................................................................................................
................................................................................................
GANDHALI
गंधाली
रणजित देसाई
by RANJEET DESAI.
................................................................................................
................................................................................................
This collection seems an attempt by author to write about well known tragic legends of love in medieval onwards India, including one of Noorjehaan and another, while seemingly - from title - of Mastaanie, but actually set in much later times.
Tale of Mastaanie does come in this collection, but only later - the arrangement of contents usnt chronological - and more to the point, here Mastaanie is introduced as someone brought by younger brother of Bajirao for refuge with the elder brother, who's impressed with her art and beauty but nevertheless is in no hurry to give himself or his heart.
This is in direct contradiction of the recent depictions based on another, relatively recent novel on the topic, which showed her a daughter of Chhatrasaal by a muslim wife, and one who considered herself a wife of Bajirao due to a tradition he was unaware of, leaving her his knife and thus making her wife as per tradition of her home region.
Last one brings home grief of aftermath of passing on of the originator of Maratha Emptre, Emporer Shivaaji.
................................................................................................
................................................................................................
अनुक्रम
................................................................................................
................................................................................................
विराणी
असा रंगला विडा
अशी छेडली तार
अशी रंगली प्रीत
नक्षत्रकथा

REVIEWS

"“बेटा! असला हट्ट धरु नकोस. तुझ्यावर माझी मोहोबत आहे. पण त्याहीपेक्षा तख्ताला मी अधिक बांधला गेलोय. ते प्रेम एवढं जबरदस्त आहे की, प्रसंग आलाच तर तख्ताची इज्जत राखण्यासाठी तुझ्यासारख्या आवडत्या मुलाचाही त्याग करायला मी क्षणभरही मागंपुढं पाहणार नाही. तो प्रसंग तू माझ्यावर आणू नकोस. माझं मन शांत होईपर्यंत माझ्यासमोर येऊ नकोस!”"
................................................................................................
"“शेर अफगाण, बादशहांचा आपणांस खास निरोप आहे.”
"“सांगा ना! खाविंदांची आज्ञा शिसावंद्य आहे.” शेर अफगाण म्हणाला.
"“सांगेन! पण त्या आधी आपल्या सेवकांना आज्ञा द्यावी.”
"शेर अफगाणने सेवकांना आज्ञा दिली. महालात दोघेच उरले. कुतुबुद्दिन विचारात गढला होता. स्वत:ला सावरीत तो म्हणाला,
"“शेर अफगाण! तुम्ही हे शांतपणे ऐकावं अशी माझी विनंती आहे. जहांपनाह जहांगीर बादशहांची अशी इच्छा आहे की, तुम्ही आपल्या बेगम मेहरुन्निसा यांच्याशी तलाक घ्यावा. खाविंदांची इच्छा आहे की, बेगमना मलिका - ए - आलम बनवावं. आपण ही गोष्ट मान्य केलीत तर, बंगालची सुभेदारी मिळवून देण्याची जबाबदारी...”
"“खामोष!” संतापाने उठत शेर अफगाण म्हणाला. सर्रकन् त्याची तलवार म्यानाबाहेर आली. कुतुबद्दिनही ताडकन् उठला.
"“शेर अफगाण, तलवार म्यान करा. मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं. संतापाच्या आहारी जाऊन आज्ञेचा उपमर्द होईल तर, तुमच्यासकट बरद्वान बेचिराख केलं जाईल.”
"संताप आवरीत शेर अफगाण म्हणाला, “तुम्ही आता जा. ह्या आज्ञेचं उत्तर मी उद्या देईन.”"
................................................................................................
"नूरजहान जशी राजकारणात हिरिरीने भाग घेऊ लागली, तसे नकळत जहांगीरने राजकारणातून लक्ष काढून घेतले. नूरजहानची सत्ता सर्वांना माहीत झाली. तिच्या हुकुमाला सरदार तत्पर असत. न्यायदानापासून ते मोहिमांच्या बंदोबस्तापर्यंत, सारे नूरजहान पाही. जहांगीर मदिरा आणि नशा यांमध्ये मग्न होता. एके दिवशी नूरजहानने हट्टाने जहांगीरला किल्ल्याबाहेर काढले. किल्ल्याच्या दक्षिणेला एक टुमदार इमारत बांधली होती. ती इमारत जहांगीर प्रथमच पाहात होता. तो नूरजहानसह त्या इमारतीत गेला तेव्हा, तेथे सुवास दरवळत होता.
"“काय आहे?” जहांगीरने आश्र्चर्याने विचारले.
"“अत्तरखाना!” नूरजहान म्हणाली, “आपल्या देशात अत्तर बनविण्यासाठी मी दूरदूरचे जाणकार आणले आहेत. गुलाबाचं अत्तर इथं तयार होतं.”
"पुढे केलेल्या अत्तराचा सुवास बादशहाने घेतला आणि तो म्हणाला. “उगीच तुझ्या हाती राज्य दिलं नाही नूर! फुलापासून अत्तर बनविणारे तुम्ही कुठं अन् नाना सुंदर फळांपासून मदिरा बनविणारे आम्ही कुठं! रसिकता केवढ्या भिन्न मार्गांनी प्रगट होऊ शकते, नाही?”"
................................................................................................
"नूरजहानला ते ऐकणे अशक्य झाले. तिला अश्रू आवरेनात. शेर अफगाण... ज्याने हक्काने तिला मिळवलं... ज्याने तिच्या मनाचे फाजील लाड कधीही पुरविले नाहीत... ज्याचा हक्क अखेरपर्यंत तिला जाणवत राहिला होता, त्याला नूरजहान सर्वस्व देऊन मोकळी झाली होती... आनंदाने त्याची गुलाम बनली होती, आणि हा सलीम! तिच्यावर प्रेम करण्यापलीकडे उभ्या आयुषयात त्याने काही केले नव्हते. एवढासाही मोह न धरता तिच्या पायाशी ताज आणि तख्त त्याने अगदी सहजपणे ठेवले होते. त्या निषठावंत प्रेमाच्या बदली, ती मात्र काही देऊ शकली नव्हती. राज्याचा न्यायनिवाडा करण्यात निष्णात असा जिचा लौकिक तीच नूरजहान, ज्याने तिच्या हाती विश्वासाने न्याय दिला त्या जहांगीरला न्याय देऊ शकली नव्हती... तिचा पराजय मोठा होता."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
1965, April 08, 2022 - April 12, 2022.

"राजनर्तकी माहेलका रावरंभांच्या पदरी राहिल्याची वार्ता भागानगरात पसरायला वेळ लागला नाही. माहेलकाच्या सहवासात रावरंभा रमले. माहेलका रावरंभांच्या पदरी होती तरी, निजाम अलीखानच्या दरबारातील तिची चाकरी चालूच होती. अनेक वेळा राजवाड्यात तिच्या नृत्यगायनाच्या मैफली होत.
