Wednesday, January 12, 2022

KARUNASHTAKA, by Vyankatesh Madgulkar.

................................................................................................
................................................................................................
KARUNASHTAKA
by Vyankatesh Madgulkar
................................................................................................
................................................................................................

Most touching. 
................................................................................................
................................................................................................
1.
................................................................................................
................................................................................................

"आजी आधी काडीसारखी, त्यात भेदरलेली. 

"आईला वाटलं, आपण मधे गेलो आणि धाड्ऽधाड्ऽ करत आगीनगाडी आली तर? 

"मी आणि भाऊ दादांच्या मागोमाग उड्या घेत गेलो. 

"आई आजीचं मनगट धरून ओरडत होती, “चला चटचट पाय उचला. ऐकलंत का, मी काय म्हणतीय ते? अहो, एवढं घाबरायला काय झालं?” 

"अनेक रुळांच्या रेघा, खडी, ओल. शिवाय जमिनीबरोबर गेलेल्या कसल्या कसल्या तारा आणि मोठमोठ्यांदा होणारे आवाज, लोकांचा गलका, धावपळ. आजवर पाऊलवाट किंवा गाडीवाट याशिवाय काही न बघितलेली पंचक्रोशी ओलांडून कधीही न गेलेली आजी – तिचा धीरच सुटला. 

"‘भगवंता, भगवंता…’ असा देवाचा धावा करीत अंगावरचं तांबडं आलवण आवरीत, केस नसलेल्या डोक्यावरचा पदर सावरीत ती उतारावरून ढेकूळ गडगडत जावं, तशी आईमागोमाग जात होती. जाता जाता कशाला तरी थटलीच आणि कोलमडली. पाटीवर उभी ठेवलेली पेन्सिल पडावी तशी रुळांवर पडली. पडताच अगदी कळवळून ओरडली, “मेल्ये, मेल्ये!” 

"दादा धावले, हमाल धावले. 

"दादांनी तिला धरून उठवली, अंग झटकलं. 

"‘बाई, तुला लागलं का?’ म्हणून विचारलं, तेव्हा बारीक आवाजात विव्हळून आजी म्हणाली, “डिगू, पडल्ये रे मी. हाडाला मार लागला….” 

दादांनी तिचं मनगट पाहिलं आणि म्हणाले, “बरं, बरं, चल आता. मग बघू….”

"पुढे, ते उजव्या हाताचे दुखावलेले मनगट डाव्या हातात धरून माझी आजी चुलीच्या उबेला बसलेली मी किती दिवस पाहत होतो. बिबे घालून घालून हे मनगट कोळशासारखं काळं पडलं होतं. आपल्या गावातून तिला जणू उपटून आणावं तसं आणलं गेलं होतं. 

"या प्रसंगानंतर मुळं उघडी पडलेल्या वेलीसारखी आजी सुकत सुकत गेली."
................................................................................................
................................................................................................
2.
................................................................................................
................................................................................................

"गोळे कम्पाउन्डर येऊन बघून गेले. त्यांनी नाना औषधं दिली. त्या कडू-तुरट औषधाचा कप पुढे करताच आजी तोंड फिरवू लागली. 

"माझ्या वडलांना म्हणू लागली, “नको रे, मला हे प्यायला सांगूस! मला उलटी होते. सगळा जीव गोळा होऊन तोंडात येतो.” 

"तिचं उठणं-फिरणं बंद झालं. कोपऱ्यात चुलीपुढं बसणं बंद झालं. अंथरुणाच्या गबाळ्यात कृश अशी बाईआजी डोळे मिटून कण्हत पडून राहू लागली. 

"वडलांना हाका मारल्यावर ती फक्त डोळे उघडून त्यांच्याकडे टकाटका बघत राही. 

"तिला बोलण्याचेही श्रम होऊ लागले.

"आम्ही शाळेत गेलो, वडील कचेरीत गेले म्हणजे आई घराला कुलुपं लावून ओढ्यावर जाऊ लागली. कारण दार उघडं राहिलं तर आत भटकी कुत्री शिरतील आणि बाईआजीला हात उचलून त्यांना हाकलणंही होणार नाही, हे तिला माहीत होतं. नुसती कडी लावून जाणंही तिला प्रशस्त वाटायचं नाही. घरात कोणी शिरलं आणि घर धुऊन नेलं तर? 

"अशीच एकदा दुपारी आई कुलूप लावून गेली आणि तासाभरानं आली. तिनं कुलूप उघडलं. घागर ठेवली, धुणं वाळत घातलं आणि बाईआजी काही हलत नाही, कण्हत नाही हे तिच्या लक्षात आलं. काळजाला चरका बसला. 

"जवळ जाऊन तिनं अंगाला हात लावून ‘सासूबाई, सासूबाई’, अशा हाका मारल्या आणि तिच्या लक्षात आलं : 

"बापडी बाईआजी मरून गेली होती. 

"तीन दिवस आमचं कौलारू घर गडद उदासीनतेत बुडून गेलं होतं. 

"आजी ज्या जागी गेली, त्या जागी आईनं पणती लावली होती. पणतीच्या बुडाशी जोंधळ्याच्या पांढऱ्या शुभ्र पिठाचं खळं केलं होतं आणि त्यावर नवी दुरडी झाकली होती. 

"रात्री झोपायच्या वेळी दिवा मालवला आणि पावसाळ्यातला ओला अंधार घरात पसरला की, बांबूच्या चोयट्यांनी विणलेली नवी दुरडी आकाशकंदिलासारखी प्रकाशे. अंथरुणावर अंग टाकलेल्या आईला पुन्हापुन्हा भडभडून येई. ती म्हणे, “अरे, तुम्हा चार कच्च्याबच्च्यांच्या व्यापातून त्या कष्टी जीवाकडे बघायला मला सवड अशी झाली नाही. अरे, शेवटच्या आजारात सुद्धा घडावी तशी त्या वडीलमाणसाची सेवा माझ्या हातून घडली नाही. कशी मला बुद्धी झाली आणि घराला कुलूप लावून पाण्याला गेले!” 

"माझ्या वडलांना डोळ्यांतून पाणी काढताना सुद्धा मी कधी पाहिलं नव्हतं. आजीला ओढ्याकडे न्यायला लोकांनी जेव्हा उचललं तेव्हा दोन्ही हातांनी तोंड झाकून ते ओल्या अंगणात मटकन खाली बसले. 

"पुढे अनेक दिवस आजीची आठवण येऊन त्यांचे डोळे भरून येत. दोन्ही तळव्यांनी ते डोळे पुसत. त्यांचे पातळ ओठ काही वेळ थरथरत राहत. 

"ते म्हणायचे, “इतकं गोत असून शेवटच्या क्षणी तिच्यापाशी कोणी नव्हतं. मुलगा नव्हता, सून नव्हती, नातवंडं नव्हती. बेवारशासारखी माझी आई एकाकी गेली… आपल्या गावात ती आनंदात राहत होती. मी तिला उचलून फरफटत इकडं आणली. तिथं आपल्या गावात, आपल्या घरात राहिली असती, तर आणखी दहा वर्षं जगली असती.” 

