Wednesday, February 2, 2022

Til Ani Tandul - तीळ आणि तांदूळ, ग. दि. माडगूळकर - by G.D. Madgulkar.

................................................................................................
................................................................................................
Til Ani Tandul
तीळ आणि तांदूळ 
ग. दि. माडगूळकर
by G.D. Madgulkar
................................................................................................
................................................................................................

Very fulfilling, many of the sketches. 
................................................................................................
................................................................................................
"पार्श्वनिवेदन"
................................................................................................
................................................................................................

"या संग्रहाचे संकल्पन कै. ग. दि. तथा अण्णासाहेब माडगूळकर यांच्या हयातीतच झालेले होते. प्रकाशनाच्या संधीची वाट मात्र हा ग्रंथ गेली तीनेक वर्षे पाहत होता. 

"अण्णासाहेबांच्या चतुरस्र लेखणीतून वेळोवेळी साकारलेली काही व्यक्तिचित्रे माझ्या वाचनात आलेली होती. ती बरीचशी दैनिकांच्या रविवारच्या आवृत्तींतून प्रसंगविशेषी प्रसिद्ध झालेली होती. काही मासिकांतून, दिवाळी अंकांतून आलेली होती. ‘बंडित बुराणिक’ हे व्यक्तिचित्र खुद्द माझ्याच ‘मोहिनी’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेले होते. ... "

" ... गेल्या दोनअडीच दशकांत मराठीत काही उत्तम व्यक्तिचित्रसंग्रह प्रसिद्ध झाले. ‘व्यक्ती आणि वल्ली’ (काल्पनिक व्यक्तिचित्रे) आणि ‘गुण गाईन आवडी’ (वास्तव व्यक्तिचित्रे) हे पु.ल. देशपांडे यांचे संग्रह, ‘मुद्रा’ (पु. भा. भावे), ‘व्यक्तिवेध’, ‘प्रकाशातील व्यक्ती’ आणि ‘आगळी माणसे’ (प्रभाकर पाध्ये), ‘दीपमाळ’ (चिं. त्र्यं. खानोलकर), ‘शतपावली’ (रवींद्र पिंगे), ‘सहवास’ (कृ. द. दीक्षित), ‘आवडलेली माणसे’ (विद्याधर पुंडलीक) ही अशा काही संग्रहांची सहज आठवलेली नावे. या पार्श्वभूमीवर गदिमांचा प्रस्तुत संग्रहही खचितच लक्षणीय ठरेल."

"या संग्रहातल्या नुसत्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली तरी एक गोष्ट तत्क्षणी उमगते की, किती विविध क्षेत्रांतल्या व्यक्तींशी माडगूळकरांचे निकटचे संबंध होते. त्यांची लेखणी या व्यक्तींमधल्या माणुसकीचा सतत वेध घेत असते. त्यांच्या जीवनातल्या लहानसहान प्रसंगांतूनही मोठा आशय मांडते. सर्वसामान्य घटनांतून असामान्यत्वाचे दर्शन घडवते. मनुष्यजीवनातल्या काही निष्ठांवर, आदर्शांवर आणि मंगल मूल्यांवर माडगूळकरांचा नितांत विश्वास आहे. या संग्रहातील पुष्कळशा लेखांना त्यांच्या अस्सल भारतीय तत्त्वचिंतनाचा परिसस्पर्श झालेला आहे. सामान्यांची दु:खे माडगूळकरांच्या सहृदय लेखणीत सामावली की, व्यक्त होताना त्या दु:खांना एक तीक्र धार चढते. काळजाला ती जाणवल्यावाचून राहत नाही. त्या माणसांमधली उदात्तता सांगताना माडगूळकरांची शब्दकळा साक्षात चैतन्यरूप धारण करते. प्रस्तुत ग्रंथ पूर्णत्वाच्या जवळ येत असताना एकच खंत काळजात राहून राहून खुपत होती की, माडगूळकरांवर माडगूळकरांचा लेख कुठून मिळणार? पण तो प्रश्नही एके दिवशी अचानक सुटला. मुद्रिते वाचता वाचता एकाएकी आठवण झाली ती माडगूळकरांच्या अतिशय गाजलेल्या ‘हॅलो, मिस्टर डेथ’ या दीर्घलेखाची. हा लेख म्हणजे म्हटले तर माडगूळकरांचे स्वत:चेच एक विशिष्ट काळातील किंवा परिस्थितील व्यक्तिचित्र आणि म्हटले तर साक्षात मृत्यूचेच रेखाटन! मृत्यूचे असे मन हलवून टाकणारे करुणविदारक चित्रण मराठीत अन्यत्र फारच क्वचित आढळेल. या लेखातले वैद्यकीय शास्त्रातले माडगूळकरांनी वापरलेले किंवा तयार केलेले परिशब्द आणि त्यात्या वेळची रुग्णाची मनोव्यथा व शरीरावस्था वाचून त्या क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळीही स्तिमित झाली. हे डॉक्टर माडगूळकरांना म्हणाले, ‘‘हे शब्द इतके अचूक आणि अर्थवाही आहेत की, या मराठीकरणाची आम्हाला कल्पनाच नव्हती. आजारपणातल्या आणि शस्त्रक्रियेच्या काळातल्या अवस्थाही आपण नेमक्या आणि बारकाईने मांडल्या आहेत.’’ कोणाही लेखकाच्या शब्दकळेला याहून वेगळ्या पावतीची काय आवश्यकता? 

"काही व्यक्तींवर माडगूळकरांनी भिन्न प्रसंगविशेषी दोनदा लेख लिहिले. ते दोन्हीही लेख या संग्रहात समाविष्ट केलेेले आहेत."

"- आनंद अंतरकर"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 28, 2022 - January 28, 2022. 

"माझी आई"
................................................................................................
................................................................................................

"महाराष्ट्रीय कुटुंबातून एक परंपरा चालत आलेली आहे. एकाच कुटुंबातील भावंडे, व्यवसायधंद्याच्या निमित्ताने चहू दिशी पांगतात, तेव्हा घराण्याचे देव थोरल्या भावाकडे येतात. आमच्या कुटुंबात मी थोरला. त्यामुळे माझ्या वृद्ध मातोश्री माझ्याकडे असतात."

" ... तिच्याशी बोलत बसले, तर उठावेसे वाटत नाही. तिचे बोलणे रसाळ, भाषा अलंकृत म्हणींनी आणि उद्धरणांनी खचलेली असते. तुकोबा, ज्ञानोबा, समर्थ यांची वचने पुन:पुन्हा तिच्या बोलण्यात येतात. तिच्या बोलण्यात कैक जुने वाक्प्रचार अजून वावरत असतात. कुणाच्या आर्थिक दारिद्य्राची परमसीमा वर्णिताना ती म्हणेल, ‘‘बिचार्‍यापाशी एक शिवराईदेखील राहिली नाही बघा.’’ आता ‘शिवराई’ हा शिवशाहीतला पैसा आईच्या वाचासाम्राज्यात ते अजूनही चलनी नाणे आहे. 

"संध्याकाळचे पाचसाडेपाच वाजलेले असतात. मोठ्या सूनबाई, नाती, नातसुना यांना आईसाहेब काहीतरी असे सांगत असतात. एकाएकी त्यांच्या लक्षात येते की, सायंकाळ झाली आहे. जमिनीला हाताचे रेटे देत उठण्याचा आविर्भाव करीत त्या सर्वांना उद्देशून म्हणतात, ‘‘अगं, उठा उठा. पोरं येतील आता दीन गाजवीत. चहाच्या तयारीला जा लागा.’’ 

"‘पोरं’ या शब्दांत माझादेखील अंतर्भाव असतो. माझी मुले, मुली, मुलींची मुले या सर्वांसाठी ‘पोरं’ हे एकच सर्वनाम वापरते आई. ‘दीन गाजवीत येणे’ हा वाक्प्रचारही असाच ऐतिहासिक. यवनांच्या फौजा हमले करताना, कोल्हाळ करीत ‘दीन दीन.’

"आईच्या या गोष्टीवेल्हाळ स्वभावामुळे तिला पुण्यातही मैत्रिणी पुष्कळ लाभल्या आहेत. चार वाजून गेेले की, त्या हळूहळू आमच्या घराकडे येतात. त्यातल्या एकदोघी खास आमच्या मुलखाकडच्या आहेत. पंढरपूरच्या आसपास वसलेल्या एखाद्या खेड्यातून आलेल्या. तिच्याच वयाच्या. बहुधा शेतकरणी. पाऊस, पेरणी, भांगलण, काढणी, मोडणी, खळी, सुकाळ, दुष्काळ यासंबंधी या बायका तासन्तास बोलत राहतात. ‘लेले’, ‘गोडबोेले’ अशा उच्चभ्रू आडनावांच्याही आईच्या काही मैत्रिणी आहेत. त्यांच्याशी ती बहुधा ‘प्रपंचपरमार्थ’ इत्यादी विषयांवर बोलत असते. दररोज यातील काहीजणी आईकडे येतातच. मग या सार्‍या मैत्रिणी पायी फिरत फिरत फर्लांगदोन फर्लांग जातात. कधी वाकडेवाडीच्या विठ्ठलाला, एस.टी. स्थानकावरच्या दत्ताला, तर कधी पोस्टाजवळच्या गणपतीला. देवापर्यंत नाही चालवले तर एखादा पार नाहीतर पुलाचा कठडा पाहून त्या सर्वजणी बसतात. पुन्हा बोलणी. वाणीचा उत्सव अखंड चालू असतो. माझा धाकटा भाऊ व्यंकटेश एकदा मौजेने मला म्हणाला, ‘‘अण्णा, आई बोलत्येय बघ कशी मुद्देसूद!’’ 

"एका क्षणाचाही विलंब न लावता आई त्याला म्हणाली, ‘‘लेका, तू एक लेखक आहेस. माझ्या पोटी तीन लेखक जन्माला आले. मलाही काही बुद्धी असेलच की!’’"

" ... तसा तिचा उभा जन्मच खेड्यात गेला. तिचे माहेरगाव शेटफळे हे जुन्या औंध संस्थानातलेच एक चिमुकले खेडे. माझ्या माडगुळात आणि आईच्या जन्मगावात चारपाच मैलांचे अंतर असेलनसेल. 

"आईचे ते माहेरगावही अद्भुत. माझ्या बालपणी तिथे जायचे तर घोड्यावरून जावे लागे. गाव सारा खानदानी मराठीजातीचा. बहुतेकांचे आडनाव गायकवाड. त्यांचे सोयरसंबंध मोठमोठ्या सरदारांशी, राजघराण्यांशी, शेंबड्या पोरांचीही नावे दादासाहेब, बाबासाहेब, अप्पासाहेब, भाऊसाहेब आणि आबासाहेब. बायका सार्‍या गोषात. त्यांचीही नावे आत्यासाब, वैनीसाब या थाटाची. कुंवारणी थोड्या मोकळेपणाने वावरत; पण त्याही अक्कासाब, ताईसाब.

"माझ्या आईचे माहेरघर हे एकच त्या गावात ब्राह्मणाचे घर. आईचे वडील काशिनाथपंत त्या गावचे पिढीजात कुलकर्णी. त्यांच्यापाशी जमीन बक्कळ. पोटी पुरुषसंतान मात्र नव्हते. तीन मुलीच! तर त्यातली एक तर जन्मत:च मुकी आणि बहिरी होती म्हणे. मी तिला कधी पाहिले नाही. माझी आई सर्वांत मोठी. आईचे माहेरचे नाव बनू. मुक्या बहिणीचे नाव गोदावरी होते. ती मधली. आणि धाकटी होती, तिला म्हणत चन्ना. या चन्नामावशीचे मात्र आमच्याकडे येणेजाणे होते. मला आठवते, आई आणि मावशी एकमेकींना भेटल्या की, मनसोक्त रडायच्या. चन्नामावशीला तिच्या सासरी फार सासुरवास होता म्हणे. पुढे ही मावशी जेव्हा स्वतंत्र झाली म्हणजे तिच्या सासरची वडील माणसे जेव्हा एकूण एक वैकुंठवासी झाली तेव्हा तिच्याकडून दरवर्षी आमच्याकडे रायवळ आंब्यांनी लादलेले घोडे येऊ लागले.

"आई सांगते, ‘‘साखळ्यावाळे घालून मी माडगूळकरांच्या वाड्याचा उंबरा ओलांडला. धान्याचा शेर सांडला. घरात आजेसासू होती. फार कर्तबगार आणि शहाणी बाई होती ती. स्वभावाने प्रेमळ, उदार आणि सासरे तर विचारायलाच नको. शरीराने आणि करणीनेही मोठा कर्ता माणूस. पंचक्रोशीवर त्यांचा दबदबा. सरकारीदरबारी वजन. बाबा बामण बोलला की बोलला! त्याचा शब्द झेलायला अवघा गाव पुढं व्हायचा. ... "

"माझ्या जन्मापर्यंत म्हणजे एकोणीसशे एकोणीस सालापर्यंत माझे आजोबा हयात होते. त्या बलदंड ब्राह्मणाने चक्क ग्रामणी करून जमिनी संपादल्या होत्या. तीन गावची वतने मिळवली होती. घरचा बारदाना मोठा होता. बाबा बामण गावचा कारभारी होता. पाटीलकुलकर्णी जिवाभावाचे मित्र होते. या बामणाच्या कारकीर्दीत आईने सुख आणि सुखच उपभोगले. तिच्या माहेरी कुलकर्णी काम करणारा बामण जिता राहत नसे. वर्षासहा महिन्यांत कुठेतरी आडरानात त्याचा खून पडे. बाबा बामणाने व्याह्याची कुलकर्णी आपण तिथं जाऊन पाच वर्षे केली; पण केसाला ढका लावून घेतला नाही. खून करवले, केले; पण एक खरवड अंगावर उमटू दिला नाही. 

"माझे आजोबा मरताना माझ्या आईला म्हणाले होते, ‘‘मुली, आतापर्यंत निभावलंस. माझ्या आईच्या माघारी मलादेखील तू लेकरासारखं सांभाळलंस. पुढचा काळ कठीण आहे. तुझा नवरा संत माणूस आहे. त्याला प्रपंचातलं काही कळत नाही. आमच्या माघारी तुमच्या दावणीला दोन पायांचं कोंबडं उरणार नाही. आज चिंच आली घरात, तर गूळ द्यायला पंधरवडा उलटून जाईल.’’

"बाबांचे भाकीत शब्दश: सत्य ठरले. वडील गावात राहिलेच नाहीत. पिढीजात कुलकर्णीपण त्यांनी चारदोन वर्षे केले; पण गावगुंडी या शब्दाविषयीदेखील त्यांना किळस होती. त्यांनी कुणाची पै खाल्ली नाही. कुणाच्या पाचोळ्यावरदेखील पाय दिला नाही. त्यांनी सरळ नोकरी धरली आणि जन्मभर ते ती नोकरीच इमानइतबारे करीत राहिले. 

"औंध संस्थान ते केवढे. तिथल्या मामलेदारालाच तीस रुपये द.म. पगार असायचा. मग कारकुनाला काय मिळणार? मिळत असतील पंधरावीस रुपये.

"माझ्या आईने संसार केला. अबु्रदारपणे संसार केला. वडिलार्जित जमिनीतला एक गुंठादेखील विकला नाही. वडिलांना नोकरीच बरी वाटत होती. आईला शेतीचा हव्यास होता. तिला वाटे, गावच्या चारी दिशांना आपली काळी असावी. चारी दिशांनी मोटांची कुरकुर आणि मोटकर्‍यांची गाणी ऐकू यावी. वाड्याचा सोपा कणगीदळणांनी भरून जावा. माळवद मिर्च्यांच्या वाळवणाने लालभडक व्हावे; तर वाड्याच्या अंगणात शाळू उन्हाला पडावी. उभ्या जन्मात तिने वडिलांना विरोध केला नाही. उलट शब्द तर चुकून उच्चारला नाही. त्यांच्या पद्धतीने तिने त्यांना राहू दिले, संसाराचा भरीभार आपल्या माथी घेतला."

" ... जमिनीची नांगरण, कुळवण, बांधबांधोर्‍या, बीबियाणे, सारे वेळच्या वेळी करवून घेण्याचे काम आईच करी. करते वाटेकरी कुचराई करू लागले तर आई त्यांना अशी धारेवर धरी की, देखते रहना! वाटेकरी तिला घाबरून असत."

"कोंबड्याने पहिली बांग दिली की, ती उठायची. परसदारी जाऊन दात घासणे, तोंड धुणे उरकायची. एका पायाची मांडी आणि एक पाय पसरलेला अशी ती जात्याशी बसायची. दळण सुरू व्हायचे. मुक्याने नाही; चांगले ओव्या गात -"

"आईचे हे गाणे चालू असताना, जात्याच्या पाळ्यातून चांदण्यासारखे पीठ गळत राही. मी जागा झालेला असे. माझ्या डोळ्यांतून उगीचच गरमगरम आसू ओघळू लागत."

" ... ‘‘गंगा, अर्जुनभावजींना पाठव. दुपारच्या आधी. भाबळीची गाठ फोडायची आहे. भाकरी देईन त्याच्याकडं.’’ ‘

:‘जी.’’ महारीण म्हणे. बामणाच्या बाईने आपल्या नवर्‍याचा उल्लेख ‘अर्जुनभावजी’ असा केल्याने गंगा मनोमन सुखावे. नम्र आवाजात म्हणे, ‘‘कोरड्याशाला बी ’’ 

"‘‘अगं रानातनं घेऊन जावं काही. करडी आहे, हरभरा आहे. चोरंमोरं नेतात, तुम्ही तर कामाची माणसं. बरं, आठवण द्यायला सांग भावजींना. मटकीची डाळ देईन मापटंभर जा.’’ 

"गंगा निघून जाई. आई गोठ्याकडे वळे. गड्याने गोठा साफ केलेला असे. आई गाईंची धार काढी. दुधाची कासंडी आत आणी. चुलीला पेटू घाली. तुरकाट्यापळाट्यांनी ती नीट पेटली म्हणजे ती माजघरात येई आणि हलक्या आवाजात माझ्या आजीला म्हणे, ‘‘सासूबाई, उठू नये का आता? तांबडं फुटलं, चूल पेटलीय.’’"

"आजी उठे. स्वयंपाकघराकडे जाई. दूध तापत ठेवणे हे तिचे काम असे. आई अंगणात जाई. घंगाळभर पाण्यात गाईचे ताजे गोमय मिसळी आणि सडा शिंपू लागे. त्या शिंपण्याचा स्वर आत माझ्या कानापर्यंत येई. मी कुणा गोसाव्याचा आशीर्वाद ऐकला होता. त्याच्या भाषेतला. त्या शब्दांशी त्या सड्याचा आवाज बरोबर जुळता असे. 

"‘अच्छा हो भला... अच्छा हो भला...’ 

"सडा संपता संपता आभाळ उजळू लागे. मग आई रांगोळ्या काढी. गाईची पावलं, कमळं, चक्रं आणि विठोबारखुमाई या तिच्या लाडक्या आकृती. आई डावखोरी आहे. रांगोळ्यादेखील ती डाव्या हाताने काढी. सारेच महत्त्वाचे ती डाव्या हाताने करी. जणू घरगृहस्थी हा तिच्या डाव्या हाताचा खेळ., सडारांगोळी झाल्यावर तिचे स्नान आटोपे. मग ती आम्हाला हाक मारी, ‘‘अक्का, अण्णा, उठा रे! उन्हं आली अंगावर.’’

"मग आमच्या उस्तवार्‍या. आम्ही शाळेत गेलो की, पुन्हा घरकाम, स्वयंपाक, जेवणखाणी. चहाचे प्रस्थ त्यावेळी खेड्यापाड्यात मुळीच नव्हते. लाह्याचे पीठ, मटक्याची उसळ, ताजी दुधातली दशमी अशीच काही न्याहारी आम्हाला मिळे. बाजरीची असेल ती. काल रात्रीची भाकरीदेखील आजच्या न्याहारीला निषिद्ध नसे.

"संध्याकाळी ती न विसरता देवाला जाऊन येई. आम्हाला लवकर जेवू घाली. वेडी आजी सोवळी झालेली होती. तिला काही निर्लेप भाजके खावे लागे. ती स्वयंपाकघरात एकटीच बसून गुलुगुलू खाई. आजीच्या आधी आई कधीच जेवत नसे. आजीचे झाल्यावर ती जेवे. तिला झोप लागल्यावर मग ती आडवी होई."

"‘‘धर्मा का रे?’’ आई विचारी. 

"‘‘जी वैनी.’’ 

"‘‘अरे, रात्री अंगणात पडायला येत जा तुमच्यापैकी कुणी. मुलांना भय वाटतं.’’ 

"‘‘जी, येतो की! आमचं ध्यान असतंच की! पर आजपासनं म्हातार्‍याला सांगतो यायला.’’ 

"म्हातारा तात्या रामोशी कुर्‍हाडीला उशाला घेऊन आमच्या अंगणात झोपे. समोरच्या घरातल्या कासारणी खालच्या सोप्यात पडायला येत. सोबत होई. गावात होतो तोपर्यंत आम्ही सुखात होतो. श्रीमंती नव्हती; पण कमतरता नव्हती. गावकर्‍यांचं प्रेम होतं. आजोबांच्या पुण्याईचं छत्र होतं. वडील जवळच्या तालुक्याच्या गावी बदलून आले आणि दैन्याला आरंभ झाला. खाणारी तोंडे वाढली. खर्चाच्या वाटा वाढल्या. आपल्या गावात धान्य, भाजीपाला, जळण, दूध यापैकी कशासाठीच पैसा वेचावा लागत नव्हता. खायचे तेल आणि दिव्यांचे तेलही आपल्या रानात पिकत होते. करडीचे तेल तुपाच्या तोंडात मारील इतके चवदार. समयांना घालायचे करंजेल. गावओढ्याच्या दोन्ही काठाला करंजांची दाटी. चार रामोशांच्या पोरांना सांगितले की, दिवस मावळेतो पोतेभर करंजा घरी येत. गाळून घेतल्या की, काम झाले. रॉकेलचा दिवा लागतोय कशाला? 

"तालुक्याच्या गावी सारेच विकत! शेण आणि माती या वस्तूदेखील दुर्मीळ. कामाला माणसे मिळायची नाहीत. लाकडे मणावर तोलून वखारीतून आणायची. सारेच विकत. म्हातारी आजी एकटी गावात राहायची. तिला शेतीभातीतले काय कळणार? बिचारे वडील आईला म्हणायचे, ‘‘तू जा, गावात रहा!’’ 

"‘‘मुलाचं शिक्षण?’’ आईपुढे ही महत्त्वाची समस्या होती. मुलाच्या शिक्षणाच्या आशेने माझी आई खेड्यापासून दूर गेली. खेडे जसजसे दूर गेले तसतसे आमच्या कुटुंबातले सुख आणि समाधानही दूर दूर जात गेले."

"बहीण लग्न होऊन गेली होती. तिला मावशीसारखाच भयंकर सासुरवास होता. दिवसातून एकदा तरी आईला तिची आठवण व्हायची. ती डोळ्यांतून पाणी काढायची. माझ्या पाठीवर आणखी तीन भावंडे झाली होती. त्यातल्या एकाच्या डोक्यात खाडूक चिघळून किडे झाले होते. एकाच्या दोन्ही पायांच्या पिंढर्‍या आगषेण नावाच्या चर्मरोगाने लबथबल्या होत्या. 

"आईचे शरीर क्षीण झाले होते. माझ्या जन्मानंतरच्या प्रत्येक अपत्याच्या वेळी जन्माबरोबर त्याच्या आईचाही पुनर्जन्म झाला होता. ती क्षीण झाली होती. तशात अर्धशिशीचे भयंकर दुखणे तिच्या कपाळी आले होते. मला हे सारे कळत होते. मी अकराबारा वर्षांचा होतो; पण त्यावेळी देशभक्तीच्या वेडाने मला पछाडलेले होते. जेवणाची जागा एवढंच माझ्या लेखी घराचे मोल होते. 

"या काळात आई वडिलांना कडकड बोलते आहे असे अभूतपूर्व दृश्य आमच्या दृष्टीस पडले. चूल थंड पडते की काय असे प्रसंग आले. दारिद्य्राची परिसीमा झाली. वडील स्थितप्रज्ञ. आई क्षीण झालेली. ... "

"पुढे शिकण्यासाठी मी औंधला गेलो. 

"जाण्यापूर्वी एक घटना घडली. ती मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. 

"एके दिवशी आईचे अर्धे डोके सीमेचे ठणकत होते. दुपारचे बारा वाजले होते. घरात पाण्याचा टिपूस नव्हता. वडील कचेरीतून आले. घागर घेतली. भर उन्हात ते पाणी आणायला गेले. आधीच त्यांना दम्याचा विकार. वैशाखातले ऊन, खांद्यावर ओझे. 

"मी शाळेतून परतत होतो. घागरीच्या ओझ्याने वाकलेले वडील धापा टाकीत घराकडे निघाले होते. मी त्यांच्याकडची घागर घेतली. घरी आलो. ते पाणी एका मोठ्या पिंपात ओतले. 

"‘‘अण्णा!’’ आईने विचारले, ‘‘तू आणलंस पाणी?’’ 

"‘‘आणखी आणतो.’’ एवढेच म्हणून मी निघालो. परत ओढ्यावर गेलो. घागर भरली. घरी आलो. दहापंधरा खेपा झाल्या. ते भलेमोठे पीप काठोकाठ भरले. एक मित्र आला, तोही माझ्याबरोबर खेपा करू लागला. आई उठून स्वयंपाकाला लागली होती. मला उद्देशून ती म्हणाली, ‘‘अरे, पुष्कळ झालं पाणी. आता थांब, भातपिठलं होतंय. जेवायला बसा. भूक लागली असेल!’’ मी पेटलेलो होतो, ‘‘आणखी भांडं काढ साठवणीला.’’ एवढेच बोललो आणि परत पाणी भरू लागलो. कासंड्या, पातेले, तांबे, गडू सारी होती नव्हती ती भांडी मी तुडुंब भरून टाकली.

"‘‘आता संध्येची पळी तेवढी राहिली.’’ वडील हसून म्हणाले. ... "

"वडिलांच्या एका वाक्याने मी पाण्याच्या खेपा थांबविल्या आणि भिंतीला टेकून मुसमुसत राहिलो. सर्वांबरोबर दोन घास खाल्ले खरे; पण त्या अन्नाची चव मला कळलीच नाही. 

"जेवण होताच वडील कचेरीत निघून गेले. भावंडे पांगली. आई जेवलेली नव्हती. संतप्त स्वरात मी म्हणालो, ‘‘तू जेव की! का तुला भूकच लागत नाही?’’"

"ती माझ्याजवळ आली आणि अगदी मवाळ शब्दांत म्हणाली, ‘‘बाळा, आज तू पाणी भरलंस. साठवणीला भांडं उरलं नाही माझ्याकडे.’’ 

"‘‘त्याला मी काय करू?’’ 

"‘‘तेच सांगते. वडिलांनी कष्टानं आणलेली एक घागर आता पुरवठ्याला येत नाही. तू आणलंस पाणी तर कुठं साठवावं हा प्रश्न पडला. पैशांचंही असंच. त्यांचं थोडं मिळवणं पुरत नाही संसाराला. तू कमावशील तेव्हा प्रश्न पडेल की, साठवावं कुठं?’’ 

"आईच्या वाक्यानंतर पाचएक वर्षे गेली असतील नसतील; मी पैसे कमावू लागलो. मध्यंतरीचा काळ आईने काटला. स्वभावात कडूपण येऊ दिले नाही. नात्याची माणसे टाकली नाहीत. क्रतवैकल्ये सोडली नाहीत. नवल म्हणजे असला फाटका संसार अंगावर लेवून ही साध्वी स्त्री देशभक्तांच्या सभांना उपस्थित राहिली. गांधींच्या उपवासाबरोबर तिने उपवास केले. शिवाशिवीची परंपरा सोडून दिली.

"मी औंधला शिकत होतो तेव्हा आमचे कुटुंब किन्हईला होते. ते दिवस जरा बरे गेले; पण तिथेही एक भयंकर प्रकार घडला. आईच्या बाळंतपणासाठी सेविका म्हणून ठेवलेली एक विधवा ब्राह्मणी आईच्या आधी प्रसूत झाली. तिने ते पापाचे पोर नरडीला नख लावून ठार केले. किन्हईच्या राजवाड्याच्या खोल नाल्यात फेकून दिले. 

"ते प्रकरण लपले नाही. कोर्टकचेर्‍या झाल्या. आईला साक्षीला जावे लागले. तिने धिटाईने साक्ष दिली. ती बाई निरपराध सुटली. एवढेच नव्हे, तर पोटासाठी हे पाप करण्याचा प्रसंग त्या विधवेवर आला म्हणून संस्थानी सरकारने तिला तहहयात एक छोटी नोकरी देऊ केली. माझ्या आईचे माहेर अगदी आडवळणी. पाऊणशे वर्षांपूर्वी अशा खेड्यात शाळा नव्हत्या. मुलांना शिक्षण मिळण्याची पंचाईत, तेथे मुलींना कोण शिकवितो? माझी आई कुठे लिहायला शिकली देव जाणे. ती लिहीत नाही; पण वाचते पुष्कळ. लिहिताना मी तिला पाहिली. पाहतो ते ती रांगोळीची अक्षरे लिहिताना. डाव्या हाताने ती छान चित्राक्षरे लिहिते : 

"‘श्रीराम प्रसन्न.’"

" ... आपल्याला पुरेसे शिक्षण मिळालेले नाही याची भाग्यवती खंत माझ्या आईला वाटते. आम्हा भावंडांना शिकवण्याचा तिने आटोकाट प्रयत्न केला. अतिसंतती आणि दारिद्य्र या दोन शत्रूंनी तिचे काही चालू दिले नाही. अक्का, मी, भालचंद्र, व्यंकटेश आम्ही तिची चार अपत्ये अल्पशिक्षितच राहिलो. गावच्या पाटलाची, धनगराची मुले अशा दु:स्थितीत आईने आपल्यापाशी ठेवून घेतली. त्यांच्या शिक्षणाला साहाय्य केले."

"मी मिळवता झालो आणि आमच्या घरची स्थिती हळूहळू पालटत गेली. धाकट्या भावाने खेडे धरले. शेती नव्याने समृद्धीला आणली. आईच्या त्रस्त मनाला परमसंजीवनी मिळाली. तिची प्रकृती पुन्हा धडधाकट झाली. तिला तिच्या आवडीच्या वातावरणाचा पुनर्लाभ झाला. 

"आई वृत्तीने धार्मिक असली तरी नव्यातले भलेपण तिला समजले. ती पूजा करताना सोवळे नेसते; पण ओवळ्यात असताना महाराच्या मुलीने धुतलेली साडी तिला चालते. तिची क्रतवैकल्ये चालू असतात; पण अन्य कुणाला त्याचा काही त्रास नसतो."

"आईच्या वडाचा विस्तार आता केवढा वाढला आहे! माझी कविता ही आईच्या ओव्यांची दुहिता आहे, हे मी मन:पूर्वक मान्य करतो. तिच्या गंगेतली कळशी घेऊनच मी मराठी शारदेचे पदप्रक्षालन करीत असतो. चि. व्यंकटेश माडगूळकरांची वाङ्मयीन कामगिरी वादातीत आहे. 

"आईला शिक्षणाची फार आवड होती. धाकटी मुले खूप शिकली. चि. अंबादास एम.ए. झाला. समाजशास्त्र विषयात त्याने डॉक्टरेट केली. माझी धाकटी बहीण सौ. लीला रायरीकर एम.ए., एम.एड. आहे. 