"त्या वेळी पुण्यात सवाई माधवराव पेशवे होते. निजामशाही आणि पेशवाई यांच्यातला वैमनस्याचा अंगार दोघांच्याही मनात धुमसत होता. दोघांचे वैर केव्हा पेटेल याचा भरवसा नव्हता. आणि याच वेळी पुण्यात सवाई माधवरावांचा विवाह निश्चित करण्यात आला. पुण्यामध्ये मोठी तयारी सुरु झाली. लगनाची आमंत्राणे साऱ्या राजांना, सरदारांना, मानकाऱ्यांना पाठविली गेली. पेशव्यांच्या लगनाचे निमंत्राण मोठ्या थाटात भागानगरच्या दरबारी सरंजामासह आले. उद्याच्या शत्रूच्या घरचे आमंत्राण पाहून साऱ्यांना आश्चर्य वाटले. खास मसलत भरली. विचारविनिमय सुरु झाला. बैठकीत निजाम, वजीर, सरदार अश्रफुल उमरा, राजे रावरंभा निंबाळकर ही विश्वासू सल्लागार मंडळी होती. ... "
................................................................................................
"पुणे वैभव कळसाला पोचले होते. निजामपुत्र पोलादजंग लगनाला येणार हे कळताच, पेशवेदरबार आश्चर्यचकित झाला. निजामपुत्र येत असल्याची बातमी आली, तसेच खुद्द छत्रपती महाराजांचेही आगमन निश्चित झाले. पुण्याभोवती नजर टाकावी तिकडे पाहुण्यांसाठी निरनिराळे तळ उभारले होते. एकएक पाहुणे पुण्यात येऊ लागले. दक्षिणप्रांतीच्या संस्थानिकांसह टिपू सुलतान पुण्यात येऊन दाखल झाला. सारे मराठे आणि ब्राह्मण सरदार— जतिक्यांना बोलावणी पोचली तितके, सरंजामसुद्धा पुण्यात दाखल झाले. तमाम फौजा आपापल्या मिसळीने तळावर उतरत होत्या. राजेरजवाडे, संस्थानिक, परराज्यातील वकील, त्यांची नाना तऱ्हेची निशाणे निरनिराळ्या तळांवर फडकू लागली.
"फर्जंद पोलादजंग नगरवेशीवर येत असल्याची बातमी पुण्याला आली. नाना फडणीस स्वागताला आधीच गेले होते. खुद्द पेशवे निजामपुत्रच्या स्वागतास गेले. पुण्यातील रस्त्याने मेण्यातून जात असता, माहेलका पुण्याचे दर्शन घेत होती. गुढ्यातोरणांनी सजलेल्या रस्त्यांवरुन मेणा असफजाही तळावर गेला. शाही डेऱ्यांनी, भव्य शामियान्यांनी सजलेला तो भव्य तळ पाहून माहेलका चकति झाली. वर्दीस्वार, खिजमतगारांपासून सारी व्यवस्था चोख होती.
"रावरंभा निंबाळकर फर्जंदांच्या तैनातीस गुंतले असताना, माहेलका पुणे पाहात होती. मोठ्या धामधुमीत आणि ऐश्वर्यसंपन्न वातावरणात श्रीमंतांचा विवाहसोहळा पार पडला. श्रीमंतांची वरात पाहून साऱ्या पाहुण्यांना पेशवाईच्या श्रीमंतीची खात्री पटली. त्या रात्री दारुकामाची लक्ष नक्षात्रो आकाशात चमकली. लगनसोहळा पार पडला आणि एके दिवशी श्रीमंतांचे निजामपुत्रांना जाफतीचे आमंत्रण आले. रावरंभा निंबाळकर निजामपुत्रासह मेजवानीला गेले. पंधराशे खासा निजामपुत्र नबाब पोलादजंगबरोबर मेजवानीला हजर राहिला. खास या मेजवानीसाठी श्रीमंतांनी पंधराशे रुप्याची ताटे करविली होती. बिछायतीवर सफेद चादरी पसरुन त्यावर पंक्ती मांडल्या होत्या. उदबत्त्यांच्या सुगंधात मेजवानीचा बेत पार पडला. आणि कोवळ्या वयाच्या श्रीमंतांसह नबाब बहादुर नाचीच्या महालाकडे चालू लागले. नबाबाच्या सन्मानार्थ खास गाण्याची बैठक आयोजित करण्यात आली होती.
"काळ्याभोर सुरुदार खांबांनी सुशोभति असलेल्या नाचीच्या महालाची बैठक, रुजाम्याच्या गालिचांनी शृंगारली होती. चिरागदानांच्या उजेडात भरजरी खासी बैठक उजळून निघाली होती. सुवर्ण गुर्र्झब हाती घेतलेल्या भालदारांनी अदब बजावली. मुजऱ्यांचा स्वीकार करीत श्रीमंत सवाई माधवरावांची स्वारी खाशा पाहुण्यांसह बैठकीवर विराजमान झाली. श्रीमंतांच्या उजव्या हाताला नाना फडणीस होते. नबाबांच्या डाव्या हाताला रावरंभा निंबाळकर, अश्रफुल उमरा बसले होते. नाना फडणिसांनी इशारतीची नाजुक टाळी वाजविली. पेशवे दरबारची खास कलांवतीण व्यंकट नरसी दरबारी प्रवेश करती झाली. साजिंद्यांनी आपल्या वाद्यांसह गायिकेच्या मागे जागा घेतली. मुजरा करुन व्यंकट नरसी गाऊ लागली. सारा महाल त्या सुरेल आवाजाने भरुन गेला. माना डोलू लागल्या. फर्जंद पोलादजंग तल्लीन होऊन गाणे ऐकत होते. उत्तर रात्री गाणे संपले. तृप्ततेचा नि:श्वास बाहेर पडला."
................................................................................................
"संधी मिळताच नाना आपले जरी उपरणे सावरीत म्हणाले,
"“इतकं चागलं गाणं आपल्या दरबारी आहे याचा श्रीमंतांना आनंद आहे. श्रीमंत कधीकाळी भागानगराला यायचा योग आला तर, जरुर आपल्या दरबारचं गाणं ऐकतील.”
"नाना फडणिसांच्या बोलण्यातील खोच चटकन रावरंभा निंबाळकरांच्या लक्षत आली. ते हसून म्हणाले,
"“त्यासाठी भागानगरापर्यंत यायची श्रीमंतांना तकलीफ कशाला? श्रीमंतांची आज्ञा होईल तर, ते गाणं इथंही ऐकायला मिळेल.”
"“इथं?” नाना उद्गारले.
"“हो! त्यात काय कठीण?”"
................................................................................................
"रात्री नाचीच्या महालात पेशवेदरबारचे आणि निजामदरबारचे खास मानकरी हजर झाले होते. साक्षात् गंधर्वकन्या असा लौकिक असलेल्या व्यंकट नरसीवर तोड करु पाहाणे म्हणजे फजीत होणे असा पेशवे दरबारच्या मानकऱ्यांचा कयास होता. मैफल केव्हा सुरु होते आणि निजाम-दरबारचा नक्षा कसा उतरला जातो हे पाहाण्याला सारे उतावीळ होते. प्रत्येक मानकरी आपले खास कपडे करुन मैफलीत आला होता. पगड्यांना मोत्यांच्या झुरमुळ्या होत्या. कानांत रत्नांचे चौकडे होते. गळ्यात कंठे शोभत होते. अनेक अत्तरांचा मिश्र सुगंध वातावरण धुंद करीत होता.