"तिसऱ्या दिवशी आईनं दुरडी उचलून पीठ न्याहाळलं आणि ती आम्हाला म्हणाली, “अरे, चिमणीचे पाय उठले आहेत बघा या पिठावर. अश्राप म्हातारी! देवानं तिला चिमणीच्या जन्माला घातलं!” 

"पुढे कित्येक वर्षं उघड्या दारातून चिमण्या भरारत घरात आल्या आणि फरशीवर नाचत कणदाणे टिपू लागल्या की मला आईचा स्वर आठवे, ‘अदाााप म्हातारी! देवानं तिला चिमणीच्या जन्माला घातलं!’"
................................................................................................
................................................................................................
3.
................................................................................................
................................................................................................

"बाईआजी गेली. माझ्या वडलांचं आणि आईचं सांतवन करण्यासाठी बरेच नातेवाईक आले. ... "

"आलेली ही माणसं निघून गेली आणि घर खायला उठलं. 

"आईला या ओसाडीतल्या घरात रात्री आपण राहू नये असं वाटायला लागलं. तिला कसले कसले भास होऊ लागले. आम्ही भास म्हणतो, तिला मात्र ते सारे सत्यच होते. हे भास तिला अवसेला किंवा पौर्णिमेलाच नेमके होत. 

"एकदा भर पौर्णिमेच्या रात्री पाण्याची घागर घेऊन ती बाहेर पडली. दार ओढून घेतलं. वळली आणि पडकापलीकडे उभी राहिलेली कोणी अनोळखी बाई तिला सामोरी आली. तिनं केस पाठीवर मोकळे सोडले होते. कपाळावर मळवट भरला होता आणि हिरव्या रंगाचं कोरं वस्त्र ती नेसली होती. नुकतंच न्हाणंधुणं झाल्यासारखी ती दिसत होती. न्हाताना अंगाला लावलेल्या उटण्याचा सूक्ष्म वास येत होता. 

"आईच्या कानांवर आवाज आला, “माघारी फिर. अजून मध्यानरात्र आहे.” 

"आई निमूट मागे फिरली. दार ढकलून घरात आली. मोकळी घागर आणि गडू खाली टाकून अंथरुणावर बसली आणि मोठ्याने रामाचा धावा करायला लागली. 

"हुडहुडी भरल्याप्रमाणे तिचा आवाज कापत होता. 

"माझे वडील जागे झाले आणि त्यांनी विचारलं, “काय झालं? इतकी घाबरी का झाली आहेस?” 

"तर म्हणाली, “कंदील लावा.” 

"वडलांनी कंदील लावला. “बाहेर व्हा आणि पडकात बघा….” 

"“काय दिसलं?” 

"“उंबऱ्याबाहेर उभं राहून तुम्हीच बघा.” 

"वडलांनी बाहेर होऊन पाहिलं. स्वच्छ चांदणं पडलं होतं. कंदील धरून बघण्याची काही जरुरीच नव्हती. चार पावलं पुढे होऊन त्यांनी सगळीकडे नीट पाहिलं. स्वच्छ चांदणं आणि पडक्या भिंताडाच्या, झुपाटाच्या काळ्या सावल्या याशिवाय त्यांना काही दिसलं नाही. 

"“मला तर काही दिसत नाही….” 

"“नाही?” 

"“काही नाही….”

"“मग आत या आणि दार लावून टाका.” 

"दार लावून वडलांनी कंदील समोर ठेवला आणि आईला ते म्हणाले, “तुला काय दिसलं? नाग?” 

"आई गंभीरपणानं एकेक शब्द काळजीपूर्वक उच्चारत बोलली, “या वास्तूत कुणीतरी ओली बाळंतीण अपघातानं गेली आहे. ती मला दिसली. म्हणाली, “मागं फिर, अजून मध्यानरात्र आहे.” 

"“मध्यानरात्र आहेच.”
................................................................................................

"आईचं बालपण फार सुखात गेलं होतं. तिचे वडील गावचे प्रतिष्ठित असे कुलकर्णी होते. शेतीवाडी भरपूर होती. अठरा एकर तर विहिरबागाईतच होती आणि मुलं ही फक्त दोनच. एक माझी आई आणि दुसरी माझी मावशी. पोटी पुत्रसंतान नाही, म्हणून तिचे आईवडील कष्टी झाल्याचं निदान माझ्या आईच्या तरी ध्यानी आलं नव्हतं. उलट ते या मोठ्या मुलीलाच मुलगा समजत. त्यामुळेच बालपण लाडात, वांडपणा करण्यात गेलं होतं. 

"कधीकधी तिला आपल्या बाराबंदी घालणाऱ्या, भव्य छातीच्या मायाळू वडलांची आणि नाजूक बाहुलीप्रमाणे दिसणाऱ्या, गोऱ्यापान आईची आठवण झाली म्हणजे समईच्या मंद उजेडात, अंथरुणावर बसून ती आम्हाला आपलं बालपण सांगायची.

"अशा या गावात गायकवाडांच्या पोरींबरोबर विटीदांडू आणि चिंध्यांच्या चेंडूनं धबाधबी खेळण्यात, हिरव्या पिकातून बागडण्यात आणि झिम्मा-फुगडी, नाच-फेर करण्यात, झाडांना बांधलेल्या झोक्यावर धरतीकडून आभाळाकडे झोके चढविण्यात आईचं बालपण संपतं, न संपतं, तोच तिचं लग्न होऊन वयाच्या तेराव्या वर्षी ती आमच्या गावी आली होती. 

"ती सांगे, “माझा सासरा फार कर्तृत्ववान पुरुष होता. फार ढाणक होता; पण त्यानं मला पोटच्या मुलीसारखं वागवलं.” 

"सासरे होते, तोवर घरात सुख होतं, समृद्धी होती. शेतमळे अमाप पिकत होते. दूधदुभत्याची चंगळ होती. गडीमाणसांचा राबता होता. वाड्यातल्या चौकात घोडी होती. दुभत्या गाई गोठ्यात होत्या. सासऱ्यांचा मोठा दरारा होता. पंचक्रोशीत त्यांचं नाव कर्तबगार कुलकर्णी म्हणून गाजत होतं."
................................................................................................

"ध्यानीमनी नसताना मावशींकडून निरोप घेऊन त्यांचा शेतावरचा गडी आमच्या घरी आला. आईला म्हणाला, “आईसाहेबांनी सांगितलंय, आम्ही मळ्यात राह्यला जातोय. तुम्ही सामानसुमान आवरा. सकाळी बैलगाडी येईल. त्यातनं मळ्याकडे या. आहे त्या झोपडीत सगळे राहू.”"

"गावातल्या ब्राह्मणवर्गाच्या बऱ्याच झोपड्या नानांच्या आसपास उभ्या राहिल्या. भाऊबंद असल्यामुळे जमिनी एका तळावरच होत्या. नानांच्या काळ्याकरंद मळ्यात जागोजागी आंब्याची मोठमोठी झाडं होती. अशा चार झाडांच्या सोबतीनं आमच्या झोपडीला जागा मिळाली. नीटनेटकी, प्रशस्त झोपडी बांधून घ्यायला करावा लागतो, तो खर्च काही माझ्या वडलांच्या कनवटीला नव्हता. आईचे चार गोड शब्द खर्चून तेवढ्या किमतीत केवढी आणि कशी झोपडी येणार? झाली आपली वेडीबागडी."

