................................................................................................

Chaitraban:
Famous Marathi Movies Songs
by G. D. Madgulkar
................................................................................................
................................................................................................
One long hidden memory that came back when seeing this was of the early days in Delhi after the family got together after the eventful year of 1965-1966, having spent it in three pieces, except home was never quite the same again, our grandmother being left back in hometown. Our mother did her best to fill that gap. She had given up her job after the last baby came, and now, at least first year or two, took us out after lunch post school in morning.
This was one of the books borrowed from the Marathi library above the state Emporium, Trimurti, up a narrow staircase in a not too large room filled to the ceiling with bookshelves. There were some happy hours spent then reading the songs familiar and not so familiar, and after all these decades it's startling to realise that what one recalls, what one thought, is only true of a small part of the collection - there is a large part not quite so "praasaadik" as one had thought the whole collection was. Perhaps those days one simply ignored much one didn't like.
Still, that leaves a sizable number of those one recalls with love and nostalgia, sung often as many were by our mother, to us or to herself as she went about the house with chores.
One shortcoming, perhaps that only of the kindle edition, is lack of an index or table of contents.
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
हाती नाही बळ,
दारी नाही आड
त्याने फुलझाड लावू नये!
घालवेना चारा,
होई न जतन
त्याने तो गोधन पाळो नये!
सोसता सोसेना
संसाराचा ताप
त्याने मायबाप होऊ नये!
नामसंकीर्तना
गवसेना वेळ
त्याने गळा माळ घालो नये!
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
मी वाजवीन मुरली वृक्षी बसून एका
होऊनिया मुकी तू वाळूत काढ रेखा!
कालिंदीचा किनारा, ते शांत संथ पाणी
राधामुकुंद दोघे, दुसरे न तेथ कोणी
माया तुझी नि माझी सांगू नकोस लोकां!
लोकांस काय ठावे संबंध हे युगांचे
हे वेगळेच नाते प्रेमातल्या जगाचे
दिसतो जरी न वारा, झुलती कदंबशाखा!
मायेत याच दोघे ये मायलेक होऊ
प्रीतीत याच राधे, होऊ बहीणभाऊ
प्रेमास बंध नाही, ही बंधने तरी का?
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
रुमझुमती पैंजण ते पायी चालता
चमचमती नीलमणी कानी डोलता!
वेणीतून गळती फुले कुंदमालती
सादाविण ‘कृष्ण कृष्ण’ ओठ बोलती
कुजबुजती खिडक्यांतून तरुण गोपिका
भेटाया श्रीहरीला जाय राधिका!
वार्यावर पदर उडे, भान कोठले
मुरलीचे सूर वनी तोच दाटले
हृदयाच्या नयने ती पाही मोहना
मोरासम देह करी धुंद नर्तना!
वृक्षांना कथिति गूज हसून मल्लिका
भेटाया श्रीहरीला जाय राधिका!
अंधारी धारांतून चिंब भिजे सुंदरी
दुरून तरी कृष्ण सखा वाजवितो पावरी
नाचुनिया देह थके भूमितळी कोसळे
मिटलेल्या नयनी हरिरूप उभे सावळे
मुरलीचा साद कथी बावरुनी वादका
भेटाया श्रीहरीला जाय राधिका!
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
कधीतरी मी आले होते
बसले होते या इथे
या इथे की त्या तिथे?
बन केळीचे आत गारवा
दूर कुठेसा घुमे पारवा
असेच ऐकत बसलो केव्हा
तसे दूर-पण जरा बिलगते
तुम्ही इथे अन् मी इथे!
सकाळ हसरी, उन्हे कोवळी
एकांताची फुलत पाकळी
अशा सुगंधित सुचल्या ओळी
मी गाणारी, तुम्ही ऐकते
तुम्ही इथे अन् मी इथे!
तुमचे माझे नवेच नाते
कुणी पाहिले कुणास नव्हते
असे कसे मग मला भासते?
पाहिलेच मी पुन्हा पाहते
तुम्ही इथे अन् मी इथे!
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
नाच रे मोरा, अंब्याच्या बनांत
नाच रे मोरा नाच!
ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी
वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच!
झरझर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसांत न्हाऊ
काहीतरी खाऊ
करून पुकारा नाच!
थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत
खेळ घेळू दोघात
निळ्या सौंगड्या नाच!
पावसाची रिमझिम थांबली रे
तुझीमाझी जोडी जमली रे
आभाळात छान छान
सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच!
☐ (देवबाप्पा)
................................................................................................
................................................................................................
आवरिले मी नयनी आसू
कसा आवरू उरिचा पान्हा?
मथुरेत मी, गोकुळि कान्हा!
कुठे तान्हुले, कुठे माउली
कुठे वासरू, कुठे गाउली
त्यात शृंखला अशा पाउली
कशी जाउ मी, पाहू तान्हा?
बसल्या ठायी बसून पाहते
चंद्रबिंब हळूहळू वाढते
असेल झाले बाळ रांगते
म्हणेल आई तेथे कोणा?
स्वर्गाहुनिया ज्याची थोरी
ते सांगाया जगात चोरी
जाणशील का बाळा, तू तरी?
तुझ्याचसाठी याही यातना!
☐ (देवबाप्पा)
................................................................................................
................................................................................................
इवल्याइवल्याशा टिकल्याटिकल्यांचे
देवाचे घर बाई, उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी!
निळीनिळी वाट निळेनिळे घाट
निळ्यानिळ्या पाण्याचे झुळुझुळु पाट
निळ्यानिळ्या डोंगरात निळीनिळी दरी!
चांदीच्या झाडांना सोन्याची पाने
सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे
सोन्याची केळी, सोन्याचा पेरू
सोनेरी अंब्याला सोन्याची कैरी!
देवाच्या घरात गुलाबाची लादी
मऊमऊ ढगांची अंथरली गादी
चांदण्याची हंडी चांदण्याची भांडी
चांदोबाचा दिवा मोठा लावला वरी!
☐ (देवबाप्पा)
................................................................................................
................................................................................................
कुणीही गावा, कुणी पुजावा,
देवच तू देवा!
मला न असूया, मला न हेवा!
रूपगर्विता अतुल सुंदरी
कुणी नाचतील तुझ्या मंदिरी
एकतारीवर एक प्रीतीचा अभंग मी गावा!
धनिक नायिका कोणी येतील
हिरेमाणके तुला वाहतील
गंधहीन या कोरांटीला नयनस्पर्श व्हावा!
रथ सोन्याचा, दोर रेशमी
तुला मिरवता विजयलक्ष्मी
रथचक्राच्या तळी मृत्यूचा मान मला द्यावा!
☐ (देवबाप्पा)
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
घट भरलेले माथ्यावरती,
सोसेना ओझे राहिले
दूर घर माझे!
लांब लांब हा पथ एकाकी
भिउन दिवसही डोळे झाकी
दिसे न सोबत, पथिक गुराखी
किर्र जंगलामधुनी वारा घोंगावत वाजे!
वाट चांदणी, तम झाकळले
मुसळधार जळ, वादळ सुटले
गाव दिसेना, घरकुल कुठले?
क्लांत भयाकुल थकले खिळले पाउल हे माझे
................................................................................................
................................................................................................
लंगडा गं बाई, लंगडा
नंदाचा कान्हा लंगडा!
रंगाने काळा, वाणीने बोबडा
त्या काळ्याचा लळा राधिके,
काय तुला एवढा?
बालकृष्ण हा दिसे लंगडा परी मला ज्ञात
तिन्ही जगाला घाली वळसा तीन पावलांत
वेद जयाची वचने गाती तो कैसा बोबडा?
काळा म्हणता घननीळाला का हो गोपीजन?
सूर्यचंद्रही वेचित फिरती त्याचे तेज:कण!
चैतन्याची अतर्क्य माया काय कळावी जडा?
................................................................................................
................................................................................................
केतकीच्या वनात, उतरत्या उन्हात
सळसळ पानात जपून जा!
जपून गा गडे जपून जा
कुठे निघेल नाग!
पायवाट लपेल
काटाकुटा रुपेल
तळव्यांत खुपेल जपून जा!
ढग येता दाटून
मग वाट कोठून
पाय ठेव रेटून जपून जा!
उसळत्या वयात
बळ तुझ्या पायात
चाल ठेव कह्यात - जपून जा!