"माझे ‘गीतरामायण’ श्री. सुधीर फडक्यांच्या तोंडून ऐकले तेव्हा आई म्हणाली, ‘‘पुत्र म्हणून तुम्ही आपलं कर्तव्य पुरं केलंत.’’ 

"प्रकृती बरी होती तोपर्यंत आई गावाकडेच असे. शेतीचा व्याप वाढला आहे. ती जातीने तो पाहत आहे. अडल्यानडल्यांना सुपादुरड्यांनी देत असते. आईच्या हातांना कंजूसपणा ठाऊक नाही. तिचे हात जणू आशीर्वाद व दान देण्यासाठीच उत्पन्न झाले आहेत."

" ... परवापरवापर्यंत खेड्यात असली की, ती शहरातल्या मुलांची चिंता करायची. शहरात असली की, खेड्यातल्या मुलाची चिंता करायची."

" ... फार फार झाले तर म्हणते, ‘‘कवीनं रामरायाच्याच तोंडी घातलं आहे. ‘दैवजात दु:खे भरता, दोष ना कुणाचा.’ ’’ आईच्या अंगी एक उपजत विद्वत्ता आहे. ते ज्ञान कुठून आणले आहे राम जाणे!""

"गांधीवधाच्या धुमाकुळात आमचा खेड्यातला वाडा जाळला गेला. आईवडिलांचा चाळीस वर्षांचा संसार जळून खाक झाला."

"अशीच तक्रार करणार्‍या माझ्या एका भावाला आई म्हणाली, ‘‘तुला एक गोष्ट आठवते का बाळा?’’ 

"‘‘कुठली आई?’’ 

"‘‘तुझ्या लहानपणाची. एका सकाळी उन्हं अंगावर आली. तू झोपला होतास. मी तुला उठवलं. तुझ्या हाती एक वाटी दिली. हरबर्‍यावरची आंब होती त्या वाटीत. मी तुला म्हटलं, ‘ही गंगाकाकूकडे दे!’ 

"’’ माझा भाऊ हसला. त्याला तो प्रसंग समग्र आठवला. मग तो स्वत:च पुढे सांगू लागला, ‘‘मी ती वाटी घेऊन निघालो. तो भिंतीला धडकलो. वाटी पडली. सांडली आणि माझा एक दातही दुखावला.’’ 

"‘‘असं का रे झालं?’’ 

"‘‘अगं, नुकता झोपेतनं उठलो होतो. दार कुठे आहे ते लक्षातच आलं नाही!’’ 

"‘‘तसंच झालं आहे या पुढार्‍यांचं. नुकती जाग आलीय त्यांना. वाट कोणती ते नेमकं नाही लक्षात येत त्यांच्या!’’"

"सांप्रत आई पुण्यात आहे. तिला भेटण्यासाठी गावाकडची माणसे येतात. आमचा बंगला आळंदीच्या रस्त्यावर आहे. पंढरपूरइतकीच आळंदी माझ्या गावकर्‍यांना प्रिय. ज्ञानेश्वर माऊलीकडे जाता येता ते आवजूर्र्न माझ्या आईला भेटतात. गावकरीमग तो कुणीही असो. मराठा असो, ब्राह्मण असो, महार असो, लव्हार असोआईला ती सारी माणसं आपलीच वाटतात."

"‘पंचवटी’तल्या बागेत पाच पवित्र वृक्ष आहेतच; पण आईसाठी बेलाचे झाडही लावलेले आहे."

" ... देवघरासाठी नंदादीप तेवता ठेवणे, निरंजनातील फुलवाती तयार ठेवणे, पूजेचे साहित्य सिद्ध करणे, यातले कुठले ना कुठले काम आई करीत असे. मनात आले तर ती भाजी निवडते, ताक घुसळते, बाकी ‘देवघर’ हेच तिचे कार्यक्षेत्र."

"आईच्या श्रद्धा आमच्या घरात कुणीही दुखवीत नाही. माझी सारी भावंडे आळीपाळीने येऊन तिला भेटून जातात. व्यंकटेश शहरातच आहे. डॉक्टरकडे जायचे असेल तर ती त्याला फोन करवते. सणासुदीचे त्याला बोलावून घेते. एकदा आईच्या पलंगाशेजारच्या खुर्चीवर बैठक मारीत मी म्हणालो, ‘‘थकलो आता आई. होईनासं झालंय!’’

"‘‘होईनासं झालंय तर करू नये. वाचावं, लिहावं, स्वस्थ असावं!’’ 

"‘‘असं कोण बसू देईल?’’ मी विचारले. 

"‘‘का? आम्ही नाही बसलो पेन्शन घेऊन!’’ 

"‘‘हं!’’ एवढेच मी उघड बोललो. आईसारखे म्हातारपण यायलाही भाग्य लागते. घरकामाने कितीही थकलेली पत्नी आपल्या सासूला काहीतरी धार्मिक वाङ्मय वाचून दाखविल्याशिवाय झोपत नाही. तिने सर्वांसाठी इतके केले आहे की, तिची सेवा करण्यात सर्वांना आनंद वाटतो. घरच्यांना आणि बाहेरच्यांनाही!"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 28, 2022 - January 28, 2022. 
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
"सकलगुणैश्वर्यमंडित श्रीमान भावेस्वामी गोसावी"
................................................................................................
................................................................................................

"भाव्यांना मी प्रथम पाहिले एकोणीसशे छत्तीस साली. फैजपूर काँग्रेसच्या परिसरात. राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होती. गांधीजी म्हणतील ती पूर्व, असा तो जमाना होता. जनमताचा प्रवाह मोठ्यांदा गर्जना करीत त्यांच्याच पाठीमागे जात होता आणि ऐन उमेदीत असलेले भावे त्या प्रवाहात उलटे पोहत होते. अगदी विरुद्ध दिशेने एकाकी हात मारीत होते. फैजपूरची काँग्रेस म्हणजे खेड्यातली पहिली काँग्रेस. आघाडीचे सारे पुढारी ऐन भरात होते. काँग्रेसच्या नेत्यांची चित्रे त्यावेळी देवांच्या चित्रांसारखी घरोघरी आदरली जात होती. ते सारे पुढारी त्या अधिवेशनात उपस्थित होते. माणसांचा महासागरच त्या खानदेशी वावरात भरतीला आला होता. नेत्यांच्या नावांचे जयजयकार अक्षरश: आभाळ भेदून जात होते. त्या आवाजात एक तापलेला तिखट आवाज बेशक विरोधी आरोळ्या देत होता. स्वयंसेवकांनी त्या वृत्तपत्रविक्रेत्याला घेरले होते. त्याच्याशी हिसकाहिसकी चालवली होती. ठोशाला ठोसा देण्याच्या पवित्र्यात उभा राहून तो पंचविशीत नागपुरी तरुण ओरडत होता, ‘‘सावधान, सावधान!’’ वृत्तपत्रकर्ता स्वत:च विक्रेता होऊन वावरत होता. आपली मते आपणच प्रसारित करीत होता. 

"कुणीतरी प्रौढाने मला सांगितले, ‘‘हे नागपूरचे पु.भा. भावे!’’ ... "

" ... पांढर्‍यावर काळे सारेच लेखक करतात. या लेखकाच्या लेखणीचे टोक उजेडाचे होते. त्याचे लिहिणे मला मानवत नव्हते; पण भिडत होते. पटत नव्हते; पण काहीतरी पेटवीत होते. 

"तोंड भाजले तरी खावे वाटावे असा काही अलौकिक गुण त्या लिखाणात होता. भाजले तरी आलिंगन द्यावे असे काही त्या साहित्यात होते. विचार न पटोत, साहित्य म्हणून वाचायला काय हरकत आहे, या साळसूद विचाराने आरंभी आरंभी मी भाव्यांचे लिखाण अधूनमधून वाचीत असे. असाच मी ‘सावरकर’ वाचला होता. कोवळ्या वयात कसरीने खाल्लेले कागद जुळवून ‘केसरी’चे अंक वाचले होते. भारून गेलो होतो. सारेच उमगले होते असे नाही; पण कळल्या त्या खुणांनीही काळीज घायाळ झाले होते. असे होताहोताच भाव्यांचे साहित्य वाचण्याचीही मला लत लागली. ... "

"मी खादीधार्‍यांचा खिदमदगार होतो; पण मूळचा पिंड शेवटी परंपरानिष्ठ हिंदू ब्राह्मणाचाच होता. भाव्यांच्या भडक मतांशीही माझे रक्त कुठेतरी जुळत होते. कानाला वेजे पडली त्या दिवसापासून माझ्या कानी पडले होते ते वाङ्मय उच्च मूल्यांची थोरवी सांगणारे, भारतीयत्वाची भव्यता गाणारेच होते. बहुधा भाव्यांच्या नेमक्या भाषेने माझे परंपरानिष्ठ मन दिपल्यासारखे झाले होते."

"‘अत्रे-आदेश’ खटला गाजला. अत्र्यांना उत्तर म्हणजे धडाडत्या तोफेला हाताच्या तळव्यांनी थोपवण्याचा विक्रम. भाव्यांनी तो केला. एक चोरटे समाधान उगीचच मला बिलगले. वाढ ठरलेल्या पैलवानालाच एखाद्या पठ्ठ्याने चितपट केलेले पाहून पे्रक्षकांतले प्राणी उगीचच हुरळतात, त्यातला प्रकार. त्या काळात मला खरोखरीच कल्पना नव्हती की, भावे कधीकाळी माझे जिगरदोस्त होणार आहेत. त्यांचा माझा बंधुतुल्य स्नेह जमणार आहे. भाव्यांच्या व माझ्या वयांत अंतर. मतांत अंतर. लेखनकौशल्यात अंतर. अध्ययनात अंतर. बौद्धिक पात्रतेत अंतर. सर्व विषयांत मी लहान, ते मोठे. कोणते धागे कसे एकमेकांत गुंतले, काही निश्चितपणे सांगता येत नाही."

"मी भीतभीत त्यांना म्हनव्या लघुकथेचा एक रथही टीकाकारांनी सजवून उभा केला. त्याला चार चक्रे लावली. त्यातले पहिले चक्र पुन्हा पु.भा. भावे यांचेच. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले आणि व्यंकटेश माडगूळकर ही उरलेली तीन चक्रे. पहिल्या पहिल्यांदा टीकाकारांनी ललितसाहित्यिक म्हणून भाव्यांना खूप नावाजले. पुढे दुस्वास आला. टीकाकार काय म्हणतात याची भाव्यांनी मात्र कधी पर्वा केली नाही. बर्‍याला वाईट म्हणणारांची थोबाडे त्यांनी आवर्जून रंगवून काढली.णालो, ‘‘ ‘रक्त आणि अश्रू’ वाचलं. विलक्षण आहे.’’ भावे नुसते हसले. त्यांचे कोकणस्थी कुर्रेबाज डोळे आनंदले नाहीत की, संतोषले नाहीत. ... लोकांनी चांगले-वाईट म्हणण्यात भाव्यांची लाभहानी काहीच नव्हती. त्यांना स्वत:च्या सामर्थ्याविषयी पूर्ण विश्वास होता. भलावणीचा भरावा कुणी भरण्याची गरज नव्हती. ते आपल्या पायावर भक्कम उभे होते."

" ... जिवंत अनुभूती, नेटके स्वभावरेखन, जातिवंत कथाबीजे आणि त्यांचे गतिमान ओजस्वी आविष्कार. त्यांची अक्षरे भुईनळ्यासारखी फुटून वर उडतात. उजेडाची झाडे उभी होतात. ती केवळ चकाकून विझत, निवत नाहीत. अवघ्या उंचीसह आणि विस्तारासह उभीच राहतात. ठिणग्यांचे झाड जणू नक्षत्रांचे होऊन जाते. आकाशगंगेचे पट्टे मनावर उकळत राहतात. ते पुसटत नाहीत की, गोठत नाहीत."

" ... नव्या लघुकथेचा एक रथही टीकाकारांनी सजवून उभा केला. त्याला चार चक्रे लावली. त्यातले पहिले चक्र पुन्हा पु.भा. भावे यांचेच. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले आणि व्यंकटेश माडगूळकर ही उरलेली तीन चक्रे. पहिल्या पहिल्यांदा टीकाकारांनी ललितसाहित्यिक म्हणून भाव्यांना खूप नावाजले. पुढे दुस्वास आला. टीकाकार काय म्हणतात याची भाव्यांनी मात्र कधी पर्वा केली नाही. बर्‍याला वाईट म्हणणारांची थोबाडे त्यांनी आवर्जून रंगवून काढली. ... ‘आम्ही लेखकांना मोठे करतो’ म्हणणार्‍या संपादकप्रकाशकांचा तर त्यांनी मुळीच मुलाहिजा धरला नाही. ‘कुणीही संपादक साहित्यकार निर्माण करू शकत नाही; फार तर शोधू शकतो’ हे भाव्यांचे स्पष्ट मत."

" ... आजही, आजघडीलादेखील भाव्यांची राजकीय, सामाजिक मते प्रवाहाविरुद्ध आहेत. कुठल्याच राजकीय पक्षात त्यांना ‘राम’ दिसत नाही. हिंदुसभा संपलीच. जनसंघाशी त्यांचे जमत नाही. लालभाईंचे तर ते उघड वैरी. काँग्रेसवाल्यांचे ढोंग ते आयुष्यभर रस्त्यावर फेकत आहेत. स्वतंत्रवितंत्रांचा तर विचारच नको. असे सारे आहे खरे; पण परिचिताला पटते की, त्यांची राष्ट्रनिष्ठा प्रखर आहे. गीतेचा खलहिंसायोग त्यांना मान्य आहे. हिंदूंची आचारपरंपरा त्यांना चिरंतन महत्त्वाची वाटते. चातुर्वर्ण्यव्यवस्था टाकाऊ होती असे त्यांना भावत नाही. लोक भले त्यांना ‘मागासलेला’ म्हणोत. आरंभी आरंभी राजकारणाच्या आखाड्यात भाव्यांनी पुष्क्ळ झोंब्याकुस्त्या केल्या. तांबडी माती पाठीला लावून घेतली. त्यांना हवे होते ते आले; पण देशाची फाळणी झाली. भावे कायमचे कष्टी झाले. त्यांच्या रक्तातल्या साहित्यिकाने कौल दिला की, ‘हा खेळ तुझ्यासाठी नाही. तू अक्षराच्या प्रांतातला माणूस!’ तरुण वयात काढलेली वर्तमानपत्रे शास्त्यांच्या अवकृपेला बळी पडली. पदरचा पैसा गेला. निवडणुका अंगाशी आल्या. सहकार्‍यांची पांगापांग झाली. एकाकी पडलेले भावे मग या वाटेला पुन्हा गेले नाहीत. पुढे त्यांनी प्रपंच केला तो केवळ अक्षरांचा. राजकारणावर त्यांनी मते दिली. आखाडा मात्र वर्ज्य केला."

" ... सरकारी पारितोषिके, पदव्या त्यांनी कधी अपेक्षिल्या नाहीत. पुस्तके विश्वविद्यालयांना लागणे, कथानिबंध क्रमिकांतून सामावणे असल्या पुष्कळ गोष्टी तर त्यांनी कधी मोजल्याच नाहीत. त्यासंबंधी बोलले तर ते टवाळपणे हसतात. बोलणार्‍याचीच रेवडी उडवतात. त्यांच्या साहित्यावर मन:पूर्वक प्रेम करणार्‍याला वाटते, आपण होऊन विकत घेतलेले वैर त्यांच्या साहित्याचाही दुस्वास करीत असावे. भाव्यांना त्यांचीही खंत वाटत नाही. बोलणे फारच वाढले तर कडवटपणे हसत ते म्हणतात : ‘‘सावरकरांसारख्यावर अन्याय झाला तिथं आमचं काय? आपल्याला पटतं ते स्पष्ट बोलणार्‍या माणसाचं हेच दैव असतं.’’ भावे दैव मानतात. देव मानतात. विज्ञानाची झेप त्यांना कळते; पण माणसाच्या शक्तींना मर्यादा आहेत हेही ते निक्षून सांगतात. पर फुटलेली मुंगी उडूनउडून उडेल किती? असा त्यांचा सवाल असतो. ... "

" ... गप्पा रंगल्या म्हणजे रात्री पुरायच्या नाहीत. मराठ्यांच्या इतिहासावर बोलणी निघाली की, बसल्या ठायीच पहाट व्हायची. बागेतल्या झाडांवर किलबिल सुरू व्हायची. कळ्यांची फुले होऊन दरवळ सुटायचा. भावेच म्हणायचे, ‘‘बुवा, कोकिळाताई बोलू लागल्या. पहाट झाली. चला आता चहा घेतला पाहिजे.’’ 

"चहाच्या टेबलावरही गप्पाच सुरू व्हायच्या. माझी मुले लहान होती. त्या सर्वांना भावेकाकांनी काही नावे ठेवली होती. मोठ्या मुलाचे नाव शेतकरी. दादा मधल्याचे मोडक इंजिनिअर, तर धाकट्याचे भगवद्भक्त कुम्या. थोरल्या मुलाला खेड्याची ओढ. मधला मोडतोडीत वाकबगार आणि धाकटा मुलगा विरलेले सोवळे नेसून बागेतील फुले खुडायचा. देवपूजा करायचा. माझी एक छोटी मुलगी झोपेत लोळण घ्यायची. या कडेला झोपली असेल तर त्या कडेला जागी व्हायची. भाव्यांनी तिचे नाव ठेवले होते ‘प्रवासिनी’. 

"भावेकाका आले रे आले की, धाकटा कुमार त्यांच्याजवळ गोट्या मागायचा. तेही न विसरता त्याच्यासाठी गोट्या घेऊन यायचे. चुलतेपुतणे मग अशोकतळीच्या तुळशीच्या चौथर्‍यावर बसायचे. भावेकाका गोष्टी लिहिणारे. कुमार त्यांनाच गोष्ट सांगायचा. 

"‘‘एक आगगाडी आली. जोरात आली. पुढे एक वाघ उभा होता. त्यानं तोंड उघडलं. गाडी मग धाड्धाड् वाघाच्या तोंडात शिरली!’’ भावे कान देऊन ऐकायचे. खूश व्हायचे. 

"भावे खानदेशी. मी माणदेशी. दोघांच्या खाण्यातल्या आवडीनिवडी समान. पोळीपेक्षा भाकरी प्रिय. लसूण, कांदा, मिरची हे त्रिकूट पाहिजेच पाहिजे. साधे अन्नदेखील अंगावर येण्याइतके खाल्ले जायचे. सहवासातला गोडवा अन्नात मिसळायचा."

"त्या आनंदमय काळात कामही बहारीचे झाले. ‘सौभाग्य’ची पटकथा आम्ही दोघांनी लिहिली. कथा भाव्यांची. संवादही त्यांचे. मी अनुभवी म्हणून पटकथेच्या रचनेपुरता त्यांचा सहकारी झालो. भावे त्या भागीदारीला म्हणत, ‘जोडविकान.’ चित्रपटाचे काम सुरू झाले. आम्ही दोघेही ‘सेट’वर हजर राहत होतो. मी तर त्या चित्रात भूमिकाच करीत होतो. तोही आग्रह भाव्यांचाच. भाव्यांनीही हौसेने तोंडाला रंग लावला. आनंदावर जणू साय आली. सहवासाचा आनंद, एकत्र निर्मितीचा आनंद, वैचारिक आदानप्रदानाचा आनंद. आनंदच आनंद. असा आनंद आम्ही पुन:पुन्हा लुटला. दोन निबरट पुरुषांची मैत्री निरगाठीसारखी पक्की झाली. भाव्यांचे आणि माझे घर परके राहिले नाही."

"एकदा संध्याकाळी मी व माझी पत्नी भाव्यांकडे जेवायला गेलो. परतायला रात्र झाली. चालत निघालो. भावे पतिपत्नी आम्हाला पोहोचवत आमच्या बंगल्यापर्यंत आली. परत त्या दोघांना पोहोचवत आम्ही दोघे त्यांच्या घरापर्यंत गेलो. असेच होत राहिले. एकमेकांचा सहवास मुळीच सोडवेना. एकमेकांना पोहोचवण्याचा हा चाळा संपला तेव्हा खरोखरच सकाळ झाली होती."

"धारानगरीहून त्यांनी माझ्या पत्राबरोबर अक्कलकाढ्याची फुले पाठवली होती व ती सरस्वतीच्या निवासस्थानाची फुले असल्यामुळे एका अक्कलशून्य साहित्यकाराला स्वहस्ते भरावीत अशी शिफारस केली होती. अशा एक ना असंख्य गोष्टी."

"भावे साठ वर्षांचे झाले. गुणवंताचे वय मोजू नये. भावे तेच आहेत. तसेच राहावेत. संकटांनी त्यांचे प्रफुल्लपण सुकणार नाही. काळानेही त्यांच्या प्रफुल्लतेच्या पाकळ्या मलूल होणार नाहीत. ते आहेत तसेच राहतील. राहावेत. 

"चित्रपट निर्मितीत, त्रेसष्टच्या पराजितपर्वात, पानशेतच्या पुरात, लडाखच्या दौर्‍यात भाव्यांची अनेक दर्शने मला झाली आहेत. मी त्यांना मानतो. त्यांना लिहिताना मी अगदी जुन्या धाटणीच्या मायन्याने आरंभ करतो, - 

"‘सकलगुणैश्वर्यमंडित भावेस्वामी गोसावी यांना शिरसाष्टांग दंडवत...’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 28, 2022 - February 01, 2022. 

"यशवंतराव चव्हाण :काबिल आदमी"
................................................................................................
................................................................................................

"भारताच्या राजधानीतील प्रसंग. करोलबाग भागात आम्हा दोन मराठी साहित्यिकांची अवचित गाठ पडली. 

"‘‘नमस्कार, अण्णा.’’ 

"‘‘नमस्कार. इथं केव्हा आलात?’’ 

"‘‘तीन-चार दिवस झालेत की!’’ 

"‘‘जाऊन आलात?’’ 

"‘‘कुठे?’’ 

"‘‘वाड्यावर.’’ 

"‘‘नाही हो; पण गेलं पाहिजे. तुम्ही जाणार आहात?’’ 

"‘‘अर्थातच.’’ 

"‘‘केव्हा?’’ 

"‘‘हा निघालोच आहे. टॅक्सीच शोधतोय. येता?’’ 

"‘‘जरूर.’’ 

"आम्ही दोघेही एका टॅक्सीत बसलो. ड्रायव्हर शीख होता. आपण दिल्लीत आहोत याचे भान होते. राष्ट्रभाषेत मी ड्रायव्हरला बोललो 

"‘‘रेसकोर्स रोड चलिएगा सरदारजी.’’ 

"सरदारजीने गाडी चालू केली. आम्ही एकमेकांत बोलू लागलोे. 

"‘‘नवल आहे नाही? हा एवढा मोठ्ठा राजकारणी माणूस. आपण बापडे साहित्यिक लोक. इथं आलं की, आवर्जून त्यांना भेटावंसं वाटतं. नाही?’’ 

"‘‘तेच तर वैशिष्ट्य आहे. राजकारणात वावरणारी मराठी माणसं कदाचित त्यांना भेटणार नाहीत; पण साहित्यिक, कलाकार, सामान्य माणूस इथं आला, की त्याला पहिल्यांदा वाटतं, आपण साहेबांना भेटलं पाहिजे.’’ 

"‘‘चव्हानसाब के यहाँ जाना है?’’ शीख ड्रायव्हरने मधेच विचारले. नाहीतरी नेमके कुठे जायचे आहे हे आम्ही त्याला सांगितलेले नव्हते. 

"‘‘जी.’’ मी म्हणालो. 

"एका हाताने चक्र सांभाळीत आणि दुसर्‍या हाताने आपली दाढी कुरवाळीत तो ड्रायव्हर म्हणाला, ‘‘चव्हानसाब बडे काबिल आदमी है.’’

"महाराष्ट्र तर त्यांना मानतोच मानतो; पण त्यांची अखिल भारतीय प्रतिमाही अशीच एका समर्थ आणि सुयोग्य माणसाची आहे. ते संरक्षणमंत्र्यांच्या पदाला योग्य ठरले. ते गृहमंत्री म्हणून यशस्वी ठरले. आज अर्थमंत्री म्हणूनही ते मान्यता पावत आहेत. मला स्वत:ला यशवंतराव या व्यक्तीविषयी विलक्षण जिव्हाळा वाटतो. तेही त्या जिव्हाळ्याला तितकाच स्निग्ध प्रतिसाद आजवर देत आले आहेत. माझ्यासारख्या अन्य कितीतरी साहित्यिकांना त्यांचा स्नेह लाभत आहे. ... "
................................................................................................

"यशवंतरावांचे बालपण विटे येथे गेले. विटे मागे टाकून, भीवघाट उतरला की, माझा भूभाग सुरू होतो. नेलकरंजी, खरसुंडी, गोमेवाडी... तडवळे... आटपाटी... माडगुळे... 

"तो सारा भाग पूर्वी खानापूर तालुक्यात होता. सातारा जिल्ह्यात होता. 

"शाळकरी वयात मी कुंडलला होतो. कुंडलपासून देवराष्ट्रे अगदी जवळ. पाचेक मैल असेल-नसेल. देवराष्ट्रे हा यशवंतरावांच्या मामांचा गाव. या आजोळगावीच त्यांचा जन्म झाला. 

"या देवराष्ट्रे गावाजवळ एक तीर्थक्षेत्र आहे. सागरेश्वरी त्याचे नाव. त्या भागातील मंडळी त्या तीर्थाला आणि तिथल्या दैवतालाही ‘सागरोबा’ अशा लाडक्या नावाने संबोधतात. या तीर्थस्थानी उण्यापुर्‍या अर्ध्या मैलाच्या परिसरात तीनशेसाठ देवळे आहेत. सारी देवळे शंकराची. एका ठायी, एकाच दैवताच्या अनेक प्रतिमा. काही लहान, काही मोठ्या."

" ... घरे पुन्हा उभी करण्यासाठी ब्राह्मणांना दिलेली कर्जे यशवंतरावांनी माफ करून टाकली. ... धर्मांतर केलेल्या पूर्वास्पृश्यांना ते स्वत:ला ‘बौद्ध’ म्हणवू लागले तरी हरिजनत्वाच्या सार्‍या सवलती त्यांनी देऊ केल्या. बाराशे रुपयांच्या आत वार्षिक उत्पन्न असणार्‍या पालकांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळेल, असे केले. मराठी रंगभूमी करमणूककरातून मुक्त केली. साहित्यिक, कलाकार, गायक, नटतमासगीर, कुस्तीगीर, शाहीर या सर्वांसाठी त्यांनी अनुदाने सुरू केली."
................................................................................................

"एकदा असेच आम्ही काही साहित्यिक मध्यरात्रीनंतरही त्यांच्याशी चर्चा करण्यात रमून गेलो. एक वाजला तसे सर्वांचे भान जागे झाले. 

"‘‘चालू या आता.’’ कुणीतरी म्हणाले. 

"‘‘जाणार कसे अण्णा?’’ यशवंतरावांनी मला विचारले. 

"मी म्हणालो, ‘‘सवालच आहे. माझी मोटार नाही. आमच्या कुंडलीत वाहनयोग नाही.’’ ‘

"‘तुम्ही असं करा,’’ यशवंतराव गंभीरपणे म्हणाले, ‘‘एक वाहन घ्या आणि कुंडली त्यात लावून ठेवा. कुंडलीत वाहन नाही तर वाहनात कुंडली!’’ 

"आम्ही सर्वजण खळाळून हसलो."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 01, 2022  - February 01, 2022.  

"एक दीपोत्सवी संध्याकाळ"
................................................................................................
................................................................................................

"आमच्या ‘पंचवटी’ बंगल्याच्या फाटकापासून ते आतल्या देवघरापर्यंत हळदीची पावले काढलेली होती. ती चित्रकलाही वेगळी होती. दोन त्रिकोणाकृती. एक उलटी. एक सुलटी. दोन्ही एकमेकींना जोडलेल्या. पुढच्या त्रिकोणाला पाच-पाच रेघा फुटलेल्या. ही लक्ष्मीची पावले. पोर्चमधल्या फरसबंदीवर आमच्या दीपालीने रांगोळीनेच एक सुरेख चित्र काढले होेते. त्या चित्रात एका तरुण मुलीने हाती पंचारती घेतलेली होती. पोर्चवरच्या छपरांना विजेचे छोटे छोटे कंद हारीने लटकले होते. काही तांबडे, काही निळे, काही लखलखीत. आत प्रवेशद्वारालाही विद्युत्कंदांचीच तोरणे लटकत होती. शेवंतीच्या फुलांच्या माळाही झालरीसारख्या लोंबत्या बांधलेल्या होत्या. 

"जिथे जिथे जागा असेल तिथे तिथे मुलींनी पणत्या लावल्या होत्या. मेणाचे दिवे उजळवले होते. सार्‍या बंगल्यात चंदनाचा आणि जळत्या दारूचा घमघमाट सुटलेला होता. मी सोवळे नेसूनच पोराटोरांना साखरखोबरे वाटीत होतो. ती फुलबाजे, फटाके आणि भुईनळे यातच गुंतलेली होती. 

"लक्ष्मीची पूजा नुकतीच आटोपली होती. प्रसाद वाटून झाला की, मी सोवळे बदलणार होतो. पुढच्या व्हरांड्यातील माझ्या खुर्चीवर बसणार होतो. मुलांची ‘आतषबाजी’ बघणार होतो. जमल्यास एखादा दिवाळी अंक वाचून पाहणार होतो. मुले पुष्कळ जमली होती. घरची, पाहुण्यांची, शेजारची. कलकलाट चालला होता. तशात रेडिओवरही काहीतरी गोड सुरावट वाजत होती. गुंतलेली मुले साखरखोबर्‍याला मोल देईनात. तेव्हा मी हातातले तबक एका जाणत्या मुलाच्या हाती दिले आणि म्हणालो, ‘‘कुमार, तू वाट आता...’’"
................................................................................................

"मागे अंगणात मुलांनी एक भुईनळा उडवला. रंगीबेरंगी ठिणग्यांचे झाड बोरकरांच्या मागे उभे झाले. कैवल्याचे झाड असेलच नाही का? मागे उजडवाडाची झाडे, पुढे ज्योतींच्या फुलमाळा. 

"एका कवीचे दुसर्‍या कवीकडे आगमन. मी आल्याबरोबर त्यांच्या हाती लक्ष्मीचा प्रसाद दिला. तो तोंडात टाकत बोरकर म्हणाले, ‘‘आज दिवाळी नाही का?’’"

"‘‘बर्‍या आहे वहिनी?’’ 

"‘‘तिला थोडासा त्रास होतो आजकाल रक्तदाबाचा. आता बरी आहे. माझ्यावरही एकदोन शस्त्रक्रिया झाल्या. आजारपणानं, चिंता... काही विचारू नका. मुलगा एक अमेरिकेत एक काबूलला. मुली सार्‍या आपापल्या घरी. आमची नभोवाणी सेवा संपली. आता बोरीलाच राहतो...’’"
................................................................................................

"‘‘माडगूळकर, आठवड्यादोन आठवड्यांपूर्वी मोठी मौज झाली. उगीचच्या उगीचच काही हिंदी ओळी आकाशातून उतरून माझ्या खांद्यावर बसू लागल्या का? तुम्हाला माहीत आहे, मी काही हिंदी शिकलेलो नाही.’’ ... "

"‘‘मैं तो फकीर कलंदर हूँ 
"भंवता हूँ भवरस नदियां 
"दसदिकयां की सबही सदियां 
"कब सुखिया कब दुखिया 
"तो भी खीरसमिंदर हूँ । 
"हालत मेरी धून दिवानी 
"मुहब्बत से खिन खिन कुरबानी 
"जोग कियेबीन भोगविमुख 
"मैं सुक जोगिंदर हूँ । 
"बादल आवे बादल जावे 
"आंतरज्योती, कौन बुझावे 
"गगननिवासी, मैं अबिनासी 
"आतमचंदर हूँ ।’’"
................................................................................................