"खाशा स्वाऱ्या महालात आल्या. सारे स्थानापन्न झाल्यानंतर नबाबांनी विचारले,
“पंडति पंतप्रधान, मैफलीची आज्ञा करायची ना?”
"सवाई माधवरावांनी मान झुकवली. रावरंभा निंबाळकरांनी टाळी वाजवताच नाचमहालाच्या उजव्या दरवाज्याचा चिकाचा पडदा दूर केला गेला. नऊ तरुण स्त्रियांनी आत प्रवेश केलेला पाहाताच सारे चकति झाले. मुजरा करुन कलावंतिणीसाठी घातलेल्या बैठकीमागे त्या स्त्रियांनी चंद्राकार जागा घेतली आणि वाद्ये जुळू लागली. वाद्ये जुळवून होताच, निंबाळकरांनी परत टाळी वाजविली. कुतूहल शिगेला पोचले होते. महालात शांतता पसरली. नूपुरांचा क्षीण आवाज स्पष्ट होत दाराशी आला.
"माहेलकाने आपल्या जागेवर येऊन आपले अवगुंठन मागे टाकले; आणि मोठ्या आदबीने श्रीमंत आणि नबाबबहादुरांना मुजरा केला. माहेलकाच्या दर्शनाने सारे श्वास अवरोधले गेले. तिच्या असामान्य लावण्याने साऱ्यांचे नेत्रा दिपले होते. कोणी तरी न राहवून बोलून गेले, “साक्षात् वसंतसेना!”
"हळू आवाजात काढलेला तो उद्गारदेखील साऱ्यांना स्पष्टपणे ऐकू गेला. माहेलका आपल्या मादक नेत्रांनी पाहात होती. ती सुरुच्या झाडासारखी सडपातळ होती. सोनचाफ्याने लाजावे अशी तिची अंगकांती होती. धारदार नाक, पातळ रेखीव गुलाबी ओठ आणि नाजूक खांद्यावर चढलेली उंच मान तिच्या सौंदर्यात भर घालीत होती. तिच्या कपाळी हिऱ्यांची बिंदी रुळत होती. कानात माणकाच्या मासोळ्या चमकत होत्या. गळ्याशी लपेटलेला लप्फा नजरही ठरु देत नव्हता. गळ्यात बोराएवढ्या मोत्यांचे दोन लांबझोक लग रुळत होते. नाजूक बोटांत अंगठ्या आणि पंजावर सुवर्णरत्नखचति पल्लव शोभत होते. कमलदलासारख्या नाजूक तळहातांवर मेहंदीची सुबक नक्षी चतिारली होती.
"नाना फडणीस विस्फारति नेत्रांनी ते लावण्य पाहात होते. मोगली पेहरावातील माहेलकाने पुन्हा आदब केला आणि तिने डावा हात कानावर ठेवून आकार लावला. त्या निर्मळ सुराबरोबर साऱ्या मैफलीतून दाद उठली. माहेलका गात होती
"— “ऊधो, मन न भये दस-बीस....”
"माहेलकाच्या गाण्यापुढे व्यंकट नरसी कैक योजने मागे पडल्याची जाणीव सर्वांना झाली. सारे कसब पणाला लावून माहेलका विश्वासाने गात होती."
................................................................................................
" ... माहेलकाच्या गळ्यातील मोत्यांचे सर तिच्या गुडघ्यापर्यंत रुळत होते. माहेलकाने मुजरा करुन नृत्याला सुरुवात केली. मृदंगाचे बोल पायांतून निघू लागले. वाद्यांनी लेहरा धरला. त्या सुरावर माहेलका नेत्रा, हस्तभाव दर्शवीत होती. लय वाढत होती. सारे खिळल्या नेत्रांनी ते नृत्य पाहात होते आणि वाढत्या लयीवर फेर घेत असताना अचानक हस्तक्षोपाने माहेलकाच्या गळ्यातील एक सर तट्कन तुटला. बोराएवढे मोती खालच्या बैठकीवर घरंगळले. बैठकीभोवती बसलेल्या अनेक जणांचे लक्ष त्या मोत्यांवर खिळले. अनेक जणांचे हात नकळत मोती वेचू लागले. चोपदारही ते मोती गोळा करीत होते— आणि क्षणात नृत्य थांबले. माहेलकाचा आवाज आला,
"“खामोश! ते मोती वेचू नका!”
"वेचलेल्या मोत्यांचे हात पुढे केले गेले. माहेलका म्हणाली,
"“टाका ते मोती!”
"...आणि वेचलेले ते मोती परत बैठकीवर घरंगळले. बोराएवढे मोता टाका! मग त्या मोत्यांचे करायचे काय?
"माहेलकाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. ते संयमाने आवरीत ती म्हणाली,
"“बेअदबीची माफी असावी हुजूर! आमच्या दरबारी नेहमी असे मोता तुटतात, पण ते आम्ही वेचीत नाही. सकाळी महाल साफ करायला जे सेवक येतात त्यांना ते मिळतात.”
"त्या उद्गारांनी माहेलकाने पेशवे दरबारचे उरलेसुरले ऐश्वर्य लुटले होते."
................................................................................................
"माहेलकाच्या सन्मानार्र्थ खास दरबार भरविण्यात आला. पेशवे दरबारीचे आणि निजाम दरबारीचे खासे दरबारात हजर होते. सवाई माधवराव, फर्जंद पोलादजंग दरबारी आले. पेशवे मसनदीवर बसले. उजव्या बाजूला खास निजामपुत्रासाठी केलेल्या बैठकीवर निजामपुत्र स्थानापन्न झाले. कोवळ्या वयाचे श्रीमंत वीरासन घालून मसनदीवर बसले होते. मस्तकी फेटा तमामी, अंगात निमा व पायांत विजार होती. श्रीमंतांच्या मस्तकी शिरपेच, कलगी व मोत्यांचा तुरा होता. गळ्यात मौल्यवान कंठा होता. छातीपर्यंत आलेल्या त्या कंठ्यात हिरे व पाचू एकाआड एक गुंफले होते. श्रीमंतांची नजर कोवळी होती, तरी त्यात विश्वास दिसत होता. श्रीमंतांजवळ नाना फडणीस उभे होते. नबाब पोलादजंगामागे रावरंभा व अश्रफुल उमरा हात बांधून उभे होते. श्रीमंतांच्या शेजारी चंदनी तिवईवर नक्षीदार सुवर्ण खासदान ठेवले होते. श्रीमंतांच्या डाव्या बाजूला रेशमी आच्छादने घातलेली तबके ओळीने ठेवली होती.
"माहेलका दरबारी आली. तिने श्रीमंतांना व नबाबांना लवून कुर्नीसात केला. नानांनी इशारत दिली आणि तबकांची आच्छादने काढली गेली. नाना म्हणाले,
"“माहेलकाबाई, — तुम्ही श्रीमंतांच्या मैफिलीत नृत्य-गायन सादर केलंत. श्रीमंत आपल्या नैपुण्यावर प्रसन्न आहेत. तुमच्या कलेची कदर करावी म्हणून एक लक्ष रुपये बिदागी अन मानाचं वस्त्र श्रीमंतांनी देऊ केलं आहे. त्याचा स्वीकार करावा.”