"पुढे लवकरच वडलांची कचेरी गावातून तात्पुरती हलली आणि पाचएक फर्लांगावर मोठ्या सडकेला लागून असलेल्या बंगल्यात सुरू झाली. आंब्याच्या झाडांनी सुशोभित असं आवार या बंगल्याला होतं. बंगला सरकारीच होता. एरवी संस्थानचे राजेसाहेब लवाजम्यानिशी आले की, त्यांचा मुक्काम याच आंबराई बंगल्यात असे."

"नानांच्या मळ्याच्या कडेनं एक मोठी ओघळ गावओढ्याच्या दिशेनं वाहत गेली होती. ओघळीच्या काठानं गर्द झाडी होती. उंबराची, कवठाची, चिंचेची, सीताफळीचीही झाडी होती. या ओलसर झाडीतून टिय्ये राघू आणि घनछड्यांचे आवाज ऐकत आम्ही भटकत असू. पिकली उंबरं खात असू आणि मोरांची पीसं गोळा करीत असू. ओघळीकाठी, पाण्यानं भरलेल्या तालींच्या काठी बाभळीची खूप झाडं होती. त्यांच्यावर सुगरण पाखरांची घरटी लोंबत असत. ही घरटी आम्ही आत काय आहे, अंडी आहेत का पिलं आहेत म्हणून शोधत असू."

"या झोपडीतल्या मुक्कामातच माझा थोरला भाऊ लांब राजधानीला शिकायला गेला. तिथं तो गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहात राहणार होता. पैसे न पडणाऱ्या बोर्डिंगात जेवणार होता आणि अभ्यास करून मॅट्रिकची परीक्षा पास होणार होता."
................................................................................................
................................................................................................
4.
................................................................................................
................................................................................................

"पाच महिने गेले. गावात पुष्कळ पडझड करून, माणसं मारून काळा प्लेग निघून गेला. रानातल्या वस्त्या मोडून माणसं पुन्हा गावात नांदायला आली. आम्ही गावात दुसरं घर बघितलं. 

"त्यातल्या त्यात ओढ्याच्या जवळपास घर बघणं हे इथं शहाणपणाचंच होतं. एरवी घरातली स्त्री पाणी आणता आणता मरून गेली असती. म्हणून तर इथं हे काम घरातल्या स्त्रीकडून काढून पुरुषांनी आपल्या खांद्यावर घेतलं होतं. लोखंडाच्या मोठमोठ्या लंबगोल घागरी आपल्या बळकट खांद्यावर घेऊन घरातले पुरुष भराभरा चार-आठ खेपा करीत आणि दिवसभराचं पाणी भरून टाकीत. घरादाराला, पाळलेल्या जनावरांना प्यायला, म्हाताऱ्याकोताऱ्यांना, बायांना, मुलाबाळांना अंघोळीसाठी, स्वयंपाकासाठी आणि सडासारवणासाठी पुरून उरेल एवढं पाणी घरचे धडधाकट पुरुषच भरून टाकत. सकाळ होते ना होते, तोंडाला तोंड दिसते ना दिसते, तोवरच पुरुषमाणसांची वर्दळ ओढ्याला सुरू होई."

"ब्राह्मणांच्या घरांतून मात्र अजूनही हे काम स्त्रीवर्गाकडेच होतं. काही थोड्यांनी पाणी भरायला ब्राह्मण गडी ठेवले होते. काही घरांतली बलदंड मुलंही हे काम करायची, पण अजूनही काही घरच्या बायकांनाच हे शरीरकष्टाचं काम करावं लागत होतं."

"आमच्या घरापासून बरंच चालून गेल्यावर आडवा ओढा होता. ओढ्यावर पूल होता. त्या पुलाच्या पलीकडे दवाखान्याची लहानशी टुमदार इमारत होती. या दवाखान्याची एक खोल विहीर होती. तिचं पाणी छान होतं. शेवाळ्याचा, माशांचा आणि बेडकांचा वास मारणाऱ्या ओढ्याच्या पाण्यापेक्षा विहिरीचं हे पाणी दादांना आवडायचं. कचेरीतून आले की अंघोळ करून ते तांब्याची एक घागर या विहिरीला जाऊन घेऊन यायचे."
................................................................................................

" ... ड्रॉईंगच्या पहिल्या परीक्षेसाठी दहा विद्यार्थी निवडले होते. त्यात माझीही निवड झाली होती. शाळेतल्या अभ्यासापेक्षा मला हा अभ्यास फार आवडायचा. 

"शाळेच्या बागेत जाऊन चार पानं असलेली मोगऱ्याची लहान डहाळी खुडून आणायची. डाव्या हातात धरायची आणि अगदी तशीच ती कागदावर काढायची. तिला सुरेख रंग द्यायचा, पानांना पिवळट-हिरवा, पानाच्या पाठींना फिक्कट निळसर-हिरवा, देठाला तांबूस-हिरवा. बघता बघता ड्रॉईंग-बोर्डावरच्या पांढऱ्या कागदावर मोगरा तरारून यायचा. असं वाटायचं की, तो उचलून बोटात सुद्धा धरता येईल. 

"वर्गात आणखी पोरं होती… एक गणपत बाड होता. एक हरी कुंभार होता. एक माश्यांनी गोड रंग आपल्या सोंडेने टिपून घेतल्यावर चित्र जसं डागळतं, तसा कोडानं चेहरा डागाळलेला मारोती होता. 

"– आणि एक निळ्या डोळ्यांची, भुऱ्या केसांची, कानात जांभळे लोलक घालणारी आणि लाजून-लाजून लाल होणारी सुशी होती. तिला चाकूनं पेन्सिल तासायला भीती वाटायची. तेव्हा आमच्यातला वयानं सर्वांत मोठा असलेला हरी तिला टोकदार पेन्सिल तासून द्यायचा."

"हे जग नाजूक रेषांचं आणि मऊ खोडरबराचं, दाट रंगांचं आणि फुगीर स्पंजाचं, मोगऱ्याच्या नाजूक डहाळ्यांचं आणि कण्हेरीच्या गुलाबी फुलांचं होतं. ओल्या कुंचल्याचं आणि रंगीत रंगीत खडूंचं होतं."
................................................................................................

"“कुठं झाली बदली?” 

"“लांब… साखरगडला. देवस्थानचा वहिवाटदार म्हणून.”"
................................................................................................
................................................................................................
5. 
................................................................................................
................................................................................................

"अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टींत ती एक गोष्ट आहे ना, आपल्या गरीबखान्यात झोपी गेलेला एक जण सकाळी जागा झाला आणि आपण राजवाड्यात आहोत असं त्याला आढळलं आणि तो चकित झाला! साखरगडाच्या पायथ्यापाशी असलेल्या चित्रासारख्या सुंदर गावातल्या भल्यामोठ्या राजवाड्यात उभं राहिल्यावर आईही तशीच चकित झाली असली पाहिजे. 