" ... परमात्म्याघरचा पारवा त्वचेच्या रानातील एका एकान्त ढोलीत घुमत होता. बोरकर नादातच गुंतलेले होते. नेहमीचा प्रसंग असता तर मी मौजेने म्हणालो असतो, ‘नादात गुंगसी ते, शब्दांत सांग काही.’ मला काही सांगण्याची आवश्यकताच नव्हती. विणेच्या तारांनाच बोलाचे अंकुर आपसुक फुटत होते. माझ्या कर्णनेत्रांपुढे ती अक्षरवेल लवलवू लागली. डोळे आरंभीच ओरडले, ‘धन्य हो, कवी धन्य हो !’"

"बोरकर आपल्याच धुंदीत दुसरी कविता गाऊ लागले. ... "

"‘‘जो कोई चितसुध होई .
"उसको सहज मिले रे सांई ॥ 
"जिसको दुनिया नहीं पराई 
"दीख परे सो भाई 
"एक दिले मुस्कान मिले तो 
"दसलख रतन कमाई । 
"पास बुराई आते जिसकी 
"बढती जाय भलाई 
"मुखरे अखियन की बरषा से 
"मिटती दरद दुराई । 
"जलबत निरमल सीतल निच्छल 
"जिस दिलकी गहराई 
"उस तीरथ में गगन चांद की 
"जगमगती परछाई।’’"

"‘‘सजन बने तो इसी जनम में 
"मुगती पाय कसाई । 
"सुन ले प्यारे सांज सबेरे 
"कहते गैब गुसांई ।’’"
................................................................................................

"माझ्या सूचनेसाठी थांबायला आज बोरकर राजी नव्हते. मी जणू त्यांच्यासमोर नव्हतोच. मागेपुढे ‘दीपावली’ तेवत होती. बोरकरांची अंगकाठी जणू कबीराच्या हातची लुकाठी झाली होती. 

"‘‘कबिरा खडा बझार में 
"लिए लुकाठी हाथ। 
"जो घर अपना जला ले, 
"चले हमारे साथ।’’ 

"बोरकरांची कविता या असल्या दोह्यांच्या मागे निघालेली होती. स्वत: बोरकरांच्या हाकेनेही परत फिरण्यासारखी नव्हती."
................................................................................................

"बोरकरांचा आवाज चढला. वरच्या पट्टीतच त्यांनी पुन्हा प्रारंभ केला, 

‘‘गजब राज रे तेरा मालिक, 
"सचही लाजवाब 
"बकायदा सब कानून, तेरा 
"कौन लगावे हिसाब? 
"पतिबरता के घर अंधेरा 
"बुझ बुझ जाती बत्ती 
"रंडी के पैखाने पर भी 
"ठंडी चंदरज्योती 
"मूरख होते हौदा चढते 
"लेते जाते मुजरे 
"विद्यामंडित पंडित सारे 
"डण्डे खा कर गुजरे 
"नीयत से जो चलता वोही 
"फिरता भूखा नंगा 
"बेइमान के न्हानीघर में 
"बहती रहती गंगा 
"अकल गुंग हो जाती मेरी, 
"अजब तमाशा तेरा 
"मालिक ये कब मिट जायेगा, 
"होगा लख्ख सबेरा?’’" 
................................................................................................

"मी वेड्यासारखा ऐकत होतो. प्रशस्ती तरी कशाकशाची देऊ? दाद तरी कशाकशाला देऊ? विश्वातल्या विसंगतीचा जाब प्रत्यक्ष विश्वनाथालाच विचारणार्‍या वेलीचा गौरव करू, की ‘बेइमान के न्हानीघर में बहती गंगा’ या सुगम रचना कौशल्याचे गुण गाऊ ? उर्दूफार्सीतला शब्दसमुच्चय असो, की गीर्वाणवाणीतील असो बोरकरांची बोरमाळ लाजवाब. मोत्यासारखा मोती सापडणे मुश्कील असते म्हणतात. बोरकरांना बुडी मारावीच लागत नाही. राजपुतान्यातल्या कोण्या विरहीने आपले पाणीच नामदेवापर्यंत आणले, तसा प्रकार. शब्दरत्नाकर स्वत:च धरणी पोकळीतून उठून, एका माळेचे निवडक मणी बोरकरांच्या स्वाधीन करतो.

"बोरकरांची तार लागली होती. दिव्यांच्या माळा घालून सजलेली ही दीपोत्सवी संध्याकाळही सुगंधी स्वरात त्यांना सांगत होती : 

"‘लागल्या आहेत तारा, तोवरी गाऊन घे.’ 

"बोरकरांनी चहा मागवला नाही की, त्यांची आवडती ‘कॅप्स्टन्’ पेटवली नाही. ते पुन्हा गाऊ लागले. गाऊच लागले : 

"‘‘बचपन से जो सुनता आया 
"मीठा तेरा नाम 
"कीरत तेरी तू भगतनका 
"आठै पहर गुलाम 
"कबीरजी के बुने दुपट्टे 
"जनिके चावल पीसे 
"आफत आई तब दामा के 
"तूने भर दिये पैसे 
"ग्यानदेव के लिए गवाया 
"भेंसा से मुख बेदा 
"हुए पुंड के लिए इर्ंटपर 
"जुग अठ्ठाइस पैदा 
"कंधेपर से एकनाथ घर 
"नित पहुँचाया पानी 
"मौके पर पहनाई तूने 
"ब्याकुल पांडवरानी 
"परेशान जब सेवक तेरा 
"तू उसका अभिमानी 
"गँवार अनपढ बाला को तो 
"दिया अमोलिक बानी 
"इन बातों पर रखा भरोसा 
"दुबिधा कभी न पायी 
"इसी लिए क्या मेरे घर तुम 
"कष्ट उठाते साई?’’"
................................................................................................

"मी त्यांच्या कविता वर्षानुवर्षे वाचीत आलो आहे. ऐकत आलो आहे. त्यांच्या निकट सहवासात वावरलो आहे. त्यांच्या वेगवेगळ्या मन:स्थितीही न्याहाळल्या आहेत. त्यांच्या मनी साजिवंत असलेल्या अश्वत्थाचीच ही निरंतर सळसळ आहे 

"‘‘अपनी प्रीत पुरानी बालम, 
"अपनी प्रीत पुरानी 
"तुम राजा, मैं रानी 
"तुम ब्रिजनंदन मैं सुमनंदन 
"तुम चंदन मैं पानी । 
"तुम बिम्बाधर, मैं बनवन्सी 
"तुम रसमानस मैं कलहन्सी 
"नटरंगी तुम सुमन बिलासी 
"मैं तो गंधदिवानी 
"तुम चंदा मैं रात नशीली 
"तुम रागा मैं गीत रसीली 
"तुम कविजी मैं कोयला घायल 
"तुम दरसन मैं बानी 
"अगनसिखा तुम मैं घीधारा 
"उरधगती मैं तुम धुरुतारा 
"सद्गतिदानी तिखने सुल तुम 
"मैं हरदम कुरबानी’’" 
................................................................................................

"हा गोपीभाव की मधुराभक्ती? काय नाव द्यायचे या प्रेमाला? 

"तू अग्निशिखा आहेस, 
"मी घृतधारा. 
"तू प्रत्यक्ष ऊर्ध्वगती, तर मी? 
"मी अधोगामिनी जलधारा. तू मला शोषून घ्यायचेस. मला अस्तित्वशून्य करायचेस. तुझ्यात मिळवून टाकायचेस! 

"म्हणजे मला ‘मुक्ती’ पाहिजे असे नाही हो जगन्नाथा! 

"सद्गति-दाता तीक्ष्ण शूल आहेस तू. 

"माझ्या श्वासांइतकी बलिदाने करायला सिद्ध आहे. 

"‘तू देव, मी भक्त ऐसे करी’ हीच मागणी. मी कुणाचे गाणे ऐकत होतो? कबीर? तुलसी? मीरा? सार्‍या जगात ज्ञानदीप चेतवणारा नामा, की कळीकाळाच्या माथ्यावर सोटे हाणणारा देहूचा क्षत्रिय? होय, ज्याची सगुण भक्ती उभ्या विश्वाला ईश्वर संबोधण्याइतकी विशाल आहे, त्याच्याच मालिकेतला एक महान मराठी कवी मला आपण होऊन ऐकवत होता. 

"‘‘देखो दिल में जलती बत्ती, 
"लाख चौर्‍यासी अत्तर की 
"अंधे हो के क्यू पूजते हो 
"सूरत मुरत फत्तर की । 
"तिरथबिरथ क्यू करते फिरते 
"नाहक तुम भटका भटकी 
"फिजूल चर्चा बेदशास्त्र की 
"गहरी माया घटमठ की । 
"अखियन में है गंगायमुना 
"ऐसी किरपा गिरधर की 
"तीरथ नहीं करुणा से बढिया, 
"पीरत है मुगती नरकी । 
"छबी खडी है सूरत बडी है 
"कोटि चंद्र चिरसुंदर की 
"उन्हें रिझावो मन बहलावो 
"बात सुनो बे अंदर की ।’’"
................................................................................................

"तासभर निघून गेला. वेळेचे भान दोघांनाही नव्हते. बोरकर म्हणाले, 

"‘‘त्या काळी खांद्यावर उतरलेल्या भिर्‍यातले हे शेवटचे पाखरू 

"‘अपनी तार सितार बजाते 
"दिल चाहे सो गावो 
"इस जग की मरजी इतराजी 
"उस धुन में भुल जावो । 
"सूर जमाते भान गमाते 
"रोम रोम सुलगावो 
"डार डार के पानफूल में 
"फागुन अगन लगावो । 
"इस मिट्टी के कनकन में से 
"सुगंध पात उगावो 
"खिन्न अकिंचन छांव छांव में 
"कंचन दिप जगाओ । 
"वरद सूर से दीन जगत की 
"अक्षय प्यास बुझावो 
"गाते-गाते सुख बरसाते 
"सात गगन उड जावो ।’’" 
................................................................................................

"सात कविता ऐकवून बोरकर थांबले. थोड्या वेळाने निरोप घेऊन गेले. मी ‘सुखिया’ झालो होतो. तृप्त झालो होतो. ती लक्ष्मीची पावले तशीच उमटलेली होती."

"गेल्याच महिन्यातली गोष्ट ही. दिवाळी दरसाल येते. दरसाल पणत्या उजळल्या जातात. रांगोळ्या काढल्या जातात. स्नेहीसोबत्यांच्या भेटीगाठी होतात. मुले आतषबाजीची दारू उडवतात. प्रकाशाची झाडे उभी होतात. ... "

"या लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळीच बोरकर माझ्या घरी आले. 

"या सात कविता ऐकवून गेले. 

"ही सात मोत्यांची भीकबाळी माझे कान अशीच अदृश्यपणे जन्मभर मिरवीत राहातील. ती साहित्यलक्ष्मीची पावलेही मला कधी विसरता येणार नाहीत. बोरकरांची ती हिंदी कविता आणि ती पिवळी पावले माझ्या मन:पटलावर संगतीसंगती उमटली आहेत."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 01, 2022  - February 01, 2022.  
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
"स. गो. बर्वे आमचे स्नेही"
................................................................................................
................................................................................................

"एकोणीसशे एकसष्ट सालच्या जुलै महिन्यात पुणे शहर जलमय झाले. मुठीएवढी मुठा बघता बघता समुद्रासारखी फुगली. पुण्याचे सारे स्वास्थ्यच तिच्या पुराच्या पाण्याने गिळंकृत केले. प्रलयाने जणू एक घोट घेतला. उरलेली चूळ थुंकून दिली. त्या चुळीबरोबर बारा वाटा वाहिलेले जीवन डोळ्यांनी पाहणे अशक्य होते. 

"मी मुंबईरस्त्यावर राहतो. माझी वास्तू वाचली. प्रलय दारापर्यंत आला आणि मान वळवून माघारा गेला. मुंंबईरस्त्यावर राहणार्‍या माणसांनीही मग सुटकेचे नि:श्वास सोडले. बुडलेले बंगले आपादमस्तक मोकळे झाले. कोंडलेली माणसे उघड्यावर आली. त्या रात्री उशिरा का होईना; पण अंतर्धान पावलेली वीज चाकरीवर रुजू झाली. पाण्याच्याच पोटी जन्माला आलेल्या विजेने तितके नुकसान केले नाही. प्रत्यक्ष पाण्याने मात्र छळ मांडला. फुगलेले पाणी ओसरले. सर्वभर किळसवाणी ओलाड उरली. तीही झपाट्याने सुकू लागली. घराघरातले नळ मात्र कोरडे ठणठणीत पडले. शहर पाण्यात विरघळले होते; पण प्यायला पाणी मिळेना. काहीतरी सोय करणे भाग होते. आमच्या रस्त्यावर एक जुनाट बारव होती. ती मोकळी करावी आणि तिच्यावर पंप बसवून पाण्याची तात्पुरती सोय करावी अशी कल्पना कुणीतरी काढली. कल्पना चांगली होती; पण पंप, इंजिन ही प्रकरणे आणायची कुठून? ती कोण आणि कशी मिळवून देणार? 

"‘‘बर्व्यांना भेटा. चुटकीसरशी काम होईल.’’ कुणीतरी म्हणाले."
................................................................................................

"बर्वे महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री झाले. बर्व्यांच्यामुळे त्या खुर्चीला शोभा आली. त्यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला, त्यावेळी मी सभागृहात होतो. राज्यपालांनी माझी नियुक्ती केलेली होती. नामनिर्देशित सभासद म्हणून मी विधानपरिषदेत बसत होतो. वृत्तपत्रांच्या वार्ताहरांनी माझी प्रतिक्रिया विचारली. मी सहजपणे म्हणालो, ‘‘भुंकता येऊ नये आणि चावताही येऊ नये असं शरसंधान केलं आहे बर्व्यांनी!’’ 

"दुसर्‍या दिवशी मराठी वर्तमानपत्रांत माझी प्रतिक्रिया ठळकपणे प्रसिद्ध झाली. त्या दिवशी माझा हात हातात घेऊन बर्वे संतुष्ट स्वरात मला म्हणाले, ‘‘तुमच्यासारख्यांची ही प्रतिक्रिया वाचून फार बरं वाटलं.’’ 

"एकदा मुंबईला आम्ही दोघे त्यांच्याच गाडीने गेलो. पुणे ते मुंबई प्रवासातील ते तीन तास मी कधी विसरणार नाही. 

"बर्व्यांचे विविध वाचन, त्यांची विलक्षण स्मरणशक्ती, मराठी भाषेविषयीचा जाज्वल्य अभिमान या सार्‍या गोष्टींचे दर्शन मला त्या प्रवासात झाले. भाविक खेडुताने बोलावे तसे ते ज्ञानेश्वरांविषयी बोलले. संतपंतांच्या काव्यातील उतारेच्या उतारे त्यांच्या मुखातून पाझरले. दिवंगत आणि विद्यमान मराठी साहित्यिकांच्या अनेक कथा आमच्या संभाषणात सामावल्या गेल्या. आचार्य अत्र्यांच्या प्रतिभेविषयी ते फार आदराने बोलले."
................................................................................................

"विधिमंडळाचे अधिवेशन मुंबई येथे चालू होते. बर्वे मंत्र्यांच्या बाकावर होते. मी सामान्य सभासदांच्या ओळीत होतो. त्यांनी एक चिठ्ठी माझ्याकडे पाठवली : 

"‘‘उद्या सायंकाळी माझ्याकडे भोजनाला या.’’ 

"मी चिठ्ठी वाचली आणि बसल्या जागेवरून होकारार्थी मान डोलवली. सायंकाळी आम्ही दोघे सचिवालयातून निघालो गाडीने. 

"‘‘आपण कुठे जाणार आहोत कविराज?’’ 

"‘‘तुमच्या बंगल्यावर.’’ 

"बर्वे नेहमी ‘आपण’ वगैरेची भाषा बोलत. मला ‘तुम्ही, मी’ करण्याचीच सवय. 

"‘‘माझ्या बंगल्यावर नाही.’’ बर्वे म्हणाले. 

"‘‘मग?’’ 

"त्यांची अपेक्षा होती की, मला सारे माहीत असावे. मला मुळीच माहीत नव्हते अशी स्थिती नव्हती. बर्वे थोडा वेळ थांबले. उगीचच गंभीर झाले. मग हलकेच म्हणाले, 

"‘‘आपल्याला सांगलीच्या राणीसाहेबांकडे आमंत्रण आहे.’’ 

"‘‘ठीक आहे.’’ मी म्हणालो."
................................................................................................

" ... थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या जीवनावर बर्व्यांनी एक ग्रंथ लिहायला घेतला होता. त्यांनी तो लिहून संपवला की नाही हे मला अजूनही माहीत नाही. ‘तो प्रकाशित करू नका’ असा सल्ला त्यांना काही मित्रांनी दिला. बर्व्यांनी तो प्रकाशित केला नाही. बाजीरावांचे व्यक्तिमत्त्वच का वर्णावेसे वाटले असेल? द्यायचे तर या प्रश्नाचे उत्तर अगदी सुस्पष्टपणे देता येईल. ते देऊ नये हा संकेत आहे, इतकेच."

"कै. शास्त्रींनी विचारणा केली आणि बर्व्यांनी होकार दिला. ते दिल्लीला गेले. प्लॅनिंग कमिशनचे सभासद या भूमिकेत ते राजधानीस गेले. 

"माझात्यांचा पत्रव्यवहार होता; पण तुरळक. त्यांनी आवर्जून लिहिले होते, ‘दिल्लीला मला मोठी जागा राहण्यासाठी मिळाली आहे. तुम्ही इकडे येऊन चार दिवस राहिलात तर मला आनंद होईल.’"
................................................................................................

"दिल्लीतला त्यानंतरचा एक प्रसंग. मी त्यांच्या कार्यालयात गेलो होतो. टेलिफोनची घंटी वाजली. फोन कोणातरी महत्त्वाच्या व्यक्तीचा होता हे आम्ही जाणले. बर्वे अतिशय आदराने बोलत होते. पलीकडच्या टोकाकडून बोलणार्‍या व्यक्तीला संबोधनात्मक साद दिली गेली तेव्हा मीही थोडा चपापलो. इंदिरा गांधींशी संवाद करीत होते. बर्व्यांचे बोलणे सुस्पष्टपणे आमच्या कानी पडत होते. पंतप्रधानांची वाणी उमटत आहे इतकेच जाणवत होते. बोलता बोलता बर्व्यांचा स्वर एकदम चढल्यासारखा झाला. ‘‘पण मी म्हणतो बाईसाहेब, ज्यांना या विषयात फारशी माहिती नाही, त्यांनी अशी वचनं द्यावीतच का?’’ 

"बाप रे! मामला गंभीर होता! आम्हाला उगीचच चोरट्यासारखे झाले. इतक्या शेजारी असूनही बर्व्यांचे बोलणे आम्हाला ऐकू येईनासे झाले. खट्ट आवाज झाला. बर्व्यांनी रिसीव्हर ठेवून दिला. ऐकलेल्या संवादाचा संदर्भ विचारणे इष्ट झाले नसते. आम्ही गप्प राहिलो. बर्वे तापले होते. त्यांच्या मुद्रेवरचा रक्तिमा अधिक गर्द झाला. स्वत:शीच बोलल्यासारखे; पण थोडे मोठ्यांदा ते बोलले, ‘‘शास्त्रीजींनी तरी कशाला वचन द्यायचं? विजगापट्टम आणि पोलादाचा कारखाना!’’"
................................................................................................

" ... बर्व्यांचा स्पष्टवक्तेपणा मला फार प्रभावित करून गेेला. राहवलेच नाही म्हणून मी त्यांना उद्देशून म्हणालो, ‘‘परशुरामाच्या कुर्‍हाडीची धार अजून कायम आहे.’’"

"गेल्या निवडणुकीचा रस्ता अरुंद असला तरी सरळ होता. मधले अंतर कमी होते. आता पल्ला मोठा होता. पाणी खवळले होते. किनारा दूर होता. बर्व्यांनी नाव टाकली. सारी शक्ती पणाला लावून ते वल्ही मारू लागले. एक भलामोठा पर्वतप्राय हिमखंड आडवा आला. बर्व्यांची बहादुरी अशी की, त्या हिमखंडाला वळसा घालून ते मुक्कामावर पोहोचले. यशस्वी झाले."
................................................................................................

"सहा तारखेला अपरात्री ‘केसरी’ कचेरीकडून मला फोन आला. वृत्तसंपादक म्हणाले, ‘‘तुम्हाला काय वाटलं ते सांगाल काय?’’ 

"रिसीव्हर कानाशी होता. सर्वांगातून बळच गळून गेल्यासारखे झाले होते. डोळे डबडबले होते. बर्व्यांविषयी काय वाटले ते मी बोलत होतो. वृत्तसंपादक टिपून घेत होते, 

"‘‘तसाच अजूनी तिलक कपाळी 
"सत्काराच्या गळ्यात माळा...’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 01, 2022  - February 01, 2022.  
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
"मी सिंह पाहिला होता!"
................................................................................................
................................................................................................

" ... ‘‘एम.एस.एम. रेल्वेनं चाललो होतो. गर्दी लई. मान्साला मानूस खेटून बसल्यालं. झ्वाप लई आलीती. सबंद डब्यात वळखीचं कुनी न्हाई. बाकड्याच्या कडंवर बसलू हुतो. शेजार्‍याला म्हन्लं, ‘वाईच् सरका.’ त्यो खसकन अंगावर आला. मी म्हन्लं, ‘राग्वू नका. वाईच् जागा द्या.’ 

"‘‘त्यो म्हन्ला : ‘कोन लागून गेला असं तुम्ही?’ 

"‘‘मी म्हन्लं : ‘कुनी न्हाई. गरीब भंगी हाय मी.’ 

"‘‘भंगी म्हणल्याबरोबर त्या बाकावरची समदी मानसं उठली. लांब सरली. मला बसायला सप्पय जागा गावली.’’"
................................................................................................

" ... नाना पाटलांच्या अधिपत्याखाली सातारा जिल्ह्यात बंडाचा झेंडा उंचावला गेला. 

"नाना पाटलांच्या माणसांनी नुसत्या सातारा जिल्ह्यातच नव्हे; तर अवघ्या देशात धुमाकूळ सुरू केला. कुठे रूळ उखडले, कुठे स्टेशने पेटली, कुठे पोस्ट लुटले आहे. कुठे खजिना लांबवला गेला, कुठे चालत्या आगगाडीवर धाड पडली. परक्या सरकारचे पोलीस आणि क्रांतिकारक यांचे युद्ध जणू चहू दिशांनी भडकले. भूमिगत कार्यकर्त्यांनी ठायी ठायी भूकंपासारखाच कल्लोळ उडवून दिला. सरकारला सळो की पळो करून सोडले. त्याला राज्यकारभार करणे जड झाले. स्वत: नाना पाटलांनी तासगावच्या सरकारी कचेरीवर तिरंगा ध्वज उभारला. अनुयायांनी त्यांची अनुकरणे केली. सरकारी वॉरंटाच्या वावड्या हवेतच उडू लागल्या. नाना पाटलांना पकडण्यासाठी सरकारने पाच हजारांचे इनाम लावले.

"नाना पाटील कसचे हाती लागतात! खेड्यापाड्यातल्या गरीब, निरपराध जनतेसाठी त्यांनी प्रतिसरकार निर्माण केले होते. इंग्रजधार्जिण्या मुर्दाडांना धाक बसावा म्हणून त्या सरकारने आपली स्वत:ची न्यायालये निर्माण केली होती. देशातील अराजकाचा लाभ घेणारे हरामखोर आणि भूमिगतांचा ठावठिकाणा सरकारला कळवणारे स्वार्थी भेकड यांना पत्र्या मारण्याचे सत्र सुरू केले होते. पत्र्या मारणे म्हणजे पायावर पत्रे ठोकणे, अशी लोकवदंता पसरली होती. खरा प्रकार वेगळा होता. गुंडांना आणि खबर्‍यांना पकडून, प्रतिसरकारचे अधिकारी त्यांचे तळपाय सडकून काढीत होते. रक्त न सांडता त्यांची हालचाल बंद करून टाकणे हाच त्या शिक्षेचा हेतू होता. गावोगावच्या प्रतिसरकारच्या ठाण्यावर एक ‘भरमप्पा’ ठेवण्यात येत होता. हा भरमप्पा म्हणजे एक लांबलचक जोड्याच्या आकाराचा कातड्याचा तुकडा असे. फितुरांना हग्या मार देण्याचे काम तो चोख बजावी."
................................................................................................

"सरकारच्या सहस्रावधी डोळ्यांना मात्र नाना पाटील सापडता सापडत नव्हते. त्यांच्यावरच्या अतीव श्रद्धेमुळे जनलोकांत त्यांच्याविषयी तर्‍हेतर्‍हेच्या नवलकथा प्रसृत होत होत्या. कुणी म्हणत होते, ‘नाना पाटलांना एकाएकी गुप्त होण्याची विद्या अवगत झाली आहे.’ कुणी सांगत होते, ‘तसं नाही; मी हजर होतो. प्रत्यक्षाला प्रमाण नको.’ नाना पाटलांची आई वारली, अशी बातमी कळली म्हणून पोलीसपार्टी खुद्द खेड्याला आली होती. पोलीसपार्टी पुढच्यामागच्या दरवाजांची दारे रोखून बसली होती. म्हातारीची तिरडी त्यांच्या समोरून मसणवाटीकडे गेली. त्या तिरडीवर जिवंत नाना पाटीलच गाढ झोपलेले होते. आई वारल्याची वार्ताच खोटी. एक ना अनेक. शिवाजी महाराजांविषयीच्या ऐतिहासिक दंतकथाच जणू समाजात पुन्हा नाचूबागडू लागल्या होत्या. नाना पाटील सरकारच्या हाती लागणे शक्य नाही, नव्हेते लागू नयेत असे जनसामान्यांना वाटत होते. हाच त्या कथांचा सारा इत्यर्थ."
................................................................................................

"मी आहे तोवर मला एकच अभिमान वाटत राहील की, मी सिंह पाहिला होता. एवढेच नव्हे, तर त्याने मला क्षेमालिंगन दिले होते."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 01, 2022  - February 01, 2022.  
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
"बांधावरली गाय"
................................................................................................
................................................................................................

"‘चाहुरांचे तुम्ही धनी, 
"तुम्हाला रे उणे काय? 
"धनंतर भाऊ माझे, 
"बांधावरली मी गाय.’ 

"माझी मोठी बहीण अक्का हिने रचलेली ओवी आहे ही. नेमक्या किती एकरांचा चाहूर होतो ते मला माहीत नाही. तिचे म्हणणे, अशा कैक चाहुरांचे आम्ही धनी. आम्ही तिचे पाच भाऊ. आम्हाला धनधान्यांची, पैशाअडक्याची काही ददात नाही. देवाने आम्हाला काहीच कमी केलेले नाही. तिचा स्वत:चा संसार ओढग्रस्तीचा आहे. कधीतरी ती आमच्या एखाद्या वावरात येईल. उभ्या पिकाला मुळीच तोंड लावणार नाही. शेतातील पीक जोसात आले म्हणजे हरळीही आतबाहेर खूप माजते. पिकातले तण काढून टाकावे लागते. बांधावरचे गवत राहून जाते. त्याच्याकडे कुणी लक्ष देत नाही. ते गवत मात्र पोटभर खाऊन ती परत फिरेल. आम्हाला आशीर्वाद देईल. 

"फार शालीन आणि अति हळवी आहे ही ओवी. नुसती ऐकली तरी माझे डोळे ओलावतात. अक्काच्या अंत:करणाची अवस्था मला समजते. बाळपणापासूनच्या आठवणी मनात गर्दी करतात. किंचित स्थूल शरीराची, साधे नऊवारी लुगडे नेसलेली, कपाळावर आडवे गोलाकार कुंकू ठसठशीतपणे लावलेली, प्रौढ सवाष्ण, पायातल्या जोडव्यांचा नाद करीत माझ्या स्मृतीच्या पायर्‍या हळूहळू चढत वर येऊ लागले. 

"माझ्या खेड्यात म्हणजे अक्काच्या माहेरगावी आता वीज आली आहे. गावात पिठाच्या दोेन-तीन चक्क्या चालू असतात. भल्या सकाळी, कमरेला खुरपे अडकवून रानाकडे जाणारी रोजगारीणदेखील आता हाताने दळत नाही. अक्का मात्र अजून दळायला बसते. भावनेने भरलेल्या ओव्या चोरट्या स्वरांनी गात असते. काळ कुठच्या कुठे बदलला आहे हे जणू तिला ठाऊकच नाही. इतिहास आणि वर्तमान यांच्या बांधावरच तिचे मन अजून उभे आहे. 

"माहेरी आलेली असली म्हणजे चांदणी उगवताना अक्का जागी होते. अंथरुणावर बसल्या बसल्याच हळू आवाजात भूपाळी म्हणते. तिचा आवाज मोठा सुरेल आहे असे नाही. ‘वेडेवाकुडे’ म्हणावे असेच तिचे गाणे असते. तिच्या त्या गाण्याने सारे घर हळूहळू जागे होत असते."

"मग ती परसदारी जाते. आडातून दोन पोहरे ताजे पाणी काढते. तोंड धुणे आटोपते. तुळशीला नमस्कार करते. आत येऊन जाते. जागे करते. जाते फिरू लागते आणि अक्काला गाणी स्फुरू लागतात. ‘बापाजी पंडिता’पासून ‘लेकीच्या माझ्या बाळा’पर्यंत तीन पिढ्यांतल्या स्वकीयांचे गुणवर्णन तिच्या ओव्या करीत राहतात. आई जागी होते. अक्काला मदत करण्याची तिची इच्छा असते. अक्का तिला जात्यावर बसू देत नाही. ‘सरलं दळण’च्या ओव्यांची एक माळ गुंफून ती उठते. 

"भावजया झोपलेल्या असतात. मुले लोळत असतात. भावंडे सकाळच्या सुस्तीत असतात. आई बाहेरच्या अंगणात सडा टाकू लागते. अक्का परसदारच्या चुलवणाला पेटू घालते. 

"चुलवण ही पुरातन संस्था आमच्या खेड्यातल्या घराच्या मागीलदारी अजून अस्तित्वात आहे. चुलवण पेटू लागली की, अक्का पुन्हा चार पोहरे पाणी शेंदते. पाण्याचा हंडा भरते. तो चुलवणावर चढवते. हा हंडा मूळचा तांब्याचा असला पाहिजे. शेंदराच्या पुटापुटांनी जसा बजरंग तांबडालाल होतो, तसा काजळीच्या पुटांनी तो हंडा काळाकुट्ट झालेला असतो. तो हंडा तापेपर्यंत आईअक्का चुलवणासमोर उबेला बसतात. मायलेकीची काहीबाही बोलणी चालू असतात. आवाज आईचाच येतो. अक्काचा नाही. ती फार कमी बोलते आणि बोलते तेव्हाही अगदी हळू बोलते. 

"सूर्योदयाच्या आत अंगधुणे उरकून अक्का जी स्वयंपाकघरातल्या चुलीशी बसते ती दुपारी दीड वाजेपर्यंत. आई, भावजया, भाच्या तिला मदत करतात, असे नाही; पण रांध्याचा मुख्य भार अक्क्ाच्या माथी. तो कुणी तिच्यावर लादलेला नसतो. ती होऊनच ते उचलते."