"माहेलकाने रावरंभांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मति होते. माहेलकाची नजर श्रीमंतांवर स्थिर झाली. ती म्हणाली, “हुजूर! तुमच्या कृपेची मला धन्यता वाटते. बेअदबी होणार नसेल तर, हुजूरचरणी एक अर्ज आहे.”
"“काय? सांगा! आमची आज्ञा आहे?”
"“मला संपत्तीचा लोभ नाही हुजूर! त्याची मला कधीच कमतरता पडली नाही. माझ्या अन्नदात्यांच्या कृपेनं, माझ्या घरी संपत्ती पाणी भरते. त्यामुळे आपल्या लक्ष रुपयांचं मला मोल नाही. आणि ज्याचं कौतुक वाटत नाही ते आपल्या दरबारी स्वीकारुन, आपण दर्शविलेल्या कृपेचा अपमान करावा असं वाटत नाही. स्वीकारणं जिवावर येतं.”"
"“बाई तुम्हांला काय म्हणायचं ते आम्ही जाणतो! माहेलका तुला जे मागायचं असेल ते तू मागू शकतेस. माग.”
"बालवयाचे पेशवे बोलून गेले. पण नानांच्या अंगावर काटा उभा राहिला. सारे मुत्सद्दी भयचकित झाले. ही हुशार बाई काय मागते याची भीती साऱ्यांना वाटत होती. साऱ्या दरबारचे श्वास अवरोधले गेले.
"“खुदा खैर करे!” माहेलकाची मान क्षणभर लवली आणि ती म्हणाली, “आपल्या औदार्याला तोड नाही हे या जगात एक खुदा आणि उदार राजाच जाणू शकतो, हुजूर! नाचीची एकच इच्छा अधुरी राहिलेली आहे.”
"“सांगा!” पेशवे म्हणाले.
"“आमच्या भागानगरला सर्व ऐश्वर्र्य आहे.” माहेलका अविचलति शब्दांनी म्हणाली, “मी आपल्या दरबारी आले तेव्हा माझं लक्ष आपल्या उजव्या बाजूला ठेवलेल्या खासदानाकडे गेलं. आमच्याकडे असे सुरेख गोविंदविडे बांधले जात नाहीत. दासीला द्यायचं झालंच तर तो विडा द्यावा. बस्स! माझी दुसरी कोणती इच्छा नाही. तो मिळाला तर सारं मिळाल्याचं समाधान मला लाभेल.”"
" ... श्रीमंतांनी खासदानातील विडा उचलला आणि विडा देण्यासाठी हात पुढे केला. माहेलका पुढे झाली. पेशव्यांच्या कोवळ्या मनगटावर पाचूची पोहची चमकत होती. विडा देण्यासाठी हात खोळंबला होत. माहेलका श्रीमंतांना म्हणाली,
"“हुजूर! आपण विडा देत आहात, याचा अर्र्थ आपणांस माहीत आहे ना? तो आपण जाणत असलात तरच विडा सोडावा.”
"हात थांबला. श्वास घुटमळले. नानांनी विचारले, “कसला अर्र्थ?”
"माहेलकाच्या ओठांच्या कोपऱ्यावर हसू होते. डोळ्यांत वेगळीच चमक दिसत होती. माहेलकाचे शब्द स्पष्टपणे उमटले—
"“विडा हे प्रेमाचं प्रतीक! मी भागानगरची राजनर्तकी... म्हणजे त्या दरबारची प्रतिनिधी. माझे अन्नदाता अली अला हजरत निजाम उल्मुल्क आणि श्रीमत पंडति पंतप्रधान पेशवेसाहेब यांच्या मनात परस्परांबद्दल जिव्हाळा, प्रेम राहणार असेल तरच या विड्याला अर्र्थ आहे. मनात वैरभाव असेल तर अजूनही विडा मागं घेतला जावा.”
"दरबार थक्क झाला होता. निजामस्वारीचा बेत साऱ्यांना माहीत होता. नानांनी स्वारीची सारी तयारी पुरी करीत आणली होती. नानांना काही सुचत नव्हते. श्रीमंत लहान असले तरी, राजकारणाच्या आखाड्यातच ते वाढले होते. चेहऱ्यावरची रेषा न बदलता ते म्हणाले,
"“माहेलका! आम्ही तुझ्यावर खूष आहो! ज्या दरबारी धन्याचे भले चिंतणारे तुमच्यासारखे थोर कलावंत असतात त्यांना धक्का कोण लावील? जोवर तुमच्या दरबाराकडून आमची आगळीक होत नाही, तोवर आम्ही आपणहून चाल करणार नाही. स्नेह टिकवण्याचा जरुर प्रयत्न करु. हात पुढं कर.”
"माहेलकाचे नेत्रा आनंदाने भरुन आले. तिने रावरंभांकडे पाहिले. सद्गदति झालेल्या रावरंभांनी आपला हात आपल्या मस्तकीच्या शिरपेचाकडे नेला. माहेलकाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. ती का हसली हे कुणालाच कळले नाही. ... "
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
April 12, 2022 - April 13, 2022.

"बंदेअलींनी मेहेंदळ्यांची जी तारीफ ऐकली होती ती अतिशयोक्ती नव्हती. बापूसाहेब मेहेंदळे, अप्पाशास्त्री वैद्य आणि बाळशास्त्री माटे हे त्या काळचे पुण्यातील प्रख्यात वैद्य. बाळशास्त्री शास्त्रज्ञ होते. अप्पाशास्त्री औषधे बनविण्यात तज्ज्ञ होते. त्यामुळे त्यांना सिद्धरसायनी म्हणतात. पण मेहेंदळ्यांचा लौकिक धन्वंतरी म्हणून होता. सकाळी सूर्योदयानंतर त्यांचा दरवाजा उघडे. माध्यान्हीपर्यंत ते रोगी तपाशीत. स्वत:ला बसायला एक घोंगडी व समोर रोग्यासाठी एक घोंगडी यांखेरीज दुसरा सरंजाम नसे."
"बंदेअली चुन्नासह पुण्यातल्या कसब्यात घर घेऊन राहिले. बापूसाहेब मेहेंदळ्यांचे औषध सुरू झाले. चुन्नाला आराम पडू लागला. बंदेअली शेख सल्ल्याच्या दर्ग्यात सायंकाळी सेवेला जाऊ लागले. मेहेंदळ्यांच्या हाताला खरेच यश दिसू लागले. तीन महिन्यांत चुन्ना बरी झाली. एके दिवशी बंदेअलींना मेहेंदळ्यांनी चुन्ना बरी झाल्याचे सांगितले. बंदेअलींचा आनंद मनात राहीना. त्यांनी चटकन मेहेंदळ्यांचे पाय धरले.
"“अरे, हे काय करतोस? कलावंतानं एवढं विनम्र होऊ नये!” बापूसाहेब म्हणाले, “पाय धरलेस म्हणून बिदागीत छदाम कमी होणार नाही.”