फसू नको मोहात
जरा उभी राहत
मागेपुढे पाहत जपून जा!
वादळाच्या वार्यात
नको चालू तोर्यात
पडशील भोर्यात जपून जा!
जाऊ नको गुंगत
स्वप्नात रंगत
तुझी तुला संगत - जपून जा!
☐ (गुळाचा गणपती)
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
सांग, तू माझा होशील का?
वसंतकाली वनी दिनान्ती
एकच पुशिते तुज एकांती
एकांती कर कोमल माझा हाती घेशील का?
नसेल माहीत तुला कधी ते
रोज तुझ्या मी स्वप्नी येते
त्या स्वप्नांच्या आठवणी या ओठा देशील का?
दूर तू तरी जवळ तुझ्या मी
नाव गुंतवित तुझिया नामी
मी येता पण सलज्ज जवळी, जवळी घेशील का?
(लाखाची गोष्ट)
................................................................................................
................................................................................................
त्या तिथे, पलीकडे, तिकडे
माझिया प्रियेचे झोपडे!
गवत उंच दाट दाट
वळत जाय पायवाट
वळणावर अंब्याचे झाड एक वाकडे!
कौलावर गार वेल
वार्यावर हळू डुलेल
गुलमोहर डोलता स्वागत ते केवढे!
तिथेच वृत्ती गुंगल्या
चांदराती रंगल्या
कल्पनेत स्वर्ग जो तिथे मनास सापडे!
(लाखाची गोष्ट)
................................................................................................
................................................................................................
तो :-
डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे
सादाविना कळावे संगीत लोचनांचे!
ती :-
मी वाचले मनी ते फुलली मनात आशा
सांगावया तुला ते नाही जगात भाषा!
हितगूज प्रेमिकांचे हे बोलक्या मुक्यांचे
डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे!
तो :-
हास्याविना फुटेना ओठात शब्द काही
कळले तुला सखे, ते कळले तसे मलाही
दोघांस गुंतविती मऊ बंध रेशमाचे
डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे!
ती :-
पद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या
जी जीवनात काव्ये, काव्यात जीवने या!
गंधात धुंद वारा वार्यात गंध नाचे
डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे!
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
ऐकशील का रे माझे अर्थहीन गीत?
दूर दूर जाते धरुनी उरी तुझी प्रीत!
वाट तुझी बघता दारी पाय थकून गेले
निमंत्रणावाचून जवळी मरण मात्र आले
फेकलेस चरणावरचे फूल तू धुळीत!
भाग्य हेच अजुनी येतो गंध पाकळीस
स्पर्श तुझा झाला होता चुकून या कळीस
उमलताच सुकले तरीही आयू हे पुनीत!
सूर आर्त गीताचा या तुझ्या घरी यावा
अश्रुबिंदू एकच नयनी तुझ्या ओघळावा
हेतू एक शेवटचा या थरथरे मनात!
(लाखाची गोष्ट)
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
सुख पाहता जवापाडे
दु:ख पर्वताएवढे!
पदोपदी अनुभव
संतवाणीचा प्रभाव
ऐकू येती मागे पुढे
बोल तुकयाचे चोखडे!
दिस राबता मावळे
रात्री चिंता माथी जळे
पोट वितीच्या एवढे
त्याचे जन्माशी साकडे!
घाण्यासंगे धरी फेरा
प्राणी जुंपला संसारा
फिरताना आडे पडे
दोन्ही डोळ्यांशी झापडे!
☐ (चिमणी पाखरं)
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
पाच प्राणांचा रे पावा,
तुला गाईन मी गाणी!
उतरुनिया टाकीन जीव-भाव ओवाळणी!
मऊ मांडी अंथरूण
पदराचे पांघरूण
एक साखरेचा पापा देई बोबड्या हासुनी!
पाणी डोळ्यांचे घालीन
रोप तुझे वाढवीन
वाढविता मेल्ये बाळा, तरी येईल फिरूनी!
जन्म अनंत घेईन
गात तुला जोजवीन
तुझ्या विळख्यात राजा, सात स्वर्गांच्या कमानी!