" ... मुलांच्या पंगती, पुरुषांची पंगत हे सारे होताहोता दुपारचा दीड वाजतोच वाजतो. मग बायकामंडळी जेवायला बसतात. सगळ्यांचे संपले तरी अक्का जेवतच असते. मग ती थोडी अंग टाकते न टाकते तोवर चहाची वेळ होते. चहा, मधली खाणी... धान्य निवडणेकेरवारेसांजवाती यातूनच मध्ये ती केव्हातरी देवाला जाऊन येते. पुन्हा रात्रीसाठी स्वयंपाक. अक्का आणि तिची चूल. 

"ही सारी उसाभर करीत असताना अक्का फारसे बोलत नाही. सारी कामे ती जणू मुक्यानेच करीत राहते. चढा शब्द तर औषधाला नाही. तिची सारी कामे रेखीव, स्वयंपाकही रुचकर; पण ही कामे करीत असताना तिची गती मात्र अति मंद. मुंगीच्या कष्टासारखे अक्काचे कष्ट चालू असतात. वेग नाही; पण उसंत नाही. आळस नाही. आदळआपट नाही. रात्री अंथरुणावर पडल्यावर मात्र तिचे तोंड पुन्हा बोलू लागते. तिला नाना स्तोत्रे तोंडपाठ आहेत. प्रत्येक वाराची निराळी देवता. जितक्या देवता, तितकी स्तोत्रे."
................................................................................................

"वयाची साठी जवळ आलेली असताना माहेरच्या घरी अक्का आपणहून इतके कष्ट करते, मग सासरी तिचे आयुष्य कसे गेले असेल? 

"तिच्या सासरच्या घरी मी फारसा कधी गेलो नाही. गेलो तेव्हा थोडा वेळ थांबलो. विचारपूस केली आणि उठलो. असेच झाले. तिच्या सासरची माणसे काही वेगळीच होती. त्यातल्या काही माणसांनी तिला आरंभापासून धारेवर धरली होती. ते सारे सोसले. संसाराचा गाडा निमूटपणे ओढतओढत इथवर आणला. बंडाची कल्पनासुद्धा तिच्या मनाला कधी शिवली नाही. सारा जन्मच ती भिऊन वागत आली आहे. 

"आम्हा सात भावंडांत अक्का सर्वांत मोठी. आईवडिलांचे पहिले अपत्य. आजोबा मोठे कर्तबगार कुलकर्णी होते. त्यांना वाटत होते, मुलाला मुलगा व्हावा. झाली मुलगी. आजोबांनी तिचे नाव ठेवले, विठाबाई. ते तिला हाक मारीत ती पुरुषाच्या नावाने. ते तिला म्हणत, ‘विठ्ठलपंत.’ 

"आजोबा हयात असते तर विठ्ठलपंतांचे दैव कदाचित वेगळे झाले असते. अक्का सात वर्षांची असताना आजोबा वारले."

"वडिलांच्या कारकिर्दीत घरालाच गरिबी आली. शेतीवाडी मोडली गेली. जमिनी मातीमोलाने करद्याच्या हवाली करून वडील नोकरी नेईल तिकडे हिंडत राहिले. अशा एका गावी अक्काला देवी निघाल्या. मक्याच्या कणसासारखे तिचे अंग फोडांनी फुलून आले. आईने खूप शुश्रूषा केली. अक्का वाचली; पण ती आधीच वर्णाने काळीसावळी. त्यात देवीच्या ठिपक्यांनी तिच्या मुद्रेवर कुरूपपणाचे शिक्के मारले. त्या आजारातून उठल्यापासून ती अशी भीतभीत वागू लागली. त्या आधी तिला गावभर मैत्रिणी होत्या. पोरींचा एक घोळकाच्या घोळका तिच्या आगेमागे असायचा. त्या गाणी म्हणायच्या. काचाकवड्या खेळायच्या. फुगड्या, झिम्मे, पिंगा, बुरुल्ला असे अनंत खेळ चालायचे. त्या गावात आमच्या आईचे नाव पडले होते, ‘इठाबाईची आई.’ देवीच्या आजारातनं उठल्यानंतर ती फारच मवाळ झाली. लहान मुलाने दटावले तरी ती भिऊ लागली. बोलणेही कमी झाले.

 "मी लहान असेन, चारपाच वर्षांचा. कशावरून तरी चिडून मी तिच्या पायाच्या मांसल भागावर एक बांगडीची काच ओढली होती. रक्ताची केवढी तरी रेघ उमटली. तिने मला मुळीच मारले नाही. ती भीतभीत आईकडे गेली. आईने मला थोपटून काढले तेव्हा आवरायला तीच पुढे आली."
................................................................................................

"अक्का नांदायला गेली तेव्हा आई आणि मी काही दिवस तिच्या सासरी गेलो होतो. त्या गावाला पाण्याचे फार दुर्भिक्ष होते. एक चिंचेची विहीर होती. चढाउतरायला भारी अवघड. सारा गाव त्या विहिरीचे पाणी प्यायचा. अक्काच्या काखेवर घागर बसली. येरझारा सुरू झाल्या. पायर्‍या नसलेल्या त्या विहिरीतून पाणी आणणे म्हणजे मरण होते. आईला ते पाहावले नाही. ती अक्काच्या सासूबाईंना सहज काही बोलायला गेली. मात्र, जो भडका उडाला! सांगता सोय नाही. उजाडल्यापासून मावळेपर्यंत सासू तणतणत राहिली. आम्ही दोघेही तिच्या सासरहून परत आलो. फार अपमानित होऊन आलो. पुन्हा कधी तिकडे जावेसे वाटले नाही. आई तर पंचवीस वर्षे त्या बाईशी बोललीदेखील नाही. अक्काचा सासुरवासही एक अविस्मरणीय गोष्ट असावी असे वाटते. तिने त्यावेळी ती कुणालाच सांगितली नाही. आता कधीकधी सांगते, सर्वांच्या पानातले उरलेले अन्न ही म्हणे अक्काच्या थाळी! एखाद्या मुलीने ते ताट लाथेने उडवले असते आणि माहेरचा रस्ता सुधारला असता."
................................................................................................

"प्रारंभी प्रारंभी तर अक्काचा फार छळ झाला. त्या काळात माझे एक गाणे स्त्रीवर्गात फार लोकप्रिय झाले होते. त्याची रचना अगदी गलथान होती; पण कथा अंत:करण पिळवटून टाकणारी होती : 

"‘खांबेटे यांची कन्या, 
"तिचे नाव कृष्णाबाई. 
"असा कसा हा सासुरवास, 
"ऐकियला नाही.’ 

"त्या खांबेट्यांच्या मुलीसारखाच सासुरवास अक्का भोगत होती. तिच्या सासूसारख्याच तिच्या नणंदाही अजब स्वभावाच्या होत्या. एकीने तर एका भरदुपारी अक्काला विहिरीत ढकलून दिली. भावजयीला पाण्यात ढकलून नणंद आपली माघारी घरी. अक्काचा सासुरवास व जन्म तेव्हाच संपायचा; पण एका शेतकर्‍याने तिला पाहिले. उडी घेतली. वाचवली. अक्काचा सासरा भला माणूस होता. बायका आणि मुली यांना समोर उभ्या करून त्याने विचारले, ‘‘बायांनो, तिला तुम्हाला मारायचीच होती; तर आधी आणलीत कशाला आपली करून?’’ 

"सासर्‍यांनी स्वत: लक्ष घातल्यावर छळाचे उकळते पाणी थोडे विसरले गेले. हे सारे आमच्या डोळ्यांमाघारी चालले होते. आम्ही अक्कापासून दूर होतो. तसे तिच्या सासरच्या आणि माहेरच्या गावांत अंतर दहा मैलांचे; पण माहेरात होते कोण?"
................................................................................................

"आम्ही ज्या गावी असू त्या गावीही सण यायचेच की. पंचमी, संक्रांत, दिवाळी आली की, आईला आपल्या सासुरवासी मुलीची आठवण व्हायची. तिच्या डोळ्यांतून गंगायमुनांचे प्रवाह वाहू लागायचे. ती वडिलांजवळ हट्ट घ्यायची: ‘‘मुलीला आणा.’’ 

"मुलीला आणणे सोपे का होते? भाड्यापुरते तरी पैसे नकोत का? बरं, त्यातून सोय केली. मुलीला आणायला गेलो, पाहुण्यांनी पाठवलीच नाही तर? आईचा हट्ट विकोपाला जायचा. वडिलांना सवड काढणे भाग पडायचे. 

"अक्का यायची आणि आपली मुकेपणाने कामाला लागायची. आईचा भार कमी व्हायचा; पण तिला वाटायचे, माहेरी तरी मुलीने आरामात चार घास खावेत. अक्काला ती सवयच पडत चालली होती. काम करीत राहायचे. सारखे काही ना काही काम करीत राहायचे. कुणाशी बोलायचे नाही, हसायचे नाही, काही नाही. ती परत निघाली म्हणजे आईचा गहिवर दाटायचा."
................................................................................................

"हे असेच चालत राहिले. अक्का सासुरवासाखाली भरडली जात होती. आम्ही या गावाहून त्या गावी जात होतो. उपर्‍यासारखे जगत होतो. 1940 सालच्या सुमाराला वडिलांची ती नोकरी एकदाची संपली. मी कोल्हापूरला गेलो. कमावू लागलो. धाकट्या भावाने जोर धरला. तो परत गावी जाऊन राहिला. त्याने शेतीला ऊर्जितावस्था आणण्याासाठी चंग बांधला. आईवडील तिकडे जाऊन राहिले. अक्काचे माहेर जवळ आले. 

"माहेरच्या ओसाड जमिनी हिरवळू लागल्या. अक्काचे जाणेयेणे, चोळी-बांगडी चालू राहिले. एकाने हत्तीसारखी धडकी मारल्यावर आमच्या सार्‍या भावंडांचे कर्तृत्वाचे दरवाजे उघडे झाले. जो तो आपले दैव उभारू लागला. अक्काला आनंद होता. अमावास्येच्या अंगणात उभी राहून ती चंद्राच्या वाढत्या कला न्याहाळीत होती. सासरात सुख नव्हतं; पण माहेरचा आसरा सुखाचा होत होता. इतक्यात...

"गांधीवधाच्या दंगलीत आमचे खेड्यातले घर जळून गेले. नशीब, माणसे वाचली. जिद्द धरून त्या जळत्या घराच्या पाठी आम्ही नवी वास्तू उभी केली. अक्काचे माहेर पुन्हा वसले; पण एवढ्यात वडील गेले.

"अक्काने आईच्या गळ्याला मिठी मारली. 

"ती मिठी आईने अजून सोडवलेली नाही. 

"आम्ही सारी भावंडे आईपासून दूर गेलो आहोत. आमचे आमचे प्रपंच आहेत. आमच्या आमच्या विवंचना आहेत. आठवण झाली की, आई आमच्याकडे येते. कधी माझ्याकडे, कधी तात्याकडे, कधी धाकट्या अंबादासकडे, कधी लीलाताईकडे; पण तिचे चित्त इथे नसते. ते खेड्यातल्या घराकडे असते. तिथेही एका भावाचा प्रपंच आहे. एक भाऊ जवळच बिर्‍हाड करून राहतो. 

"वडिलांच्या पुण्यतिथीला बव्हंशी आम्ही सर्वजण एकत्र येतो. 

"कुणातरी मुलाचा आई पाठपुरवठा करते. अक्काचे माहेरपण केल्यावाचून राहत नाही."
................................................................................................

"अक्काचा संसार वितळला आहे. तिची दोन मुले कर्ती झाली आहेत. दोन मुलींची लग्ने झाली आहेत. अक्का आता आजी झाली आहे. आईला अजूनही वाटते, अक्काने माहेरला यावे. कंटाळा येईतो राहावे. आपल्याला मिळेल त्यातले थोडे भावांनी बहिणीसाठी वेचावे. 

"आईची ही इच्छा भाऊ जाणतील. भावजयांना ती कशी जाणवणार? त्या कधीतरी नाकांना सुरकुत्या पाडतात. वर्षातले जवळजवळ आठ-दहा महिने सलग आई खेड्यावर असते. तिथल्या शेतीला मिळणारा वानवळा अक्काच्याही ओटी पडावा असे तिला वाटते. ओल्या हुरड्यापासून तर गाईच्या खरवसापर्यंत सार्‍या वस्तू आई अक्काकडे पोहोचवते. खेड्यातल्या घरातून कधी नापसंतीचा सूर उमटतो.

"माहेरच्या जात्यावर बसल्या बसल्या अक्का त्या स्वराला मवाळपणे म्हणाली, 

"‘‘चाहुरांचे तुम्ही धनी । 
"तुम्हाला रे उणे काय? 
"धनंतर भाऊ माझे 
"बांधावरली मी गाय.’’

"ती स्वत:ला ‘बांधावरली गाय’ म्हणवते; पण खेड्यातले घर आरोप करते : धान्यातले धान्य, भाज्यातल्या भाज्या, दुधातले दूध, लोणची, पापडदेखील आई लेकीकडे पाठवते. 

"आईचा जीव अक्काकडे झेपावणारच. तिने भोगलेली सारी दु:खे तिने कुणा एकीजवळ समग्र सांगितली असतील तर आईजवळच. अन्य कुणाला ऐकून घेण्याइतकी तरी सवड आहे?"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 01, 2022  - February 01, 2022.  
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
"सुरांचा वसंत सरला"
................................................................................................
................................................................................................

"‘‘मी सुधीर फडके बोलतोय.’’ 

"‘‘का हो?’’ 

"‘‘एक वाईट बातमी ’’ 

"पायांना कापरे भरले. कपाळावर घाम आला. छातीत धस्स झाले. त्यांचे वाक्य तोडूनच मी विचारले, ‘‘काय झालं आणखी?’’ 

"‘‘वसंतराव देसाई गेले. अकस्मात लिफ्टमध्ये अडकले म्हणे आणि ’’ 

"‘‘काहीतरीच काय सांगता?’’ मी जवळजवळ कळवळून ओरडलोच. 

"‘‘माझाही विश्वास बसत नाही; पण ‘जसलोक’मध्ये काम करणार्‍या डॉ. वाघ आहेत, त्यांचा फोन आला होता.’’"
................................................................................................

"अंत्ययात्रेला गेलो. व्यवसायातले, राजकारणातले मित्र भेटले. सगळ्यांचीच काळजे गलबललेली होती. सर्वांचेच डोळे पाझरत होते. 

"एका निर्मात्यांनी सांगितले, ‘‘नागपूरहून परतताच ते आम्हाला म्हणाले होते, तुमच्या चित्राचं बॅकग्राउंड म्यूझिक उरकून घ्या. आमचा काही नेम नाही.’’ नागपूरहून परतलेल्या एका ज्येष्ठ सभासदांनी सांगितले, ‘‘ते म्हणाले होते, ‘आपण शहात्तर साल पाहणार नाही !’ ’’"
................................................................................................

" ... ‘प्रभात’ कंपनीतला एक ‘बॉय’ अखिल भारतीय कीर्तीचा संगीतकार, पद्मश्री वसंतराव देसाई म्हणून आज डौलाने वावरत होता."

" ... वसंतरावांनी आयुष्यात कधी लग्न केले नाही; पण त्यांनी फार मोठा प्रपंच केला. अनेकांना हात दिला. असंख्यांना आधार दिला. आपले खेड्यातले घर तर त्यांनी मोठे केलेच; पण स्वत:चे मनही ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणण्याएवढे मोठे केले. त्यांच्या प्रत्येक कृत्यात माणुसकी होती; कारण संतत्व त्यांच्या रक्तात भिनले होते."
................................................................................................

"‘राजकमल’च्या ‘रामजोशी’ची कथा मी लिहिली होती. त्या चित्रपटातील बरीच गीते मूळ रामजोशीबुवांची होती. काही थोड्या लावण्या व सवालजवाब लिहिण्याची ‘चावटी’ करणे मला भाग होते. त्या चित्रपटात संवाद फार थोडा होता. चित्रपटाचा अर्धाधिक भाग संगीतमय होता. वसंतरावांनी ते सारे संगीत उत्पन्न केले. त्यासाठी 

"अविश्रांत श्रम घेतले. लावणी या काव्यप्रकाराचा अभ्यास केला. अविश्रांत श्रम हा गुण त्यांनी आपल्या गुरूपासून श्री. व्ही. शांताराम यांच्याकडून घेतलेला होता. ‘रामजोशी’ चित्रपटातील गाणी ऐकली तेव्हा मी थक्क झालो. ‘सुंदरा मनामधी भरली’, ‘भला जन्म हा तुला लाधला’, ‘नर जन्मामधी करून घे’ इत्यादी रामजोशीबुवांच्या लावण्यांना तर वसंतरावांनी अप्रतिम चाली लावल्या होत्याच; पण माझ्या सुती शब्दांनाही आपल्या स्वयंयोजनेने त्यांनी रेशमासारखे मुलायम करून टाकले होते. 

"‘रामजोशी’ बोलपटातील रामजोशाला त्याचे स्नेहीसोबती ‘कविराय’ म्हणत. वसंतरावांनी तोच शब्द तुर्‍यासारखा माझ्या टोपीत खोचून टाकला. ते मला म्हणत, ‘कविराज!’ 

"‘रामजोशी’ बोलपट ‘मतवाला शायर’ या नावाने हिंदीतही निघाला होता. हिंदीकरण करण्यासाठी सुप्रसिद्ध कवी नरेंद्र यांची योजना झाली होती. 

"रामजोशींची दक्षिणी लावणी उत्तरी पेहरावात कशी दिसते ते पाहण्याची मला फार इच्छा होती. नरेंद्रांनी गीते लिहिली होती. वसंतरावांनी चालीही लावल्या होत्या. मला त्या ऐकायला मिळाल्या नव्हत्या. आवर्जून ऐकण्याचे ठरवावे आणि काहीतरी अडचण येत रहित व्हावे असेच होत राहिले होते."

"एकापाठोपाठ एक, सारीच्या सारी गीते वसंतरावांनी मला गाऊन दाखवली. मी निहायत खूश होऊन गेलो. वसंतरावांचा इतका मोकळाचाकळा आवाज मी त्या रात्रीतच ऐकला. पूर्वी ऐकला नव्हता; नंतरही ऐकायला मिळाला नाही. 

"‘‘आवाज उत्तम आहे तुमचा.’’ 

"वसंतराव हसले आणि म्हणाले, 

"‘‘ ‘ज्ञानेश्वर’ पाहिला होता का ‘प्रभात’चा?’’ 

"‘‘हो. हो.’’ 

"‘‘त्यात एक गाणं होतं माझं, मी गायलेलं.’’ 

"‘‘कोणतं हो?’’ 

"‘‘ ‘आम्ही दैवाचे, दैवाचे शेतकरी रे 
"करू काम 
"मुखी नाम 
"राम हरी रे....’ ’’ 

"वसंतरावांनी गुणगुणून दाखवले. 

"मला ‘ज्ञानेश्वर’मधील ते दृश्यच आठवले. तो गाडीवान शेतकरी आठवला. न राहवून मी विचारले, ‘‘त्या गाडीवानाची भूमिका —’’ 

"‘‘मीच केली होती!’’ 

"‘‘वसंतराव?’’ 

"‘‘अहो, मला बर्‍याच गोष्टी थोड्या थोड्या येतात. ‘प्रभात’मध्ये मी आलो तो पडेल ते काम करण्यासाठी.’’ 

"‘‘आणि झालात संगीतदिग्दर्शक!’’ ‘‘ती अण्णांची कृपा!’’ 

"व्ही. शांताराम यांच्याविषयी वसंतरावांच्या मनीमानसी परमादर वसत होता. त्यांचे भव्य छायाचित्र त्यांच्या बैठकीच्या खोलीत प्रमुख जागी लावलेले असे. त्याला पुष्पहार चढवलेले असत. मला वाटते, ही गुरुपूजा नित्यच होत होती. 

"‘रामजोशी’नंतर मी परत माझ्या मराठी मुलुखात गेलो."

" ... पुन्हा गाठ पडली. ती ‘झनक झनक पायल’च्या वेळी. ‘झनक झनक’ची कथा माझी नव्हती; पण नंतर निघालेल्या ‘तुफान और दिया’ आणि ‘दो आँखे बारह हाथ’ यांच्या चित्रकथा माझ्या होत्या. हिंदी गीते मी काय लिहिणार? ती पं. भरत व्यास लिहीत; पण देसाई कटाक्षाने ती मला ऐकवीत. माझ्या कल्पना समजून घेत. ‘राजकमल कलामंदिरा’तील ती पाच वर्षे आमच्या आयुष्यातील सुवर्णसंवत्सरे. ... "

"पुढे आम्ही दोघेही ‘राजकमल’मधून निघालो. मी प्रथम, वसंतराव नंतर. ‘प्रकाश फिक्चर्स’ने ‘गूंज उठी शहनाई’ नावाचे एक चित्र केले. त्याची कथा माझी होती. त्याचे संगीत वसंतरावांनीच केले. संगीतावरच त्या कथेची उभारणी होती. ते संगीत वसंतराव करणार म्हणूनच कथालेखनाचे काम माझ्याकडे आले होते, असे म्हणणे जास्त खरेपणाचे ठरेल. ... "

"वसंतरावांना फार वाटे की, मी हिंदीची पेठ जिंकावी; पण माझा स्वभाव अस्सल मराठी. आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या सामर्थ्याचा आम्हाला अकारण अभिमान. मी फारसा मुंबईच्या फंदात पडलो नाही. पुण्यातच गुरफटलो."
................................................................................................

"चिनी आक्रमणाच्या वेळी ‘जिंकू किंवा मरू’ हे माझे गीत त्यांनी घरोघर पोहोचवले. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर एक लाख मुलामुलींनी गायलेले ते गीत आजही माझ्या कानामनात घुमत आहे, असे वाटते : 

"‘माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू 
"जिंकू किंवा मरू’"
................................................................................................

"सुप्रसिद्ध अभिनेत्री व नर्तकी वैजयंतीमाला हिला एक नृत्यनाट्य बसवायचे होते. त्याला संगीत देण्याचे वसंतरावांनी मान्य केले; पण तिला हेही सांगितले, 

"‘‘लिखवाइए माडगूलकरजीसे!’’ 

"वैजयंतीमालेचे नृत्यनाट्य मराठी भाषेत होणार होते; पण दिल्लीच्या एका धनिक स्त्रीला श्रीकृष्णचरित्रावर गीते हवी होती. संगीतासाठी ती वसंतरावांकडे आली. वसंतरावांनी मान्य केले आणि सांगितले हेच की, 

"‘‘लिखवाइए माडगूलकरजीसे।’’ 

"‘‘वह हिंदी में लिखते है?’’ 

"‘‘नहीं, मराठी में लिखेंगे। उसका भाषांतर करवाएंगे हम।’’"
................................................................................................

"फार उशिरा भारतशासनाने त्यांना पद्मश्री कले. फार उशिरा महाराष्ट्र राज्यपालांनी त्यांना विधानपरिषदेचे सभासद म्हणून नामनियुक्त केले. नाट्यप्रेमी जनतेने त्यांना नाट्यसंमेलनाध्यक्ष केले. 1927 साली एक हरकाम्या म्हणून ‘प्रभात’ फिल्म कंपनीत आलेला मुलगा वीस वर्षांनी प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक झाला. परवापरवा पद्मश्री झाला. कायदेमंडळाचे सदस्यत्व त्याला काल मिळाले. सार्‍या घटनांनी घ्यायचा तितका वेळ घेतला. घाई केली ती मृत्यूने. आकाशातील वीज माथ्यावर पडून एखाद्याला अकस्मात मृत्यू येतो. विज्ञानांकित विजेने अचानक गाठून केलेला हा वज्राघात... याला काय नाव होते?"
................................................................................................

"एक प्रसंग आठवला, चार महिन्यांपूर्वीचा. 

"22 ऑगस्ट 75 ला मुंबई येथील के.ई.एम. इस्पितळात माझ्या छातीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. 

"शस्त्रक्रिया अवघड नव्हती; पण मोठी होती. मी व माझी सारी कुटुंबीय मंडळी घाबरलेली होती. शस्त्रक्रिया होण्याच्या आधी मुंबईतली अनेक मित्रमंडळी मला सदिच्छा देण्यासाठी इस्पितळात येऊन गेली. मी कुणाशी आणि किती बोलणार? शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यावर शुद्धीवर आलो. माझ्या खोलीत एक भलामोठा, अनंतरंगी घमघमता पुष्पगुच्छ ठेवलेला होता. त्या क्षीण स्थितीतही मला फार बरे वाटले. 

"‘‘कुणी आणली गं फुलं ही?’’ मी पत्नीला विचारले. 

"‘‘वसंतराव देसाई आले होते... त्यांनी आणली.’’ 
................................................................................................

"असा वसंतराव देसाई. जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेला माणूस. भरघोस कार्पण्यापासून करोडो कोस दूर असलेला. गेला. अचानक गेला."

"‘सौभद्र नाटक केवळ संगीतात साकार करण्याचा प्रयोग अर्धाच उरला आहे. त्याचे गीतमय रूपांतर धाष्टर्याने केले होते. वसंतरावांनी एक अंक सादर केला होता. श्री. हरिभाऊ मोटे म्हणाले होते, ‘‘अरे, या साखरभातात सारी साखरच आहे; भात कुठे आहे?’’"
................................................................................................

"मोराच्या पिसार्‍यासारखा वसंतरावांचा गीतसंभार आहे. त्यांच्या देहाभोवतीच तो पुरता फुललेला दिसणे आता दुरापास्त, अशक्य. 

"एक-एक पीस आता सांभाळायचे. जपून ठेवायचे. त्यांची गाणी जपायची. त्यांच्या आठवणी जपायच्या. इतकेच आपल्या हाती आहे."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 01, 2022  - February 01, 2022.  
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
"बंडित बुराणिक"
................................................................................................
................................................................................................

"‘‘पंडितजी सानु इक पान दे दो. साडी लाइफ बन जाएगी!’’ 

"भारतीय चित्रपटसृष्टीचा एक विख्यात नायक एका मराठी माणसाच्या शेजारी उभा राहून विनवणी करीत होता. त्याची ती विनवणी विनोदी होती; पण त्याच्या मुद्रेवरचा आर्जवी आप्तभाव मात्र अगदी सत्य होता. 

"राजेश खन्ना आणि पंडित वसंतराव पुराणिक यांची ही भेट मी स्वत: पाहिलेली आहे. मद्रासच्या ‘वाहिनी’ स्टुडिओत, मला वाटते, ‘प्रेमनगर’ या रंगीत बोलपटाचे चित्रीकरण त्यावेळी चालू होते. 

"पंडित वसंत पुराणिक हे महाराष्ट्रीय गृहस्थ आहेत. गेली अठ्ठावीस वर्षे ते मद्रासमध्ये राहत आहेत. कोडंबकम मार्गाला लागून असलेल्या पुलय्युरपुरम या मागास लोकांच्या वस्तीत ते राहतात. आता राहत्या घरासमोरच त्यांनी एक जागा खरेदी केली आहे. तिला चांगले कुंपण घातले आहे. आत एक लहानशी कुटी बांधवून घेतली आहे. त्या कुटीचे नाव कोरलेला एक प्रस्तरही मला दिसला. अक्षरे मला वाचता आली नाहीत. 

"ती अक्षरे तामिळ लिपीतली होती. नामाभिधानही तामिळ भाषेतच होते : ‘उषानीलयम.’ 

"‘‘उषा कुणाचं नाव पंडितजी?’’ मी औत्सुक्याने विचारले. 

"‘‘माझ्या पत्नीचं.’’ पंडितजी म्हणाले. 

"पंडितजीच्या पत्नी वारल्या, त्याला आता तीस वर्षे होऊन गेली आहेत. या दांपत्याला अपत्य असे एकच झाले. तो मुलगा आता विवाहित झाला आहे. एका जर्मन दूरचित्रवाणी संस्थेत तो छायाचित्रकार म्हणून काम करतो. तो ‘फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चा प्रशिक्षित छायाचित्रकार आहे. त्याला मोठ्ठा पगार मिळतो. त्यालाही आता दोन गोजिरवाणी मुले झाली आहेत. हे सारे कुटुंब भारताच्या राजधानीत राहते. पंडितजी दिवाळ सणापुरते तिकडे जातात. लेकाच्या गावी जातात. तूपरोटी खातात, मोठेधाटे होतात, परत मद्रासला येतात. 

"मद्रास त्यांची कर्मभूमी. आपल्या अल्पकालीन प्रपंचसुखाचे स्मारक त्यांनी तेथे उभारले आहे. पंडितजींचे घर, त्यांची राहणी, त्यांचा उद्योग, त्यांचा परिवार - सारेच कौतुकास्पद आहे."
................................................................................................

"एकोणीसशे सत्तावन्न सालची गोष्ट. माझे मित्र राजा परांजपे यांना मद्रासचे चित्र दिग्दर्शनासाठी मिळाले. चित्र ‘ए.व्ही.एम.’सारख्या ख्यातनाम संस्थेसाठी करायचे होते. राजाभाऊंनी ते आनंदाने स्वीकारले. कथेच्या चर्चेसाठी ते मद्रासला गेले. 

"कथा मूळचीच उत्तीर्ण होती. तामिळ भाषेत तिच्यावर एक चित्रपट झालेला होता. त्याला अमाप यश मिळालेले होते. ‘नालवर’ हे त्या कथेचे नाव. ‘नालवर’ म्हणजे चौघे. राजाभाऊंनी त्या कथेचे इंग्रजी भाषांतर तयार केले होते. त्यांनी ते ऐकले आणि निर्मात्यांना सांगितले, ‘‘या कथेची चित्रकथा हिंदीसाठी नव्यानं करावी लागेल.’’ 

"‘‘अर्थातच.’’ निर्माते म्हणाले, ‘‘तुम्हाला पाहिजे तो हिंदीतला स्क्रीनप्ले एक्स्पर्ट बोलावून घ्या.’’ 

"‘‘ग.दि.माडगूळकर’’ राजाभाऊंना माझेच नाव सुचणे अपरिहार्य होते. त्यांनी आणि मी मिळून तोवर मराठी चित्रपटसृष्टीत खूप कामे केलेली होती. 

"ए.व्ही. मय्याप्पन चेट्टीयार यांना माझे नाव फारसे परिचित नव्हते. वसंतराव पुराणिक त्यावेळी ‘ए.व्ही.एम.’च्या परिवारात होते. त्यांनी तामिळ पद्धतीने ओठांचा ‘पट्ट’ असा आवाज केला आणि आपल्या बॉसला सांगितले, ‘‘ओ:, ही इज अ ग्रेट रायटर.’’ 

"‘माडगूळकर आणि त्यांच्या चित्रकथा’ या विषयावर बोलून पुराणिक थांबले नाहीत. त्यांनी माझ्या कविता, गीते, निबंध, लघुकथा या सर्वांवर तामिळ भाषेत एक व्याख्यानच ऐकवले. श्री. मय्याप्पन प्रभावित झाले आणि त्यांनी राजाभाऊंना सांगितले, ‘‘त्यांना लगेच बोलावून घ्या.’’"
................................................................................................

" ... पुराणिक माझ्याशी शुद्ध मराठीत बोलत होते. नाही म्हणायला त्यांच्या मराठी क्रियापदांची टोके तेवढी दक्षिणेकडे झुकत होती. ‘करतील, देतील’ या शब्दांचे उच्चार ते ‘करतिलै देतिलै’ असा करीत होते."

