर नाहीच नाही! 

"एक्स्ट्रॉ नट – गवळीनं – आपलं सिनेमासृष्टीबद्दलचं तत्त्वज्ञान एकवार ऐकविलं. 

"नाईट शुटिंगच्या वेळी माझ्या खुर्चीच्या पायाशी मांडी ठोकून तो बसला आणि म्हणाला, ‘‘दादा, शिनेमावर मिळालेला पैसा मानसापाशी ऱ्हात न्हाई. धा वाटानं निघून जातो आनि आखिरी माणूस कंगाल ऱ्हातो.’’ 

"मी विचारलं, ‘‘असं का बरं?’’ 

"तर हा कन्फ्युशसच्या थाटात म्हणाला, ‘‘दादा, हा पैसा ‘हाय तोबा’चा असतो. शिनेमा लागला म्हंजे, खिडकीशी रांगा कोन लावतं? थेटर कोन लोकांनी भरतं? तर, गोरगरिबांनीच. रुपाया, दोन रुपये खर्चून मानूस शिनेमा बघतं आन् तीन घंट्यांनी थेटराभायेर पडल्यावर मनाशी हळहळतं, हाय-हाय! या परीस मी पोटाला घेऊन काही खाल्लं का न्हाई, लेकराबाळास्नी मेवा का न्हेला न्हाई? चांडाळा, सिनेमा बगून पोट भरलं का? तोबा, तोबा! फुकट पैसा खरचला, फुकट टाईम खरचला!’’"
................................................................................................

"एका सकाळी मी स्टुडिओत गेलो, तर बाहेरच्या उघड्या पटांगणात तीन मजली माडीचा सेट लागला होता. छान इमारत उभी केली होती. जिने, कठडे, दारं, काचेच्या खिडक्या, तिसऱ्या मजल्यावरच्या गॅलरीत, बाबूराव पहिलवान आणि तीन भाई लोक वेगवेगळ्या पोझिशनवर उभे होते. साऊंड रेकॉर्डिंगचा प्रश्न नव्हता. सायलेन्ट सीनच होता. 

"पारशी डायरेक्टरने कॅमेऱ्याला ‘गो’ अशी ऑर्डर दिली आणि जी धमाल मारामारी सुरू झाली, त्यात काय काय व्हावं? 

"खिडकीच्या काचांचा खळकन चुरा झाला. गॅलरीचा कठडा तुटला. मारासरशी एकजण उलटापालटा होऊन गडगडत एका पिंपावर आदळला आणि जिन्याचा कठडा तोडून ते पिंप व बरोबर तोही दाणकन पार खाली आले! 

"एकूण सीन दीड-दोन मिनिटांचा सुद्धा असेल नसेल, पण तुफान ठोकाठोकी, विध्वंस आणि आदळाआपट झाली. 

"आणि इतकं होऊन कुणाला काहीही दुखापत झाली नव्हती. चौघंही मांजरासारखे पायांवरच पडले होते. सीनमधला अचूकपणा आणि सत्याचा आभास बघून मी चकित झालो!"
................................................................................................
................................................................................................
सात

" ... मोहनराव काटेकर. चांगले समजदार, वाचन केलेले, हुशार, अनुभवी गृहस्थ वाटले. त्यांच्याकडनंच कळलं की, आत्तापर्यंत हे जाहिरातींसाठी लागणाऱ्या शॉर्ट फिल्मस करीत होते. बरीच वर्षं त्यांना हा अनुभव आहे. या शॉर्ट फिल्मस करून त्यांनी कंपनीला खूप पैसा मिळवून दिला. म्हणून शेटनी खूश होऊन त्यांना सांगितलं की, ‘मोहन तुझ्या मनाला येईल तशी मराठी फिचर फिल्म तू कर.’ 

"हे सगळं इतकं आदर्श होतं की, मला मनोमनी वाटत होतं असं काही प्रत्यक्षात येईल का नाही कोण जाणे! 

"एखादं तान्हं मूल फार शहाण्यासारखं सतत वागत राहिल्यावर माझी आई म्हणायची, ‘‘हे पोर फार गुण करतंय रे, जगतंय का जातंय कुणाला ठाऊक!’’ 

"या बोलण्याची मला आठवण येई! 

"पण मी उत्साहानं पटकथा लिहिण्याच्या कामाला लागलो. रोज मी आणि मोहनराव, सकाळपासून संध्याकाळपर्यंत चर्चा करायचो आणि रात्री उशिरा घरी जायचो. 

"सगळं लेखन पुरं झालं. पात्रांची निवड करायची वेळ आली. मोहनराव म्हणाले, ‘‘तुम्हीच निवड करा.’’"
................................................................................................
................................................................................................
आठ

"यानंतर बरोबर अडीच महिन्यांनी ‘कान्होपात्रा’ कुठंतरी रिलीज झालं. आमंत्रण असून मी गेलो नाही. दोन दिवसांतच पिक्चर उडालं. काही ऐकू आलं नाही. 