"“अर्ज आहे...” हात जोडून बंदेअली म्हणाले, “छदाम कमी न करता बिदागी वाढवता येईल तेवढी वाढवावी!”
"“असं म्हणतोस?” मेहेंदळे विचारात पडले. “त्याचाच विचार करतोय.” बंदेअली बिदागीचा आकडा ऐकण्यास आतुर होते. काही क्षण तसेच गेले.बापूसाहेबांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. ते म्हणाले,
"“बंदेअली, वैद्यसुद्धा रसिक असतो. किंबहुना वैद्याइतका रसिक कोणीच नसतो. सांगितलं तर आश्चर्य वाटेल, आम्हीसुद्धा कछवा, सतार छेडतो. करमणुकीसाठी आमचा मोकळा वेळ आम्हांला सांगता येत नाही. आम्ही जेव्हा तुम्हांला निरोप पाठवू तेव्हा, तुम्ही आमच्याकडं यायचं आणि आम्हाला मनसोक्त बीन ऐकवायचं. आमच्या परवानगीखेरीज पुणे सोडायचं नाही. हीच माझी बिदागी... आहे कबूल?”"
"पुण्याच्या शनिवारवाड्यापासून नव्या पुलावर जात असताना, पुलाच्या पहिल्या कमानीपाशी थोडे थांबा. तिथे थांबून, डाव्या हाताला नजर टाकलीत तर, नदीकाठी उभा असलेला शेख सल्ल्याचा पांढरा-शुभ्र दर्गा दिसेल. तिथेच वटवृक्षाजवळ वाढलेला एक उंच लिंबारा उभा आहे. त्या लिंबाच्या बुंध्यालगत एक छोटी कबर आहे. त्या कबरीवर गेल्या आत्म्याची नावनिशाणीही कोरली आहे. लिंबाला जेव्हा बहर येतो, तेव्हा ही कबर त्या नाजूक फुलांनी आच्छादली जाते. शेख-सल्ल्यातून उठणारा उदबत्ती-धूपाचा सुगंध त्या कबरीभोवती घोटाळतो. पौर्णिमेच्या रात्री कधी एकटे त्या ठिकाणी गेलात तर, आजही बीनचे सूर तुम्हांला ऐकू येतील... भाग्यवान असलात तर."
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
April 13, 2022 - April 13, 2022.

"मस्तानीने मोठ्या कौतुकाने मुलाला बाजीरावांच्या मांडीवर दिले. बाजीराव आपल्या मुलाला निरखीत होते. मुलाला परत पाळण्यात ठेवीत असता त्यांचे लक्ष पाळण्यावर टांगलेल्या तलवारीकडे गेले. बाजीरावांनी विचारले.
"“पाळण्यावर ही तलवार का लावली?”
"मस्तानी हसली. म्हणाली,
"“पाळण्यावर शस्त्र लावलं की बाधा होत नाही म्हणे.”
"पाळण्यातल्या मुलावर नजर रोखीत बाजीराव बोलून गेले.
"“बाधा? आणि आमच्या चिरंजीवांना? नाही मस्तानी, ते अशक्य आहे. बाळापणापासून ह्याच्या नजरेसमोर समशेर ठेवली तर हा समशेरबहाद्दर होईल.”
"“कुणास माहीत, त्याच्या नशिबी काय आहे ते!”
"“ते भविषय वर्तवण्यास ज्योतिषयाची गरज नाही. जसे आमचे नाना, रघुनाथ, जनार्दन, तसेच हे चौथे.”"
................................................................................................
" ... काशीबाई नेहमी आजारीच असत. या बातम्यांनी त्यांची चिंता वाढली. एके दिवशी त्यांनी हा विषय बाजीरावांकडे काढला—
"“आम्ही ऐकतो ते खरं का?”
"“कशाबद्दल?”
"“कोथरूडच्या महालाबद्दल.”
"बाजीरावांनी नि:श्वास सोडला. ते म्हणाले,
"“खरं आहे. साऱ्या पुण्याला ते माहीत आहे.”
"काशीबाई त्या उत्तराने निराश झाल्या. त्यांनी कष्टाने विचारले, “आपल्यासमोर कोणी काही बोलत नाहीत. पण माघारी...”
"“माघारी काय बोलतात याचा विचार आम्ही केला नाही. करणार नाही. आमच्या माघारी आमच्याबद्दल हवं ते छत्रपतींच्या कानावर घालण्यातही त्यांनी कमी केलं नाही.”
"“मग?” भीतीयुक्त नजरेने काशीबाईनी विचारले.
"बाजीरावांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. आपल्या संजाबावरुन हात फिरवीत ते म्हणाले,
"“छत्रपती हलक्या कानाचे नव्हेत. कान भरु पाहणाऱ्यांनाच त्यांनी कानपिचक्या देऊन परत पाठविलं. त्यांनी सांगतिलं— उत्तरेच्या सनदा आणून, छत्रपतींच्या राज्याचं साम्राज्य करण्याचा पराक्रम कोणीही करावा आणि पदरी असल्या दहा कंचकी बाळगाव्या. आम्ही त्याची चौकशी करणार नाही.”"
................................................................................................
"बाजीरावानी मस्तानीला शनवारवाड्यात आणल्याची बातमी पुण्यात पसरायला वेळ लागला नाही. पुण्याच्या ब्राह्मणवर्गात तर ती बातमी विजेसारखी धक्का देणारी ठरली. एका यवन कंचकीला पेशवे आश्रय देतात, तिला व तिच्या मुलाला शनवारवाड्यात आणतात, ही घटनाच मुळी अतर्क्य. ज्या शनवारवाड्यात होम व्हायचे, तेथे अभक्ष्य भक्षण केले जात होते. ज्या भूमीवर दुधा-तुपाच्या धारा सांडायच्या, तेथे मद्याचे बुधले रिकामे होत होते. जेथे मंत्रोच्चाराने भूमी भारली जायची, त्याच वास्तूवर नर्तकीचे पदन्यास उमटू लागावेत, हे कसे सहन होणार?
"पुण्यातला हा वाढता असंतोषा बाजीरावांना जाणवत नव्हता. मस्तानीच्या सहवासात त्यांचे मन रमत होते. शनवारवाड्यातील सणासुदीच्या, उत्सवाच्या वेळी मस्तानीचे गाणे गणेशमहालात होत होते. मस्तानीचे वाढते प्रस्थ पाहून पुण्यातील शिष्टाईत आणखी भर पडत होती. मस्तानीला शनवारवाड्यात ठेवून बाजीराव उत्तरेच्या मोहिमेला गेले आणि पुण्यात बाजीराव-मस्तानी चर्चेला ऊत आला. पेशव्यांनी आपले वर्तन सुधारले नाही तर, त्यांना वाळीत टाकण्याचे घाटत होते. या वाढत्या असंतोषाला खुद्द शनवारवाडासुद्धा अपवाद राहिला नाही. पेशव्यांच्या वाड्यात पेशव्यांच्या मातोश्री राधाबाई, पेशव्यांचे थोरले चिरंजीव नानासाहेब मस्तानीविरुद्ध बोलू लागले हाते. पेशवे वाळीत पडणार, मुलांच्या मुंजी होणार नाहीत, या बातम्यांमुळे काशीबाई पण व्यथति झाल्या होत्या. चिमाजी आप्पांवर हे सारे खापर फोडले जात होते. त्यांच्यामुळेच बाजीरावांच्या जीवनात मस्तानीचा प्रवेश झाला असा त्यांच्यावर सर्वांचा आरोप होता. एका बाजूला भावाचे प्रेम आणि दुसऱ्या बाजूला धर्म, घराण्याची प्रतिष्ठा यांत चिमाजींचा कोंडमारा होत होता."