"स्टुडिओतील सारे लोक त्यांना ‘पंडितजी’ म्हणून संबोधित होते. भेटणार्‍या माणसाला मात्र ते ‘यन्न स्वामीऽ, येन्ना समाचारम्?’ असे तामिळमध्ये विचारत होते. त्यांच्या बोलण्याला ‘हम्मा, सरी सरी’ असा प्रतिसाद देत होते. ‘वूडलँड’ हॉटेलच्या वातानुकूलित कुटीत नीटपणे बस्तान बसल्यावर मी पुराणिकांना विचारले, ‘‘तुम्ही मूळचे कुठचे?’’ 

"‘‘बर्‍हाणपूर.’’ 

"‘‘मध्यप्रदेश?’’ 

"‘‘बरोबर. मूळचं घराणं इकडचंच असेल, महाराष्ट्रातलं. आमचे पूर्वज बडोद्याच्या राजांचे पुराणिक.’’ 

"‘‘म्हणजे कथावाचकच.’’ 

"पुराणिक खळखळून हसले. 

"‘‘मद्रासला कसे काय येऊन पोहोचलात पण?’’ 

"‘‘तीही एक कथाच आहे.’’ पुराणिक म्हणाले. 

"‘‘वाङ्मयाची आवड केव्हा लागली?’’ 

"‘‘विद्यार्थिदशेतच.’’ 

"‘‘शिकायला कुठे होतात?’’ 

"‘‘शिक्षणाची यात्रा ही एक त्रिस्थळीच म्हटली पाहिजे. कल्याण, नाशिक आणि बर्‍हाणपूर. बर्‍हाणपूरला हायस्कूलमध्ये असतानाच आम्ही एक हिंदी मासिक चालवीत होतो. अंचल, शिवमंगलसिंह ‘सुमन’ असे बडेबडे हिंदी साहित्यिक आमच्या सल्लागार मंडळात होते. हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांतलं साहित्य आणि साहित्यकार याविषयी मला फार प्रेम. मराठी साहित्य संमेलनाला मी हमखास हजर राहत असे. कै. माधवराव पटवर्धनांचा नि माझा खूप पत्रव्यवहार होता.’’ 

"‘‘ही खादी केव्हा चिकटली तुम्हाला?’’ 

"‘‘हायस्कूलमध्ये शिकत असतानाच. मी काँग्रेसचा स्वयंसेवक होतो. पुढे कार्यकर्ता झालो. अडतीस सालापर्यंत मी शहरकाँग्रेसचा जनरल सेक्रेटरी होतो. फैजपूर, हरिपुरा, त्रिपुरी, रामगढ या काँग्रेसच्या अधिवेशनांना मी निष्ठेनं उपस्थित राहिलो होतो. ए.आय.सी.सी.चा सदस्यही होतो. ‘ताली मिल मझदूर संघ’ या संस्थेसाठी मी कामगार संघटना बांधीत होतो.’’ 

"‘‘म्हणजे कामगार चळवळीत होता तुम्ही?’’ 

"‘‘होय. कम्युनिस्ट विचारांनीही मला झपाटलं होतं. गोदावरी परुळेकर यांच्या भाषणांनी मी भारावून गेलो होतो. मार्क्स समजावून घेण्याचा प्रयत्न केला; पण फारसं हाती लागलं नाही. विचार आणि वास्तवता यांची हातमिळवणी मला कुठंच दिसली नाही. आपण करतो आहो ते काम केवळ आपल्याला थोरवी देईल, ज्यांना आवश्यक आहे त्यांच्यासाठी आपण काही करू शकू की नाही याची शंका मला सारखी वाटत राहिली.’’"

" ... हिंदी भाषेच्या प्रचारासाठी एक वृत्तपत्र काढायचं ठरवलं आणि मुंंबईला आलो. ती कल्पना उमलली तशीच सुकली आणि हिंदी प्रचाराचाच धागा धरून दक्षिणेत आलो...’’ 

"‘‘मद्रास साहुकार पेठेत हिंदीची पाठशाळा चालवली. ‘पंडितजी’ हे अभिधान माझ्या वाट्याला आलं ते तेव्हापासून.’’ 

"‘‘मुलगा लहान होता. नातेवाइकांकडे राहत होता. त्याला वाढवणं भाग होतं. त्याच्या शिक्षणाची व्यवस्था करीत राहणं हे कर्तव्य होतं... 

"‘‘बर्‍हाणपुरातल्या उत्पन्नाच्या हुरळीची मुळीही स्वातंत्र्यानंतर सुकून गेली होती. केवळ समाजकार्यानं निभावण्यासारखं नव्हतं. मद्रासमध्ये ओळखीपाळखी झाल्या होत्या... 

"‘‘ ‘ए.व्ही.एम.’ या विख्यात चित्रपट संस्थेला हिंदी जाणणारा एखादा माणूस हवा होता. मी तिथं जाऊन पोहोचलो. तिथल्या परिवारात इतका रमलो की, लोक मला ‘ए.व्ही.एम. पंडित’ म्हणूनच ओळखू लागले... 

"‘‘पाण्यात पडलं म्हणजे पोहायला येतं. हिंदी संवादाचं दिग्दर्शन करता करता मी छोट्या छोट्या भूमिकाही करू लागलो. ‘बहार’, ‘लडकी’ या चित्रपटांतून मी कामं केली आहेत. आता आपल्या सदाशिवराव कवींनी एक बालचित्र काढलं आहे. त्यातही माझी भूमिका आहे, ‘हम पंछी एक डाल के.’ 

"’’ सदाशिवराव कवी त्यावेळी मद्रासमध्येच होते. एच. शांताराम नावाचे एक मराठी कलादिग्दर्शकही त्यावेळी मद्रासेत स्थिरावलेले होते. कोल्हापूरचे पापा बुलबुलेही छायाचित्रकार म्हणून तेथे काम करीत होते. मी, राजाभाऊ, दत्ता मायाळू असे सारे मराठीच्या डहाळीवरचे आम्ही पक्षी मद्रासमध्ये एकत्र जमलो."

"आमचे ‘नालवर’वर आधारलेले ते ‘बापबेटे’ नावाचे चित्र तयार झाले, प्रकाशित झाले आणि साफ पडले. त्यावेळचे सुप्रसिद्ध हिंदी दिग्दर्शक श्री. पी. एल. संतोषी पुराणिकांना म्हणाले, 

"‘‘यह क्या हो गया पंडितजी?’’ 

"‘‘क्या?’’ पुराणिकांनी विचारले. 

"चहाटळपणे संतोषी बोलले, ‘‘बाप और बेटे, दोनों भी लेटे?’’"
................................................................................................

"‘बापबेटे’च्या वेळची गोष्ट. मी जवळजवळ तीन आठवडे मद्रासमध्ये मुक्काम ठोकून होतो. काम चांगली गती घेत होते. बाकीच्या सुखसोयी उत्तम होत्या. राहण्यासाठी कुटी सुरेख होती. दिमतीला मोटर होती. संध्याकाळच्या वेळी मद्रासबीचवर जाऊन हिंडावे, महाबलिपूरमसारख्या कलासंपन्न स्थानाला भेट द्यावी अशी सोय होती. पुराणिकांसारखा मित्र सारखा सहवासात होता. वाचन आणि पानतंबाखू ही त्यांचीमाझी समान व्यसने होती. मद्रासच्या इडलीसांभार्‍याने, सादमसादमने माझी जीभ मात्र वैतागली. मी पुराणिकांना म्हणालो, ‘‘पंडितजी!’’ 

"‘‘बोलो अन्ना.’’ 

"‘‘यार, यह चावल, चावल, खाने से अपनी भूखही खत्म हो बैठी है. मैंने सुना कि साहुकार पेठ में अपने यहाँ के जैसी चीजे मिलती है. जाएँ एक दिन.’’ 

"‘‘बाजार में क्या खाना है?’’ 

"‘‘तो कहाँ जाएँ यहाँ परदेस में?’’ 

"‘‘अपने घर चलो.’’ 

"मी हसलो आणि म्हणालो, ‘‘अहो, तुमचं घर म्हणजे विधुराचा विश्राम! तिथं काय मिळणार खायला?’’ 

"‘‘मागाल ते!’’ 

"‘‘तुमच्याकडे महाराष्ट्रीय स्वयंपाकी आहे की काय?’’ 

"‘‘आहे. तुम्हाला काय आवडतं ते सांगा.’’ 

"‘‘ठरलं?’’ 

"‘‘ठरलं. अगदी मागाल ते देतो! इच्छाभोजन! बोला!’’ 

"मराठी पदार्थांच्या आठवणीने माझ्या जिव्हेला पाझर फुटले. ओलसर स्वरात मी म्हणालो, ‘‘डाळमेथीचं घट्ट वरण, मोडावलेल्या मटकीची उसळ, मोकळी डाळ, कांद्या-टोमॅटोची कोशिंबीर, लिंबाचं लोणचं, हिरव्या मिर्च्यांची चटणी, घडीच्या पोळ्या, लोणकढं तूप, वरणभात, सायीचं दही...’’  

"‘‘बस्स?’’ 

"‘‘बस्स?’’ एवढं मिळालं की, आणखी आठ दिवस आपण सांबरसादम खात काळ कंठायला तयार आहोत.’’"

"संध्याकाळी पंडितजींच्या घरातील टेबलावर मी मागितलेल्या सार्‍या वस्तू हजर होत्या. मी आणि पंडितजी दोघेच होतो. चार घास पोटात गेले आणि मला वाटले, मी पुण्यातच आहे. 

"‘‘आचारी पुण्याचा आहे का?’’ मी विचारले. 

"‘‘बर्‍हाणपूरचा.’’ 

"‘‘छान केलाय स्वयंपाक. त्याला म्हणावं एक गरम पोळी आणअगदी तव्यावरची.’’ 

"पंडितजी उठू लागले. 

"‘‘तुम्ही कशाला उठता?’’ 

"‘‘तव्यावरची पोळी हवी ना तुम्हाला? मलाच तवा तापवला पाहिजे. गॅस चेतवला पाहिजे.’’ 

"‘‘म्हणजे?’’ 

"‘‘अहो, माझा स्वयंपाक मी स्वत: करतो!’’

"मी थक्क झालो. कुणाही सुगृहिणीच्या पाकसिद्धीला स्पर्धेत सहज मागे टाकील असा स्वाद प्रत्येक पदार्थाला होता. बांगड्यांची किणकिण निनादल्यावाचून स्वयंपाकाला असा गोडवा येणे शक्यच नव्हते. आश्चर्याचा भर ओसरल्यावर मी म्हटले, 

‘‘आज केलात स्वयंपाक की ’’ 

"‘‘रोज.’’ 

"‘‘जमतं कसं तुम्हाला?’’ 

"‘‘कारण अभ्यास, तुका म्हणे!’’

"तेव्हापासून मद्रासच्या मुक्कामात पंडितजींच्या, बायको नसलेल्या बिर्‍हाडात जाऊन पोटभर जेवणे हा माझा एक महत्त्वाचा शिरस्ता होऊन बसलेला आहे. मीच काय, चित्रपट व्यवसायाशी संबंधित असलेला कुणीही महाराष्ट्रीय मद्रासला गेला तर पंडितजींचे हात त्याच्या पोटी जातातच.

"त्यांचे घरही नीटपणे लावलेले असते. घरात नोकर असा कुणीच नाही. त्या वस्तीतील घराघरात पाण्याचे नळ पोहोचवलेले नाहीत. सार्वजनिक नळाचे पाणी आणून भरावे लागते. पाणी भरणे, दळण आणणे, रेशन मिळवणे, असली कामे त्यांचे शेजारी करतात. हौसेने करतात. ब्राह्मण आणि तोही महाराष्ट्रातला. रामस्वामी नायकरांच्या (पेरियार) मद्रासमधील एका पूर्वास्पृश्य वस्तीत त्याला एवढे प्रेम लाभले कसे? 

"प्रेमाचा उगम प्रेमातूनच होतो. पुराणिकांचे अंत:करण एखाद्या संतासारखे शुद्ध आहे. प्रांतभेद, भाषाभेद, धर्मभेद, जातिभेद असल्या कुठल्याच भेदाला त्यांच्या अंत:करणात थारा नाही."

" ... पंडितजींची राहती कुटी मात्र सुरेख आहे. 

"एक पडवी आणि दोन खोल्या एवढाच तिचा विस्तार. एका खोलीत त्यांची कॉट, टेबलखुर्ची आणि पुस्तके. अभ्यासिका आणि शयनागार एकच. या खोलीत भिंतीवर चित्रे टांगलेली आहेत तीही मोजकी दोन. एक छायाचित्र शरदबाबूंचे आणि एक रवींद्रनाथ ठाकुरांचे. भिंतीतली कपाटे पुस्तकांनी खच्चून भरलेली. त्यात अधिक भरणा इंग्रजी पुस्तकांचा. त्याच्या खालोखाल हिंदीमराठी पुस्तकांचा. तामिळ, तेलगू, मल्याळम भाषांतील पुस्तकांची संख्याही नगण्य आहे. त्यांच्याकडे वर्तमानपत्र येते ते इंग्रजी ‘हिंदू’. मासिकपत्रांंत प्राधान्य मराठीला. ‘हंस’, ‘मोहिनी’ आणि ‘नवल’ या मासिकांचे ते त्या मासिकांच्या जन्मापासून वर्गणीदार आहेत. ही वृत्तपत्रेमासिकेही कुठेतरी पडलेली नसतात. ती व्यवस्थितपणे ठेवलेली असतात."

"आतली स्वयंपाकाची खोलीही अशीच व्यवस्थित. गॅसवर चालणारी चूल, फ्रीज, स्वयंपाकाची भांडी, वाढायची भांडी, चमचेकाटे सारे जिथल्या तिथे. घरधनीण नाही, घरगडी नाही, तरी घर कसे टापटिपीचे आणि समृद्ध. न राहवून मी एकदा पंडितजींना विचारलेच, ‘‘रसोईची इल्म कुठे पैदा केलीत बा?’’ 

"‘‘आजीचा आशीर्वाद फळाला आला आहे.’’ 

"मी औत्सुक्याने ऐकू लागलो आणि पुराणिक सांगू लागले, ‘‘मी अकरा वर्षांचा होतो तेव्हा आई गेली. बारा वर्षांचा झालो तेव्हा वडील गेले. आईच्या आईनं माझा सांभाळ केला. ती एका वेळेलाच जेवत असे. थकली होती. माझ्या रात्रीच्या जेवणासाठी ती दोन पोळ्या आणि वरणाचा अळणी गोळा दुपारच्या स्वयंपाकातून काढून ठेवायची. त्या काळात खेळ आणि देशभक्ती हे पोरांचे छंद असत. घरी परतायला मला उशीर व्हायचा. थंडगार पोळी आणि थंडगार वरण घशाखाली उतरायचं नाही. आजीला त्रास देणंही मनाला पटत नसे. वरणाची आमटी कशी करावी ते तंत्र मी स्वाध्यायानं शिकून घेतलं. आजीच्या ते लक्षात आलं तेव्हा ती वैतागून म्हणाली, ‘तू मेल्या हंड्यांवर पळ्या ठोकण्यात जन्म घालवशील!’ तिच्या म्हणण्याचा अर्थ असा की, मी पुढल्या आयुष्यात आचारी होईन. मी आचारी झालो नाही; पण स्वयंपाकाची हौस मात्र मला विलक्षण आहे.’’"
................................................................................................

"‘हम पंछी एक डाल के’नंतर त्यांनी ‘दी ट्रेन’, ‘मेरे जीवन साथी’, ‘हाथी मेरे साथी’, ‘प्रेमनगर’ इत्यादी चित्रपटांतून कामे केली; पण त्यांचा खरा व्यवसाय संवाददिग्दर्शकाचा. त्या व्यवसायामुळे हिंदीतील आघाडीच्या सार्‍या नटनटींशी त्यांचा दृढपरिचय झाला आहे. काही त्यांचे जिव्हाळ्याचे स्नेही झाले. 

"ओमप्रकाशची आणि त्यांची भेट झाली की, एकमेकांना शिव्यांनीच संबोधने सुरू होते. राजेश खन्ना, डॅनी डेंग्झोंपा त्यांच्याकडे पानाचा हट्ट घेतात. धर्मेंद्र, विनोद खन्ना, मेहरा पंडितजींचा सहवास सर्वांनाच प्रिय असतो."

"राजेश खन्नाने त्यांना एकदा आपल्या नव्या घरी नेले. घर नवे बांधलेले नाही. पुष्कळ सुधारणांनिशी परत सुशोभित केलेले आहे. ते घर पाहून पंडितजी खूश झाले. 

"‘‘कितना खर्च हुवा होगा?’’ राजेशने विचारले. 

"‘‘दो लाख से कम नहीं.’’ पंडितजींनी अंदाज केला. 

"राजेशने सांगितले, ‘‘तुम्ही म्हणता त्याच्या दुप्पट पैसे लागले!’’ 

"‘‘कारण?’’ 

"‘‘खाल्ले मधल्या लोकांनी.’’ 

"पंडितजी हसले. 

"‘‘हसते क्या है आप? मेरा कहना मानिए, आपको जितनी तनखा यहाँ मिलती है, मैं उतनी दे दूँगा. आप आ के मेरे घर रहिए. कुछ काम न कीजिए. सिर्फ खुली आँखो से देखते रहिए.’’ 

"पंडितजींनी नम्र नकार दिला. राजेशला त्यांनी सांगितले, ‘‘मोठ्या माणसाच्या भोवती अशी खाबू माणसं जमतात. झालं ते गेलं! आता तसं होणार नाही.’’ 

"‘‘वह कैसे?’’ 

"‘‘अजी अब तो हमारी बहू आयी है ना? औरतें जानती है की, अपना घर कैसा चलाए.’’ 

"‘‘बस्स! प्रेम राहू द्या, आणखी काही मागणे नाही’’, ही पंडितजींची वृत्ती.

"पंडितजी श्रीमंत झाले नाहीत. तसे होण्याची त्यांची इच्छाही नाही. संवाद-दिग्दर्शनाची कामे करताना एक नवा व्यवसायही त्यांच्या हाती आला. एका भाषेतील चित्र अन्य भाषेत रूपांतरित करण्याचा. हा व्यवसाय तसा किचकट आहे; पण धनार्जनाला वाईट नाही. नवनिर्मितीचा एक आनंद मर्यादितपणे लाभतो. ‘भक्तिमहिमा’, ‘मेरी बहन’, ‘अमर प्रेम’, ‘आशिक’, ‘सी.आय.डी.’, ‘आखरी निशान’, ‘जगके तारनहार’ इत्यादी अनेक चित्रे त्यांनी दाक्षिणात्य भाषेतून हिंदीत वा हिंदीतून दाक्षिणात्य भाषेत रूपांतरित केली आहेत.

"हिंदी, इंग्रजी, तामिळ, मराठी या भाषा पंडितजींना उत्तम येतात. तामिळ त्यांनी पूर्णत: आत्मसात केलेली आहे. तेलगू आणि मल्याळममध्येही त्यांना उत्तम गती आहे."

"प्रकाश लाटकर नावाचा एक तरुण मुलगा हैदराबादेहून मद्रासला आला. मुलगा पदवीधर होता. प्रामाणिक होता. कामधंद्याच्या शोधात आला होता. त्याची मातृभाषा मराठी होती; पण आंध्राइट. त्याला तेलगूही चांगले येत होते. बिचारा लग्न करून बसला होता. त्याला एक अपत्यही झालेले होते. घरात भावंडे बरीच होती. वडिलांच्या हातून आता उसाभर होत नव्हती. 

"पंडितजींनी त्याला आश्रय दिला. आपल्या हाताखाली घेतले. चिन्नापा देवर यांच्या संस्थेत त्याला कायमची नोकरी मिळवून दिली. तो मुलगा पंडितजींचा उल्लेख ‘गुरूगारू’ असा करतो. 

"कृष्णा वेणी अशीच एक दु:खीकष्टी मुलगी. थोडी प्रौढच म्हणावी अशी. तीसपस्तीस वर्षे वयाची. गाणारी. प्लेबॅकसाठी, डबिंगसाठी आवाज देणारी. जातीने आंध्र ब्राह्मण. वर्णाने काळीसावळी; पण नाकाडोळ्यांनी नीटस. अंगलटीने आटोपशीर. 

"प्लेबॅक देणे; डबिंगसाठी आवाज देणे या उद्योगावर तिने थोडीफार कमाई केली होती. या व्यवसायातच तिची आणि परजातीच्या दिग्दर्शकाची ओळख झाली. परिचय प्रणयपरिणय या पायर्‍या ती त्वरेने चढली. दैव अनाकलनीय असते. दोन वर्षांतच ती विधवा झाली. निष्कांचन, निराधार. सासरी कोणी नाही. माहेर तुटलेले. 

"ती पंडितजींकडे आली. डोळे कोरडे होईतो रडली. तिने आपली सारी शोककथा सांगितली. पंडितजींनी तिला काम दिले. तामिळ, तेलगू आणि हिंदी भाषा तिला चांगल्या येत होत्या."
................................................................................................

" ... वडाची एक पारंबी भूमीत रुजली आहे. तिचा दुसरा वड आकाराला येतो आहे. आणखी पारंब्या अधांतरी लोंबत आहेत. त्यांचे केव्हा वृक्ष होतील या चिंतेने पंडितजी व्याकूळ होत असतात. ते संन्याशी आहेत. संसारीही आहेत. आपल्या कुटीत ते एकटे राहतात; पण त्यांचा परिवार मोठा आहे. ‘शांतिनिकेतन’मधील प्रा. बाजपेयी त्यांना प्रेमाने लिहीत असतात. प्रशांत पांडे, भवानीप्रसाद मिश्र कधी मद्रासला आले की, त्यांना आणायला पंडितजींना स्टेशनपर्यंत जावे लागते. आरुद्रा, आत्रेया हे तामिळतेलगू चित्रपट लेखक त्यांचे स्नेही आहेत. रवी नगाइच या उत्तरप्रांतीय दिग्दर्शकाचे पान पंडितजींच्या सल्ल्याशिवाय हलत नाही. त्यांच्या पत्नीला ते ‘रानीबिटिया’ अशी हाक मारतात. पंडितजी बंगल्यावर आले की, रवीसाहेबांची मुले त्यांच्या अंगाखांद्यावर चढतात आणि गिल्ला करतात : ‘‘पंडितजी, कहानी कहिए.’’ त्यांना हातावर तोलीत पंडितजी त्वरेने सांगू लागतात, ‘‘एक था गुलिव्हर. वह निकला सफर पर...’’"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 01, 2022  - February 01, 2022.  
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
"आर्जवी, पण खंबीर नेतृत्व : श्री. वसंतराव नाईक"
................................................................................................
................................................................................................

" ... विरोधी पक्षांचे सदस्य कठोर शब्दांचे प्रहार करीत असतात. स्वकीयातला एखादा उठून करू नये इतकी स्तुती करू लागतो. वसंतरावांच्या मुद्रेवरील शांती कधी ढळत नाही, ते विचलित होत नाहीत की, उल्हसित होत नाहीत. अगदी अविश्वासाच्या ठरावाला उत्तर द्यायची वेळ असू द्या, त्यांचा स्वर सहसा चढत नाही. विरोधकांचा एक-एक मुद्दा घेऊन, ते त्याचा सौम्यपणे समाचार घेतात. एखादा रेशमी चिमटा घेतील; पण वत्तृत्वाचा थयथयाट असा कधीच नाही. शासनकर्ते कधीच चुकत नाहीत, असला अट्टहासी दावा तर ते मुळीच करीत नाहीत. जे सत्य आहे, तेच ते सांगतात आणि वर आर्जवी स्वरात: ‘आमचीही चूक होईल जरूर; पण या सदनाच्या सन्मान्य सदस्यांना मी सांगू चाहतो की, या विषयात ती मुळीच झालेली नाही!’"
................................................................................................

" ... त्रेसष्ट साल सरता सरता ते नव्या संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 

"गेली दहा वर्षे ते या सन्माननीय पदावर आहेत. त्यांच्यावर उघड आणि छुपी टीका अमाप झाली. हारतुर्‍यांचाही पाऊस पडला. थैली अर्पण केली गेली. वसंतरावांनी टीकेचा खेद मानला नाही, स्तुतीचे हार गळ्यात मिरवले नाहीत. मिळालेली थैली आपल्या स्वत:च्या काही दानासह सार्वजनिक कार्याला देऊन टाकली."

" ... ना. यशवंतरावांनी घातलेला महाराष्ट्राच्या प्रगतिप्रासादाचा पाया वसंतरावांच्या कारकिर्दीत वास्तूच्या आकाराला आला, ही गोष्ट मान्य करायला हवी. त्यांच्या विरोधकांनाही याबाबतीत खरा विरोध करता येणार नाही. एक खरे की, वसंतराव मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्रावर सारखी गंडांतरे येत आहेत. त्यांच्यासारख्या स्थिरबुद्धी नेतृत्वाची जणू पुन:पुन्हा परीक्षा घेतली जात आहे. हे असे का होते आहे, असा अकारण विचार माझ्या मनी अनेकदा येतो. माझे मलाच उत्तरही गवसते. कस सोन्यालाच लागतो. अन्य धातू केवळ तोलून घ्यायचे असतात. ‘दग्धं दग्धं पुनरपि पुन: कांचनं कांतवर्णम्’ असे त्यांच्या नेतृत्वाबाबत नित्य होत आले आहे. 1963 साली वसंतराव मुख्यमंत्री झाले. चौसष्टच्या जुलैत ते युगोस्लाव्हियाचा दौरा करून आले. उणेपुरे एक वर्ष गेले. पासष्टच्या सप्टेंबरात भारतपाक संघर्ष सुरू झाला. त्या काळात त्यांनी केलेली जनजागृती नि:संशय वाखाणणीय होती. महाराष्ट्राच्या भूमीचा सारा कणखरपणा आणि चिवटपणा त्यावेळी त्यांच्या वाणीने आत्मसात केला होता. अवघा महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा ठाकला. संकट संपले. आपल्या लोकांवरचा विश्वास हे वसंतरावांचे बळ. 

"त्यांच्या कारकिर्दीत भारताला आपल्या शेजार्‍यांशी लढावे लागले. महाराष्ट्राला आपले तन, मन, धन देशासाठी द्यावे लागले. निसर्गानेही वसंतरावांच्या कारकिर्दीत कस पारखायला प्रारंभ केला. दोन वेळा महापूर आले. त्रिवार दुष्काळाने थैमान मांडले. एकदा तर धरणीमातेेलाच अर्धांगाचा झटका आला. कोयनेच्या परिसरातील महाराष्ट्रीयांचे जीवन जमीनदोस्त झाले. वसंतराव डगमगले नाहीत. ऐकताच अंगावर शहारा उभा राहावा अशा या संकटातूनदेखील त्यांनी महाराष्ट्राला बाहेर आणले. धरणी दुभंगली तरी त्यांनी माणसांची मने दुभंगू दिली नाहीत. ते स्वत: हादरले नाहीत."
................................................................................................

"वसंंतराव राजकारणात आले, मध्य प्रदेशात उपमंत्री झाले, मुंबई राज्यात मंत्री झाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. हा प्रवास नि:संशय अभिनंदनीय; पण वसंतरावांचा मूळ पिंड शेतकर्‍याचा. शेती हा खरा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. शेती व्यवसाय म्हणून केली गेली पाहिजे, शेतकर्‍याला प्रतिष्ठा लाभली पाहिजे, हे त्यांच्या चिंतनगीतांचे जणू ध्रुपद आहे. 

"कोणी कितीही म्हणाले तरी एक गोष्ट कोणासही मान्य करावी लागेल की, महाराष्ट्राच्या शेतीचा मुखडा गेल्या दहा वर्षांत पूर्ण बदलून गेला आहे. त्याच्यावर झळाळी आली आहे. शेती कसणार्‍या माणसाच्या मुखावरचा स्वाभिमान वाचून घ्यावा इतका सुस्पष्ट झाला आहे. आकड्यांची अक्कलहुशारी हे मान्य करो की न करो, शून्य क्रमांकाच्या काचेचा चश्मा घालून पाहिले तर दिसेल की, महाराष्ट्राची शेती आता नागडीउघडी राहिलेली नाही. तिच्या कटीला लाज राखील असे हिरवे वस्र आहे. शालीनता सांभाळता येईल एवढी कंचुकी तिच्या वक्ष:स्थळावर आहे. ती पायघोळ पैठणी नेसून मिरवील, तेव्हा वसंतरावांचे सारे मनोरथ फळाला येतील."

" ... अन्नधान्याच्या स्वयंपूर्णतेवाचून अन्य प्रगतीच्या गोष्टी अकारण ठरतील, असे त्यांना मन:पूर्वक वाटते. आभाळातून पडलेला प्रत्येक पाण्याचा थेंब साठवला जावा, उपयोगी पडावा यासाठी त्यांचा आटापिटा आहे. पाझर तलाव, छोटे बंधारे ही सारी त्या अट्टहासाचीच अपत्ये. जमिनीचा पोत सुधारावा, तिला खताचा पुरवठा व्हावा, चांगले बियाणे मिळावे, या सार्‍या गोष्टी त्यांनी शासनाकडून करवल्या. दुष्काळ आले तरी माणसाने दबू नये, आभाळाची अवकृपा पचवण्याइतके बळ त्याने धरणीला दिले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे. एकाधिकार कापूस खरेदी हा शेतकर्‍यांच्या संरक्षणासाठीच केलेला प्रसिद्ध प्रयास."
................................................................................................

" ... सांगलीच्या सहकारी निर्मात्यांनी ‘संथ वाहते कृष्णामाई’ नावाचा एक चित्रपट काढला. त्या चित्रपटातील ‘संथ वाहते कृष्णामाई’ याच गीताची ध्वनिमुद्रिका वसंतरावांनी ऐकली. 

"‘सतत वाहते उदंड पाणी 
"कुणी न वळवून आणी राणी 
"आळशास ही व्हावी कैसी गंगा सुखदाय?’ 

"या ओळी त्यांना इतक्या आवडल्या की, माझ्या पाठीवर एक धबका मारून ते म्हणाले, 

"‘‘अण्णा, हे तुमचं गाणं खेडोपाडी वाजलं पाहिजे.’’"

"गेल्या वर्षादोन वर्षातला दुष्काळ तर वसंतरावांनी फार धैर्याने हाताळला. लाखो लोकांना काम उत्पन्न करून दिले. अन्नाचा पुरवठा करण्याची पराकाष्ठा केली. नवनवीन कामे इतकी करवून घेतली की, चालू वर्षी पाऊस वेळेवर पडला तर गेला दुष्काळ ही एक इष्टापत्ती ठरेल."
................................................................................................

"वसंतरावांचा प्रेमविवाह झालेला आहे. त्यांच्या पत्नी पूर्वाश्रमीच्या कु. वत्सला घाटे, बी.ए. त्या ब्राह्मण, वसंतराव वंजारी जमातीतील. वंजारी मंडळींनी त्या नवदांपत्याला काही काळ वाळीतही टाकले होते म्हणे. या गोष्टीला आता बत्तीस वर्षे होऊन गेली. 

"त्या दोघांतला प्रेमभाव ताजा आहे. तरुण आहे. ‘वर्षा’ बंगल्यात राहणार्‍या वसंतरावांना गहुलीपुसदची आठवण रोज होत असली पाहिजे. बागेचे नाव देऊन म्हणूनच त्यांनी बंगल्याच्या पिछाडीला एक शेत सजवलेले आहे. प्रेमळ वडीलमाणसे, प्रेमळ पत्नी, मुलेबाळे यांच्या सहवासात वसंतरावांचा गृहस्थाश्रम नित्य वसंतकालात वावरत असतो."
................................................................................................