"तळहातावर भाग्यरेषा असावी तशी या गावाच्या मधोमध सुंदर, बारा महिने वाहती अशी नदी होती. पात्राचा विस्तार बेताचा होता. दोन्ही काठांवर गर्द झाडी होती. नारळ, आंबा, गुलाब अशा मोठमोठ्या बागा होत्या. काळ्या पाषाणाची शांत देवळं होती. मोठमोठे घाट होते. राजघराण्यातल्या पुण्यवान पूर्वजांची वृंदावनं होती. या नदीत जागोजागी निळेकाळे डोह होते आणि वेड्यासारख्या फुलणाऱ्या पांढऱ्या आणि तांबड्या कण्हेरीची, केवड्याची बने होती. पिवळ्या धमक फुलांनी लहडणाऱ्या बिट्ट्यांची झाडं होती. 

"अशा या सुंदर नदीकाठी एकोणिसाव्या शतकात बांधलेला भलामोठा राजवाडा होता. 

"वाड्याचा लाकडी दरवाजा प्रचंडच होता. तो काही विशेष प्रसंगीच उघडला जाई. या उघड्या दरवाज्यातून घोडेस्वार खाली न उतरता घोड्यासकट आत आला असता. दिंडी दरवाजा उघडा असे. तोच एवढा होता की, त्यातून सहज जा-ये करता येई."

"वरच्या मजल्यावरच्या दिवाणखान्यातून जाड तांबडी जाजमं पसरलेली असत. पांढऱ्याशुभ्र गाद्या, लोड, तकिये अशा बैठकी असत. मध्यभागी नक्षीदार गालिचे असत. या दिवाणखान्याच्या खिडक्यांना दाट निळ्या-जांभळ्या आणि तांबड्या-हिरव्या रंगांच्या काचा लावलेल्या होत्या. लाकडी छताला हुंड्या-झुंबरं टांगलेली होती आणि उंच भिंतींना मोठमोठी तैलचित्रं टांगलेली होती. या तैलचित्रांतल्या पुरुषांच्या डोक्यांवर भलीमोठी पागोटी होती. त्यावर मोत्यांचे तुरे होते. त्यांच्या भव्य कपाळावर उभं गंध होतं, ओठांवर जाड अशा काळ्या-पांढऱ्या मिशा होत्या. यांच्या गळ्यातून बोराएवढ्या मोत्यांच्या माळा होत्या. मनगटांवर रत्नखचित पोच्या होत्या. अंगात जरीकाम केलेले किनखापी अंगरखे होते. जरीकाठी उपरणी ह्यांनी लफ्फेदारपणे गळ्यांभोवती घेतली होती आणि यांचे अंगठ्यांनी भरलेले हात, मखमली म्यानात ठेवलेल्या तलवारींच्या सोनेरी मुठींवर होते. 

"साखरगड देवस्थानचे वहिवाटदार म्हणून माझ्या वडलांनी या वाड्यात राहावे आणि वाड्याची देखभाल पाहावी असा हुकूम होता. 

"भल्यामोठ्या वाड्यावर चार-सहा चिमण्याच फक्त राहाव्यात तसे आम्ही या वाड्यात राहत होतो. 

"वेगवेगळ्या कामांसाठी वाड्यात बारा-पंधरा नोकर होते, चाकर होते. खालच्या मजल्यावर प्रत्येक दालनात एक असे वीसेक कंदीलच संध्याकाळी लागत. 

"आम्ही पोरं आत उतरून बसू शकू, एवढी प्रचंड पातेली, हंडे, कढया, पराती बघूनच माझ्या आईचे दोन्ही हात छातीवर जात आणि तोंडातून शब्द निघत, “अगो बाई!”

"साखरगडनिवासिनी देवीचं नवरात्र येई, तेव्हा नऊ दिवस उत्सव चाले आणि वाड्यात रोज दोनदोनशे लोकांच्या पंगती उठत. 

"वाड्याच्या शेजारी असलेल्या रामाच्या भव्य देवळात रोज एका प्रख्यात कीर्तनकाराचं सुश्राव्य कीर्तन होई. गावातले झाडून सारे प्रतिष्ठित लोक कीर्तनाला गर्दी करीत. देवळात गाद्या, लोड, तकिये यांच्या बैठकी घातलेल्या असत. फुलांच्या माळा, धूप आणि अत्तर यांच्या गंधानं देवळांचा अनेकखांबी सभामंडप कोंदून जात असे. तंबोरे झंकारत, पखवाज घुमे, मंजिऱ्या किणकिणत. रसगंगा दुथडी भरून वाही. पूर्वरंग झाला की हारतुरे, गोटे, अत्तर-गुलाबपाणी होई. उत्तररंग होईपर्यंत रात्रीचा एक वाजे. आरती होई, खिरापत वाटली जाई आणि लोक घरोघरी जात. 

"एरवी प्रत्येक मंगळवारी देवीला पंचपक्वान्नांचा नैवेद्य होई. जरीकाठी रुमाल बांधून, जरीकाठी उपरणं अंगावर घेऊन माझ्या वडलांना; आणि शोभेल असा थाटमाट करून आईला जावं लागे. त्यांचा तिथे मोठा मान असे. 

"नवरात्र उत्सवात आणि एरवी विशेष प्रसंगी देवीचे एकशे आठ मानकरी गडावर जमत. गड आणि गडावरचं देवालय माणसांनी फुलून जाई. 

"लव्याजम्यानिशी देवीची पालखी-छबिना गावातून निघे आणि गडावर जाई. मोरचेले, अबदागिरी, चवऱ्या ढाळल्या जात. सनई-चौघडा वाजत राही. याही मिरवणुकीत आई-दादांना जावं लागे. 

"आईच्या दिमतीला सखूबाई नावाची एक अनुभवी कुणबीण नित्य असे. कुठे काय रीतभात पाळायची, वहिवाट काय आहे, हे आदब राखून ती आईला हलक्या आवाजात सांगत राही."

"हे संस्थान होतं. जगदंबा ही राजघराण्याची कुलदेवता होती. इथल्या प्रत्येक सकाळला फुलांचा, तुळशीचा, धूपाचा गंध होता. सनई-चौघड्यांचा, घंटांचा, शिंग-तुताऱ्यांचा, झाजांचा नाद होता. इथल्या दुपारींना नैवेद्याची रुची आणि केशराचा घमघमाट होता. इथल्या संध्याकाळला स्तोत्रांचा, आरतीचा स्वर होता आणि रात्रींना गाण्या-बजावण्याचा, नाचरंगाचा आनंद होता. 

"आईच्या तोंडावर तेज आलं. वागण्यात विशेष आब आला. ती चांगली उजळ आणि किंचित स्थूल दिसायला लागली आणि ती आमच्याजवळ दादांचा उल्लेख करताना ‘हे तुकारामबोवा’ असा करेनाशी झाली. तुकारामबोवा या शब्दाची जागा आता ‘स्वारी’ या आदरार्थी शब्दानं घेतली. 