................................................................................................
"त्यानंतर दोनच दिवसांत मस्तानीने हिराबागेत जाण्याचा निर्णय घेतला. मस्तानी आपल्या सरंजामासह हिराबागेतील महालात गेली. पण शनवारवाड्यातील वातावरण बदलले नाही. मस्तानी हिराबागेत गेल्यामुळे धर्माचे पारडे जड झाले होते. वाड्यात आणि वाड्याबाहेर धर्ममंडळाच्या बैठकी होत होत्या. पेशवे वाळीत पडणार, पेशव्यांचे शुद्धीकरण होणार, पेशव्यांच्या मुलांच्या मुंजी होणार नाहीत, अशा अनेक बातम्या उठत होत्या. त्या चिंतेखाली चिमाजी, नानासाहेब, काशीबाई, मातोश्री राधाबाई ही मंडळी होरपळत होती.
"बाजीराव विजय संपादन करून मोहिमेवरून परतले. शनवारवाड्यात येताच मस्तानी हिराबागेत गेल्याचे त्यांना कळले. बाजीरावांचा सारा संताप उफाळून उठला. आपल्या अपरोक्ष मस्तानीला हिराबागेत हलवण्याचा कट आपल्या घरात शिजावा याचे त्यांना भारी दु:ख झाले. बंधू चिमाजी, पत्नी काशीबाई, मातोश्री राधाबाई, एवढेच नव्हे तर, खुद्द मुलगा नानासाहेब... सारे मस्तानीविरोधी उभे होते. बाजीरावानी सांगतिले,
"“ठीक आहे. मस्तानीच्या जाण्याने धर्म वाचत असेल, मुलांच्या मुंजी होणार असतील, छत्रपतींची नाराजी दूर होणार असेल, तर त्यापुढं आमची चिंता कसली करता? तुमच्या सुखाआड आम्ही मुळीच येणार नाही. पण त्याचबरोबर आमचं सुख आम्ही कुणाला हिरावू देणार नाही. आजपासून आम्हीही हिराबागेत जाऊ.”"
................................................................................................
"“आणि त्या भटांच्या निर्णयाला तुम्ही भ्यालात?”
"“जी! आपणही भटच आहोत. मीही त्याच घराण्यातला वंशज आहे. मीही कुणाचा तरी दीर आहे. भावाच्या आज्ञेइतकीच आईची आज्ञा मला शिरसावंद्य आहे. छत्रपतींचा मी इमानी सरदार आहे. पेशव्यांच्या मसनदीला माझं रक्ताचं नातं जखडलं आहे.”
"त्या बोलण्याने बाजीरावांचा संताप उसळला.
"“आणि आम्ही... आम्ही रक्ताला बेइमानी, पेशवेपदाला नालायक... छत्रपतींच्या गादीला दगाबाज, असंच ना? गुन्हा काय घडला? तर आम्ही मस्तानीला आश्रय दिला. बस्स्! तेवढ्यानं सारं हरवलं? आमच्या बाजूला काहीच का जमा नाही? भीमा-कृष्णेच्या मधल्या मुलखावर असलेली छत्रपतींची सत्ता आणि शिक्का आम्ही काशीपासून रामेश्वरापर्यंत भिडवला. हे केलं ते त्या गादीच्याच इमानासाठी ना! कोणता स्वार्थ आम्ही बाळगला होता? त्या दौलतीच्या सेवेपायी आम्ही स्वत:ला विसरलो. माळवा, गुजरात जिंकून दिल्लीपर्यंत धाव घेतली. छत्रपतींच्या पायांशी उत्तरेच्या सनदांची चवड रचली. यातून मिळवलं काय? तर आम्ही खुद्द लक्षावधी रुपयांच्या कर्जाचे धनी झालो, त्याला काहीच मोल राहिलं नाही? आठवण राहिली फक्त मस्तानीची!! सातारा-सासवडचं ठाणं उठवून आम्ही पुण्याला आलो. चार घरांचा तिकोटा बांधून राहिलेली ही पुण्याची वास्तू. तिथं आम्ही पेशवाई उभी केली. छातीचा कोट करुन या मातीवर दौलतीच्या सेवेसाठी उभे ठाकलो. सारे आप्तस्वकीय गोळा केले. गावाचं शहरगाव बनवलं. दैवतांची ढासळलेली मंदिरं उभी केली. त्यांचे सुवर्णकळस पुन्हा उगवत्या सूर्यकिरणांत तळपू लागले. होमकुंडातून उठलेले धुराचे लोट आकाशाला भिडले. दानसत्रे सुरू केली. ...कशासाठी? एका यवन कंचकीला आश्रय दिला म्हणून आम्हालाच वाळीत टाकण्यासाठी? ज्या बाजीरावाची चितारलेली नुसती छबी पाहून शत्रू समझौत्याला येतात, तो बाजीराव त्याच्या राहत्या घरात बदनाम होतो... अशक्य!”
................................................................................................
"“बातमी आली आहे. दादासाहेबांचा मुक्काम सध्या नर्मदातीरी आहे. त्यांची तब्येत ढासळत आहे.”
"“काय झालं?”
"“कोण सांगणार? येथून जाताना दादासाहेब बेचैनच होते. त्यांचा हट्टी स्वभाव वाढत होता. संयम सुटत होता. अंगात ज्वर असता कोणी नर्मदेत पोहायला जाईल का? पण त्यांना अडवण्याची हिंमत कुणाची? शेवटी व्हायचं तेच झालं. ज्वरानं ठाण मांडलं, बाईसाहेबांना पाठवा म्हणून निरोप आला. म्हणून वहिनीसाहेबांना पाठवलं. त्यांच्याकडून निरोप आलाय...”
"“काय?” “दादासाहेब आपली सारखी आठवण काढताहेत. आपल्याला घेऊन येण्याची आज्ञा झाली आहे. आपल्याखेरीज दादासाहेबांना आवरील असं कोणी दिसत नाही.”"
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................
................................................
April 13, 2022 - April 13, 2022.
................................................
................................................
................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
नक्षत्रकथा
................................................................................................
................................................................................................