☐ (ओवाळणी)
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
आठवणींच्या आधी जाते
तिथे मनाचे निळे पाखरू
खेड्यामधले घर कौलारू!
हिरवी श्यामल भवती शेती
पाउलवाटा अंगणी मिळती
लव फुलवंती, जुई शेवंती
शेंदरी अंबा सजे मोहरू!
चौकट तीवर बाल गणपती
चौसोपी खण स्वागत करती
झोपाळ्यावर अभंग कातर
सवे लागती कड्या करकरू!
माजघरांतील उजेड मिणमिण
वृद्ध कांकणे करिती किणकिण
किणकिण ती हळू, ये कुरवाळू
दूरदेशींचे प्रौढ लेकरू!
☐ (ऊनपाऊस)
................................................................................................
................................................................................................
या कातरवेळी
पाहिजेस तू जवळी!
दिवस जाय बुडून पार
ललित नभी मेघ चार
पुसट त्यास जरिकिनार
उसवी तीच सांग खुळी!
शेष तेज वलय वलय
पावे तमी सहज विलय
कसले तरी दाटे भय
येई तूच तम उजळी!
येई, बैस, ये समीप
अधरे हे नयन टीप
दोन ज्योती एक दीप
मंद प्रभा मग पिवळी!
☐ (ऊनपाऊस)
................................................................................................
................................................................................................
गा एक एकतारी
गा गीत चालण्याचे
जा जीवनात वेडे, कोणी नव्हे कुणाचे!
ही एक धर्मशाळा, सारे इथे प्रवासी
दिनरात दोन दारे येण्यास जावयासी
आले निघून गेले सम्राट लौकिकाचे!
ये एकलाच प्राणी, तो एकलाच जाई
गे भोग त्याग त्यांना तिळभाव अर्थ नाही
येती तसेच घ्यावे घणघाव संकटांचे
सुखदु:ख दोन नावे एकाच कल्पनेची
ही एक स्वप्नमाला कोमेजल्या क्षणांची
चित्रांतल्या जळांत हे चित्र तारकांचे!
☐ (ऊनपाऊस)
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
ते माझे घर
जगावेगळे असेल सुंदर!
नक्षीदार अति दार तयाचे
शिल्प तयावर बुद्धकलेचे
चक्रे, वेली, मूर्ती मनोहर!
अंगणी कमलाकृती कारंजे
वरी अप्सरा एक विराजे
झरतील धारा ओलेतीवर!
आकार मोठा, तरीही बैठा
आतून वेरूळ आणि अजंठा
वरी लालसर असेल छप्पर!
पागोड्यांची शिखरे वळती
तशी छप्परे छपरावरती
कृष्णकमळीच्या वेली त्यावर!
☐ (पोस्टातली मुलगी)
................................................................................................
................................................................................................
वाजवी मुरली श्यामसुंदरा
तुझ्या मंदिरी नाचे मीरा!
करि करताळा, पायी घुंगुर
जन्म तुडविते हा क्षणभंगुर
देह नव्हे हा मोरपिसारा!
कसले कलियुग? मी द्वापारी
गोपवधू मी, कंसारी कालिंदीचा रम्य किनारा!
गोपीनाथ तू, मी तर गोपी
पुण्यशील तुज, जगास पापी
आले, आले मी अभिसारा!
मिठीत मिटले विश्व मुकुंदा
मी आपणिले ब्रह्मानंदा
तू मी दोघे अमृतधारा!
☐ (पोस्टातली मुलगी)
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
हरि थेंब घे रे दुधाचा
चांदण्याचा रंग याचा,
गोडवा रे मधाचा!
सोनियाची बाळवाटी
सोनियाची शिंप छोटी
वाटीमध्ये ओघ साचे वात्सल्याच्या नदाचा!
फूल फुले आपसूक
उघडी रे तसे मुख
थांबू दे ना चाळा थोडा सावळ्या या पदाचा!
गोकुळीच्या गाउलीचा
नंदिनीच्या माउलीचा
तुझियासाठी अमृताचा घडा भरे रे सदाचा!
☐ (गंगेत घोडं न्हालं)
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
माझ्यासाठी बोल न लावील
तुला राजसा कुणी
सख्या, मी तुळस तुझ्या अंगणी!