"आईचा कडक स्वभाव आणि फाडफाड बोलणं यामुळे दादांनी तिचं टोपणनाव ‘फौजदार’ ठेवलं होतं. आमच्यापाशी तिचा उल्लेख तर ते ‘फौजदार’ म्हणून करतच; पण तिच्या तोंडावर देखील करत. आता त्याऐवजी ते आईचा उल्लेख ‘वहिवाटदारीणबाई’ असा करू लागले."

"आता अगदी आई आत्मविश्वासानं काकासाठी मुली बघू लागली. 

"दादांनी सावधपणे म्हणून पाहिलं, “अहो, हे वैभव चार दिवसांचं आहे आणि ते सुद्धा जगदंबेचं आहे. आपलं नव्हे.” 

"तर ही म्हणाली, “तिच्याच कृपेनं सगळं निर्विघ्नपणे पार पाडेल. माणूसबळ आहे, जागा आहे, भांडीकुंडी आहेत. बाकी तुमचं काही नको आम्हाला. केवळ तुमचा भाऊ म्हणून एखाद्या मुलीचा बाप दोन्हीकडचं लग्न करून देईल आणि वर वरदक्षिणा सुद्धा तुमच्या पुढे ताट भरून ठेवेल. बघा तुम्ही!”"

"देवस्थानचा एवढा मोठा खटला चालवायचा, वेळच्या वेळी पूजाअर्चा, विशेष दिवस साजरे करायचे याचं नाही म्हटलं तरी एक मोठं दडपण माझ्या वडलांच्या मनावर असायचं. 

"त्यांना सर्वांत चिंता वाटायची, ती जामदारखान्यातल्या देवीच्या दागदागिन्यांची. जुनेपुराणे आणि फार मूल्यवान असे हे रत्नामाणकांचे, सोन्या-मोत्यांचे दागिने होते. चांदीच्या ताटवाट्या, भांडी, तबकं, पूजेची नाना उपकरणं, रेशमी वस्त्रं – असलं केवढं तरी भांडार जामदारखान्यात होतं. तिजोऱ्यांतून, जागच्या हलविता येऊ नयेत अशा प्रचंड मोठ्या लाकडी पेट्यांतून हे सामान बंदोबस्तानं ठेवलेलं होतं. पेट्यांना मोठमोठी कुलुपं होती. या जमादारखान्यात बसून वडील जेव्हा काही काम करीत असत, तेव्हा लोखंडी गज लावलेलं जामदारखान्याचं बाहेरचं दार बंद असे, आतलं दार तेवढं उघडं असे आणि बाहेर हत्यारबंद शिपाई उभा असे."

"दोन, तीन, चार दिवस दादा असे गप्प गप्प होते. चिडत होते. सारखे जामदारखान्यात जाऊन बसत होते. सुस्कारे सोडत होते. रात्री नीट झोपत नव्हते. 

"शेवटी आई काकुळती येऊन म्हणाली, “अहो, मी तुमचे पाय धरते. काय झालंय ते मला सांगा.”"

"“देवीच्या गळ्यातल्या हारात जडवलेलं पन्ना रत्न.” 

“अग्गबाई!” 

"“हार मोठ्या मोत्यांचा आहे. त्याच्या छातीवरच्या पदकात हा पन्ना माणकांच्या मधे बसवलेला होता. तो सुटला होता म्हणून मी वेगळ्या पुडीत बांधून हाराच्याच पेटीत ठेवला होता. तो नाही….” 

"“फार किमती असणार.” 

"“सगळं लिहिलेलं असतं दप्तरात. हार पाऊण लाख किमतीचा आहे.”"

" ... लखोबानं पुडी ओंजळीत ठेवली आणि वाकून दादांना दाखवत म्हटलं, “बघा बघू आपण आपल्या डोळ्यांनी, हीच का ती पुडी?” 

"दादा पुडी बघून चकित झाले. त्यांचे डोळे विस्फारले. घाईनं त्यांनी पुडी घेतली. उघडली. 

"आत ते बहुमोल रत्न होतं! 

"“लखोबा अरे, हे कुठून मिळवलंस तू? केवढं काम केलंस! माझा प्राण वाचवलास.” 

"लखोबाला गहिवरून आलं. दोन्ही हात जोडून कपाळाला लावून तो म्हणाला, “पंत, तुम्ही पुण्याई जोडली होती म्हणून हा भारी जिन्नस उकिरड्यावर जाऊन पडलेला पुन्हा तुमच्या हाती आला.”"

"आईनं पुरणा-वरणाचा स्वयंपाक करून लखोबाला, त्याच्या बायकोला, धाकट्या दोन मुलांना जेवायला बोलावलं. आग्रह करून करून त्यांना जेवू घातलं आणि माझ्या हातून लखोबाला एक फेटा, धोतराचं पान आणि अंगरख्याचं कापड दिलं. त्याच्या बायकोची ओटी स्वत: भरली. तिला चोळी-लुगडं दिलं. पोरांच्या हातांवर दोन-दोन रुपये ठेवले. 

"वहिवाटदारीणबाईंनी केलेला हा सत्कार घेता घेता लखोबा आणि त्याची बायको लाजून गेली. ते दोघं वडलांच्या आणि आईच्या पाया पडले. 

"दादा आईला म्हणाले, “हे तू उत्तम केलंस. मी आपले कडोसरीचे काढून अकरा रुपये त्याला देणार होतो. सगळ्यांना जेवायला बोलवावं हे काही मला सुचलं नसतं.”"

"साखरगडची तीन, साडेतीन वर्षं संपली. माझी लहान बहीण तीन वर्षांची झाली. 

"दादांची बदली पुन्हा पहिल्या जागी झाली. 

"औटघटकेचे वहिवाटदार पुन्हा कारकून झाले. बिऱ्हाड-बाजलं उचलून आम्ही साखरगड सोडला. 

"आईच्या मनात साखरगडची आठवण सदैव राहिली. 

"देवीच्या नावानं ती जन्मभर मंगळवारचा उपवास करीत राहिली"
................................................................................................
................................................................................................
6.
................................................................................................
................................................................................................

"दुसरं महायुद्ध सुरू होतं. हे मिळत नाही, ते मिळत नाही असे दिवस होते. चड्ड्यांसाठी लागणारं खाकी कापड सुद्धा रेशनवर मिळायचं. शिवाय रेशनवर आणखीही काहीबाही मिळायचं. ‘मिलो’ नावाचं ज्वारीसारखं पण निकृष्ट धान्य, घोड्याच्या दातासारखा दिसणारा तांबडा-पिवळा मका. फोडी करून वाळवलेले बटाटे आणि साखर. 