१ मृग
"रायगडाच्या पायथ्यापाशी असलेल्या पाचाडला छावणीचे रूप आले होते. पाचाडच्या सर्व माळावरून छावणी पसरली होती. रायगडवाडी, निजामपूर या गावांचीही तीच स्थिति झाली होती. दररोज अनेक सरदार आपापल्या पथकांनिशी तळावर दाखल होत होते. पाचाडच्या वाड्यात रंगोजी भोसले, आनंदराव निंबाळकर ही सरदार मंडळी संभाजीराजांची वाट पाहात होती. शिवाजी काळ झाल्यापासून दीड महिन्यांत अनेक घटना घडल्या होत्या. गडावर राजारामांचे मंचकारोहण झाले. गडावरून अनाजी, मोरोपंत आपल्या शिबंदीसह संभाजीराजांना पकडण्यासाठी पन्हाळ्याला रवाना झाले. पण संभाजीराजांना पकडण्याआधी तेच हंबीरराव मोहित्यांकडून कऱ्हाडच्या छावणीत पकडले गेले. पन्हाळ्यावर नजरकैदेत असलेले संभाजीराजे आता सर्व फौजेसह रायगडावर येत होते आणि बंदोबस्तास्तव पुढे पाठविलेल्या फौजा रायगडवाडी, निजामपूर, पाचाड येथे छावणी करून संभाजीराजांच्या आगमनाची वाट पाहत होत्या.
२. आर्द्रा
"मृगाने आपल्या सरत्या पावसात आर्द्राशी गाठ घालून दिली. पश्चिमेचे गार वारे गडाच्या माथ्यावर घोंगावू लागले. पावसाची अखंड धार गडावर कोसळू लागली. कडेकपारीतून पावसाच्या धारा वाहत होत्या. वाढत्या पाण्याने गंगासागराचा काठ गाठला होता. पावसाळी विरळ धुक्याने गड आच्छादला होता."
" ... पुतळाबाईना पाहताच सोयराबाई रडू लागल्या. पुतळाबाई जवळ जाऊन बसल्या. धीर करून त्यांनी सोयराबाईच्या पाठीवर हात ठेवला. सोयराबाई पुतळाबाईच्या मिठीत अश्रूंना वाट देत होत्या. काही वेळाने सोयराबाईनी आपला शोक आवरला. ... "
"राजारामाने डोळे पुशीत विचारले,
"“आईसाहेब, दादामहाराज आम्हांला हत्तीच्या पायाखाली देणार?”"
................................................................................................
" ... सोयराबाईनी आश्चर्यांने वर पाहिले.
"“येवढं आजारपण राहिलं, पण मला गडावर घेतलं नाहीत... मी काय केलं होतं तुमचं?”
"“काय सांगू बाई! सारा दोष माझ्यावरच. कुणाला भेटायचं नाही म्हटल्यावर, कोण काय करणार?”
"पुतळाबाई हसल्या.
"“बाई, निदान आता तरी खोटं बोलू नका. गडाचे दरवाजे बंद करून घेतलेत. बाई, मी गडावर आले असते तर फार बरं झालं असतं. निदान आज घडतंय ते टळलं असतं.”
"“हवं ते म्हणा, पण काही सुचलंच नाही हेच खरं! मला तुम्हाला खूप सांगायचं आहे.”
"“मला काही ऐकायचं नाही.” पुतळाबाईनी मनोहारीकडे पाहिले.
"“मनू, वैद्यांना घेऊन ये. युवराजांची तब्येत बरी नाही म्हणावं.”
"मनोहारी गेली. राजारामांनी विचारले,
"“दादामहाराज का रागावलेत? त्यांची आम्हाला भीती वाटते ”
"पुतळाबाई राजारामांना जवळ घेत म्हणाल्या,
"“युवराज, धाकट्या भावाला कोणी शिक्षा करतं का? रागावले असतील. राग शांत होईल. तुम्हाला जपणं हे त्यांचं कर्तव्य आहे.”
"“चांगला जपतोय!” सोयराबाईचा संताप उसळला.
"“आईची जाण नाही; तो भावाची काय ठेवणार?”
"“का ठेवावी त्याचं कारण समजेल?”
"त्या शब्दाबरोबर दोघींच्या नजरा दरवाज्याकडे गेल्या. दरवाज्यात संभाजीराजे उभे होते. भ्यालेले राजाराम पुतळाबाईना बिलगले. महालात येत संभाजीराजे पुतळाबाईना म्हणाले,
"“आमच्याविरुद्ध तक्रारी चालल्या होत्या वाटतं? त्याचसाठी महालावर सक्त पहारे ठेवले होते.. पहारे आपण उठवलेत असं ऐकतो.”
"“हो!”
"“पण आईसाहेब...”
"“युवराज, हा वाडा आहे. आजवरचे महालाचे पहारे इथल्या माणसांची आदब म्हणून रहात असत. त्याच महालावर तुरूंगासारखे पहारे शोभत नाहीत. आपले गडाचे पहारे चोख आहेत. इथं त्यांची गरज वाटत नाही.”
"“जशी आज्ञा.”
"संभाजीराजे जाण्यासाठी वळले तोच, पुतळाबाईचे शब्द त्यांच्या कानावर पडले–
"“युवराजांना बरं नाही,... ताप आहे.”
"संभाजीराजे वळले. त्यांचं लक्ष पलंगावर स्थिरावलं. धीमे पावलं टाकीत ते पलंगाजवळ गेले. दहा वर्षांचे राजाराम त्यांच्याकडे पाहत होते. राजारामांनी विचारले,
"“दादामहाराज, रागावलात?”
"संभाजीराजे चटकन राजारामांच्याजवळ गेले. त्यांना जवळ घेत ते म्हणाले,
"“नाही बाळराजे! तुमच्यावर कोण रागावेल? ते बळ आम्हांला नाही...”
"राजाराम हसले.
"संभाजीराजांनी विचारले,
"“औषध घेतलं नाही ना? वैद्यराज जरूर येतील. मनू भेटली होती. वैद्यराजांना मुभा द्यायला मी सांगितलंय.”"
................................................................................................
"संभाजीराजांचा संताप अचानक उफाळला. ते पलंगावरून उठले.
"“आपल्या हरकतीचा सवाल आता उरत नाही. तो अधिकार केव्हाच सरला हे ध्यानी घ्यावं.”
"“युवराज!” पुतळाबाई म्हणाल्या.
"“आईसाहेब, आपल्याला यांची करणी माहीत नाही... फार सहन केलं.”
"संभाजीराजांचा सारा चेहरा गोरामोरा झाला. डोळे आरक्त बनले. सोयराबाईकडे बोट दाखवत ते उसळले,
"“तुम्हांला कदाचित माहीत नसेल. आबासाहेब पन्हाळ्याला भेटले. आम्ही चांगले बोललो, फिरलो. तिथून आबासाहेब येतात काय, तातडीनं राजारामांची मुंज होते काय, त्याचं लग्न होतं अन् आम्हांला बोलावलं जात नाही!... धाकट्या भावाचं लग्न अन् मोठा भाऊ हजर राहू शकत नाही. अन् त्यानंतर आठ दिवसांत आबासाहेब आजारी पडतात काय... अन् पुढे अकराच दिवसांत कारभार आटोपतो काय! असा कोणता आजार झाला, की सारा मामला येवढ्या तडकाफडकी संपावा? याला काही उत्तर आहे?”
"पुतळाबाईनी आपले अश्रू आवरले. त्या शांतपणे म्हणाल्या, “माझ्या कुंकवाचे बळ सरलं एवढंच मला माहीत आहे!”