"मास्तरांकडनं कळलं की चित्रपटाला एकसंधपणाच नव्हता. गती नव्हती आणि तंत्रदृष्ट्या ते दरिद्री वाटत होतं. पहिलंच मूल, जन्माआधी गेल्यावर पहिलटकरणीनं करावा तसा माझ्या मनानं आकांत केला."
................................................................................................
................................................................................................
नऊ

"पुढं काही वर्षांनी मला कळलं की, दामू आमच्या गावाशेजारच्या एका सर्वोदय केंद्रावर नोकरीला लागला. त्याचं भलंही झालं म्हणे. म्हणजे लग्न, मुलंबाळं, घर-संसार वगैरे. आणि पुढे हेही कळलं की वैताग का, तर ज्या मेव्हण्यांनी त्याला बेस्ट कंपनीत ट्रामकंडक्टर म्हणून नोकरी लावली, त्यांच्या बहिणीची एक काळी, बुटकी, दात पुढे असलेली मुलगी यानं करून घ्यावी असा मेव्हण्याचा, बहिणीचा आणि आईचा आग्रह होता. त्यामुळे विरक्ती येऊन यानं हिमालयात तात्पुरती साधुगिरी केली. त्यामुळे घरदार हबकलं. शोधाशोध सुरू झाली ते याला कळलं आणि संकट टळलं अशी खात्री झाल्यावर हा माघारी आला. 

"माझ्या मनानं नोंद घेतली की, हाही प्रयोग करून बघायला पाहिजे एकदा."
................................................................................................

"आम्ही कष्टपूर्वक तयार केलेला चित्रपट कुठंही लागला नाही. पैशाच्या विलक्षण अडचणीत आलेल्या मालकांनी तो म्हणे कुणा धनंतर मारवाड्याकडे गहाण टाकला आणि आर्थिक संकटातून कंपनी तात्पुरती सावरली. हे अर्थात मला फार उशीरा कळलं. 

"मग मी धार्जिण्या नसलेल्या गोष्टींच्या यादीत सिनेमाचं नाव घातलं. आवराआवर केली. खोली सोडली. ट्रकमध्ये टाकून सामान पुण्याला आधी मित्राकडं टाकलं, मग गावाबाहेर, झाडांच्या संगतीत असलेलं, एक अडीच खोल्यांचं घर पाहिलं आणि बिऱ्हाड थाटलं. या घरात आणि घराच्या पायरीवरनं बदाबद पडता पडता वाढत जाईल अशी बाळाची वाट पाहत राहिलो."
................................................................................................
................................................................................................
दहा

"मी चित्रकथी आहे. हजार वर्षांमागे चित्रकथी होते. चित्र, गीत आणि वाद्य या तिन्हींच्या मेळातून, श्रोत्यांना रंगविणारी कथा सांगणारे चित्रकथी. अगदी माझ्या लहानपणापर्यंत मी हे लोक पाहिले आहेत. आत्ता मात्र काळाच्या लोंढ्यात ते वाहून गेलेत. पण पूर्णपणे नाहीसं काहीच होत नाही. सिनेमाला तुम्ही काय म्हणाल? 

"त्या काळी पुणं हे एक राहायला उत्तम शहर होतं. झोपडपट्ट्या नव्हत्या. मोठमोठे उद्योगधंदे नव्हते. नदीचं पाणी पाण्यासारखं होतं. रस्ते सहज ओलांडता येत. हॉटेलात बरे पदार्थ मिळत. उन्हाळ्यात उकाडा असह्य होत नसे. पुण्याच्या आसपास बागा होत्या, शेतं होती. हनुमान टेकडीवर भेकरं दिसत. खिंडीत भुरगुंज्या दिसत. रस्त्याकाठचे वड पिकून तांबडे झाले की, त्यावर हरेल पाखरांची गर्दी होई. डोणज्याच्या डोहात मरळ मासे हवेचा घोट घेण्यासाठी पाण्यावर डोकं काढत."
................................................................................................

"शेतं पिकत होती, डोलत होती, पक्व झाली की कापली जात होती. झाडं वाढत होती, सुकत होती, वठत होती, जळणाला जात होती. 

"फुलणं, बहरणं, सुकणं आणि नव्याला वाट करून देणं चालू होतं. जमीन धीर सोडीत नव्हती. या झाडाझडोऱ्याचा मीही एक भाग नव्हतो का? मग मी तरी खिन्न का व्हावं, धीर का सोडावा? 

"माझी दुःखं म्हणजे लहानसहान पस्तावे होते. एकूण पाहता, जीवन चविष्ट आणि आनंदाचंच होतं."
................................................................................................
................................................................................................

................................................

January 31, 2022 - February 01, 2022. 

Purchased January 01, 2022. 

Kindle Edition, 96 pages
Published by 
MEHTA PUBLISHING HOUSE 
June 19, 1905 
(first published January 1997)
Original Title चित्रकथी
ASIN:- B01NCMXNMC
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4518923226