" ... एका विषयात मात्र ते काँग्रेसने काढलेल्या खडूच्या वर्तुळाबाहेर दिसतात. जुन्या काँग्रेसवाल्यांनी रूढ केलेला वेश त्यांनी स्वीकारलेला नाही. ते कटाक्षाने खादी वापरतात; पण पायघोळ धोतर, नेहरूसदरा, जाकीट व कोचदार गांधीटोपी हा संच त्यांनी पत्करलेला नाही. बूट, पँट, कोट असा त्यांचा वेश टिपटॉप असतो. खादीतदेखील किती तलम आणि सुरेख रंगापोताचे कापड निघू शकते हे वसंतरावांचा वेश पाहिल्यावर समजते. ते सुवेशधारी असतात. काळाबरोबर असतात. ते संपूर्ण निर्व्यसनी नाहीत. चर्चिलच्या चिरुटासारखी त्यांची आवडती पाइप सदैव त्यांच्या ओठाशी असते. चहा ते पितात, पण रशियन पद्धतीने. चहाची पत्ती घालून उकळलेले पाणी, चवीपुरता लिंबाचा रस, बस्स!"
................................................................................................

" ... परवाचीच गोष्ट आहे. ‘राजा केळकर म्यूझियम’ ते तासदीड तास पाहत राहिले होते. त्या संग्रहालयातील वस्तूंच्या दर्शनाने त्यांना इतका आनंद झाला होता की, नंतर झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत त्यांनी सांगितले, ‘‘मी एका तरुण माणसाचं अलौकिक काम आज पाहिलं. तो तरुण माणूस म्हणजे कवी अज्ञातवासी. श्री. केळकर, वय वर्षे पंचाहत्तर.’’"
................................................................................................

"वसंतरावांचे कर्तृत्व आत्मसिद्ध आहे. प्राथमिक शिक्षणासाठी रोज चार मैल पायपीट करणारा मुलगा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवतो आहे. या मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीत महाराष्ट्रावर अनेक संकटे आली. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला त्यातून तर वाचवलेच. पश्चिममहाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा हे महाराष्ट्रशंकराचे त्रिदल आहे. यातील प्रत्येक दलाचा हिरवा रंग आणि ताजेपण त्यांनी टिकवून धरले. तिन्ही दलांचे ऐक्य अभंग ठेवले."
................................................................................................

"पूर्वी ते ‘राठोड’ आडनाव लावीत. राठोड आडनावातील झुंजार कणखरपणा त्यांच्या वृत्तीत आहे. ‘नाईक’ या नावाला योग्य ती नेतृत्वशक्तीही त्यांनी संपादली आहे. महाराष्ट्रात रामराज्य नांदते आहे असे कुणीच म्हणणार नाही. दुसर्‍या राज्यांतले आवर्जून म्हणतात, ‘महाराष्ट्र तरक्की पर है।’ हे श्रेय वसंतरावांचे."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 01, 2022  - February 01, 2022.  
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
"मंगळकाका"
................................................................................................
................................................................................................

" ... तो भणसाळी कुळात जन्मलेला होता, म्हणून गुजराती बोले; पण त्याचे गुजराती आमच्यासारखेच होते. हिंदी बोलताना तो मधेच गुजराती शब्द घुसडी. गुजराती बोलताना एखादा तद्दन मराठी शब्द इस्तेमाल करी. हिंदीच्या नावाने आनंदच होता. चित्रपट व्यवसायात वावरल्यामुळे त्याच्या हिंदीचेही खोबरे झालेले होते. वेळप्रसंगी तो इंग्रजीही बोलत असे; पण ते इंग्रजीही खास अँग्लोइंडियन. मंगळकाकाला जगातील कुठलीही भाषा शुद्धपणे बोलता येत नव्हती; पण त्यामुळे त्याचे काम कधी अडत नव्हते. कारण त्याला तसे महत्त्वाचे काही काम मुळातच नव्हते."

"त्याच्या स्वत:च्या गावी जाण्याचा योग एकदा आला. सागरतीरावर वसलेले चौल नावाचे सुंदर गाव. प्रत्येक घराभोवती माडासुपारीच्या बागा. कुरकुर बोलणारे रहाट. खळखळ करीत वाहत जाणारे स्वच्छ पाण्याचे पाट. मंगळकाकाची स्वत:ची वाडीही मोठी सुंदर होती. त्याच्या जमातीची कुलदेवता हिंगुळजा. त्या हिंगुळजेच्या डोंगराखालीच होती ही वाडी. दोन टुमदार बंगल्या. अवतीभोवती झाडी. माडांची, सुपार्‍यांची. अंगणात एक भलेमोठे बकुळीचे झाड. त्याचा विस्तार एखाद्या वडाच्या झाडासारखा. त्या झाडाखाली खाटली ठेवून मंगळकाकाने आमच्यासाठी उघडे शयनागर सजवले होते. समुद्रतीरामुळे हवा थोडी दमट असायची; पण रात्रभर बकुळीचा घमघमाट सुटायचा. अंगावर बरसात व्हायची. हवा आणि श्वास सुगंधित होऊन जायचे. 

‘‘आमच्या घरची सारी मंडळी वर्षातून चार दिवस इथं रहायला येतात.’’ अशी माहिती मंगळकाकानेच आम्हाला दिली. 

"एवढे मोठे कुटुंब. चार दिवसांच्या विश्रांतीसाठी एवढी मोठी वाडी सांभाळून ठेवण्याइतकी त्या कुटुंबाची सुदृढ आर्थिक स्थिती. वडील व्यवसाय करताहेत. मुले व्यवसायाला लागली आहेत. वयाची पन्नाशी आली तर मस्तकी कसलीही जबाबदारी नाही. कसलीही चिंता नाही. रूप चांगले. शरीर प्रकृती. स्वभाव विनोदी, मनमोकळा. दुसर्‍याला सुखावणारा. माझ्या सार्‍या आयुष्यात मंगळकाकाइतका सुखी माणूस मी पाहिला नव्हता. प्रत्येकाला काही ना काही चिंता असते. मंगळकाका मात्र तृप्त, सदानंदी. पूर्वी त्याने कधी काही उचापती केल्या होत्या. चित्रपट व्यवसायात काही निर्मिती सुरू करून पाहिली होती. त्यात तो फसला होता; पण त्या फसवणार्‍या मंडळीविषयी त्याच्या मनी अनादर नव्हता, आकस नव्हता. त्याने आपला हात आखडता घेतला होता एवढेच.’’
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 01, 2022  - February 02, 2022.  

"स्वामी आम्रानंद"
................................................................................................
................................................................................................

"साहित्यप्रेमी मित्रांचा घोळका फिरायला निघाला की, तेही आमच्याबरोबर असायचे. आमचे विषय वेगळे चाललेले असायचे. स्वारीची तंद्री काही वेगळी लागलेली असायची. 

"शहर संपून आम्ही बाहेर मोकळ्यावर आलो की, ते गच्च मिटलेले ओठ उघडायचे. अर्धे मिटलेले डोळे पूर्ण मिटायचे आणि एकदम गुणगुणणे सुरू व्हायचे, 

"‘‘आनंदगीत अनंत तू 
"मांगल्य तू विश्वातले 
"तू प्राण या देहातला 
"सुखकुंभ तू दु:खातला...’’ 

"आम्ही सारेजण गप्प व्हायचो. त्यांच्या अवतीभोवती गोळा व्हायचो; पण मग पुढे काही नाही. ते आमच्याबरोबर पुढे चालायचे; पण त्यांचे काही वेगळेच चाललेले असायचे. बघणार्‍याला तेही जाणवत राहायचे. कुणी म्हणे, ‘‘स्वातंत्र्याला उद्देशून असावी ही कविता.’’ 

"‘‘का? परमेश्वराला उद्देशूनही असणं शक्य आहे.’’ ‘‘प्रेयसीला समोर ठेवून लिहिली असण्याचा संभव आहे.’’ ऐकलेल्या ओळी आठवण्याचा प्रयत्न मग आमच्यापैकी प्रत्येकजण करू लागे. एकपाठी, द्विपाठी, त्रिपाठी एकमेकांच्या साहाय्याला धावत. स्मृतीतली शब्दकळा परत साधली जाई. एक संहिता तयार होई : 

"‘‘आनंदगीत अनंत तू 
"मांगल्य तू विश्वातले 
"तू प्राण या देहातला 
"सुखकुंभ तू दु:खातला...’’ 

"‘‘वा: वा:!’’ सर्वांच्याच तोंडून हा उद्गार निघायचा; पण त्या स्वारीवर त्याचा काही परिणाम व्हायचा नाही. ओठ आवळून ते आपले चालत असायचे. आमच्या थोडे पुढे, नाहीतर किंचित मागे. आपल्याच तंद्रीत. 

"एखाद्या हिरवळलेल्या उंचवट्यावर वा स्वच्छ कातळावर आमची बैठक बसे. त्या ओळी सर्वजण पुन:पुन्हा म्हणत. त्या ओळींतील अर्थसौंदर्याचे, रचनेचे सारे पोत वेगळे केले जात असत. ते त्यात मुळीच भाग घेत नसत. ‘ईश्वर निर्मिती करून वेगळा झाला. निर्माण झालेल्या सौंदर्याचा लाभ जीवमात्रांनी घ्यावा, न घ्यावा. ईश्वराला त्याचे काय?’ अशी त्यांची वृत्ती. ... "
................................................................................................

"माझ्या जीवनातल्या मंतरलेल्या काळातलीच कथा आहे ही. आम्ही सारेच पंचविशीत होतो. माझ्यावाचून बाकीचे सर्व मित्र कॉलेजमध्ये शिकत होते. मी एकटाच विवाहित होतो. बाकी सर्वजण अजून ‘प्रेमा’तच होते. मी नोकरीचाकरी करीत होतो; पण मनात वेड होते साहित्याचे आणि देशभक्तीचे. तो काळच तसला होता. पंचवीसच्या आसपासची सारी तरुण मुले या दोन वेडांनी हमखास पछाडली जात असत. 

"एकोणीसशे बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस हाच तो काळ."

"त्या दोन वर्षांत आमच्या बिर्‍हाडी असे पाहुणे येऊन राहत की, त्यांचे नावगाव पुसण्याची सोय नसे. ते क्रांतिकारक असत. सायंकाळीच एखादी पोलीस चौकी जाळून, तिथली शस्त्रे हस्तगत करून एखादा सातारकर रात्री आमच्या निवार्‍याला येई. माझ्याबरोबर बसून असेल तो घास आनंदाने खाई. उजाडायच्या आत निघून जाई. हजारो रुपयांची नोटांची बंडले मोडक्या बॅगेत भरून कुणी भूमिगत अपरात्री येई. बरोबर आणलेले पेढे आम्हाला खायला लावी. स्वत: दहावीस पेढे खाई. तांब्याभर थंड पाणी पिऊन घेई. एक डुलकी घेई. तांबडे फुटायच्या आत पसार. असले संशयास्पद पाहुणे सतत येत. राहून जात. काल आलेल्या आणि आज निघून गेलेल्या पाहुण्यांविषयी तिने म्हणून फार चांभारचौकशा केल्या नाहीत. मी माझी स्नानादी कामे उरकली आणि नेहमीसारखा स्टुडिओत कामाला गेलो. पोटाच्या व्यवसायासाठी द्यायचा तो वेळ देणे भागच होते." 
................................................................................................

"सायंकाळी मित्र येतील व साहित्याविषयी गप्पा निघतील ही आशा मनी ठेवून मी तिथले काम करीत असे. आज फारसे काम नव्हते. कंटाळा आल्यासारखा झाला म्हणून संबंधित अधिकार्‍याला सांगून मी तीनसाडेतीनलाच घरी आलो. बायको खालच्या खोलीत मुलींना खेळवीत होती. वास्तविक ती वेळच तेवढी विश्रांतीसाठी मिळायची. 

"‘‘खाली आज तू?’’ 

"‘‘वर पाहुणे आहेत.’’ 

"‘‘कोण?’’ 

"‘‘कालचे ते.’’ 

"मी भराभर वर गेलो. बघतो तो स्वारी लेखनात गर्क. काल मी त्यांना घेऊन आलो होतो. आज ते स्वत: आले होते. त्यांनी आपली पेटी-वळकटीही बरोबर आणली होती आज. ती माझ्या दृष्टीस पडली. माझ्या मते ते फार थोर कवी होते. अशा माणसाची योग्य व्यवस्था राहावी असे सामर्थ्य माझ्या फाटक्या प्रपंचात नव्हते; पण ‘राह्यला कशाला आलात?’ असे मी त्यांना कसे विचारणार? 

"मी काही विचारले नाही. ते काही बोलले नाहीत. 

"दिवस मावळायच्या सुमारास सारी साहित्यप्रेमी मंडळी जमली. आम्ही फिरायला गेलो. तेही आले. तसेच गच्च मिटलेले ओठ आणि अर्धे मिटलेले डोळे. 

"पुन्हा तसाच प्रकार. अर्धे डोळे पुरे मिटणे. गच्च मिटलेले ओठ अचानकपणे उघडणे. स्वत:शीच गद्यसदृश शैलीत गाणे - 

"‘‘आलीस कशाला राणी?’’’ 

"पुढच्या ओळी ऐकायला आमचे सर्वांचे कान अधीर झाले; पण पुढे काय? काही नाही. मग हा नित्यक्रमच सुरू झाला. ते माझ्या घरीच राहिले. माझ्याबरोबर चहा, माझ्याबरोबर नाश्ता, माझ्याबरोबर जेवण, माझ्याबरोबरच फिरणे. मी घरी असेन तर साहित्याविषयी गप्पा. मी नसेन तेव्हा लिखाण. 

" कविता लिहायची आणि बॅगमध्ये टाकायची. ती कुणाला दाखवणे नाही, कुठे प्रसिद्ध करणे नाही, काही नाही. निष्ठेने लिहायचे आणि निष्ठेने ते त्या बॅगमध्ये टाकायचे. आदिकवींनी खड्यांनी रांजण भरले तसे ते कवितांच्या कपट्यांनी भरीत. 

"कधी दुपारच्या जेवणाच्या वेळी मी घरी नसे. मग गृहस्थधर्म म्हणून माझी बायको त्यांना विचारी, ‘‘जेवणार ना?’’ 

"‘‘नाही.’’ 

"‘‘का?’’ 

"‘‘भूक नाही.’’ 

"मी असलो तर मात्र ते मूकपणाने येत. माझ्याबरोबर जेवण घेत. साहित्यावाचून अन्य विषयावर बोलणे त्यांना मुळीच आवडत नसे. महिनाभर असाच गेला. आंब्याचा मोसम आला. परवडेल इतक्या प्रमाणात त्या फळांचा आस्वाद आम्ही घेत असू. आठवड्याभरात एखादे आंबरसचपातीचे जेवण होई. 

"एकदा दुपारचा मी घरी नव्हतो. माझ्या पत्नीने पाहुण्यांना विचारले, ‘‘जेवून घेता ना?’’ 

"‘‘नको.’’ 

"‘‘का?’’ 

"‘‘भूक नाही.’’ 

"‘‘हापूस आंबे आहेत. कापून देते. एखादा खा.’’ 

"‘हो’ नाही ‘नाही’ नाही. 

"माझ्या पत्नीने आंब्याच्या फोडींची बशी वर आणून ठेवली. हे लिहीतच होते. तासाभराने वर्तमानपत्र की, काहीतरी घेण्यासाठी ती वर आली. आंब्याच्या बशीत कोया व साली. स्वारी लिखाणात गर्क. मघा होती तशीच. पुढे पुढे ते स्वत:च आंबे घेऊन येऊ लागले. जेवणाचे विचारले तर सांगत, ‘‘मी आंबेच खाणार आहे. मी अन्नसंन्यास घेतला आहे. या आश्रमात ‘स्वामी आम्रानंद’ असं नाव धारण केलं आहे.’’ 

"मग तो मोसम संपेपर्यंत त्यांचे आम्राशन चालू होते. 

"लिखाण अव्याहत चालू होतेच. कविता लिहिल्या जात होत्या. पेटीत साठत होत्या. त्या कुणी वाचाव्या ही अपेक्षाच नव्हती. ठरल्याप्रमाणे रवींद्राच्या भाषांतरालाही त्यांची ना नव्हती. त्यांनी आणि मी मिळून केलेले एक भाषांतर माझ्या अजून स्मरणात आहे. काही ओळी विसरल्या आहेत. कुठे थोडा हेरफेर झाला असेल. भाषांतर मात्र माझ्या आठवणीत आहे : 

"‘निर्भय राहिल जेथे मानस 
"शिरहि राहिल जेथे उन्नत 
"विज्ञानाला जिथे मुक्तता 
"नाविन्याचा प्रवाह निर्मल 
"मृत रुढीच्या वाळूमाजी 
"गुप्त न होते 
"अविश्रांत श्रम 
"आपले बाहू 
"पूर्णत्वाप्रत येथे पसरती 
"चालविसी तू जेथ मनाला 
"विकासणार्‍या चिंतनी, कार्यी, 
"स्वतंत्रतेच्या त्या स्वर्गात 
"प्रभो, 
"राष्ट्र हे व्हावे जागृत.’ 

"हे ते भाषांतर. त्यांची छंदावर हुकमत होती. रसिकता प्रथम प्रतीची होती. विनोदबुद्धीही जागी होती.

"एकदा सायंकाळच्या पर्यटनात कुणातरी मित्राचा विषय चालला होता. कवी गप्प होते. तोंड गच्च मिटून चालते होते. डोळे अर्धवट मिटलेले होते. कुणीतरी म्हणाले, ‘‘सूर्यकांतला मुलगीच झाली पुन्हा तिसर्‍यांदा.’’ 

"‘‘अरेरे!’’ 

"‘‘त्याला मुलगा होेतच नाही.’’ 

"कवी एकदम म्हणाले, ‘‘त्यांना एक उपाय करायला सांगा.’’ 

"‘‘काय?’’ 

"आम्ही सर्वजण त्यांच्याभोवती जमा झालो. आज ते सामान्य विषयात भाग घेत होते. 

"ते म्हणाले, ‘‘त्याला म्हणावं, पुत्रकामेष्टियज्ञ करा.’’ 

"आंब्याचा मोसम संपेतो कवी माझ्या घरी राहिले. त्या मुदतीत त्यांनी एकदादोनदा छोट्या मुलीला अलगदपणे खांद्यावर घेतले. माझ्या बायकोच्या भलेपणावर आठ ओव्या रचल्या. सातत्याने स्वर्गाचादेखील कंटाळा येत असेल. गरिबीला कितीही मोठा पाहुणा असला तरी तो रोज परवडत नाही. स्वारीचे गूढ वागणे आणि मुखस्तंभ बसणे आम्हाला जाचक वाटू लागले. तशात आमच्या आंब्याच्या व्यापार्‍याने तीनशे रुपयांचे बिल पाठवले. इतके आंबे आम्ही कशाला आणतो? 

"मी तरातरा गेलो आणि व्यापार्‍याला जाब विचारला, — 

"‘‘आंब्याचं बिल एवढं? मी तर इतके आंबे नेले नाहीत. आमच्या मिसेस येत होत्या का दुकानावर?’’ 

"‘‘नाही.’’ ‘‘मग?’’ ‘‘तुमच्याकडे असतात, ते येत होते.’’ 

"‘‘कोण?’’ 

"‘‘ते तुमच्याबरोबर असतात की नेहमी. तुमच्या बिर्‍हाडीच राहतात ते.’’ 

"‘‘त्यांनी नेले?’’ 

"‘‘पुष्कळदा.’’ 

"‘‘माझ्या खात्यावर.’’ 

"‘‘हो.’’ 

"‘‘तुम्ही का दिलेत?’’ 

"‘‘एकदा दिले. तुमची तक्रार आली नाही. दुसर्‍यांदा दिले. तसंच झालं. मग म्हटलं, तुमच्याकडचं मार्केटिंग तेच करीत असावेत.’’ 

"मी कपाळावर हात मारला."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 02, 2022  - February 02, 2022.  

"भाव्यांशी भेट"
................................................................................................
................................................................................................

"पावसाळी दिवस. सायंकाळची वेळ. आभाळात ढगांची दाटी. थोडेसे बुरंगटदेखील पडले असावे. वारा पडलेला. बाहेर सारी ओलाड असूनही, अंगाला मात्र एक विचित्र उष्मा जाणवत होता. 

"माझ्या बंगलीच्या व्हरांड्यातील कोचावर बसून, एका अकारण खिन्नतेने मी समोरच्या महासागराकडे पाहत होतो."

"सारे नेहमीसारखेच होते. मी मात्र उदासवाणा होतो. अधिक उदासवाणा होतो. मला वाटत होते, सपाटून पाऊस कोसळावा. मुसळधार लागावी. पाणीच पाणी होऊन जावे. आभाळ स्वच्छ व्हावे. मन स्वच्छ व्हावे. झाडांच्या ओल्या मस्तकांवर केशरी ऊन पडावे. आपण हलकेच उठून फाटकाजवळच्या जुईजवळ जावे, तिच्या तळी फुलांचा सडा पडलेला असेल... 

"एवढ्यात रिक्षा दाराशी थांबली. एक किंचित स्थूल, गोरीपान, ठेंगणी मूर्ती खाली उतरली. दुरूनच मी ओळखले : बहुधा भावेस्वामी असावेत. 

"भावे हो, भावेच फाटकातून आत आले. सवयीप्रमाणे त्यांनी जुईची चार फुले खुडून घेतली. त्यांचा वास घेत घेत, डुलत डुलत ते माझ्याच दिशेने येऊ लागले. मुद्रा जुईलीसारखीच सुस्मित; पण शरीरकाठी मात्र थोडकी शिणल्यासारखी वाटली. चालण्यातला वेग थोडा थकला आहे की काय अशी शंका आली. ... "

"भावे वर आले. माझ्या समोरच्या वेताच्या सोफ्यावर विसावत म्हणाले, 

"‘‘काय गम्पटराव, काय म्हणतेय प्रकृती?’’"
................................................................................................

"‘‘हसता का?’’ 

"‘‘असल्या विषयावर पूर्वी कधी आपण बोलत तरी होतो का गम्पटराव?’’ 

"‘‘ ‘गम्पटराव’ हे कुठलं नवीन बांडुंग काढलंयत आज?’’ 

"भावे मला नेहमीच अशा वेगवेगळ्या नावांनी बोलावतात. कधी स्वामी, कधी बुवा, कधी दादा, कधी मास्तर, कधी डेंगरू, तर कधी मास्ती व्यंकटेश, केव्हा मंतलू; तर केव्हा केव्हा गणप्या-गण्यादेखील. 

"वाचनात आलेले कुठलेही विचित्र नाव एक तर सौ. भाव्यांना नाहीतर मला बहाल करून टाकायचे ही त्यांची खोड. मला चांगले आठवते की, सौ. भावेवहिनींना ते एक पंधरवडाभर तरी ‘मधुमंगेश’ याच नावाने हाक मारीत होते. भाव्यांचे वय तेव्हा साठीचे. वहिनी पंचावन्नच्या."

"सांप्रत ते अव्वल इंग्रजीत किंवा उत्तर पेशवाईत केव्हातरी लिहिले गेलेले, एक इंग्रज अधिकार्‍याचे पुस्तक वाचीत होते. त्यात एका ‘गणपत देवकर’ नावाचा इसम पुन:पुन्हा आला होता आणि साहेब मजकुराने त्याच्या नावाचे स्पेलिंग ‘Gunpantrao Deocurr’ असे केलेले होते. मी गदगदून हसलो. 

"बाहेरही मुसळधार पाऊस सुरू झाला. आमच्या गप्पांतील मरगळ पार पळून गेली. त्या परत पूर्वीसारख्या नाचूबागडू लागल्या."
................................................................................................

" ... ‘‘एक प्रसंग आठवला मास्तर.’’ 

"‘‘कोणता?’’ 

"‘‘तुमच्या पितृदेवतेनं तुम्हाला ’’ 

"‘‘बुटांनी मारलं, पादत्राणानं पूजा केली, तोच ना?’’ 

"भावे मनमोकळे हसले. मीही हसलो. खरोखरीच ‘प्रथमपुरुषी एकवचनी’ हे त्यांचे ‘हंस’मधून क्रमश: प्रसिद्ध होत असलेले आत्मचरित्र वाङ्मयात एक वाढ पुस्तक ठरणार आहे. त्यातला स्पष्टपणा आगळा आहे. स्वत:कडे पाहण्याची वृत्ती सीमेची निकोप आहे. सुदृढ आहे. 

"आत्मचरित्रावरून गोष्टी निघाल्या आणि मग तो रूसो काय, थोरो काय आणि चॅपलिन काय, एरॉल फ्लिन काय! अनेक देशीपरदेशी आत्मचरित्रांविषयी भावे बोलू लागले. मराठीतल्या लक्ष्मीबाई टिळकांचा, रमाबाई रानड्यांचा आदरपूर्वक उल्लेख झाला. औंधकर प्रतिनिधींच्या धाडसी सत्यकथनाचे कौतुक झाले. गो.नी.दांचा उल्लेखदेखील आला. विषय बापूसाहेब शेगावकरांच्या ‘सत्याच्या प्रयोगा’शी पोहोचला आणि भाव्यांच्या जिभेने कडुनिंबाचा पाला चघळला आणि थुंकला. 

"‘श्रीमंत बापूसाहेब शेगावकर’ हे भाव्यांनी महात्मा गांधींचे केलेले जुने नामकरण. गांधी, नेहरू ही मंडळी भाव्यांना मुळीच आवडत नाहीत. त्यांच्या लिखाणाबद्दलही ते तोंड भरून स्तुती करत नाही. वास्तविक शत्रूचेही चांगले लिखाण मन:पूर्वक नावाजावे असा त्यांचा स्वभाव आहे. 

"गांधीनेहरूंच्या विषयात तेथेही त्यांची वाणी पान्हा चोरते. इतकी त्यांच्याविषयी विलक्षण अप्रीती. गांधीनेहरूंची नावे निघाली आणि आमची बोलणी राजकारणाच्या रानवटीत भरकटली. भाव्यांची मते मला माहीत असल्यामुळे मी फारसे प्रतिप्रश्न करीत नाही. ते मात्र कळकळून, तळमळून बोलतात. पालथ्या घड्यावर रांजण उघडे करतात. 

"‘‘गांधीनेहरूंनी या सुंदर देशाचं वाटोळं केलं. गांधी खोटं बोलला. पाकिस्तान होऊ देणार नाही म्हणाला होता. ते झालं. त्याच्या समोर झालं. अष्टौप्रहर सुरा घेऊन, समोर ठाकलं. हे गांधीचं पाप. नेहरूचं कुकर्म, त्या राजगोपालाचार्‍याचं कवटाळं ’’ 

"‘‘सत्पुरुषांच्या नावाचा एकेरी उल्लेख बरा नाही, भावे!’’ सारे ठाऊक असूनही मी शेरा मारलाच. 

"‘‘बरोबर! गांधी सत्पुरुष आणि तुम्ही पांढर्‍या टोप्यांचे गणंग त्यांचे शिष्य! बरा बापडा तो जयप्रकाश नारायण उभा राहिला. लोकांनी त्याचं तरी ऐकलं. नाहीतर या नेहरूकन्येनं या देशाला ’’ 

"‘‘जाऊ द्या. राजकारण कशाला?’’ मी त्यांना थांबवले. त्यांच्या मुद्रेवर लाली चढलीच होती. अंमळशाने त्यांचा स्वर किंचित उतरला; पण सदैव डोक्यात असलेले हिंदुत्व संभाषणात आलेच. 

"‘‘तुम्हीच तेवढे हिंदू आहात का भावे? मला तर वाटतं, शेवटचा हिंदू नथुराम गोडशानं ठार केला.’’ 

"‘‘मला अधिक बोलायला लावू नका. तुम्हाला ठाऊक आहेत माझी मतं.’’ 

"‘‘आम्हीदेखील हिंदुत्वनिष्ठच आहोत भावे. फक्त तुम्ही हिंदुत्वनिष्ठ गुंड आहात-’’ 

"‘‘आणि तुम्ही हिंदुत्वनिष्ठ गांडू आहात!’’ भाव्यांना राहावले नाही. ते भडकून बोलले. 

"सौ. विद्याबाईंनी वेळीच पाठवलेल्या कॉफीमुळे पुन:पुन्हा रंगणारे हे रणदुुंदुभी नाटक तिथेच थांबले. गप्पांनी परत घरगुती वळण घेतले. शब्दांच्या मासोळ्या घोळामेळाने आपलेपणाच्या पाण्यात खेळू लागल्या. 

"भालजी पेंढारकरांची आठवण निघाली. चित्रकथा लिहिण्यासाठी भाव्यांना प्रथम त्यांनीच पाचारण केले होते. गांधीहत्येच्या गोंधळात भालजींचा कोल्हापुरातील स्टुडिओ जळून खाक झाला तेव्हा तो बहादूर माणूस उद्गारला होता, ‘‘छान झालं! आता चित्रपट काढायची कटकट नको! कोळशाची वखार काढली तरी चालेल!’’"

"मग आठवण वामनराव कुलकर्ण्यांची निघाली. नमाड्यांची निघाली. दिवंगतांच्या स्मरणासरशी वि.घ. देशपांडे, राजा बढे यांच्याविषयी बोलणी निघाली. ते आज आपल्यात नाहीत याची उदास जाणीव... ‘मरण...’ मग मरणावर भाष्ये. मरणाविषयी साहित्यिकांचे सहजोद्गार. दोघांचेही पाठांतर चांगले. 

"‘‘आता सुंदर मी होणार!’’ मी गोविंदरावांची ओळ म्हणालो. 

"‘‘मरणात खरोखर जग जगते.’’ भाव्यांना तांब्याची आठवण झाली. या दोन गंभीर ओळींनंतर ‘दूता आलो थांबिव शिंगा’ या तांब्यांच्याच ओळीचे मात्र हसू आले. तशाही मन:स्थितीत हसू आले. ते ओसरल्यावर भावे म्हणाले, ‘‘तत्त्वज्ञालादेखील मरावंसं वाटत नाही. मास्तर वि. स. खांडेकर मजजवळ म्हणाले होते, ‘शरीर क्षीण झालं, दृष्टी गेली; पण मरावंसं वाटत नाही.’’’ 

"‘‘तुकारामबुवानं कसा शेवटचा अभंग लिहून ठेवला असेल बुवा?’’ मी बुवांचा अभंग म्हणू लागलो, 

"‘‘गरुड येती फणत्कारे । नाभि नाभि म्हणति त्वरे 
"किरीट कुंडलाच्या दीप्ती । तेजे लोपला भस्ती ।’’ 

"‘‘दिसलं असेल त्याला.’’ भावे भाविकपणे म्हणाले. 

"‘‘असे मरणाला सामोरे होणारे खरंच असतील कुणी?’’ मी शंका काढली. 

"‘‘क्रांतिकारकांच्या कथा आहेतच की!’’ भावे गंभीरपणे बोलले, ‘‘मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू - फार कशाला, आपल्या न. चिं. केळकरांनी नव्हती का जाण्यापूर्वी शांतपणे कविता करून ठेवली — 

"‘दिसो लागे मृत्यू परि न भिववू तो मज शके’ अशी कविता लिहून वर आपले उपनेत्र ठेवून दिले होते तात्यांनी.’’ 

"‘‘तुमचा तात्याही असा सल्लेखना करूनच मेला की!’’ मी म्हणालो. 

"आणि मग तात्याराव सावरकर या व्यक्तीविषयी भावे बोलू लागले. त्यांचा हिंदुत्वविचार, त्यांची राष्ट्रनिष्ठा, त्यांचे शौर्य, त्यांचे वाङ्मय, त्यांचे वत्तृत्व फार काय, व्याख्यान देताना हवेत नाचणारी त्यांची तर्जनी कशी विद्युल्लतेसारखी नाचत असे, त्याचेही भाव्यांनी वर्णन केले. 