"“आईसाहेब, एक विचारतो... कशासाठी त्यांना पाठीशी घालता? आबासाहेब आजारी होते; तुमची आमची आठवण त्यांनी घडोघडी केली असेल. पण गडाखालच्या तुम्ही गडावर आला नाहीत, ते पन्हाळ्याला असलेले आम्ही कसे येणार?”
"पुतळाबाईचे ओठ थरथरू लागले. सारे बळ एकवटून त्या ओरडल्या,
"“बाळराजे ऽऽ!”
"गालांवरून निथळलेली आसवे न पुसता संभाजीराजे बोलले,
"“बाळराजे ऽऽ!... आबासाहेब आम्हांला नेहमी ह्याच नावानं हाक मारीत असत. आईसाहेब, ही हाक आता ऐकू यायची नाही. आबासाहेब गेले अन् आम्ही गादीचे वारस असताना यांनी मंत्र्यांच्या सल्ल्यानं राजारामाचं मंचकारोहण करवलं अन् खुद्द आम्हांला अटक करण्यासाठी फौज घेऊन मंत्री पाठवले. यातला एक तरी गुन्हा क्षम्य वाटतो? सांगा, कोणत्या आधारावर हे सारं विसरावं?”
"“बाळराजे! त्या तुमच्या थोरल्या आईसाहेब आहेत. तेवढा आधार पुरेसा नसेल तर दुसरा हुडकूनही सापडणार नाही.”"
................................................................................................
" ... मेण दरवाज्याजवळ उतरून पुतळाबाई तिथल्या विस्तीर्ण मैदानावर आल्या. संध्याकाळचा गार वारा अंगाला झोंबत होता. पश्चिमेच्या गार वाऱ्याने तीव्रता धारण केली होती. सारे आकाश ढगांनी व्यापले होते. उत्तुंग पर्वतांनी रेखलेल्या त्या दरीत विरळ धुके उतरत होते. पुतळाबाई बेभान होऊन ते दृश्य पाहात होत्या. मस्तकावरचा पदर केव्हा पडला याचंही त्यांना भान नव्हतं. केसांच्या बटा चेहऱ्यावर रूळत हात्या. श्वत पदर वाऱ्यावर फडफडत हाता. पुतळाबाईची नजर पश्चिम क्षितिजावर स्थिरावली होती. चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद प्रकटला होता. मनोहारीने धीर करून हाक मारली,
"“राणीसाहेब!”
"“अं?”
"पुतळाबाईनी मनोहारीकडे पाहिले.
"“मनू, तुला माहीत आहे ना? ही जागा त्यांना भारी आवडायची. जेव्हा सवड मिळेल तेव्हा इथं येऊन बसायचे. इथून हरवलेलं सारं दिसायचं. तो पाचाडचा मासाहेबांचा वाडा अन् आकाशात असतानाच मावळणारा सूर्यही. त्यांनी सांगेपर्यंत माझ्या कधी लक्षात आलं नाही बघ, या गडावरून कधी सूर्य मावळताना दिसत नाही. बऱ्याच वेळा तो आकाशात असतानाच अचानक नाहीसा होतो. ते पाहून त्यांना थोरल्या राणीसाहेबांची आठवण व्हायची.”"
................................................................................................
" ... दोन प्रहर कलली असताना मनोहारी पुतळाबाईच्या महालात आली आणि तिने संभाजीराजे येत असल्याची वर्दी दिली. संभाजीराजे आले. त्यांनी पुतळाबाईना मुजरा केला. पुतळाबाईनी बैठकीकडे बोट दाखवले.
"“बसा.”
"संभाजीराजे तसेच उभे होते. पुतळाबाईच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्या बैठकीवर बसल्या आणि त्यांनी परत सांगतिले,
"“बसा.”
"संभाजीराजे बैठकीच्या कोपऱ्यावर बसले. बोलण्याची सुरूवात कशी करावी हे संभाजीराजांना कळत नव्हते. पुतळाबाईच्या ते ध्यानी आले. त्यांनी विचारले,
"“आपण पंडितजींचा सल्ला घेतलात?”
"“जी! आपली शंका बरोबर होती. अद्याप अस्थींचा विधी अपूर्णच राहिला आहे. त्यामुळे परत सर्व क्रियाकर्म करावं लागेल.”
"“तसं करा.”
"“आम्ही गडावर आल्यापासून दहावा दिवस... एकादशीला दहावा दिवस येतो. तो दिवस पंडितजींनी निवडला आहे.”
"“ठीक आहे. त्यांच्या नावाला साजेसं करा. कशात कमतरता राहू देऊ नका.”
"“जशी आज्ञा.”
"“आणि हे पाहा, त्यांचं क्रियाकर्म होत असता त्यांची आवडती माणसं दु:खात ठेवू नका.”
"“आईसाहेब, आपण आज्ञा करताच मोरोपंत-अनाजींच्या बेड्या काढल्या....”
"“ते माहीत आहे. आता तुम्ही राजे... राजकारण मला कळत नाही. पण तुमची नवी घडी; एकेक माणूस त्यांनी मोलानं जतन केलं. ती माणसं एकदम टाकू नका. शिक्षेपेक्षा क्षमेनं कार्य साधून जातं. मागचं विसरा. ही माणसं जुळवून घेता आली तर बघा.”
"“जी! जशी आज्ञा.”
"“ही आज्ञा नाही.” पुतळाबाई हसून म्हणाल्या, “मला वाटलं ते मी सांगितलं.”
................................................................................................
"एकादशीला पुतळाबाईसाहेब सती जाणार ही बातमी साऱ्या गडावर पसरली. गडाच्या सुवासिनी पुतळाबाईच्या दर्शनासाठी येऊ लागल्या. सायंकाळच्या वेळी पुतळाबाई महालात बसल्या असता दासीने अनाजी, मोरोपंत आल्याची वर्दी दिली. ... मोरोपंत, अनाजी महालात आले. दोघांनी पुतळाबाईना मुजरे केले.
"पुतळाबाईची मोरोपंतांकडे नजर वळली आणि मोरोपंतांच्या मुखातून हुंदका बाहेर पडला. उभ्याने ते मूक अश्रू ढाळू लागले. पुतळाबाई विस्मयाने मोरोपंतांकडे पाहत होत्या. तीच शेलाटी अंगलट होती. तोच गौरवर्ण होता. पण पूर्वीची जरब कुठल्या कुठे गेली होती. हेच ते मोरोपंत, की ज्यांनी साल्हेर-मुल्हेरची लढाई जकिंली होती, प्रतापगडासारखे नामांकति गड उभारले होते, राजे दक्षिण दिग्विजयासाठी गेले असता, उभे राज्या ह्याच मंत्र्यांवर त्यांनी सोपविले होते. स्वराज्याच्या स्थापनेपासून राजांचे सोबती, राज्याचे प्रधान असलेले मोरोपंत पुतळाबाईसाहेबांच्या समोर एखाद्या वठलेल्या चंदनवृक्षासारखे उभे होते. पुतळाबाईचे मन हेलावले."