"अशा नको त्या काळात आठवं भावंडं जन्माला आलं. चांगला गोरागोमटा पोरगा होता. फार गुणी, फार बोलका, चुणचुणीत. त्याला समजही फार होती. कधी भोकाड पसरून हे पोर रडलं नाही. कधी नको त्या जागी शी करून ठेवली नाही. सदा खुदुखुदु हसायचं. लवकर चालायला लागलं. त्याच्या तोंडाचं बोळकं फार लवकर दातांनी भरून गेलं. लवकरच कुलुकुलु बोलायलाही लागलं. डोक्यावर भुऱ्या केसांचं टोपलं, निळे डोळे, गुलाबी ओठ असं हे रूपवान पोर, गळ्यात काळा गोफ घालून घरभर प्रवास करताना अजून माझ्या डोळ्यांपुढे तस्सं दिसतं. 

"हे इतकं गुणी होतं की आई वारंवार बोलून दाखवी, “अरे, हे पोर फार गुण करतंय, जगतंय का जातंय, कुणाला ठाऊक!”"

"एका उदास रात्री हे गुणी पोर आईच्या मांडीवर मरून मोकळं झालं. आई त्याच्या तोंडावरून हात फिरवून म्हणाली, “बाळा माझ्या, अरे का रे, माझ्या पोटी आलास आणि दोन वर्षांचा होऊन माझ्या मांडीवर गेलास?”

"महायुद्धाचा वणवा सारखा भडकत होता. जगभर पसरत होता. बाँबफेकीनं शहरं बेचिराख होत होती. विमानं धडाधड कोसळत होती. बोटी बुडत होत्या. तोफा गर्जत होत्या. लाखांनी माणसं मरत होती. शहरं, खेडी, कुटुंब उद्ध्वस्त होत होती. अशा काळातच बारीकराव व्ह. फा. परीक्षा पास झाले. आईला-दादांना आनंद झाला."

"महायुद्ध आलं, गेलं. माझ्या जन्मगावी फार मोठे बदल झाले नाहीत. काही पोरं मिलिटरीत भरती झाली. एखादं-दुसरं लढाईत मारलं गेलं. तालुक्याला आलेल्या पोस्टाच्या रनरनं काही मनिऑर्डरी, काही पत्रं – आघाडीवरनं आलेली – गावात पोहोचविली. 

"स्वातंत्र्य मिळालं. देशात आनंदीआनंद झाला. काही फार बदल गावात झाला नाही. शाळेवर झेंडा फडफडला. मास्तरांनी पोरं घेऊन प्रभातफेरी काढली. शाळेपुढे जमून गावकऱ्यांनी ‘झेंडे की जय,’ ‘गांधी की जय,’ ‘भारत माता की जय’ अशा घोषणा केल्या. पाटलांनी पोरांना ऊस वाटले. 

"महात्मा गांधींचा खून झाला आणि दिल्लीच्या बिर्ला मंदिराच्या दारात झाडलेल्या पिस्तुलाचे बार मात्र इथं वाजले. ‘हे राम’ हे शेवटचे शब्द इथे उमटले. शुभ्र खादीवस्त्रावर लाल रक्ताचे डाग पडले आणि पसरले, त्याचे चार शिंतोडे इथपर्यंत आले. आधी घोंगावत बातमी आली. मागोमाग वाजत गर्जत लोकांचा लोंढा आला. 

"‘आले, आले, बामणांची घरं जाळायला लोक आले!’ असा ओरडा गावात होतो न होतो, लोक सावध होतात न होतात, तोच वावटळ यावी तशी गरगरत झुंड आली. बेफाम झालेले लोक होते. त्यांच्या हातात काठ्या होत्या. कुऱ्हाडी होत्या. गावात शिरल्या-शिरल्या त्यांनी उगाचच चार लोकांना काठ्या घातल्या. दहशत पसरवली. लगेच मागून लोकांनी आणि रॉकेल तेलाच्या डब्यांनी भरून ट्रक आले. गावातल्या लोकांना धाकदपटशा दाखवून त्यांनी हुकूम सोडले, “बामणाची घरं दावा!” 

"काही पळाले, काहींनी भीतीनं, तर काहींनी परिणामाची काही कल्पना नसल्यामुळे घरं दाखवली. 

"झुंडीच्या झुंडी काठ्या वर करून, जळते पलिते घेऊन दरवाज्यातून आत घुसल्या. 

"“बायकापोरांस्नी घिऊन बाहेर पडा. आमी घर पेटवनार हाय!” 

"“का? आम्ही काय केलं? तुम्ही कोण?” असं विचारायची हिंमत कुणाला होणार? घाबरून, भीतीनं कापत, बायकापोरं, म्हातारी माणसं बाहेर पडली. 

"खांबांवर रॉकेल ओतून त्याला पलिता लावण्यात आला. धारच्या धार ओतून गाईगुरं बांधायचा गोठा, त्यावरचं छप्पर याला चूड लावण्यात आली."

"घरं जळून गेलेली, उघड्यावर पडलेले हे गावातल्या आठ घरांतले लोक देवळात, पारावर, कुणाच्या पडवीत, कुणाच्या सोप्यात राहिले. अंगावरच्या वस्त्राखेरीज त्यांच्यापाशी काही राहिलं नव्हतं. 

"मग कोणी आपल्या रानात झोपड्या घालून राहिले. कुणी परगावी आपल्या नात्यातल्या माणसांकडे गेले, कुणी त्याच जळक्या घरात, जागा साफसूफ करून जी उभी भिंत होती, तिच्या आधारानं छप्पर घालून राहिले."

"ही सगळी हकिकत कळल्यावर थोरल्या भावाचं तातडीचं पत्र आलं आणि माझी आई, वडील, भावंडं काही महिने थोरल्या भावाकडे जाऊन राहिले."

"वडील पार काळवंडून गेले. त्यांची जगण्यावरची वासनाच उडाली. हे काय झालं? मी कुणाचा काय अपराध केला होता? असं घोकता-घोकता त्यांना आला दिवस जड वाटू लागला. सगळ्यांनी धीर दिला, “दादा, जाऊ द्या. घर गेलं म्हणजे काय नशीब गेलं का? आपण पुन्हा घर उभारू. पुन्हा संसार उभा करू. आम्ही आहोत ना, तुम्ही धीर टाकू नका. उभारी ठेवा, आपण सगळं पुन्हा उभारू.” 

"दादा ‘होय-होय’ म्हणत पण त्यांच्या मनानं, त्यांच्या शरीरानं उभारी धरली नाही."

"थोरल्या भावाच्या मांडीवर डोकं ठेवून दादा गेले. 

"आई एकटी राहिली. 

"इथून पुढे तीस वर्षं तिला एकटीला वाट चालायची होती. आणखी काय काय पाहायचं होतं!"
................................................................................................
................................................................................................
7. 
................................................................................................
................................................................................................

"आईलाही फार वाईट वाटलं. 

"मग तिनं विचार कर-कर केला आणि मध्यानरात्री अंथरुणावर पडल्या पडल्या म्हणाली, “एवढं महत्त्वाचं वाटतंय हे शिक्षण तुला, तर माझं माहेरचं घर विक. कशाला जातेय मी आता तिथं राहायला? तुझ्या गरजेपुरते पैसे त्यातनं सहज येतील.” 

"माझा भाऊ चकित झाला. आपल्या आईवडलांचं हे घर, इथं आपलं बालपण गेलं म्हणून आईला ते फार प्रिय होतं. 