तुझ्या जागी तू बैस ध्रुवपदी
पुरे माझी मज प्रीती-समाधी
मी नच मार्गी येइन अगदी
तुझ्या प्रीतीने फिकट निळी मी शुक्राची चांदणी!
उभव नगा, तू मान आपुली
नद्या वाहतील तुझ्या पाउली
दुरून करिन मी निळी साउली
एक सावळी माळ ढगांची दिसेल केवळ जनी!
सुखी रहा तू तव संसारी
वृंदावन मज पुरे समोरी
डुलतील सुकतील लाख मंजिरी
कधीमधी तू पान खुडावे इतुकी आशा मनी!
☐ (मी तुळस तुझ्या अंगणी)
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
जा एकटीच तू गे,
दोघे सुखात भेटा
मी पाहिजे कशाला फुलत्या फुलात काटा?
येतील स्वागता ते, येतील हात हाती
एकाच स्पर्शमात्रे तुमची जडेल प्रीती
ठेवू कशी मुखी मी गंभीर भाव खोटा?
कमळापरी तुला ते नेतील गे खुडून
मज सोडतील तेथे शेवाळ मी म्हणून
जाऊ कशी कुठे मी शोधीत पायवाटा?
मज ओळखील ऐसी तेथे नसे असामी
तव सासुर्याला आले जरी मैत्रिणी पुन्हा मी
तू दावशील कोपा डोळा करून मोठा!
निर्लज्ज मी बनून जरी राहिले तुझ्यात
श्रीमंत तू पिढ्यांची, घेशील काय आत
फेकून घोंगडी तू मज दावशील ओटा!
☐ (गाठ पडली ठकाठका)
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
गगनी अर्धा चंद्र उगवला, मोहरले चांदणे
अडली वाणी, मिटे पापणी, मिटली गं लोचने
राहिले अर्ध्यावर बोलणे!
प्रथम बोलले तेच काहीसे
मला न सुचले उत्तर कैसे
भलत्या वेळी कसे बाई गं आठवले लाजणे?
धीर धरून मी पुसता काही
अस्फुट त्यांचे उत्तर येई
शब्दाहूनही अधिक बोलके झाले मग पाहणे!
एक हाक ये दुरुनी साधी
सिद्धीपूर्वी सुटे समाधी
पुन्हा न जमले कधी त्यापरी एकांती भेटणे!
☐ (देवघर)
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
असा कसा देवाघरचा न्याय उफराटा
फूल मरे बघता बघता, जगे मात्र काटा!
उभा होय वाडा कोठे लिंब-बाभळीचा
तसू तसू झिजुनी मरतो वृक्ष चंदनाचा!
दुष्ट त्यास लाभे आयू, भला तो करंटा!
पिढ्या पिढ्या जगते लोकी शिळा फत्तराची
क्षणामाजी जळुनि जाई वडी कापराची
मनुज मरे, मूर्ती त्याची भूषवी चव्हाटा!
विषामुळे जपणूक होते अफूच्या फुलांची
मधुर म्हणुनी फुटती माथी जगी नारळांची
न्यायप्रियतेचा डंका तुझ्या झडे खोटा!
☐ (देवाघरचं लेणं)
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक!
कोणी न त्यास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक!
पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वत:शी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी?
जे ते तयास टोची, दावी उगाच धाक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक!
एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड त्याचे वार्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक!
☐ (सुखाचे सोबती)
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
राजहंस सांगते कीर्तीच्या तुझ्या कथा
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता!
पाहिले तुला न मी तरीही नित्य पाहते
लाजुनी मनोमनी उगीच धुंद राहते
ठाउका न मजसी जरी निषध देश कोणता
दिवसरात्र ओढणी या मनास लागते
तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते
मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता
निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी
नादचित्र रेखितो तुझेच मंद कूजनी
वेग वाढवून तो उडून जाय मागुता!
☐ (सुवासिनी).
................................................................................................
................................................................................................
सासुर्यास चालली लाडकी शकुंतला
चालतो तिच्यासवे, तिच्यात जीव गुंतला!
ढाळतात आसवे मोर-हरिणशावके
मूक आज जाहले सर्व पक्षी बोलके
यापुढे सखी नुरे, माधवी-लते, तुला!