"भावे बोलत होते आणि मी ऐकत होतो. बाहेरचा पाऊस कधी उघडला, दिवेलागण कधी झाली, शुभदेने मांगलिक उदबत्त्यांचे पेटते झाड आमच्या बैठकीच्या जागी कधी आणून ठेवले, कळले नाही. बोलता बोलता मध्येच भावे एकाएकी उठले, उभे राहिले आणि ‘बरं गम्पटराव, आता येतो’, असे म्हणून वळलेदेखील. 

"एवढ्यात सौ. विद्याबाई परत बाहेर आल्या. ‘‘हे काय निघालात? स्वयंपाक तयार आहे माझा.’’ 

"‘‘पुन्हा केव्हातरी येईन. घरी हवालदारसाहेब एकटे आहेत.’’ भावे अगदी काकुळतीने म्हणाले. 

"‘‘चालतच जाणार?’’ 

"‘‘नाही हो. तो आनंद कमी झाला आता. रिक्षा मिळेल जवळच. तेवढं चालीन. बुढा झालो ना जी.’’"

"भाव्यांच्या बरोबर व्हरांड्याच्या पायर्‍या उतरत मी विचारले, ‘‘निवडणुकीचा काय रंग?’’ ‘‘बघू या. विद्याधर गोखले, वा. य. गाडगीळ वगैरे मंडळी मुद्दाम मुंबईहून आली आहेत त्यासाठी. निवडून आलो वाहव्वा; नाही आलो तरी वाहव्वा! अपयश तर आपल्याला पाठच आहे!’’ 

"मागे एकदा राजकीय निवडणुकीत भाव्यांनी आपटी खाल्ली होती. काही सन्मान आणि संधी त्यांच्या विशिष्ट मतांमुळे त्यांना नाकारण्यात आल्या होत्या. नाही म्हटले तरी त्यांच्या मनी कुठेतरी सलत होतेच. ‘‘बरंय भेटू मग.’’ ‘‘बरंय.’’ 

"भावे निघून गेले. पूर्वीसारखी धडधाकट प्रकृती असती तर मी त्यांना पोहोचवायला त्यांच्या बिर्‍हाडापर्यंत गेलो असतो. आम्ही दोघे हौसेने चालत गेलो असतो. माझे रात्रीचे जेवण त्यांच्याकडेच झाले असते. अर्धी रात्र उलटल्यावर मी परत यायला निघालो असतो. मग भावेदांपत्य मला पोहोचवायला आले असते. 

"मी, सौभाग्यवती विद्याबाई, भावे व सौ. भावे यांच्या गप्पा मग आमच्या ‘पंचवटी’त रमल्या असत्या. कोकिळा बोलू लागल्या असत्या. भावे भानावर आले असते. 

"भावेवैनी म्हणाल्या असत्या, ‘‘बघा हो. बोलता बोलता सकाळ झाली. आता उठा.’’ 

"विद्याबाई म्हणाल्या असत्या, ‘‘थांबा. आत्ता ताजं दूध येईल. चहा घेऊन मग जा.’’ 

"आज तसे झाले नाही. भाव्यांच्या वयाला सदुसष्ट वर्षे झाली आणि माझी साठीही आता दोन वर्षांवर आली. त्यांना निरोप देऊन मी परत आलो. आभाळ पुन्हा कोंदटले होते. वारा पडला होता; पण मला फक्त प्रसन्न वाटत होते. 

"भावे येऊन गेले होते. बर्‍याच दिवसांनी माझा जिवलग मित्र मला भेटला होता. मनमुराद गप्पा झाल्या होत्या. भाव्यांचा सहवास मला आनंददायक वाटतो, उत्साहवर्धक वाटतो. या मैत्रीलादेखील आता पंचवीस वर्षे होऊन गेली."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 02, 2022  - February 02, 2022.  
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
"वासुदेव बळवंत ‘विश्वास’"
................................................................................................
................................................................................................

"‘वासुदेव बळवंत, 
"स.प. कॉलेजजवळ, 
"पुणे-2.’ 

"एवढाच पत्ता असलेले एक पत्र पोस्टमनने संगीतदिग्दर्शक सुधीर फडके यांच्या बिर्‍हाडी आणून टाकले. घरातल्या गड्याने ते अचूक श्री. विश्वास कुंटे यांच्या हाती आणून दिले. कुंट्यांनी ते मोठ्या आश्चर्याने फोडले. पत्र होते त्यांच्या पत्नीचेच. त्यांनी तो पत्ता केवळ विनोद म्हणून लिहिला होता. उगाच मौज करून पाहिली होती; पण तेवढ्या पत्त्यावर पोहोचावे यात केवढा अर्थ होता! कुंट्यांची ‘वासुदेव बळवंता’ची भूमिका किती लोकप्रिय झाली आहे याचीच ती साक्ष होती. या लोकप्रियतेचा अभिमान स्वत: कुंट्यांना वाटणे तर स्वाभाविकच आहे; पण माझ्यासारख्या हितचिंतक मित्रांचेही ऊर आनंदाने भरून यावे असेच हे यश नाही का?"
................................................................................................

"कुंट्यांचे मूळ घराणे धुळ्याचे. त्यांचे आजोबा कै. दामोदर केशव कुंटे हे मोठे नामांकित डॉक्टर होते. डॉ. वामन गोपाळांना ‘सार्सापरिला’ आणि डोंगरे यांना ‘बालामृत’ त्यांच्याकडून मिळाले. हे दोघेही औषध निर्माते डॉ. कुंट्यांकडे कंपाउंडर्स होते. कुंट्यांच्या वडिलांनीही आजोबाचेच नाव पुढे चालवले. पहिल्या महायुद्धात ते ‘मिलिटरी सर्जन’ म्हणून गेले होते. नंतर काही वर्षे ते सिव्हिल सर्जनही होते. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्यांनी अनेक ठिकाणी स्वतंत्र दवाखाने चालवले आणि फार मोठा लौकिक मिळवला. पाँडेचरीच्या राजाकडेही त्यांनी काही काळ नोकरी केली. तेथून निवृत्त होताना त्यांना एक चांदीची ढाल व तलवार बहाल करण्यात आलेली होती. ही ढालतलवार अद्यापिही कुंट्यांच्या घरात आहे. खंडेनवमीला तिची पूजा होत असते. या ढालतलवारीपुढे दर विजयादशमीस थोडे का होईना; पण सोने खरेदी करून ठेवण्याची प्रथा त्यांच्या वडिलांनीच सुरू करून ठेवलेली आहे. विश्वास कुंट्यांचा जन्म ‘बीना’ या गावी झाला. एकोणीसशे वीस ते सदतीस अशी वयाची सतरा वर्षे त्यांनी अतिशय आनंदात काढली. वडिलांच्या प्रकृतीतील सशक्तता विश्वासाला उपजता लाभली होती. जन्मले तेव्हा त्यांचे वजन बारा पौंड होते असे त्यांच्या आजी सांगतात. कुंट्यांना मातृसुख फारसे लाभले नाही. यामुळे आजींनीच त्यांचा प्रतिपाळ केला म्हटले तरी चालेल. कुंट्यांच्या आजी या पुण्याचे प्रसिद्ध गणिती कै. केरूनाना छत्रे यांच्या कन्या होत. आजीच्या वात्सल्याची पाखर आणि वडिलांची हौशी वृत्ती यात विश्वास लहानाचा मोठा झाला. वडील व्यायामाचे शौकी होते. अडीच वर्षांचा असतानाच ते विश्वासला दोरी बांधून विहिरीत पोहण्यासाठी सोडीत आणि विश्वासही निर्भयपणे हातपाय हलवी. जोर, जोडी, व्यायाम यांचा गुरुमंत्रही त्यांना वडिलांकडूनच मिळाला. त्यांचे शरीर म्हणूनच पिळदार, घाटदार आणि कांतिमान घडवले गेले."
................................................................................................

"1937 साली वडील वारले आणि कुंटे कुटुंबातला हा आनंद मावळला. उदार स्वभावामुळे डॉक्टरांनी ‘अशाश्वत’ धनाचा संचय मुळीच केला नव्हता. आशीर्वाद, दुवे, धन्यवाद मात्र असंख्य मिळवले होते; पण पाठीमागे उरलेल्या आठ भावंडांना, त्यांच्या आईला आणि आजीला त्यांचा उपयोग ऐहिक जीवनात होण्यासारखा नव्हता. विश्वास सर्वांत मोठा असल्याने त्याला काही मिळवणे भाग होते. तो त्यावेळी मॅट्रिकच्या वर्गात शिकत होता. वडिलांच्या मनात होते, विश्वास डॉक्टर व्हावा. उच्च शिक्षणासाठी त्याला परदेशी पाठवण्याचे बेतही ते बोलवून दाखवीत; पण लहानपणीच एकदा परदेशात जाण्याचा योग विश्वासच्या आयुष्यात आला होता. भोपाळास असताना तिथे एक वृद्ध इंंग्लिश जोडपे होते. बिचारे निपुत्रिक होते. पेन्शन झाल्यावर ते मायदेशी जायला निघाले. शेजारामुळे विश्वासचा त्या दोघांना फार लळा लागला होता. ते इंग्लिश गृहस्थ डॉक्टर कुंट्यांना म्हणाले, ‘‘हा मुलगा आम्हाला द्या. त्याला शिकवू. डॉक्टर करू. आमच्या जिवात जीव आहे तोवर त्याला आम्ही मुलगा म्हणून सांभाळू. नंतर येईल तो मायदेशी!’’ उत्साही डॉक्टरांनी त्याला ताबडतोब ‘हो’कार दिला. विश्वाससाठी लोकरीचे कपडे शिवले गेले. गोडधोड केले गेले; पण ऐनवेळी आजीच्या अश्रूंनी डोळ्यांचा बांध फोडला आणि विश्वास परत हिंदुस्थानातच राहिला! कुटुंब त्याचा अखेरचा निरोप घेऊन मोठ्या कष्टाने ‘दर्यापार’ झाले! लहानपणी हुकलेले परदेशी जाण्याचे भाग्य, डॉक्टरांची इच्छा असूनही विश्वासला परत लाभले नाही. वडील गेले आणि तो संसाराच्या आखाड्यात उतरला. कुणाही आप्तस्वकीयांकडे याचनेचा हात न पसरता त्या कोवळ्या वयात त्याने आलेली जबाबदारी ‘उचलली.’ सेकंडरी इंजिनिअिरिंगचा कोर्स पुरा केला. प्रताप मिल्समध्ये बॉलर असिस्टंट म्हणून नोकरी धरली. कसेबसे मीठभाकरी खाऊन कुंटे कुटुंब अब्रूने जाते दिवस सोसू लागले. ही नोकरी विश्वासने तीन-साडेतीन वर्षे केली आणि प्रधान नावाच्या एका मित्राच्या प्रयत्नाने 1941 साली तो मुंबईस फायर ब्रिगेडमध्ये आला. कुठला मनुष्य कुठे तरी फेकला गेला. मुंबईतली पाच वर्षे विश्वासने अति हलाखीत रेटली. प्रत्येक क्षणाला धावपळ अपेक्षित असलेली ती सरकारी चाकरी त्याच्या मन:प्रकृतीला मुळीच भावत नव्हती; पण करणार काय? 

"1946 साली ‘रामजोशी’ चित्रपटाच्या निमित्ताने मी मुंबईस होतो. माझा मुक्काम श्री. सुधीर फडक्यांचे वडील बंधू वामनराव फडके यांच्याकडे होता. डॉकयार्डला त्यांचा चांगला ऐसपैस ब्लॉक होता. ते ‘ऑक्झिलिअरी फायर ऑफिसर’ म्हणून डॉकयार्ड फायर ब्रिगेडमध्ये होते. त्यांच्या घरी माझी आणि कुंट्यांची प्रथम ओळख झाली होती. फडक्यांकडे अशीच चार-दोन समव्यवसायी मंडळी जेवायला आली होती. त्यात कुंटे होते. फडक्यांनी आमची ओळख करून दिली. कुंट्यांची धिप्पाड आणि सतेज शरीरप्रकृती पाहून मला उगीचच वाटले, ‘हा मनुष्य चित्रपटात शोभून दिसेल!’ 

"‘‘तुम्ही कधी नाटकात काम केलंय का हो?’’ जेवता जेवता मी विचारले. 

"‘‘छे: बुवा! कधीच नाही.’’ कुंट्यांनी बेफिकीरपणे उत्तर दिले आणि काही निराळ्याच गप्पा सुरू केल्या. मला तो मनुष्य जरा बेमुर्वतखोरच वाटला; पण त्यांच्या आवाजातला ‘गंभीर’पणा ऐकून पुन:पुन्हा वाटू लागले, ‘ऐतिहासिक स्वभावचित्राला फार चांगली व्यक्ती आहे.’ 

"‘‘सिनेमात याल का तुम्ही?’’ आणखी एकदा मी विचारले. 

"‘‘अहो घेतो कोण आम्हाला?’’ 

"ते बोलणे तिथेच राहिले. या रगेल माणसाशी बोलण्यात काही अर्थ नाही असे समजून मी बराच वेळ गप्प राहिलो; पण शेवटी जाताना न राहवून मी पुनश्च एकवार म्हटलेच, ‘‘माझ्याबरोबर एकदा ‘राजकमल’मध्ये याल का?’’ ‘

"‘येऊ की! आम्हालाही एकदा स्टुडिओ पाह्यचाय तो!’’"
................................................................................................

"‘बनवासी’ पुरा झाला. लागलाआणि एका नव्या नटाचे पडद्यावर पदार्पण झाले. ‘बनवासी’नंतरचा काही काळ कुंट्यांनी आणखी क्लेश भोगले. पुढे पुण्यात वसंत ठेंगडी यांच्याकडे त्यांची आणि दिग्दर्शक विश्राम बेडेकरांची सहज गाठ पडली. 

"‘‘काम करता का आमच्या चित्रपटात?’’ बेडेकरांनी विचारले. कुंट्यांना हाच प्रश्न कुणीतरी विचारायला हवा होता. त्यांचे उत्तर होते : ‘‘जरूर!’’ 

"‘वासुदेव बळवंता’सारख्या अमर हुतात्म्याची भूमिका वठवणे सोपे नव्हते. पण कुंट्यांचे भाग्य बलवत्तर. दिग्दर्शक बेडेकरांसारखा शिक्षक त्यांना लाभला. कुंटे प्रामाणिकपणे मान्य करतात की, ‘‘बेडेकरच होेते म्हणून ती अवघड भूमिका मी पेलू शकलो!’’ ‘वासुदेव बळवंत’ पुणे आणि दादर येथे प्रकाशित झाला आणि चोवीस तासांत कुंटे ख्यातनाम नट झाले. नाचगाण्यांनी नासलेल्या चित्रपटसृष्टीत या चित्रपटाने साखर मिसळली! वर्तमानपत्रांनी कुंट्यांचे कौतुक केले. दादर ब्राह्मणसभेत त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. एवढेच नव्हे, तर वासुदेव बळवंताच्या लोकप्रियतेची एक गोष्ट कुंंटे स्वत: विनयपूर्वक सांगतात, ‘‘गिरगावात लिथो प्रेसवाले एक फडके राहतात. ते या वासुदेव बळवंताचे कोणी नात्यातले आहेत. त्यांनी मला आग्रहानं जेवायला घरी बोलावलं. मी गेलो. तिथं एका वृद्ध फडक्यांनी मला पायांशी हात लावून नमस्कार केला. 

"‘‘मी विलक्षण बावरलो आणि म्हणालो, ‘हे काय?’ ’’ 

"‘‘फडके म्हणाले, ‘मी नमस्कार कुंट्यांना केला नाही; वासुदेव बळवंतांना! तुम्ही भूमिका हुबेहूब वठवली आहे !’’’ 

"‘वासुदेव बळवंता’मुळे कुंट्यांना महामूर लोकप्रियता लाभली. मोटार अडवून त्यांच्याशी हस्तांदोलन करणारे तरुण मी स्वत: पाहिले आहेत. ‘अहो, वासुदेव बळवंत’ असे म्हणून त्यांचे लक्ष वेधून घेणारा अधिक उत्साही प्रेक्षकही कैकदा पाहिला आहे. ‘वासुदेव बळवंता’बरोबर कुंट्यांची गृहस्थितीही पालटली. चार पैसे दिसले."
................................................................................................

" ... कुंट्यांचा संसार सुखाचा आहे. गेल्या वर्षी जूनमध्येच त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नी या सुप्रसिद्ध गायिका सौ. ललिता फडके यांच्या भगिनी. त्या यंदा बी.ए.ला बसत आहेत. कुंटे म्हणतात, ‘‘वडिलांच्या आकस्मिक मृत्यूमुळे माझं शिक्षण अपुरं राहिलं. सर्व मंडळींना आता मी भरपूर शिकवणार!’’ त्यांचा एक भाऊ ‘मेडिकल’ला आहे. तो पास झाला म्हणजे धुळ्याच्या जुन्या घरावर नवी पाटी झळकणार आहे : ‘डॉ. कुंटे.’ कुंटे घराण्याची परंपरा तिसर्‍या पिढीतही अखंडित राहणार!"
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 02, 2022  - February 02, 2022.  
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
"शेतकरी आणि शास्ता"
................................................................................................
................................................................................................

"वसंतरावांच्या स्वत:च्या मुलखात त्यांच्या शेतीची विलक्षण ख्याती आहे. कर्त्या शेतकर्‍याने वाटेवर थांबून निरखावे असेच त्यांचे शिवार आहे. ती एक उघडी प्रयोगशाळाच आहे. वसंतरावांच्या सहवासात आलेल्या माणसालाही थोड्याच वेळात पटते की, हा माणूस हाडाचा शेतकरी आहे. आभाळापेक्षाही त्याला मातीची मातब्बरी अधिक वाटते. आभाळ लहरी आहे. मातीला लहरीपणा नाही. आभाळ बरसेल, न बरसेल. माती मात्र राबणार्‍याच्या हाती केवळ अपयश ठेवणार नाही. काहीतरी देईलच देईल. 

"आज देणे साधले नाही तर उद्या देईल. नित्यनवी निर्मिती हा मातीचा धर्म. सगळेच श्रम वाया जातील कसे? पेरलेले जपले तर ते भराला आलेच पाहिजे. दैव धोका देईल; पण किती वेळ? कधी ना कधी श्रमाचे फळ मिळालेच पाहिजे. मातीची मशागत माणसाच्या स्वाधीन आहे. आभाळाचा आशीर्वाद साठवण्याचे सामर्थ्यही मातीच्या अंगी आहे. हात आणि बुद्धी वापरून माणसाने मातीची मशागत केली पाहिजे. निसर्गावरच मदार ठेवून भागणार नाही. 

"शेती हे वसंतरावांचे दैवत आहे. त्या दैवताच्या भक्तीचे सारे गुण त्यांच्या ठायी आहेत. हाडाचा शेतकरी एक सुगी साधली नाही म्हणून हैराण होत नाही. हाती आलेला पाटणचा चोळा पुन्हा त्याच मातीत गाडून तो नव्या सुगीची लावणी करतो. खचून न जाण्याची, यत्नशील राहण्याची वृत्ती वसंतरावांना त्यांच्या कृषिप्रेमानेच दिली आहे. आपण मातीवर उभे आहोत. माथ्यावर आभाळ आहे. आभाळाचा कारभार आपल्या हाती नाही. वारे सुटतील. वावटळे होतील. विजा कडाडतील. आपण आपले भवितव्य मातीत पेरले पाहिजे, मातीतूनच ते उगवणार आहे याविषयी ते नि:शंक असतात."

" ... देशातल्या अनेक राज्यांतील मंत्रिमंडळे पत्त्याच्या बंगल्यासारखी भुईसपाट होत आहेत. महाराष्ट्राची राज्यसत्ता स्थिर आहे. टीकेच्या गदारोळातही तिचे यश हरपले नाही. प्रत्यक्ष पृथ्वी हादरली तरीही वसंतराव नाईक या नावाचा पृथ्वीपुत्र निश्चल उभा आहे. पृथ्वीच्या वात्सल्यावर त्यांचा विश्वास आहे. माणसाच्या कर्तृत्वावर त्यांची निष्ठा आहे."

" ... नित्य पाहतो, त्याच दृष्टीने महाराष्ट्राकडे पाहिले तर या दगडाच्या देशाला ‘हिरवे बाळसे’ आले आहे ही गोष्ट अमान्य करता येण्यासारखी नाही. श्री. यशवंतराव चव्हाणांचे स्वप्नचित्र हिरव्या आणि रसाळ रेखांनी सजीव करण्याचे कार्य वसंतरावांच्या कारकिर्दीने केले आहे निश्चित."
................................................................................................

"पाच-सहा वर्षांपूर्वी मी पुसदला गेलो होतो. वसंतराव त्यावेळी मुख्यमंत्री झालेले नव्हते. पुसदलाच वसंतरावांचे वडिलोपार्जित घर आहे. त्यांच्या वडिलांच्या नावाचे एक कॉलेजही तिथे आहे. त्या कॉलेजच्या समारंभासाठी वसंतरावांच्याच आग्रहावरून मी तिकडे गेलो होतोे. त्यांच्याच घरी उतरलो होतो. बोलता बोलता मी त्यांच्या वडील बंधूंनाबाबासाहेबांनाम्हणालो, 

"‘‘तुमचे वसंतराव लवकरच मुख्यमंत्री होणार!’’ 

"‘‘कशाला? त्यापेक्षा इकडे येऊन त्यानं शेती पाहावी. काय लाभ आहे त्या मुख्यमंत्री होण्यात? हल्ली इथूनच पैसे पाठवावे लागतात त्याला!’’"

"सर्वांच्या कल्याणाच्या ध्यासापायी ते अहोरात्र श्रम करतात. पाचशेपाचशे मैलांचे दौरे करतात. फायलींचे डोंगर रात्रीअपरात्री धुंडाळत बसतात. विरोधी पक्षांशी चर्चा करतात. स्वकीयांच्या मुलाखती घेतात. आज वर्‍हाड, तर उद्या दिल्ली असे सतत चालू असते."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 02, 2022  - February 02, 2022.  
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
"प्रपंच-तपस्विनी कै. माईसाहेब"
................................................................................................
................................................................................................

"माईसाहेबांचे माहेर जेजुरीचे. खंडेराव देवतेचे. पेशवे हे त्यांचे माहेरघर. त्यांचा विवाह झाला तोही पारखे या प्रतिष्ठित घराण्यातील कर्तृत्ववान तरुणाशी. त्यांचे पती श्री. सदाशिवराव पारखे हे अक्कलकोट, कुरंदवाड, जमखिंडी अशा संस्थानांमध्ये न्यायाधीश, दिवाण, सरन्यायाधीश अशा हुद्द्यावर चढत गेले होते. मानमरातब, नोकरचाकर, राजैश्वर्यसारे काही त्यांनी त्यांच्याबरोबर अनुभवले. 

"दुर्दैवाने वयाच्या 38व्या वर्षी माईसाहेबांच्या मस्तकी वैधव्याची कुर्‍हाड कोसळली. त्या काळात प्रतिष्ठित घराण्यातील स्त्रीने एकाकी जीवन चालणे अतिशय अवघड होते. तशात माईसाहेबांच्या पदरी दोन मुलगे, तीन लग्नाच्या मुली. आप्तस्वकीय, ऋणानुबंधी-कोणाकडेही साहाय्याची याचना न करता माईसाहेबांनी आपली अपत्ये वाढवली-पढवली. तीनही लेकींची सुयोग्य स्थळी लग्ने करून दिली. मोठा मुलगा विशीचा वेस ओलांडण्याआधीच त्याच्यासाठी त्यांनी एका व्यवसायाचा श्रीगणेशा करून ठेवला. हाताने कागदी पाकिटे तयार करण्याचा माईसाहेबांनी सुरू केलेला व्यवसाय आज ‘पॅपको’ आणि ‘सेंट्रल पल्प’ या दोन महान उद्योगसंस्थांच्या रूपाने भारतात भरभराटीस आला आहे. 

"‘पारखे उद्योगसमूह’ हे माईसाहेबांनी लावलेल्या बीजाचेच उद्यानस्वरूप आहे. काळाची पावले लक्षात घेऊन माईसाहेबांनी आपल्या पुढच्या पिढीला उद्योगनिष्ठेचा नवा वसा दिला हे खरे; पण जुन्यातले चिरंतनत्वही नव्यांच्या हाती देण्यास त्या विसरल्या नाहीत. स्वत: माईसाहेब अत्यंत धार्मिक वृत्तीच्या. महाराष्ट्रीय समाजातील स्त्रियांनी करावयाची क्रतवैकल्ये त्यांनी आयुष्यभर निष्ठेने अनुसरली, जपली. चारी धामांच्या यात्रा नातवंडांना बरोबर घेऊन केल्या. त्याही पिढीवर त्यांना संस्कार करायचे होते. 

"गोमाता हे त्यांचे उपास्य दैवत. गोधनावर त्यांचा विश्वास आणि म्हणूनच प्रत्येक कारखान्याच्या ठिकाणी गोशाला निर्माण करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. खोपोली, अक्कलकोट, सोनगड येथील पुष्ट ‘गोकूळ’ पाहून त्या तृप्त होत."
................................................................................................

"पतीनिधनानंतर साठवलेले पाणी टिकणार किती हे माहीत असल्याने त्यांनी आपली झाकली मूठ झाकलीच ठेवली. कोणाच्या हाताखाली हात उघडला नाही. प्रसंगी आपलीच मूठ दुसर्‍याच्या हातावर धरली. आपल्या या वागणुकीने जणू त्यांनी मुलांना शिकवण दिली. व्यापारउदीम पतीवर चालत असतो. पत नेहमी झाकल्या मुठीसारखी सांभाळायची असते. पारखे उद्योगाचा विस्तार या शिकवणीतून झाला आहे."
................................................................................................

"अकालवैधव्याने त्यांना ग्रासलेच. धाकट्या कर्तृत्ववान मुलाचा अकाली मृत्यू त्यांना सोसावा लागला. असे अन्य आघातही झाले. घराण्याचा लौकिक व संपदा चहूबाजूंनी वाढत असतानाच एकाएकी वज्राघातही त्यांना सहन करावा लागला. 1973 सालच्या मे महिन्यात नातू सुधाकर, मुलीचा मुलगा दादासाहेब आणि नातजावई नागेशराव हे तिघेही तरुण एकाएकी भीषण अपघातात परलोकी गेले."

"7 डिसेंबर 1975ची मध्यरात्र उलटून गेली. भगवान परशुरामांच्या पादुका दहा दिवसांची कुरुक्षेत्राची यात्रा संपवून घरी आल्या होत्या. त्यांनी स्पर्श करून दर्शन घेतले. पुढे अक्कलकोटपर्यंत त्या पादुका गेल्या. यात्रेची सांगता झाल्याची वार्ता त्यांना रात्री 10॥ वाजता कळाली. त्यानंतर दोन तासांत तो मुक्तीचा क्षण आला. जणू यात्रासमाप्तीची वाटच त्या पाहात होत्या. म्हणूनच सर्व मायेचे पाश निरनिराळ्या मिषाने त्यांनी दूर ठेवले. आता काही करणे नाही व काही मागणे नाही अशा अवस्थेत अगदी शांतपणे झोपल्या. माईसाहेबांनी इहलोकाची यात्रा संपवली. विझत्या समईचा आवाज जितका होत असेल, नसेल... जणू अनंतात विलीन होण्यासाठीच. 

"त्यासाठी त्यांनी तिथी निवडली ती पंचमी, दिनांक 7 आणि उजाडता वार सोमवार. याच तिथीला, याच वाराला, याच तारखेला माईसाहेबांची आवडती नातवंडे अपघाती झाली होती. 

"या योगामधील हेतूही त्या रामालाच ठाऊक."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 02, 2022  - February 02, 2022.  
................................................
................................................

................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
""
मराठी चित्रपटसृष्टीतील स्वयंभू पुराणपुरुष
................................................................................................
................................................................................................

"मी स्वत: भालजींच्या हाताखाली काम केले होते. अभिनयाचे पाठ त्यांच्याकडून घेतले होेते. चित्रपटासाठी पद्यरचना करण्याची संधी त्यांनीच मला पहिल्यांदा दिली होती. ‘बहिर्जी’ नावाच्या त्यांच्या एका चित्रपटात मी तीन भूमिका केलेल्या होत्या. तळहातावरची चरबी वाघाला चाखवणारा बादशहा, भुताला भिणारा पहारेकरी आणि नेमक्या जागी गीतयोजना करणारा पद्यकार. बाळ चितळे आणि भालजी यांचाही चांगला स्नेह होता. चितळे यांनी त्यांच्याकडे कधी नोकरीचाकरी केलेली नव्हती, तरी त्यांचे स्नेहसंबंध जवळचे आणि जिव्हाळ्याचे होते. नाही म्हणायला आमच्यापैकी मुकुंदराव किर्लोस्करांनी मात्र भालजींशी कधी बातचीत केली नव्हती. त्यांना जवळून पाहिले नव्हते."

"वयाच्या 75व्या वर्षी एवढे निखळ सत्य बोलणारा हा माणूस चित्रपटधंद्यात कसा काय वावरला? अंधारात निर्माण होणारी आणि अंधारातच प्रदर्शित केली जाणारी चित्रपट नावाची वस्तू निर्माण करता करता या माणसाला प्रकाशाचे वेड लागले कसे? पन्नाससाठ वर्षे या व्यवसायात असणार्‍या या माणसाने गल्ल्याच्या अभिलाषेने हलक्या निर्मितीचा हव्यास कसा काय केला नाही? चित्रपटकथालेखनाचे तंत्र, दिग्दर्शनाचे कौशल्य, छायाचित्रण, संपादनसंकलनाचे ज्ञान कुठून मिळवले? साहित्याच्या इतर शाखांकडे ते का वळले नाहीत? इत्यादी प्रश्न आमच्या तिघांच्याही मस्तकात घोळत होते. मी स्वत: अर्धे आयुष्य चित्रपटात घालवले असल्यामुळे मला भालजींविषयी बरेच काही माहीत होते; पण जे माहीत नाही त्याचाही शोध घ्यावा, आजचा चित्रपट, आजची नाटके, आजचे साहित्य, आजचा समाज; किंबहुना आजचे जग याविषयी कालचा काल डोळसपणे उपभोगलेल्या या वृद्ध युवकाची मते काय आहेत, याचाही जमल्यास अंदाज घ्यावा या हेतूनेच आम्ही त्यांच्या भेटीला आलो होतो."

"‘‘या!’’ भालजी म्हणाले आणि त्यांच्या पाठोपाठ आम्ही तिघेही त्यांच्या कार्यालयात गेलो. कार्यालयही सगळे साधेसुधेच होते. तिथली खुर्ची, टेबले, कोच सगळ्यांचेच आकार वेगळे. नेहमी आपल्या पाहाण्यात येतात त्या अद्ययावत नमुन्यांहूनही वेगळे. रेषेच्या वक्रतेत सौंदर्य आहे याचा साक्षात्कार घडवणारे. भालजींच्या नित्याच्या खुर्चीच्या मागील भिंतीवर शिरोभागी एक सुंदर चित्र विविध रंगांंत रंगवलेले, गायित्री या पौराणिक देवतेचे. कोपर्‍यातील एका उंच स्टुलावर काटकोनात ठेवलेल्या दोन तसबिरी. एक अमरनाथच्या बर्फमय शिवलिंगाची, एक कोणा अज्ञात सत्पुरुषाची. या दोन्ही तसबिरींवर नुकतीच गुलाबाची फुले वाहिलेली. डाव्या हाताच्या भिंतीवर छत्रपतींची उठावाची रजतमूर्ती धारण केलेली एक गोलाकृती ढाल आणि भालजींच्या बैठकीच्या समोरच्या खिडकीशी एक अर्धगोलाकृती टीपॉय. त्यावर ब्राँझच्या सातआठ कलशधारिणी महाराष्ट्रसुंदरीच्या मूर्ती. भालजींच्या वेगवेगळ्या चित्रपटांना महाराष्ट्रशासनाकडून मिळालेली ती प्रतीकात्मक पारितोषिके. कोचावरच्या गाद्यांना भगव्या रंगाचे अभ्रे. कार्यालयात चंदनाचा सुगंध कोंदला आहे हे जाणवत होते. आम्ही सर्वजण स्थानापन्न झालो.