"हे चिरेबंदी घर छान होतं. आईला भाऊ नव्हता. नाहीतर हा बालगीतातल्या मामाचा वाडा शोभला असता. इथल्या रुंद अंगणात, भागलेल्या चांदोबाला लपायला निंबोणीचं झाड सुद्धा होतं. आईची चांगली पिकणारी बागाईत, जिराईत अशी अठरा एकर जमीन या गावी होती. त्यामुळे मामाच्या वाड्यात जाऊन, तूपरोटी खाऊन यायलाही आम्हा कुणाला आडकाठी नव्हती. 

"माझ्या भावानं विचारलं, “मनापासून म्हणतेस का गं?” 

"“होय रे. माझ्यापाशी दुसरं काय आहे देण्यासारखं? आणि शिक्षणासाठीच विकतो आहेस. पुण्यच जोडतेय मी!” 

"माझी आई काही पंडिता नव्हती, सर्वनाशही ओढविलेला नव्हता, तरी आपल्या वाट्याला आलेली ही अर्धी इस्टेट तिनं आनंदानं त्यजिली."
................................................................................................
................................................................................................
8. 
................................................................................................
................................................................................................

"वडलांच्या माघारी आई बरीच वर्षं माझ्या जन्मगावी होती. घरचा, शेतीवाडीचा बराच कारभार तिच्या सल्ल्यानुसार चालायचा. आता सुबत्ता आली होती. तीन मुलं मिळवू लागली होती. बाकी दोघं उद्या हाताशी येणार होती. ‘सगळे आपल्या मनाप्रमाणे खर्च करतात. मग मीच काटकसर कशाला करू?’ असं म्हणून आई तडाखेबंद असा दानधर्म करायची."

"सुनांवर रागावली म्हणजे आई म्हणे, “नऊ महिने ओझं मी वागवलं, मी खस्ता खाल्ल्या, दृष्टीची दोरी आणि हातांचा पाळणा करून पोरं मी वाढवली आणि आयत्या पिठावर रेघोट्या मारायला या आल्या. काल आल्या आणि आज मालकिणी झाल्या. माझी मुलं यांना फुकटात मिळाली.” 

"सुनांचं ती बिलकूल ऐकून घेत नसे; पण मुलं बोलली की ती फार घायाळ व्हायची. 

"थेट उठून पंढरपुरी जाऊन ऱ्हायची. मन शांत झालं म्हणजे घरी यायची. 

"गावी एकाच्या दोन सुना झाल्या. मुलंही एकाऐवजी दोन एकत्र राहू लागली. साहजिकच भांड्याला भांडं लागू लागलं. आवाज होऊ लागले. 

"बराच काळ आईनं आवाज सोसले आणि ते कान किटतील एवढे वाढले तेव्हा ती थेट उठून गाडीत बसली आणि थोरल्या लेकाकडे पुण्याला आली आणि राहिली."

"गावी ॠतू ठळक जाणवायचे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा जाणवायचा. इथं ते सगळं सपाट होतं. तिथं काळाचा प्रवाह खडकावर आपटत, खाली कोसळत, कधी उड्या घेत, कधी फेसाळत वाहणारा होता. इथं तो संथ, शांत दोन्ही काठ बांधून काढलेला होता. तिथं रानं होती, इथं बाग होती. तिथं सकाळ कोंबडा आरवून व्हायची, इथं रेडिओच्या मंगलप्रभातानं होऊ लागली."

"आता तिला देवधर्म करावा, चारीधाम यात्रा करावी असं फार वाटायचं. सारखी घोकायची. 

"मी एकदा म्हणालो, “चल, मी तुला सगळीकडे नेऊन आणतो.” तर म्हणाली, 

"“थोरला लागतो बाबा सोबत. थोरल्या मुलाला बरोबर घेऊन सगळं करायचं आहे मला.” 

"ही तिची इच्छा शेवटपर्यंत काही पुरी झाली नाही."
................................................................................................
................................................................................................
9. 
................................................................................................
................................................................................................

" ... दोन मुली गेल्या आणि आईनं जपाची माळ टाकून दिली. 

"हरिपाठ, करुणाष्टकं – काही म्हणेनाशी झाली. तो तसबिरींचा पसाराही तिनं आवरून टाकला. 

"घरीदारी कोणीही मोठ्या आवाजात कण्हू लागलं की, त्याला ‘देवाचं नाव घ्या…’ असं दरडावून सांगणारी आई अजिबात देवाचं नाव घेईनाशी झाली. तिनं देवाचा एवढा मोठा राग केलेला मी कधीच पाहिला नव्हता.

"– आणि तिचं आजारपण चालू असतानाच मोठा लेक आजारी झाला. साधा खोकला म्हणता-म्हणता त्या आजारानं पुढे अक्राळविक्राळ रूप घेतलं."
................................................................................................
................................................................................................
10.
................................................................................................
................................................................................................

"एखाद्या भुसनळ्याप्रमाणे डोळे दिपवणारं आणि आजूबाजूचा काळोख उजळून टाकणारं या आपल्या मुलाचं कर्तृत्व आईनं फार जवळून पाहिलं होतं. 

"त्याचा सगळा प्रवासच तिच्या परिचयाचा होता. आपल्याला एकट्यालाच वरवर जायचं नाही, सर्वांना घेऊन जायचं आहे याची जाण याला होती. अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला मिळालेल्या लाभाचा वाटा त्यानं लहानधाकट्या भावंडापर्यंत पोहोचविला होता. शिक्षणं केली होती, आजारपणं सावडली होती. लग्न-कार्य पार पाडली होती. कर्ज आणि देणी वारली होती. जमिनी लागवडीला आणल्या होत्या आणि घरं बांधली होती. 

"यानं घर मोठं केलं होतं. आडनाव मोठं केलं होतं. आपल्या लहानशा खेड्याला नकाशावर आणलं होतं. 

"महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात केवढी तरी भर या एकट्या माणसानं घातली होती. यानं शेकडो चित्रपटकथा लिहिल्या. सुंदर-सुंदर अशी शेकडो भावगीतं लिहिली, गाणी लिहिली, स्वातंत्र्य-चळवळीत येण्याचे आवाहन करणारे स्फूर्तिप्रद असे पोवाडे लिहिले. परचक्र येताच अंगावर रोमांच उभे राहतील, मूठ उगारून शस्त्र उभारून रणाकडे धाव घ्यावी असं वाटेल अशी संग्रामगीतं, स्फूर्तिगीतं, संचलनगीतं लिहिली. रामकथा गीतांतून नव्यानं सांगितली. कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या. सभासंमेलनं गाजविली. बालगंधर्वांनी गाणं जसं मराठी घराघरांतून पोहोचविलं, तशी ह्यांनी ‘कविता’ नावाची वस्तू घराघरांतून पोहोचविली. त्यांच्या शब्दांच्या ओळी मराठी भाषेत जाऊन बसल्या."

"डिसेंबर महिन्यात आईच्या आयुष्यातलं एक नवल घडलं. 

"‘आदर्श माता’ म्हणून तिचा जाहीरपणे सत्कार ठरला."