पान पान गाळुनी दु:ख दाविती तरू
गर्भिणी मृगी कुणी वाट ये तिची धरू
दंती धरुनी पल्लवा आडवी खुळी तिला!
भावमुक्त मी मुनी, मला न शोक आवरे
जन्मदास सोसवे दु:ख हे कसे बरे?
कन्यका न, कनककोष मी धन्यास अर्पिला!
☐ (सुवासिनी)
................................................................................................
................................................................................................
मी तर प्रेमदिवाणी
माझे दु:ख न जाणे कोणी!
आर्ताची गत आर्ता ठावी
कळा ज्या अंत:करणी
स्थिती सतीची सतीच जाणे
जिती चढे जी सरणी!
शूळावरती शेज आमुची
कुठले मीलन सजनी?
गगनमंडळी नाथ झोपती
अमुच्या दैवी धरणी!
दुखणाइत मी फिरते वणवण
वैद्य मिळेना कोणी
या मीरेचा धन्वंतरी हरी श्यामल पंकजपाणी!
☐ (सुवासिनी)
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार!
माती, पाणी, उजेड, वारा
तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार!
घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा नकळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार!
तूच घडविसी, तूच फोडिसी
कुरवाळिसी तू, तूच ताडिसी
नकळे यातून काय जोडिसी?
देसी डोळे, परि निर्मिसी तयांपुढे अंधार!
☐ (प्रपंच)
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
जाहली जागी पंचवटी!
कळ्याफुलांचे सडे सांडले झाडांच्या तळवटी!
पहाटवारा सुटला शीतळ
अंब्यावरती बोले कोकीळ
तापसबाळा जळा चालल्या कुंभ घेउनी कटी!
सडा शिंपण्या आश्रमांगणी
कवाड उघडी जनकनदिनी
उभा पाहिला दीर लक्षुमण राखित पर्णकुटी!
बघून तयाची निष्ठा प्रीती
जानकी-नयनी जमले मोती
त्या मोत्यांचा सडा सांडला भूमीवर शेवटी!
☐ (आकाशगंगा)
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे
जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे
पांघरसी जरी असला कपडा
येसी उघडा, जासी उघडा
कपड्यासाठी करिसी नाटक, तीन प्रवेशांचे
मुकी अंगडी बालपणाची
रंगीत वसने तारुण्याची
जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे!
या वस्त्रांते विणतो कोण?
एकासारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्याचे!
☐ (जगाच्या पाठीवर)
................................................................................................
................................................................................................
नाही खर्चिली कवडीदमडी,
नाही वेचला दाम
बाई, मी विकत घेतला श्याम
कुणी म्हणे ही असेल चोरी
कुणा वाटते असे उधारी
जन्मभरीच्या श्वासाइतके मोजियले हरिनाम!
बाळ गुराखी यमुनेवरचा
गुलाम काळा संताघरचा
हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम!
जितके मालक, तितकी नावे
हृदये तितकी, याची गावे
कुणी न ओळखी तरीही याला दीन अनाथ अनाम!
☐ (जगाच्या पाठीवर)
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................................................................
................................................

1966 - January 08, 2022.
Purchased December 24, 2021.
Kindle Edition
Published May 11th 2020
ASIN:- B088HD6Q4P

Chaitraban
चैत्रबन गाजलेली चित्रपटगीते ग. दि. माडगूळकर
चैत्रबन ग. दि. माडगूळकर ☐
प्रकाशक साकेत बाबा भांड,
साकेत प्रकाशन प्रा. लि.,
115, म. गांधीनगर,
स्टेशन रोड, औरंगाबाद - 431 005,
फोन- (0240)2332692/95.
www.saketpublication.com
info@saketpublication.com •
पुणे कार्यालय साकेत प्रकाशन प्रा. लि.,
ऑफिस नं. 02, ‘ए’ विंग, पहिला मजला,
धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स, 373 शनिवार पेठ,
कन्या शाळेसमोर, कागद गल्ली, पुणे -411 030
फोन- (020) 24436692
ASIN: B088HD6Q4P
Publisher:
Saket Prakashan Pvt. Ltd
(11 May 2020)
Language: Marathi
................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4458688493