"‘‘छान झालं आलात. नुकताच हा स्टुडिओ माझ्याकडे आलाय. गेले आठपंधरा दिवस नुसती स्वच्छताच करून घेतोय. या वास्तूचा आणि माझा काय योगायोग आहे कुणास ठाऊक. ती मला सोडत नाही आणि मला ती सुटत नाही. असंच आयुष्यभर चाललंय.’’ भालजी म्हणाले."

"खासगी भाषणात भालजी अनेक अपशब्द अगदी सहजपणे वापरतात; पण व्याख्यानाला उभे राहिले की, भालजींची भाषा अत्यंत प्रौढ होते. ग्राम्य तर सोडाच; पण ग्रामीण शब्दांचाही वापर त्यांच्या तोंडून होत नाही. त्या किमयेचे मूळ त्यांच्या आणि सदानंद महाराजांच्या या सहवासातच असेल का? कोण जाणे! असे काही माझ्या मनात चालले आहे, एवढ्यात मुकुंदरावांनी भालजींना विचारले, 

"‘‘या सत्संगतीचा एवढा परिणाम आपल्यावर झाला आहे म्हणता, मग...?’’ 

"‘‘मी असा बेछूट वागणारा कसा झालो, हेच तुम्हाला विचारायचं आहे ना? तालमीच्या छंदामुळे अंगात एक रग होती. हात पराक्रमाला शिवशिवत होते. 1917 साली मी सैन्यात भरती झालो होतो. उच्छृंखल स्वभावाला पराक्रमाची ओढ उपजत होती. ‘303 मराठा फलटणी’तला एक सैनिक म्हणून वर्षभर मी नोकरी केली आणि पुढं क्रातिकारकांच्या जथ्यातही सामील झालो. त्या विषयातले माझे गुरू स्वातंत्र्यवीरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर. त्यांच्या प्रेरणेनं आपण आपला देह देशकार्यासाठी फेकून द्यायचा हे मी तरुण वयात निश्चित ठरवलं होतं. जो देह असा फेकूनच द्यायचाय, त्याचे लाड एकदा पुरवून टाका, अशी काहीशी वृत्ती तेव्हा निर्माण झाली होती. नायकिणीकसबिणींच्या माड्या ही माझी हमखास बैठकीची ठिकाणं. हिंदूमुसलमान हा धर्मभेदही माझ्या डोक्यात त्यावेळी येत नव्हता. त्या परित्यक्त मानलेल्या लोकांतून वावरण्यास काही सामाजिक हीनता आहे हे पण त्यावेळी मान्यच नव्हतं. वासनेच्या प्रवाहाबरोबर मी अनेकदा वाहवत गेलो; पण या अमर्यादपणालाही एक मर्यादा होती. मी कोणाही कुलीन स्त्रीला कलंकित केलेलं नाही. कुण्या भल्या स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं नाही. ज्यांच्या बाबतीत किंचितही शंका आली त्यांच्या पुढच्या आयुष्याची जबाबदारी पत्करली. त्यांच्याशी लग्नं केली.’’ 

"आजही भालजींचे तीन संसार आहेत. सौ. सरलाबाई, सौ. लीलाबाई आणि सौ. बकुळाबाई. देशात ‘द्विभार्याप्रतिबंधक’ कायदा नांदत असताना भालजींची ही तिन्ही कुटुंबे एकोप्याने राहत आहेत. चुली वेगळ्या असतील; पण त्यांचा संसार एकच आहे. विसाव्या शतकाच्या चौथाव्या दशकात मास्तर विनायकांच्या जोडीने हिंदी पडद्यावर चमकणारी प्रसिद्ध चित्रपटतारका लीला चंद्रगिरी ही भालजींची द्वितीय पत्नी. बकुळा नावाच्या एका चित्रपटतारकेशी त्यांनी विवाह केला आहे."

"भालजींच्या स्पष्टवत्तेपणामुळे आम्हाला सार्‍यांनाच अवघडल्यासारखे झाले होते. भालजी मात्र सारे मोकळ्या मनाने सांगून टाकण्याच्या मन:स्थितीत होते. ते म्हणाले, ‘‘सांगत काय होतो? - देह देशकार्याला वाहून टाकायचा असं मी ठरवलं होतं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या त्रयीतील राजगुरू हे माझे जिव्हाळ्याचे मित्र होते. त्यांच्या धाडसी कार्यक्रमात सहभागी होण्याची माझी जिद्द होती. त्यासाठी मी कलकत्त्याला अनेक खेपाही केल्या. देशाला स्वातंत्र्य मिळालं तरी माझ्यातल्या या बंडखोर वृत्तीचा उपशम झाला नाही. स्वातंत्र्यलाभानंतरही ती आग छातीत तशीच राहिली. जे आणि जसलं स्वातंत्र्य मिळालं ते माझ्या वृत्तीच्या माणसाचं समाधान करण्यास समर्थ नव्हतं. माझे विचार हिंदुत्ववादी होते, आहेत. गांधीहत्येच्या दुर्दैवी घटनेच्या सुमारास मी हिंदू सभेचा अध्यक्ष होतो आणि ‘अग्रणी’कार नथुराम गोडसे हा माझा चिटणीस होता. त्याच्या ‘अग्रणी’तून मी लेखनही केलं आहे. या वस्तुस्थितीची झळ मला केवढ्या प्रमाणात पोहोचली ती सर्वांना ठाऊक आहे. गांधीहत्येची वार्ता कोल्हापूर शहरात येताच जिकडेतिकडे जाळपोळ सुरू झाली. चिडलेल्या लोकांनी ह्याच स्टुडिओला आठही दिशांनी आग लावून टाकली. मी पन्हाळ्याला होतो. तुमचा विश्वास बसणार नाही; पण स्टुडिओ पेटला या वार्तेनं मला धक्का बसला नाही. माझं काळीज हललं नाही. उलट माझ्याबरोबर माझी पत्नी आली होती, तिला मी पन्हाळ्यावरून कोल्हापूर शहर दाखवलं आणि अंगुलीनिर्देश करून म्हटलं, ‘लीला, ही सर्वांत मोठी आग दिसते आहे ती आपल्या स्टुडिओची.’

"‘‘कोल्हापूरच्या पोलिसांनी मला ताबडतोब पन्हाळ्यावरून उचललं आणि एका कोठडीत डांबून ठेवलं. अधिकार्‍यांनी पुन:पुन्हा विचारलं, ‘नथुराम आणि आपली ओळख होती का?’ मी प्रत्येकवेळी उत्तर दिलं, ‘ओळख जरूर होती; पण तो असं काही करणार आहे असं त्यानं मला कधीच सांगितलं नव्हतं.’ तरीही पोलिसांनी मला डांबून ठेवलंच. त्या कोठडीतून प्रातर्विधीसाठीदेखील ते मला वेळेवर काढत नसत. ज्या कोठडीत मला डांबून ठेवलं होतं ती कोठडी फाशीची होती. ज्याला फाशीची शिक्षा झालेली असेल, त्याच कैद्याला तिथे डांबण्यात येई. मला फाशीच्या कोठडीत डांबून ठेवलं होतं. कसलीही सोय उपलब्ध करून देण्यात येेत नव्हती. असे चारपाच दिवस गेल्यावर मला निश्चितपणे वाटू लागलं की, मलाही बहुतेक फासावर चढवलं जाणार. नथुरामनं माझ्याविषयी काही सांगितलं असेल तर असं होणं अशक्य नव्हतं. माझ्या घरातल्या स्त्रियांनी, मुलाबाळांनी त्या दिवसांत पोटभर रडून घेतलं. ती सारीजणं त्या काळात इतकी रडली असतील, की आता मी खराच मेलो तर लोकनीतीप्रमाणं ढाळण्यासाठी त्यांच्याजवळ अश्रू उरले असतील की नाही, कुणास ठाऊक!’’"

" ... भालजी मुंबईला गेले. पार्श्वनाथ आळतेकर, बाबूराव पेंढारकर यांच्या सहकार्याने त्यांनी ‘वंदे मातरम्’ या नावाचा एक चित्रपट निर्माण केला. हा चित्रपट इतका जाज्वल्य होता की, तत्कालीन सेन्सॉरबोर्डाने तो सातदा पाहिला आणि सात वेळा त्याचा एकेक अवयव कापून काढला. मग उरले असेल काय, कुणास ठाऊक? विद्यार्थी हा या चित्रपटाचा कथनीय विषय होता आणि गुरुकुल शिक्षणपद्धतीची त्यात भलावण केली होती. ‘वंदे मातरम्’च्या या शोककथेनंतर भालजी पुन्हा कोल्हापुरास आले आणि त्यांनी ‘राणी रूपमती’ हा चित्रपट काढला. या मूकपटानंतर भालजी बोलक्या जमान्याला सामोरे झाले आणि पुण्याला येऊन त्यांनी ‘श्यामसुंदर’ हा चित्रपट ‘सरस्वती सिनेटोन’साठी लिहिला व दिग्दर्शित केला. या चित्रपटाला असाधारण यश प्राप्त झाले. शांता आपटे ही नवी नायिका आणि शाहू मोडक हा नवा नट या चित्रपटाने लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर पोहोचले.

"नंतर ‘सूर्य’, ‘शारदा’, ‘फेमस’, ‘अरुण’, ‘कोल्हापूर सिनेटोन’ इत्यादी अनेक संस्थांच्या उभारणीत भालजींनी प्रमुख भाग घेतला. अनेक उत्तमोत्तम चित्रपट निर्माण केले. ते त्यांचे कार्य आजतागायत अखंडपणे चालू आहे. ‘श्यामसुंदर’, ‘गोरखनाथ’, ‘सूनबाई’, ‘शिवा रामोशी’, ‘थोरातांची कमळा’, ‘नेताजी पालकर’, ‘मीठभाकर’, ‘पावनखिंड’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘साधी माणसे’ इत्यादी त्यांच्या चित्रपटांनी मराठी प्रेक्षकांना मोहून टाकले. शिवचरित्र आणि शिवकाल या विषयावर चित्रे काढावीत भालजींनीच! अन्य कोणीही निर्माता अगर दिग्दर्शक तशी चित्रे काढायला धजला नाही. ‘प्रभात’च्या ‘सिंहगडा’सारखा एखादाच अपवाद.

"भालजींनी अनेक संस्था उभारल्या. ऊर्जितावस्थेला आणल्या. इतरांना हेकटपणाच वाटावा असल्या स्वाभिमानी स्वभावामुळे अनेकदा असणार्‍या व होणार्‍या मिळकतीवर तुळशीपत्र ठेवून एखाद्या जोग्यासारखे ते बाजूला झाले. पैसाही त्यांनी पुष्कळ कमावला. कोल्हापूरचा सर्व स्टुडिओ लोकक्षोभाच्या भक्ष्यस्थानी पडला. त्या सुमारास आपण बावीस लाख रुपयांचे धनी होतो हेसुद्धा बोलण्याच्या ओघात भालजींनी सांगितले. ग्रामीण भाषेला, कोल्हापुरी बोलीला चित्रपटाच्या माध्यमातून चिरंजीव केले ते भालजींनीच. त्यांचे खटकेबाज संवाद ऐकणे ही एकेकाळी अवघ्या मराठी प्रेक्षकांची ‘क्रेझ’ होती.

"आपल्या लेखनकलेला कुठल्याही विशिष्ट अभ्यासाची पार्श्वभूमी नाही असे भालजींनी सांगितले; पण त्यांच्या शैलीवर गडकर्‍यांची छाप असल्याचे माझ्यासारख्या अभ्यासकाला जाणवल्यावाचून राहत नाही. आयुष्याच्या वाटचालीत श्री. भालजी पेंढारकरांना चित्रपटगृहाचा व्यवस्थापक, प्रसिद्धिकार म्हणूनही कामे करावी लागली. या कामाच्या निमित्ताने त्यांनी अनेक विदेशी चित्रपट पाहिले आणि चित्रपटातील प्रसंगरचनापद्धतीचे तंत्र कळतनकळत आत्मसात केले."

" ... त्यांचे वाचन अखंड चालत असले पाहिजे. संभाषणाच्या ओघात त्यांनी अनेक संस्कृत श्लोक आणि इंग्रजी अवतरणे सहजपणे वापरली. तरुणवयात नायकिणीकसबिणींच्या घरांचे उंबरे झिजवताझिजवता गाण्याची समजही त्यांच्या पदरात पडली. इतकेच नव्हे, तर आपल्या अफाट पद्धतीच्या आयुष्यात त्यांनी अल्लादिया खाँसारख्या गायनशास्त्रातील वल्लीकडून गायनाचे प्रत्यक्ष धडेही घेतले."

"‘‘तुम्हाला लोक शिवभक्त म्हणून म्हणतात. शिवाजीबद्दलची एवढी असीम निष्ठा तुमच्या स्वभावात का आली?’’ 

"‘‘मी महाराष्ट्रात जन्मलो म्हणून!’’ भालजींनी ताडकन उत्तर दिले. 

"‘‘शिवाजीला आपण अगदी परमेश्वर मानता?’’ ‘‘परमेश्वराला मी केवळ भोळेपणानं मानत नाही हे मघा मी सांगितलंच. शिवाजी या व्यक्तिमत्त्वावरील माझी श्रद्धाही डोळस आहे. पूर्णत्वाच्या जवळजवळ गेलेला एक माणूस म्हणून मी शिवाजीला मानतो आणि माझ्या श्रद्धेचं प्रतीक म्हणून त्यांच्या मूर्तीवर फुलं वाहतानाही मला लाज वाटत नाही. महाराष्ट्रातल्या, भारतातल्या प्रत्येक माणसानं शिवाजीचे गुण आत्मसात करावेत, निदान त्या दिशेनं प्रयत्न करीत राहावं असं मला प्रामाणिकपणं वाटतं. शिवाजी हे तरुणांचं श्रद्धास्थान सदैव समाजापुढं ठेवण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न केला आहे. माझ्या सर्व शक्ती मी त्या कामी पणाला लावल्या आहेत. ‘रिअल शिवाजी’ या पुस्तकातील शिवाजीबद्दलच्या बेजबाबदार विधानांना मूठमाती देऊन, शिवरायांची प्रतिमा आहे तशी उजळ राखण्यासाठी आटापिटा केला. ‘रिअल शिवाजी’च्या लेखकाविरुद्ध खटला लढवला. हजारो रुपये खर्च केले. स्वत:चे अठ्ठावीस हजार रुपये घातले. स्वत:ची अयाचित वृत्ती सोडून शिवप्रेमी जनतेसमोर झोळी पसरली. कोल्हापुरात स्वखर्चानं शिवरायांचा पुतळा उभा केला आणि एक फार मोठं काम मी शिवसेवा म्हणून केलं होतं...’’ भालजी थोडेसे थांबले. 

"‘‘कोणतं ते कार्य?’’ कुणीतरी विचारले. 

"‘‘छाननीपूर्व पुरावा देऊन मी शिवरायांचं एक सत्यप्रतिपादक विस्तृत असं चरित्र लिहिलं होतं. 1200 पृष्ठांचा मुद्रित ग्रंथ होईल एवढा तो मजकूर होता. पण ’’ 

"‘‘पण काय झालं?’’ 

"‘‘स्टुडिओ जाळला गेला, त्यात त्या हस्तलिखिताचीही राख झाली.’’ भालजी गप्प झाले. आम्हीही काही काळ गप्प झालो. भालजीच पुन्हा म्हणाले, ‘‘जळून गेलेला स्टुडिओ पुन्हा कार्यक्षम झाला. ईश्वराच्या मनात असेल तर तो ग्रंथही पुन्हा लिहून होईल.’’"

"परतीच्या प्रवासातही आम्ही भालजींविषयी बोलत होतो. खूप बोलत होतो. मी त्यांच्या आठवणी सांगत होतो. बाळ चितळे सांगत होते. भालजींच्या दातृत्वाच्या गोष्टी, भालजींच्या बेछूटपणाच्या गोष्टी, भालजींच्या चातुर्याच्या गोष्टी, त्यांच्या अमोघ वक्तृत्वाच्या गोष्टी."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 02, 2022  - February 02, 2022.  
................................................
................................................

................................................................................................

................................................................................................
................................................................................................
""हॅलो, मिस्टर डेथ!
................................................................................................
................................................................................................

"जरामरण यातून सुटला 
"कोण प्राणिजात? 
"दिसे, भासतें, तें सारें 
"विश्व नाशवन्त, 
"काय शोक करिसी वेड्या, 
"स्वप्नींच्या फळांचा? 
"पराधीन आहे जगती 
"पुत्र मानवाचा।"

"वृद्ध मातोश्रींच्या पायांचे स्पर्शपूर्वक दर्शन घेताना मला असे जाणवले नाही की, हे पाय मला पुन्हा दिसणार नाहीत. 

"‘‘मुंबईला जाऊन येतो आई.’’ 

"‘‘या. औक्षवंत व्हा!’’ 

"एवढाच मायलेकरांचा संवाद झाला. 

"आम्ही मुंबईला निघालो."

"18 ऑगस्ट 1975 या दिवशी के.ई.एम. इस्पितळात डॉ. एस. आर. कामत यांच्या विभागात एक रुग्णाईत म्हणून दाखल झालो. 

"कामताला मी म्हटले, ‘‘मी इस्पितळात आलो आहे हे पेपरात कुठे देऊ नकोस. माझ्यावर प्रेम करणारी फार माणसं आहेत. ती चिंतेत पडतील.’’"

"ब्राँकोस्कोपीनंतर मध्ये एखादाच दिवस गेला असेलनसेल. शस्त्रक्रियेचा दिवस ठरला. 

"22 ऑगस्ट, 1975."

"माझ्या वडिलांचा मृत्यू आणि माझ्या तरुण जामातांचे अंत्यदर्शन यांची दृश्ये आलटूनपालटून माझ्या डोळ्यांसमोर उमटू लागली... 

"ज्येष्ठ जामात श्री. सुधाकर पारखे यांचा अपमृत्यू खरोखरीच भयंकर होता. त्यांना दक्षिणेत विजयवाड्याजवळ कुठेतरी रस्त्यावर मृत्यू आला होता. अनोळखी मुलूख. अनोळखी माणसे. अनोळखी भाषा. मृत्यू नेमका केव्हा घडला, हेही कुणाला कळले नाही. आजतागायत कळले नाही. घरात मायेच्या माणसांना तोटा नव्हता. संपत्तीची कसली कमतरता नव्हती. डझनांनी गाड्या होत्या. विमानाने परदेश प्रवास ही तर त्यांच्या विषयातील नित्याची गोष्ट होती. ते स्वत: गाडी उत्तम चालवीत. वृत्तीने उमदे. स्वभावाने उदार. आणि शरीरप्रकृतीच्या बाबतीत बोलायचे, तर ही वॉज अ पिक्चर ऑफ हेल्थ! असा तरणाबांड मनुष्य एकाएकी गेला. अपघातात गेल्यामुळे त्यांचे शवविच्छेदन करावे लागले. 

"तिघांना एकदम मृत्यू आला. तिन्ही कलेवरे आच्छादित अवस्थेत वायुमार्गाने पुण्यास घरी आणण्यात आली. आप्तांपैकी कुणालाही या तिघांतील कोणते प्रेत कोणाचे, हेही कळले नाही. कुणाचे मुखदर्शन घेता आले नाही. मला कुणीतरी रडत रडतच सांगितले, 

"‘‘पायाचा अंगठा उघडा आहे ते सुधाकर.’’

"दुसरा आठवला मला माझ्या वडिलांचा मृत्यू. पासष्टीच्या वर गेलेले वय. गांधीहत्येच्या दंगलीत लोकक्षोभाला बळी पडलेले घर. मुलांनी परत उभे केलेले. आजारात योग्य शुश्रूषा झालेली. अखेरच्या वेळी सर्व आप्त — नव्हे, सारा गाव निवासाभोवती गोळा झालेला. 

:तिन्हीसांजेच्या वेळेला ते गेले. त्यांची मान माझ्या मांडीवर होती. ‘पुराण पुरुषोत्तमयोग’ नावाचा गीतेतील अध्याय मी नुकताच त्यांच्या उशाशी बसून मोठ्याने म्हटला होता. माझ्याकडे पाहून ते एकच वाक्य म्हणाले, 

"‘‘तुम्हाला काय सांगायचं? तुम्ही सर्व करीतच आहात.’’ 

"मी मुखात गंगा घालण्यापूर्वी, सांध्यवेळेचे भान आल्यामुळे की काय, त्यांनी एकच वाक्य उच्चारले, 

"‘‘अरे, दिवा लावा रे कुणीतरी!’’ 

"आणि ते गेले. 

"दोन मरणांत केवढा फरक!"

"माझी पत्नी तेवढी पुढे आली आणि तिने कसलासा अंगारा माझ्या कपाळाला लावला. 

"मी देवभोळा नाही; पण आस्तिक अवश्य आहे. माझ्या पत्नीच्या अंगात काही दैवी शक्ती आहे, याचा साक्षात्कार माझ्यापुरता मला अनेकदा घडला आहे. तिने कुणाचा अंगारा माझ्या कपाळी लावला, कुणास ठाऊक! कुण्या देवतेचा, कुण्या साधूचा - मला कशाचीच काही कल्पना नाही. तिच्या स्वत:च्या अंगुलीचा स्पर्श मला संरक्षक वाटला. हे मी हळवेपणाने लिहितो आहे असे नाही. व्यक्तिगत माझ्यापुरते ते सत्य आहे. त्रिवार सत्य!"

"शस्त्रक्रिया संपवून मला ऑपरेशनथिएटरच्या नजीकच्या असलेल्या अतिविशेष शुश्रूषाकक्षात नेण्यात आले. शस्त्रक्रिया झाली म्हणजे काय झाले हे मला कळलेले नव्हते. माझ्यातला मी कधीच बाजूला झाला होता. त्या बाजूला झालेल्या मलाही माझ्या कुडीचे काय केले गेले याची जाणीव नव्हती. म्हणजे पार्थिव, मी आणि अपार्थिव मी दोघेही काय घडले याविषयी अज्ञानी होतो. 

"बाहेरच्या मंडळींना तर आत काय झाले आहे हे कळण्याचा मुळीच संभव नव्हता. 

"प्रत्यक्ष शस्त्रक्रियेत किती वेळ गेला होता त्याची मला काहीच जाण नव्हती. मला अतिविशेष शुश्रूषाकक्षात ठेवले आहे हेही मला कळण्याचे काही कारण नव्हते. 

"मी भानावर आलो तेव्हा मात्र माझ्या सर्व शक्ती पुन्हा परत आल्यासारख्या झाल्या. माझ्या समोर उभ्या राहिलेल्या मुलीला मी बरोबर ओळखले. ती सुधा होती. माझे मित्र गोविंदराव घाणेकर यांची कन्या. मला काय वाटले, कोणास ठाऊक. मी होऊन माझा हात पुढे केला आणि तिचा हात हाती घेत म्हणालो, 

"‘‘नानाकाकांना सांग, ऑपरेशन सक्सेसफुल झालं!’’"

"माझ्या आजाराच्या आधीच माझा सर्वांत धाकटा भाऊ डॉ. अंबादास याच्यावर असे एक खोटे बालंट रचले गेले होते. 

"डॉ. अंबादास कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी नावाच्या गावी ‘मौनी विद्यापीठ’ नामक जी प्रसिद्ध शिक्षणसंस्था आहे, तिचा डायरेक्टर होता. तिथल्या कॉलेजचा प्रिन्सिपॉल होता. राजकारणी लोकांच्या चिथावणीमुळे त्याच्या विद्यापीठाच्या परिसरात विद्यार्थीविद्यार्थ्यांत भयंकर दंगल झाली होती आणि त्या दंगलीत एका विद्यार्थ्याने दुसर्‍या एका विद्यार्थ्याचा खून केला होता. तो खून त्याने प्रिन्सिपॉलच्या चिथावणीवरून केला, असा आरोप प्रतिपक्षाने केला होता. ते सारेच प्रकरण न्यायालयापुढे येण्याचा संभव होता. न्यायदेवता आंधळी असते. कदाचित माझा निष्पाप भाऊ अकारण अपराधी ठरण्याचा संभव होता. 

"असल्या भयंकर आजाराने पछाडल्यामुळे मी त्याच्यासाठी काहीच करू शकत नव्हतो. ते शल्य माझ्या मस्तकात होते."

"भावे आले आणि मला एक आठवण झाली की, पु.ल. देशपांड्यांनी भाव्यांविषयी म्हटले होते, 

"‘‘चालणारे भावे दोन. एक विनोबा आणि दुसरे पुभा.’’ 

"भाव्यांच्याबरोबर मी मैलोगणती चाललो होतो. 

:डॉक्टर चालाच म्हणत होते तर निदान भाव्यांबरोबर चालावे, असा एक विचार माझ्या मनात आला; पण भाव्यांचे डोळे आज नेहमीसारखे चावट दिसत नव्हते. त्यांच्या डोळ्यांत एक केविलवाणा भाव होता. 

"मी हलकेच उठत म्हणालो, 

"‘‘चला भावे. फिरून येऊ या.’’ त्यांना ‘चला’ म्हणताना आणि उठून दोन पायांवर उभे राहण्याची खटपट करताना पार्श्वभागी कुठेतरी भाव्यांच्याच ओळी कुणीतरी म्हणत असल्याचे मला ऐकू येेत होते, 

"‘मृत्यू न म्हणे हा नेहरू, 
"मृत्यू न म्हणे हा डेंगरू, 
"मृत्यू न म्हणे हा कांगारू, 
"ऑस्ट्रेलिया देशचा॥’ 

"मला चांगले स्मरत होते की, भाव्यांनी या चावट ओळी पं. नेहरूंच्या मृत्यूनंतर आम्हाला म्हणून दाखवल्या होत्या. 

"त्या ओळींमधल्या अस्थानी चहाटळपणामुळे माझ्या चेहर्‍यावर हसू उमटले असावे. तेवढ्यात भावे म्हणाले, 

:‘‘चला फिरायला? चला!’’ 

"मग मी, भावे आणि डॉ. कामत जनरल वॉर्डच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत हळूहळू चालत गेलो."

"‘दैवजात दु:खे भरता, दोष ना कुणाचा 
"पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ॥’"

"अशातच मुंबईत गणेशोत्सव सुरू झाला. शेजारच्या घरांतून आरत्या, टाळ, देवे, मंत्रोच्चार ऐकू येऊ लागले. 

"अशाच एका रात्री अर्धउघडी झोप लागली असताना मला वाटले, मी आणि माझी पत्नी कुठल्यातरी भल्यामोठ्या देवळाच्या ओवरीत झोपलो आहोत. आम्ही यात्रेला आलो आहोत. झोप डोळ्यांवर आली आहे. देवळात सर्वत्र नामसंकीर्तन सुरू आहे. झोपेच्या आहारी जाऊन आम्ही दोघेच एका बाजूला आलो आहोत. पडल्या पडल्या ऐकत आहोत. 

"देवालय श्रीगणेशाचे होते; पण त्याची रचना अद्भुत होती. त्याचा प्रकार पंढरीच्या पांडुरंगाच्या देवळासारखा होता. तेच नक्षीदार खांब होते. तोच भलामोठा मंडप होता. तोच गरुडखांब होता. तीच रंगशिळा होती. गाभार्‍यात मात्र एकट्या पांडुरंगाच्या जागी एकटा विघ्नहर्ता गणेश होता. त्याचे ध्यान वाईच्या ढोल्या गणपतीसारखे होते. आम्ही झोपलो होतो ती ओवरी मात्र वेरूळच्या कैलासलेण्यातील ओवरीसारखी प्रशस्त होती. ते काय गौडबंगाल होते ते मात्र मला सकाळपर्यंत कळले नाही. 

"त्या दिवशी सकाळी जाग आल्यावर मला वाटले, विघ्नहर्त्याचे दर्शन झाले. आता संकट संपले."

"ऐन दुपारी मी ‘पंचवटी’त येऊन पोहोचलो. 

"गेला सव्वा महिना मी या वास्तूपासून दूर होतो. तिथल्या झाडाझाडांनी, वेलीवेलींनी माझे स्वागत केले. 

"बंगल्याच्या प्रवेशद्वारावर अंगणातल्या अशोक आणि आम्रवृक्षांची तोरणे लावलेली होती आणि मला ओवाळण्यासाठी हाती पंचारती घेऊन एक्याऐंशी वयाच्या माझ्या मातु:श्री प्रवेशिकेत उभ्या होत्या. 

"मला एकदम आठवले, मी मुंबईला गेलो त्याच्या आदल्या दिवशी श्रावणातला शुक्रवार होता आणि आईने मला असेच पंचारतीने ओवाळले होते. 

"शरद ऋतूतील संध्याकाळ. गुलाबी गुदगुल्या करणारी थंडी अंगावर घेत मी ‘पंचवटी’समोरच्या प्रांगणात बसलो होतो. नुकताच थोडासा फिरून आलो होतो. 

"किंचितसा थकवा जाणवत होता. गेल्या आजारपणात माझ्या मुलाने आणलेल्या त्या आरामखुर्चीवर मी पाय लांबवले आणि सभोवार पाहू लागलो... 

"परिसरभर असलेल्या रातराण्या हळूहळू फुलू लागल्या होत्या. त्यांचा दरवळ हवेत मिळसत होता. ‘पंचवटी’च्या सीमा सांगणारे उंच वड आभाळाला भिडले होते. रामफळी, पेरवी यांचा बहार आता गेला होता. आवळीवर मात्र छोटी छोटी फळे आकार धरू लागली होती. 

"मला एकाएकी आठवण झाली. गेल्या वर्षी हेच आवळीचे झाड वठून गेले होते. ते तोडून टाकावे असे माझ्या मनात आले होते; पण माळ्याने ते तोडले नव्हते. त्या झाडाला भिरूड नावाचा एक किडा लागला होता. त्याने तो शोधून मारून टाकला होता. झाड आता निरोगी झाले होते. पुन्हा तरारले होते. दहावीस माणसांनी तळाशी बसून आवळीभोजन करावे, इतक्ा त्याचा विस्तार आता वाढला होता. लहानलहान फळे त्याच्या अंगाखांद्यावर डवरली होती. मी आणि तो आवळीचा वृक्ष या दोघांत काही विलक्षण साम्य असल्याचे मला जाणवले, आणि एका कवितेचा जन्म झाला  ... "

"अलीकडे भारताचे नवे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांना असलाच काही रोग झाल्याची वार्ता होती. त्यांच्यावरही अशीच काही शस्त्रक्रिया करण्यात आली; पण ती अमेरिकेत."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
February 02, 2022  - February 02, 2022.  
................................................
................................................

................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................
January 28, 2022 - February , 2022. 

Purchased January 28, 2022. 

Marathi Edition  
by G. D. Madgulkar (Author) 
Format: Kindle Edition
Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd 
(12 May 2020) 
Language ‏ : ‎ Marathi

ASIN ‏ : ‎ B088KMH9MX 
................................................
................................................
श्रीधर माडगूळकर, 
‘पंचवटी’ 
११ मुंबई – पुणे रस्ता, 
पुणे – ४११००३

Til Ani Tandul 
(Marathi Edition) 
Kindle Edition

................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4511535344
................................................................................................
................................................................................................