"नोकरीच्या गावी असताना माझा एक छान, गोरागोरा असा शंकर म्हणून मित्र होता. तो जातीनं चांभार. आणखी एक सालोमन होता. हा ज्यू. पण मधल्या सुट्टीत धावत-पळत मी मित्रांना घेऊन घरात घुसायचो. हाती लागेल ते खायचो, पाणी प्यायचो. याबद्दल तिनं मला दटावल्याचं, बंदी घातल्याचं मला कधी स्मरत नाही. 

"माझ्या मोठ्या भावाचेही असे अनेक मित्र होते. एक बद्रुद्दीन होता, एक कुंभार होता, एक लाड होता, एक जैन होता. त्यांना सगळ्या घरात मुक्त संचार करता येत असे. आमच्या गावी तर घर सारवायला, भांडी धुवायला रामोशीण होती आणि कपडे धुवायला रश्शी नावाची महारीण होती. यामुळे आईच्या व्रतवैकल्यात कधी बाधा येत नसे. गुरवाची म्हातारी शेवटच्या आजारात देवळात जाऊन पडली, तर आई रोज तिला मऊ भात आणि लिंबाचं लोणचं घेऊन खाऊ घालायला जायची.

"गुणी मारुती म्हणून एक महार शाहीर होता. म्हातारा झाला, खूप थकला. हा वाकत वाकत यायचा आणि मागल्या दारी काठी वाजवायचा. 

"आई जाऊन बघायची, तर हा. 

“काय म्हणता, मारुतीबाबा?”

"“काकी, मला सांजा खावा वाटतो.” 

"“बसा, मी करते आणि देते.”

"आज मला तिच्या या वागण्याची फार अपूर्वाई वाटते. पण तिनं वैयक्तिक जीवनात केलेल्या या गोष्टींबद्दल कुणी तिचा कधी जाहीर सत्कार केला नसता. 

"तिनं शिक्षणासाठीही अनेकांना मदत केली. मदत केली म्हणजे उचलून पैसे दिले नाहीत; पण कष्ट केले. जेवणखाण करून घातलं. कपडे धुतले. 

"नात्यातला कुणी चुलत, मावसभाऊ शिक्षणानं अडला की ही उत्तेजन द्यायची. 

"‘माझ्याकडे येऊन राहा. पाच पोरांत तू सहावा अधिक नाहीस.’ म्हणायची. 

"भुकेलेल्याला अन्न दिलं की पुण्य लागतं, तसं कुणाच्या शिक्षणाला मदत केली, तरीही लागतं असं ती म्हणे. 

"तिच्या या लहानशा कामाबद्दलही कोणी उपकृत विद्यार्थ्यानं मोठेपणी तिला कृतज्ञतेचा नमस्कार वाकून केला असेल, पण जाहीर सत्कार कोण आणि कशाबद्दल करील?"

"समारंभाला सुरुवात होऊन अर्धाएक तास झाला असेल, नसेल. कोणीतरी गृहस्थ रांगेत वाट काढत माझ्यापर्यंत आले. माझ्या खांद्याला स्पर्श करून कानात बोलले, “कविराजांना बरं नाही, आपल्याला घरी जायचं आहे.” 

"मी उठलो आणि माझ्याप्रमाणेच कोणीतरी आईलाही व्यासपीठावरून हाताला धरून खाली उतरवताना मी पाहिलं. 

"म्हणजे? काय घडलं आहे? 

"आम्हाला घेऊन जाण्यासाठी मोटार आली. आई, मी बसलो. सहा-सात मिनिटांत घरी येऊन पोहोचलो. 

"– आणि शोकाचा कल्लोळ कानांवर आला."

"आई लटपटत पुढे आली. मोठ्या मुलाच्या चेहऱ्याकडे तिनं क्षणभर निरखून पाहिलं. छातीवरची शर्टाची बटनं काढली आणि लेकाच्या रुंद छातीवरनं ती सबंध असा हात फिरवीत फिरवीत म्हणाली, “बाळा, बाळा रे….”"
................................................................................................
................................................................................................
11. 
................................................................................................
................................................................................................

"आईचं शेवटचं दर्शन मला झालं नाही. मला नाही, माझ्याप्रमाणेच अडीचशे मैल धावत आलेल्या सर्वांत धाकट्या भावालाही नाही. 

:सोप्यात भिंतीला टेकून बसलो आणि एक खिन्न जाणीव झाली की, बांधल्या पेंढीचा आळा आता सुटला आहे. सर्वांना बांधून ठेवेल असं काही उरलेलं नाही. 

"आई गेली की माणसाचं बरंच काही जातं.

"फार दिवसांनी मी भेटलो, बोलत बसलो म्हणजे कधी कधी आई माझ्या बालपणीच्या आठवणी सांगे. 

"म्हणे, “फार आईवेडा होतास. सारखा माझ्या मागं-मागं असायचास. ओढ्यावर पाण्याला गेले की मागं यायचास. 

"“संध्याकाळी देवाला गेले की बरोबर यायचास. कुठं ओळखीच्या घरी बोला-बसायला गेले तरी माझी पाठ काही सोडायचा नाहीस. गाईमागं वासरू असतं ना, तसा सतत माझ्या मागं असायचास.” 

"एवढं म्हणून आई साभिप्राय हसायची. म्हणजे भावार्थ असा की तुम्ही लहानधाकटे असता तेव्हा आई हवी असते; मोठे झालात की तिची गरज संपते. 

"मग पुढं झुकून चौकशी व्हायची, “बरे आहात का? प्रकृती कशी आहे? हा असल्या आजाराचा साप तुम्हा दोघातिघा भावंडांच्या पायात काय म्हणून सोडला असेल रे देवानं?” 

"– आणि इथं शब्द थांबायचे. जीर्णशीर्ण हात माझ्या पाठीवरनं, केसांतनं फिरायचा."

"राखेच्या एवढ्याशा ढिगाकडे बघत वाळूत मी उभा. 

"भराभरा सगळे पुढे सरकले. 

"“– पुढे व्हा, काका.” 

"मी उकिडवा बसून इतरांच्याबरोबर राख सावडू लागलो. 

"एक बोटाएवढा अस्थीचा तुकडा हाती आला. 

"त्याच्याभोवती तांबड्या काचेचं कडं होतं. 

"हे मनगट. ही आगीच्या आचेनं एवढीशी राहिलेली बांगडी. 

"शेवटी हे एवढंच मी पाहिलं आईचं : राख, एवढासा अस्थिवशेष आणि काचेची बांगडी…."
................................................................................................
................................................................................................

................................................................................................
................................................................................................

................................................
................................................

January 03, 2022 - 

January 11, 2022 - January 11, 2022

Purchased August 22, 2021. 

Kindle Edition
Published January 1st 1982

ASIN:- B071HDWRHB

ASIN:- B073M5M5VG
................................................
................................................
Kindle Edition
Published January 1st 1982

ASIN:- B073M5M5VG
................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4467815838
................................................................................................
................................................................................................
https://www.goodreads.com/review/show/4467814337
................................................................................................
................................................................................................